Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 12 November 2009

गोव्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा

२४ ट्रॉलर्सशी संपर्क..१० ट्रॉलर्स बेपत्ता
पेडणे, बेतुल, कोलवा, पाळोळे, बांबोळी किनाऱ्यांना सर्वाधिक फटका
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर "फयान' चक्रीवादळात झाले असून या चक्रीवादळाचा धोका गोव्यापुरता टळला असला तरी खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांना याचा जबर तडाखा बसला आहे. सुमारे ३४ ट्रॉलरवरील २०० मच्छिबांधव बेपत्ता असून रात्री उशिरा पर्यंत यातील २४ ट्रॉलरशी संपर्क साधण्यात यश आले होते. तर, १० ट्रॉलरचा कोणताच थांगपत्ता लागत नसल्याची माहिती मच्छीमार खात्याचे मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी दिली. या चक्रीवादळामुळे लोकांचे नेमके किती नुकसान झाले हे आत्ताच सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक ट्रॉलरवर ६ जणाचा गट असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुसाट वाऱ्यामुळे गोव्याच्या समुद्रातून हे मच्छीमार मालवणला पोहोचले असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. भारतीय किनारी सुरक्षा दल जे हरवलेल्या मच्छीमारांचा शोध घेत आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येत असून, गेले दोन दिवस सतत त्यांच्याकडे हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारी येत आहेत. हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी एका एअरक्राफ्टची सोयही करण्यात आली असल्याचे भारतीय किनारी सुरक्षा दलाचे अधिकारी ए. के. सक्सेना यांनी सांगितले. मालिम बेती जेटीसह दक्षिणेतील कुटबण आणि बेतुल जेटीवरील ट्रॉलर्सही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.
बेपत्ता ट्रॉलर आणि मच्छिबांधवांचा शोध घेण्यासाठी कोचीन येथून खास जहाज आणल्याची माहिती श्री. आलेमाव यांनी दिली. मालिम बेती जेटीवरून मच्छीमारी करण्यासाठी सुटलेल्या किती ट्रॉलर बेपत्ता आहेत, याचा नक्की आकडा प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हता. तर, वास्को येथून चार आणि बेतुल येथील २ बोटींशी कोणताच संपर्क होत नसल्याचे श्री. आलेमाव यांनी सांगितले.
काल मध्यरात्री १.२० च्या दरम्यान पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने गोव्याच्या किनारपट्टीवर धडक दिली. किनाऱ्यापासून पाच किमी. अंतरावर ट्रॉलर घेऊन मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या ट्रॉलरना याचा जोरदार तडाखा बसला. यातील अनेक ट्रॉलर भरकटून रत्नागिरी, देवगडच्या दिशेने गेल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दिशेने या ट्रॉलर गेल्यास त्यांना अधिक प्रमाणात धोका संभवत आहे. कारण या चक्रीवादळाचा प्रभाव या भागात अधिक प्रमाणात जाणवल्याचे मच्छीमार खात्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, काकरा बांबोळी येथील पाच मच्छिमाऱ्यांच्या छोट्या होड्या रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दगडावर आपटून फुटल्या तर, अनेकांच्या जाळ्यांची नासाडी झाली. वादळामुळे समुद्राची पातळीही वाढली होती. मासेमारीसाठी दोन महिन्यांपूर्वी उतरलेले व नांगरून ठेवलेले ट्रॉलर्स नांगर तुटून किनाऱ्यावर आले होते. अनेक होड्या दगडावर आपटून फुटल्या, तर वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून घरांवर पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी मार्ग बंद झाले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे काही भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी अनभिज्ञ!
चक्रीवादळामुळे किती मच्छीमार बांधव आणि त्यांचे ट्रॉलर बेपत्ता आहेत, याची कोणतीही माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना सायंकाळपर्यंत नव्हती. याविषयी त्यांना विचारले असता,"मला यातले काहीही माहीत नाही, तुम्ही मच्छीमारी खात्यात संपर्क साधा', असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख असलेले श्री. वर्धन यांना याची कोणतीच माहिती नसल्याने कशा पद्धतीने राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन चालते याचा प्रत्यय काल पत्रकारांना आला.
-------------------------------------------------------------------------
नौका मालवणकडे?
गोव्यातील मच्छीमार बोटी जर मालवणच्या दिशेने भरकटल्या असतील तर स्थिती अधिक गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण, सिंधुदुर्ग किनारपट्टीला काल (बुधवारी) पहाटे वादळाचा जबरदस्त फटका बसला. बेपत्ता ट्रॉलर्समध्ये किती मच्छीमार आहेत, याचा नेमका आकडा उशिरापर्यंत समजला नव्हता. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाहीची मदत घेतली जात आहे.

No comments: