पर्वरीतील फ्लॅटबाहेर पोलिसांचा पहारा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी हवे असलेले पेडणेकर दांपत्य आणि त्याची मेहुणी अद्याप फरारी असून त्यांच्या फ्लॅटबाहेर पोलिस पहारा ठेवण्यास आला आहे. मात्र हा पहारा फ्लॅट राखण्यासाठी की फरार पेडणेकर दांपत्याला गजाआड करण्यासाठी ठेवला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा शोध सुरू असून सुगावा लागताच त्यांना अटक केली जाणार असल्याचा दावा पर्वरी पोलिस करीत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांना पकडण्यात पर्वरी पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज पणजी बस स्थानकावर कोपरा बैठक घेऊन या अमानुष अत्याचाराचा तीव्र निषेध केला. त्याप्रमाणे दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी विद्यार्थी परिषदेने केली. जामीन अर्ज रद्द होण्याची शक्यता असताना संशयितांच्या मागावर पोलिस ठेवायचे सोडून ते फरारी झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर पोलिस पहारा ठेवल्याने लोकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या त्या पीडित मुलीच्या मुद्यावरून बाल हक्कासाठी लढणाऱ्या काही सामाजिक संस्थात जोरदार राजकारण सुरू झाले आहे. या संस्थांना विदेशातून निधी मिळतो. या प्रकरणात तर विदेशातून भरपूर निधी येण्याची शक्यता असल्याने हे राजकारण सुरू झाल्याचे एका संस्थेच्या अधिकाऱ्याने खाजगीत बोलताना सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत असलेल्या त्या मुलीला भेटण्यास मज्जाव केला जात असून पत्रकारांनाही रोखले जात आहे.
Tuesday, 4 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment