..अपहरणकर्त्यांचे वाहन ताब्यात
..दोन दिवसांत टोळीही गजाआड?पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात गोवा पोलिसांना यश हाती लागले असून अपहरण झालेल्या कळंगुट येथील इंदर वडवाणी या हॉटेल उद्योजकाचा मुलगा सागर वडवाणी याला घेऊन गोवा पोलिसाचे पथक आज सकाळी गोव्यात दाखल झाले. पोलिसांच्या हातून निसटलेल्या टोळीला येत्या दोन दिवसांत गजाआड करू, असा दावा पोलिसांनी केला असून अपहरणकर्त्यांचे एक चारचाकी वाहन पोलिसांच्या हाती लागले आहे.
दि. १ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता मटकोड म्हैसूर येथे मोठ्या शिताफीने सहा अपहरणकर्त्यांकडून सागर याची कर्नाटक पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिसांनी सुटका केली होती. दि. २५ डिसेंबर रोजी सागर वडवाणी याचे निपाणी येथून अपहरण करण्यात आले होते. यावेळी अपहरणकर्त्यांनी त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयाकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी आज दिली. त्यानंतर, या प्रकरणी गेल्या सात दिवसांपासून पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. सागर याची सुटका करण्यासाठी सहभागी झालेल्या पोलिस पथकाला प्रत्येकी दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सागर याचे अपहरण करणारी टोळी ही चलाख असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. एका विशिष्ट पद्धतीने मोबाईलचा वापर करून अपहरणकर्ते सागर याच्या वडिलांशी संपर्क साधत होते. दि. २६ डिसेंबर रोजी इंदर वडवाणी यांनी कळंगुट पोलिस स्थानकात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंद करताच त्याची सुटका करण्याच्या मोहिमेवर पणजी पोलिस स्थानकाचे दुसऱ्या क्रमांकावरील पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त, फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दीपक पेडणेकर व पोलिस शिपाई विनय श्रीवास्तव यांची रवानगी करण्यात आली. त्यानंतर खंडणीचे पैसे देऊन सुटका करण्याचे ठरताच दोन दिवसांपूर्वी सागर याचे वडील व मामा हे आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे, पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या समवेत बंगळूर येथे रवाना झाले. त्यानंतर दि. १ जानेवारी रोजी प्रत्यक्ष सकाळी १० वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. पैसे स्वीकारून सागर याची सुटका करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी इंदर वडवाणी यांना सुमारे चारशे किलोमीटर अंतर फिरणे भाग पाडले. त्यानंतर दुपारी ४. ३० वाजता पैसे स्वीकारून त्याची सुटका करण्यात आली.
आज दुपारी पोलिस निरीक्षक कॉर्त यांच्या खाजगी वाहनातून सागर याला घेऊन गोवा पोलिस पोलिस मुख्यालयात दाखल झाले. या पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी अभिनंदन केले. तर, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी मोठे यश हाती लागल्याचे उद्गार काढले.
त्यांच्याकडे बंदुकाही होत्या...
त्यांनी माझे पैशांसाठी अपहरण केले होते. मी पुणे येथे जात असताना वाटेत मला अडवून त्यांनी एका स्कॉर्पियो वाहनात कोंबले. त्यानंतर माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. निपाणीतून मला बंगळूर येथे घेऊन जाण्यात आले. तेथे एका घरात मला ठेवण्यात आले होते. एक सेकंद सुद्धा मला एकटे सोडत नव्हते. मी पळून जाऊ नये यासाठी माझ्या पायांना लांब अशी लोखंडी साखळी बांधून ठेवण्यात आली होती. शौचालयात जातानाही ती साखळी तशी घेऊन मला जायला सांगायचे. अपहरणकर्ते हे सर्व तरुण व माझ्या वयोगटातील होते. तसेच त्याच्याकडे अद्ययावत बंदुकाही होत्या,अशी माहिती सागर यांनी दिली.
Monday, 4 January 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment