Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 1 February 2009

भारताच्या पुराव्यांवर पाकचे पुन्हा प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली, दि. १ - कुठल्याही चौकशी यंत्रणेकडून गुन्ह्याची चौकशी ज्या पद्धतीने व्हावी त्याच पद्धतीने पाकिस्तानकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याची चौकशी होत असून भारताने दिलेल्या पुराव्यांवर पाकिस्तानने काही पृच्छा केली असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी सूत्राने दिली. पाकिस्तानने दोन वेगवेगळ्या संचात पाठवलेल्या प्रश्नावलींपैकी एका प्रश्नावलीची उत्तरे भारताने पाठविलीही आहेत, अशीही माहिती या सूत्राने दिली.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी, माझ्या माहितीनुसार भारताकडील पुरावे प्राप्त होताच पाक सरकारने त्यावर आम्हाला असंख्य प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांची सर्व उत्तरे त्यांना पाठविण्यात आली, असे सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील करण थापर यांच्या "डेव्हिल्स ऍडव्होकेट' या कार्यक्रमात बोलताना सांगितले. पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चयुक्त वाजिद शमसूल हसन यांनी त्यांच्या नुकत्याच दिलेल्या वक्तव्यात, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानी भूमिवर शिजला नाही, असे म्हटले होते. वाजिद यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायणन यांनी वरील माहिती दिली.
दुसऱ्या संचात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना अजून प्राप्त झाली नसावीत असे मला वाटते. त्यामुळे पाकिस्तानचे उच्चायुक्त लंडनमध्ये कशाबद्दल बोलताहेत हे मी सांगू शकत नाही. त्यादेशात असंख्य बाबतीत बेबंदशाही आहे. तशीच याही बाबतीत ती असू शकते एवढेच मला म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया नारायणन यांनी दिली.
भारताच्या पुराव्यांवरील पाकिस्तानी प्रतिक्रियेबद्दल तुम्ही समाधानी आहात काय या प्रश्नावर बोलताना, "समाधान' या शब्दाचा नेमका अर्थ मला कळत नाही परंतु ते नक्कीच गांभिर्याने वागत आहेत असे वाटते. कुठल्याही चौकशी यंत्रणेने ज्या पद्धतीने तपास पुढे न्यावा त्याचप्रमाणे ते तपास करित आहेत. दिलेल्या माहितीची पडताळणी आणि शहानिशा करणे, पुराव्यांवर प्रश्न उपस्थित करणे, ही गांभिर्याने चौकशी करण्याची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे आमच्यादृष्टीने पाकने प्रश्न उपस्थित करणे, ही खुशखबर आहे. परंतु हे सर्व सोपस्कार झाल्यावर, त्यांच्याच श्रीमुखात हाणणारे सत्य ते स्वीकातील काय हे मला माहित नाही.

नारायण यांच्या वक्तव्याने गोंधळ :
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या भारताने पाकला दिलेल्या पुराव्यांवर पाकने काही पृच्छा केल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांच्या गौप्यस्फोटामुळे गोंधळ उडाला आहे. कारण, पाककडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसल्याच्या आपल्या विधानावर परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी ठाम आहेत.

गोव्यात प्रथमच शिर्डी साईबाबांच्या पादुका

पणजीत २२ रोजी भव्य दर्शनसोहळा
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - तब्बल ९१ वर्षानंतर भक्तांना दर्शन घेण्यासाठी बाहेर काढल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा पहिला मान गोव्यातील भक्तांना प्राप्त झाला आहे, ही साईभक्तांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही संधी गोव्यातील "साईबाबा पादुका दर्शन सोहळा समिती'ने उपलब्ध केली असून दि. २२ फेब्रुवारी रोजी पणजीत हा पादुकादर्शन सोहळा होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अनिल खंवटे यांनी आज दिली.
पहाटे ४ वाजता साईंच्या आरत्या झाल्यानंतर रात्री १२ पर्यंत साईंच्या पादुका दर्शनासाठी उपलब्ध असणार आहेत. या सोहळ्यात सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. कला अकादमी ते कांपाल मैदानापर्यंत शामियाना उभारण्यात येणार आहे. यासाठी खास कोल्हापूर येथून शामियाना उभारणाऱ्या एका आस्थापनाला हे काम सोपवण्यात आले आहे. या शामियानात दर्शन घेण्यासाठी रांगेत राहणाऱ्या भक्तांना पिण्याच्या पाण्याची तसेच दर्शन घेण्यास तसेच अपंग भक्तांसाठी खास व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. खंवटे यांनी यावेळी दिली.
"गोवा मुक्त झाल्यापासून साईंच्या पादुका गोव्यात आणण्याचा विचार अनेकांच्या मनात होता. परंतु, त्यावेळी साईंच्या मनात नसल्याने ते शक्य झाले नाही. आता कित्येक वर्षानंतर गोव्यातील भक्तांना ही संधी उपलब्ध होत असून हे गोव्यातील साई भक्तांचे भाग्य' असल्याचे श्री. खंवटे म्हणाले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली असून देणगीच्या स्वरूपात मदत करण्याचे आवाहन साईभक्तांना करण्यात आले आहे. त्याप्रमाणे गोव्यात असलेल्या ५१ साई मंदिराच्या समित्यांशी संपर्क साधण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पहाट ते रात्री या दरम्यान साईंच्या पारंपरिक चार आरत्या केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे साई भजनांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील कोणत्याही भजन मंडळांना याठिकाणी साईंचे भजन करण्याची इच्छा असल्यास त्यांनी या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. देणगी देण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी अध्यक्ष अनिल खंवटे(९६२३४४७४०१), सचिव प्रदीप पालेकर (९६२३४४७४१०) व खजिनदार विवेक पार्सेकर (९६२३४४७४०२) यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष टोनी रोड्रिगीस, शेख मुस्ताफ कादर, रवी नायडू, सहसचिव गौरीश धोंड, सहखजिनदार संतोष नाईक, सदस्य दिनेश वाघेला, मार्क वाझ, सुरज लोटलीकर, धीरज नाईक गावकर, प्रसाद मांद्रेकर, प्रकाश कित्तूर, विजय भोसले व सुभाष नाईक उपस्थित होते.

"सोनसोडो ऑपरेशन' ७० टक्के फत्ते?

० धुमसणाऱ्या आगीवर १८२ ट्रक माती
० आज सायंकाळपर्यंत पूर्णतः नियंत्रण


मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : गेला आठवडाभर धुमसत असलेली सोनसोडो येथील कचरा यार्डातील आग नियंत्रणाखाली आणण्यात मडगाव नगरपालिकेला यश न आल्याने अखेर आजपासून येथील जिल्हा आपत्कालीन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन कार्यरत झाले व आज एकाच दिवशी तब्बल १८२ ट्रक माती धुमसणाऱ्या कचऱ्यावर पसरविली गेली. उरलेले काम उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री व्यक्त केली जात आहे.
काल मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सोनसोडोवर जाऊन तेथील ऑपरेशनचा आढावा घेतला असता नगरपालिकेच्या मोहिमेत नियोजन नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी जिल्हा आपत्कालीन यंत्रणेस पुढाकार घेण्यास सांगितले व त्यानुसार आजचे ऑपरेशन पार पडले.
आज स्वतः जिल्हाधिकारी सोनसोडोवर उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही तेथे भेट दिली. कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स व नगराध्यक्ष साव्हियो कुतिन्हो यांनी आज बराच वेळ तेथे थांबून एकंदर ऑपरेशनवर लक्ष ठेवले . मुख्याधिकारी यशवंत तावडे व पालिकेचे अन्य अधिकारी तर सकाळी ८ वा. पासून सोनसोड्यावर ठाण मांडून राहिले ते सायंकाळी ७ वा. परतले.आजच्या मोहिमेमुळे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उरलेले उद्या सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असे तावडे यांनी सांगितले.
आजच्या ऑपरेशनसाठी विविध खाण कंपन्यांकडून तसेच बांधकाम ठेकेदार आर्थर डिसोजा व संतोष जॉर्ज यांच्या कडून टिपरी उपलब्ध करण्यात आल्या व दिवसभर त्यांनी एकूण १८२ टिपरी माती आणली व त्यामुळे सोनसोडो भागाला खाणसदृश रूप आज आले होते. इतक्या मोठ्या संख्येतील टिपरी तेथे वाहतूक करणार असल्याने कुडतरी रस्त्यावर कोणतीही वाहतूक समस्या उद्भवून लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी तेथे खास वाहतूक पोलिस तैनात करण्याची तसेच आगीमुळे खंडित झालेला यार्डांतील वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काल आपल्या सोनसोडो भेटीच्यावेळी पोलिस व वीज खाते अभियंत्यांना दिल्या होत्या आज त्याची कार्यवाही झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आज बव्हंशी आग विझली आहे व उद्या सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळेल अशी खात्री आहे.

अपहरणाच्या धमकीमुळे विमान दिल्लीत उतरविले

नवी दिल्ली, दि. १ - गोव्याहून निघालेले इंडिगो कंपनीचे ई-६६४ हे प्रवासी विमान आज अचानकपणे नवी दिल्ली विमानतळावर उतरविणे भाग पडले.गोव्याहून निघालेल्या विमानातील दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमणपणे वागून, विमानाचे अपहरण करण्याची धमकी दिली, त्यामुळे विमान तातडीने उतरावे लागले, असे स्पष्टीकरण रात्री उशिरा सरकारतर्फे करण्यात आले.
सर्व प्रकारची खबरदारी घेऊन विमान उतरविण्यात आले, असे नागरी विमान सचिव एम. माधवन यांनी पत्रकारांना सांगितले. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच दोन तासांनी प्रवाशांना विमानातून बाहेर जाण्यास संमती देण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. त्या दोघा प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि दिल्ली पोलिसांनी तातडीने धाव घेतली तसेच सीमा सुरक्षा दलाच्या विमानांनाही सतर्क करण्यात आले. या विमानातील दोन प्रवाशांनी हुल्लडबाजी करीत आपल्याकडे चाकू असल्याची धमकी दिल्याने हा गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार वैमानिकाने हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बाजूला नेले, त्यावेळी कमांडोनी त्याला वेढा घातला. दोघा प्रवाशांनी अतिशय आक्रमकपणे शिवीगाळ करायला सुरवात केल्याने वैमानिकाने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी सर्वत्र विमानाचे अपहरण झाल्याची अफवा पसरली, तर एका दूरचित्रवाणी वाहिनीने अशा स्थितीत काय होऊ शकते ते पाहाण्यासाठी हा प्रयोग (मॉक ड्रिल) करण्यात आल्याची माहिती प्रसृत केली. तथापि सरकारने वस्तुस्थिती स्पष्ट करीत धोका टळला असल्याची माहिती रात्री दिली.

Saturday, 31 January 2009

'व्हॅट'लागू केल्याने गॅस, इंधन महागले कामत सरकारचा ग्राहकांना दणका

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) : वाढत्या महागाईने त्रस्त बनलेल्या जनतेच्या रोषाचा तडाखा निवडणुकीत बसणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे केंद्रातील संपुआ सरकारने अपेक्षेप्रमाणे गॅस सिलिंडर व इंधनाच्या दरात कपात करून एक दिवसही उलटला नाही, तोच राज्य सरकारने नव्याने "व्हॅट' लागू केल्याने पुन्हा एकदा गॅस व पेट्रोल आणि डिझेलही वाढीव दराने खरेदी करण्याची पाळी गोमंतकीयांवर आली आहे. या वाढीचा तीव्र निषेध सर्व स्तरावर होत असून व्हॅट तातडीने मागे घेण्याची मागणी भाजपने केली आहे.
केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा करताना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडराच्या किमतीत २५ रुपये कपात केली होती, मात्र गोवा सरकारने ४ टक्के "व्हॅट'(मुल्यवर्धित कर) पुन्हा लागू केल्याने केवळ ११ रुपये किंमत कमी झाली आहे. मागे सिलिंडरचे दर वाढल्यावर राज्य सरकारने त्यावरील ४ टक्के व्हॅट कमी केला होता. त्यामुळे ३५४ रुपयांचा सिलिंडर ३४० मध्ये उपलब्ध होत होता. आता केंद्राने २५ रुपये कपात जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने अचानक पुन्हा व्हॅट लागू करून गृहिणींचा आनंद हिरावून घेतला आहे. अन्य राज्यांत सिलिंडर २५ रुपयांनी कमी झाला असला तरी गोव्यात मात्र ११ रुपये कमी झाला आहे. याबद्दल ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
कॉंग्रेसकडून राजकारण
आंतरराष्ट्रीय बाजारात जरी कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्या असल्या तरी कॉंग्रेसने तेल कंपन्यांशी संगनमत करून जनतेला गेले दोन महिने लुटले आणि आता लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी इंधनाच्या किमती उतरवून त्याचे राजकीय भांडवल चालवले आहे. मात्र त्याच वेळी विमान कंपन्यांच्या मालकांशी साटेलोटे करून विमान इंधनाचे दर केंद्र सरकारने लगेच उतरवले होते. तथापि, आम आदमीच्या नावाने सतत गळा काढणाऱ्या कॉंग्रेसने तेल कंपन्यांना जो करोडो रुपयांचा फायदा करून दिला तो निवडणूक निधीच्या उभारणीसाठी तर नव्हे ना, असा सवाल भारतीय जनता पक्षाने एका पत्रकाद्वारे केला आहे. विशेष म्हणजे या उतरलेल्या दरांची घोषणा पंतप्रधान किंवा पेट्रोलियम मंत्र्यांनी नव्हे तर कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा श्रीमती सोनिया गांधी यांनी दिल्लीत केली. हे तर खालच्या पातळीवरील राजकारण झाले. या दर उतरवल्याच्या बाता मारून आपण लोककल्याण करत असल्याचे स्वप्न कॉंग्रेसने पाहू नये. त्या पक्षाच्या दिशाहीन राजकारणाला कंटाळलेली जनता आता त्यांना घरची वाट दाखवण्याच्या प्रतीक्षेत असल्याचेही पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोविंद पर्वतकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसवरील दर कमी केल्यानंतर आता गोवा सरकारने "व्हॅट' लागू करून एके प्रकारे जनतेवर अन्याय केला आहे. आम आदमीच्या सरकारने अशा प्रकारे गोव्याच्या जनतेला लुटण्याची पद्धत अवलंबली असून ही नवीन पद्धत त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे. आज संध्याकाळी वास्कोच्या भाजप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री आर्लेकर यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलवर ५ रुपये, डिझेलवर २ रुपये व एलपीजी गॅस वर २५ रुपयांची कपात केल्यानंतर याचाच फायदा उठवीत गोवा सरकारने व्हॅटमध्ये वाढ केली आहे. काल सकाळपर्यंत ४०.७० रु. असलेली पेट्रोलची किंमत आजपासून ४१.३६ झाल्याचे श्री आर्लेकर यांनी यावेळी सांगून ३२२ रुपयाचा गॅस ३३४ तर ३२.७१ चे डिझेल ३३.२५ रु.प्रतिलीटर झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारकडून कमी करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरात अशा प्रकारे वाढ केल्याने गोवा सरकारबाबत जनतेमध्ये सध्या अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असल्याचे श्री आर्लेकर यांनी सांगितले. कामत सरकारकडून गोमंतकीय जनतेची ही पिळवणूक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तेल कंपन्या सध्या फायद्यात आहेत. वाढविलेला कर लवकरात लवकर मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गेल्या जून महिन्यात गोवा सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट २ टक्के तर एलपीजीवरील कर शून्य करण्यात आली होता.(चार टक्यावरून).आता पुन्हा त्यात वाढ का करण्यात आली आहे, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. जनतेची फसवणूक करत असलेल्या या सरकारने पेट्रोलवरील व्हॅट २२ वरून १५ टक्के करावा व गॅसवरचा कर पूर्णपणे हटवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
-----------------------------------------------------------
ग्राहकांना 'व्हॅट'चा फटका
उपलब्ध माहितीनुसार, पेट्रोल व डिझेलवर राज्य सरकारचा "व्हॅट' २२ टक्के होता. जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी गेल्या जूनमध्ये त्यात दोन टक्के कपात करण्यात आली, तर गॅसवरील चार टक्के व्हॅट काढून टाकण्यात आला होता.आता केंद्र सरकारने दर कमी केल्यावर अचानक राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील "व्हॅट' पूर्ववत लागू केल्याने दर एका दिवसात पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल प्रतिलीटर ६६ पैसे वाढले आहेत,तर डिझेलमध्ये ५४ पैशांची वाढ झाली आहे. गॅस २५ रुपयांऐवजी ११ रुपयेच कमी झाला आहे. व्हॅट पूर्णपणे काढून टाकल्यास ग्राहकांना पेट्रोल ३० रु. तर डिझेल २० रु. लिटर देणे शक्य असल्याचे पेट्रोल विक्रेत्यांनी सांगितले.

परप्रांतीयांना जमीन विक्रीवर बंदी नको; मात्र बंधने हवीत पर्रीकर यांचे मतप्रदर्शन

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) : गोव्यातील शेतजमिनी परप्रांतीयांना विकण्यास विरोधी पक्ष या नात्याने आमचा पाठिंबा नाही. तथापि, त्यावर बंधने असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यातील जमीन परप्रांतीयांना विक्री करण्यास बंदी घालणे हे बेकायदा असल्याचे मत आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. ते आज पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर फार्तोड्याचे आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.
"सेझ' कंपन्यांना भरपाई देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले असले तरी त्यांनी विरोधी पक्षाला विश्वासात न घेता या विषयीचा कोणताही निर्णय करू नये. त्याचप्रमाणे सोनसोडो येथे कचऱ्याला लागलेली आग म्हणजे नगरविकास मंत्री व मुख्यमंत्री यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा परिपाक असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याची स्थिती पाहिल्यास गोव्यात सरकार आहे की, नाही असा प्रश्न पडतो, असे पर्रीकर म्हणाले.
शेतजमिन विक्री बंदी कायदा करण्यापूर्वी सरकारने "शेतजमिन' या विषयाची नेमकी व्याख्या आधी करावी. भरड, पडीक अशा अनेक जमिनी गोव्यात आहेत. त्यामुळे भूखंडाची विक्री करण्यास बंधने घालावीत. गोवा हा खूप लहान आहे. त्याची ओळख राखणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. शेतजमिन परप्रातीयांना विकण्यास बंदी घालणारे विधेयक येत्या विधानसभेत मांडण्याची घोषणा मुख्यमंत्री कामत करीत असले तरी ते या अल्पकालीन अधिवेशनात त्यांना शक्य होणार नसल्याचे ते म्हणाले.
गोव्याला खास दर्जा बहाल करण्याचा विषय घेऊन केंद्रात जाण्यापूर्वी या मुद्यावर येत्या विधानसभेत चर्चा करा, असा टोला पर्रीकरांनी लगावला. येत्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा ठेवावी अशी मागणी त्यांनी केली.
सोनसोडो मडगाव येथे कचऱ्याला लागलेली आग ही नियोजनबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यास त्यांनी याच्या मागे कोण आहे, ते शोधून काढावे असे आव्हान श्री. पर्रीकर यांनी दिले. गेल्या कित्येक वर्षापासून या सोनसोडो हा विषय गाजत आहेत. परंतु, खुद्द मुख्यमंत्र्यांनाच आपल्या मतदारसंघातील हा प्रश्न सोडवता येत नाही, अशी टीका त्यांनी केली. कला व संस्कृती यांचा अपवाद केल्यास अन्य कोणत्याच खात्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे ते म्हणाले.
"सेझ'रद्द करीत असल्याच्या मुख्यमंत्री केवळ घोषणाच करत आहेत. ज्यावेळी एकाच "सेझ'ची अधिसूचना काढण्यास आली होती, वेळी भारतीय जनता पक्षाने अन्य कोणत्याही "सेझ'ला मान्यता न देण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने त्यानंतर "सेझ'ना मान्यता देऊन तशी अधिसूचनाही काढली. त्याचप्रमाणे वेळकाढू धोरण अवलंबून त्यांना बांधकामाची संधी दिली. आता त्या "सेझ' कंपन्यांना भरपाईची घोषणा केली जात असून याविषयात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे, असे पर्रीकर शेवटी म्हणाले.
-------------------------------------------------------------
'भाजपचा फिक्सिंगवर विश्वास नाही'
भाजप 'फिक्सिंग'वर विश्वास ठेवत नाही. आम्ही आगामी विधानसभा अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी जय्यत केली ठेवली आहे. त्यासाठी सुमारे ७०२ प्रश्न यापूर्वीच तयार झाले आहेत. तथापि, वेळ अत्यंत कमी असल्याने अनेक मंत्री आमच्या कचाट्यातून सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणी "या' किंवा "त्या' मंत्र्याकडे फिक्सिंग केल्याचे समजू नये, असे श्री. पर्रीकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

चिंबल भागात टोळीयुद्ध दोघांचे अपहरण व बेदम मारहाण

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): चिंबल मेरशी येथे दोघा तरुणांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली असून पुन्हा एकदा गुंडांच्या टोळ्यांनी आपले डोकेवर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बिच्चू टोळीचा म्होरक्या शौकत जाकिर ऊर्फ बिच्चू याला अटक करून भारतीय दंड संहितेच्या ३६४ व ३९४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बिच्चू याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बिच्चू याची काही दिवसांपूर्वीच खुनीहल्ला केल्याच्या प्रकरणी जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. इकबाल अब्दुल शेख व फैयाज शेख यांनी याविषयीची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इकबाल व फैयाज हे दोघे आपल्या दुचाकीवरून चिंबलहून पणजीला येत असताना बिच्चू व त्याच्या अन्य साथीदारांनी या दोघा तरुणांना अडवून त्यांना वाहनात कोंबले व मेरशी येथील एका अज्ञात स्थळी नेले. यावेळी त्यांना काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना काल दिवसभर डांबून ठेवण्यात आले. आज सकाळी बिच्चू हा मेरशी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
या अपहरणात वापरण्यात आलेले वाहन क्रमांक जीए ०१ ए १७८६ पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच या घटनेतील अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. याविषयीचा अधिक तपास पणजीचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त करीत आहेत.

सोने कडाडले! १५ हजाराकडे वाटचाल

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी): वाढता वाढता वाढत चाललेल्या सोन्याच्या भावाने भारतीय बाजारपेठेत आजपर्यंतचा उच्चांक नोंदवला. सहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत पेढीवर १४,९७५ रुपये होती आणि २३ कॅरेट सोन्याला दहा ग्रॅमसाठी ग्राहकांनी चक्क १४,६८५ रुपये मोजले.
जागतिक बाजारात रुपयाचे घसरत चाललेले मूल्य आणि बाजारपेठेत सोन्याला असलेली प्रचंड मागणी, ही या उच्चांकामागीलची कारणे ठरली आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे १९ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून १३ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती देत असल्यामुळे २००८ मध्ये सोन्याच्या दरात २९.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे चित्र इतक्यात बदलणारे नसल्याने, हा दर लवकरच १५ हजाराचा पल्ला ओलांडेल, अशी शक्यता आहे.
सोनेबाजारात आज १० ग्रॅम सोन्याचा भाव १४,४४८ रुपये होता. दुपारी तो ७० रुपयांनी खाली आला. हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. याआधी १० ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव १४,३२० नोंदला गेला होता.

मुंबई हल्ला प्रकरणी पाक खटला चालविणार

इस्लामाबाद, दि. ३० : मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानवर केवळ भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव असल्याने या प्रकरणी पकडलेल्या निदान काही आरोपींवर तरी पाकला खटला चालवावा लागेल आणि तशी तयारी त्यांनी ठेवल्याचे वृत्त आहे.
मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर अतिरेकी संघटनांवर कारवाईसाठी प्रचंड दबाव निर्माण झाला. त्यातच त्यांनी एकीकडे मुंबई हल्ल्याची चौकशी गुप्तहेर संघटनांच्या मार्फत सुरू केली आणि दुसरीकडे अतिरेकी संघटनांच्या छावण्यांवर धाडसत्र सुरू झाले. आतापर्यंत त्यांनी यात १२४ अतिरेक्यांना पकडले आहे. शिवाय, पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेची चौकशी प्रक्रियाही संपली आहे. आता या प्रकरणी जितक्या अतिरेक्यांना पकडले त्यांच्यावर खटला चालविण्याची तयारी पाकिस्तानने प्रशासकीय स्तरावर सुरू केल्याचे समजते.
यातील नेमक्या कोणत्या आणि किती अतिरेक्यांवर खटला दाखल होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, जगाला दाखविण्यासाठी ही कारवाई होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

Friday, 30 January 2009

दक्षिण गोवा भाजपचे सावईकर उमेदवार


पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून फोंड्याचे ऍड. नरेंद्र सावईकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
१९९७ ते २००६ पर्यंत ते दक्षिण गोवा भाजपचे सरचिटणीस होते. सध्या ते गोवा प्रदेश सचिव आहेत. त्यांनी विद्यार्थी चळवळीत मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई संघटनमंत्री म्हणून त्यांनी २००४ ते २००७ या कालावधीत काम पाहिले आहे. तसेच गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून सध्या ते या संस्थेच्या संचालक मंडळावर आहेत. त्याखेरीज रोटरी क्लब व सम्राट क्लबचे ते सभासद आहेत. त्यांच्या उमेदवारीचे दक्षिण गोव्यात जोरदार स्वागत होत असून भारतीय जनता युवा मोर्चामध्ये उत्साह संचारला आहे.