Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 2 April 2008

मतभेद उफाळले, कामत सरकार अस्थिरतेच्या गर्तेत

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील मतभेद पुन्हा एकदा तीव्रतेने उफाळून आल्याने दिगंबर कामत सरकार पुन्हा एकदा अस्थिरतेच्या गर्तेत सापडले आहे. सतत सुरू असलेला हा वाद एकदाचा संपवावा या निर्धाराने कॉंग्रेसमधील एक गट सक्रिय बनल्याने येत्या दोन दिवसांत राज्यात वेगवान राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरोधात कॉंग्रेस पक्षातील एक गट पुढे सरसावला असून राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांना आघाडी बाहेर काढून नवा पर्याय बनवण्याचा अनोखा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर ठेवल्याचे वृत्त आहे. पाशेको व चर्चिल आलेमाव यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याने व चर्चिल यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते काढून घेण्यासाठी मिकी यांनी आपला दबाव वाढवल्याने या गटात अस्वस्थता पसरली आहे. वित्तमंत्री नार्वेकर यांच्याकडील खाते काढून घेण्याबाबतही मिकी ठाम असल्याने नार्वेकर व चर्चिल एकत्र आले आहेत. या गटाला आता गृहमंत्री रवी नाईक यांचाही पाठिंबा मिळत असल्याची चर्चा असून इतर मंत्री, आमदारांना एकत्र करण्याचे जोरदार प्रयत्न या गटाने चालवले आहेत.
दरम्यान, या वादाचे निमित्त पुढे करून आघाडी अंतर्गत नेतृत्व बदलाचाही मुद्दा रेटून धरण्याचा विचार काही नेत्यांनी चालवल्याने मुख्यमंत्री कामत यांच्यासाठी ही सत्वपरीक्षाच ठरण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. सरकारात नव्यानेच दाखल झालेल्या सुदिन ढवळीकर यांच्यामुळे काहीसे वातावरण बिघडले असताना आता मिकी पाशेको यांनी चर्चिल यांच्याकडील सा. बां. खाते काढून घेण्याचा दबाव वाढवला आहे. दुसरीकडे ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याने त्यासाठी मडकईकर यांच्यानंतर आता अन्य एका मंत्र्यावर संक्रांत येणार आहे. बाबूश सध्या दिल्लीत असून उद्या पांडुरंग मडकईकर हे दिल्लीला रवाना होणार आहेत. कॉंग्रेसचे गोवा प्रभारी हरीप्रसाद यांच्याबरोबर आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या एकही मंत्री आपले मंत्रिपद सोडण्यास तयार नसल्याने मुख्यमंत्र्यांसमोर संकट उभे राहीले आहे. मंत्रिपद जाण्याची सर्वात जास्त भीती ज्योकीम आलेमाव यांना असल्याने त्यांनी मिकी पाशेको यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या तीनही आमदारांना आघाडीतून बाहेर काढल्यास त्याजागी अन्य दोन मंत्रिपदे रिक्त होतील व सरकारला पाठींबा देणाऱ्या अन्य चेहऱ्यांना संधी देता येईल,असा सल्लाही देण्यात आल्याचे कळते. सध्याचे बलाबल पाहता कॉंग्रेस-१८, मगो-२, विश्वजित राणे, अनिल साळगावकर, बाबूश मोन्सेरात यांचा पाठींबा धरून हा आकडा २३ वर जातो. अशावेळी राष्ट्रवादीची गरजच नाही,अशी भूमिका या गटाने घेतली आहे. दरम्यान, मिकी पाशेको यांच्याबरोबर कॉंग्रेस पक्षातील काही नेते सामील असल्याची कुरबुर असून त्यामुळे हे गणीत प्रत्यक्षात उतरवणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यावर सुदिन ढवळीकर यांची नजर लागलीे आहे. तसेच विश्वजित व सुदिन यांनी राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आपले श्रेष्ठी मानल्याने राष्ट्रवादीला बाहेर काढण्याची योजना प्रत्यक्षात उतरणे कठीण झाले आहे. एका अर्थाने आघाडीतील ही रस्सीखेच एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच सुरू असल्याने त्यातून मुख्यमंत्री कामत कसे काय मार्ग काढतात याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

No comments: