पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - समाजकल्याण खात्याच्या योजनांची कार्यवाही करताना पक्षपात केल्याचा थेट
थेट आरोप करत खुद्द सरकार पक्षाचेच आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी या खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर तिखट शाब्दिक हल्ला चढवला. येथील सगळा कारभार "बहुजनसुखाय'ऐवजी "बहुजन दुःखाय' अशा पद्धतीने चालला असून खात्याच्या योजनांपैकी अर्ध्याहून जास्तलाभार्थी केवळ मडकई, प्रियोळ अशा फोंडा तालुक्यातील मतदारसंघांपुरत्याच मर्यादित असल्याचा आरोपही नार्वेकर यांनी केला.
नार्वेकर यांनी चढवलेल्या या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी ढवळीकर यांना पुरेसा वेळही मिळाला नाही. तुमच्याच मतदारांना सगळे लाभ, मग आमच्या मतदारांनी काय घोडे मारले आहे? आमच्या मतदारांवर आमचे प्रेम नाही का, त्यांना योजनांची गरज नाही का, असा शाब्दिक हल्ला चढवत येथे कुंपणच शेत खात आहे, असा आरोपही नार्वेकरांनी केला. आपल्या या म्हणण्याला अधिक बळकटी देताना ते म्हणाले, इतरांना ही योजना मिळवण्यासाठी जेथे दोन दोन तीन महिने लागतात तेथे ढवळीकरांच्या मतदारसंघात केवळ तीन दिवसांत योजना मार्गी लागते. इतरांना या योजनेखाली एकदाही आर्थिक मदत मिळत नाही. मात्र मडकई मतदारसंघात दोन दोनदा मदत घेऊन लोक मोकळे होतात याचा अर्थ काय? फक्त तुमच्या मतदारसंघांपुरताच तुम्ही विचार करणार असाल तर इतरांचे काय, असे नार्वेकरांनी विचारले.
त्यावर आपण कोणाचाच अर्ज अडवून ठेवला नाही असा पवित्रा सुदिन यांनी घेतला. नार्वेकर म्हणाले, तुम्ही अडवणार कसे, तुमचे अधिकारी अडवतात त्याचे काय? अर्ज हातावेगळे करण्यासाठी काही पद्धत निश्चित करा, असे सभापती राणे यांनी सुदिन यांना सुनावले. सुदिन यांनी समाजकल्याण आणि महिला व बाल कल्याण ही दोन वेगळी खाती झाल्यामुळे कसे गोंधळ निर्माण झाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तथापि, नार्वेकरांनी त्यांचे म्हणणे फेटाळून लावताना, सरकार किंवा खात्यांतर्गत जो घोळ आहे तो तुम्ही सोडवा. रडा, मिठी मारा, किंवा झगडा तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या फिजुल गोष्टी आम्हाला सांगू नका. लोकांना त्याच्याशी काहीच कर्तव्य नाही, असेही नार्वेकरांनी सुनावले. ढवळीकर यांनी त्याही स्थितीत आपले म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभापती श्री. राणे यांनी त्यांना बोलू दिले नाही.
Wednesday, 5 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment