Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 1 April 2008

आघाडीतील "बिघाडी' कायमच

बाबूशच्या मंत्रिपदाचा विषय ऐरणीवर
मडगाव दि.१ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाची अग्निपरीक्षा सहीसलामत पार पाडली असली तरी सध्याच्या आघाडीतील "बिघाडी' मात्र अजूनही कायम आहे. पाळीचे आमदार गुरुदास गावस यांनी हस्तकला महामंडळाच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा ताजा असताना आता ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना सुरुवातीस दिलेले मंत्रिमंडळातील समावेशाचे आश्वासन पुन्हा ऐरणीवर आले आहे. मोन्सेरात यांना जागा खाली करून देण्यासाठी आता सासष्टी तालुक्यातील एका मंत्र्यावर कुऱ्हाड येणार असल्याने पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकाराविरोधातील विरोधी भाजपने आपली धार कमी केल्याची चर्चा असताना आता आघाडीतीलच घटक सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली करीत असल्याने मुख्यमंत्री कामत यांना कसरत करावी लागणार आहे. पर्यटनमंत्री मिकी पाशेको व सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्यात बाणावली मतदारसंघावरून खटके उडण्यास सुरू झाल्याने हा पेच मुख्यमंत्र्यांसाठी अधिक डोकेदुखीचा ठरण्याचीच शक्यता आहे. दरम्यान, सरकारातील एक गट सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच आघाडीतून वगळण्याची भाषा करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मिकी पाशेको यांचे कुणाशीही पटत नसल्याने आघाडीतील अन्य घटक बेजार झाल्याचे कळते. बाकी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना कॉंग्रेस पक्षात येण्यासाठी गळ टाकण्याचा डाव शिजत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्याचे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची इच्छा अजूनही सोडलेली नाही. या खात्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जोरदार मोर्चेबांधणी चालवल्याचे वृत्त आहे. बाबूश उद्या दिल्लीला रवाना होत असल्याने या शक्यतेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे.
गावस यांचा राजीनामा फेटाळला
आमदार गुरुदास गावस यांचा राजीनामा स्वीकारण्यास मुख्यमंत्री कामत यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली असून त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गावस हे विश्र्वजित राणे यांच्या गटातील मानले जात असल्याने त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, विश्वजित राणे यांनी आमदार गावस यांच्याविरोधातच पाळी मतदारसंघात आपला प्रचार करण्यास सुरुवात केल्याने ते अधिक नाराज झाल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

No comments: