पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - पणजी महापालिकेत माजलेली बजबजपुरी आटोक्यात आणण्यासाठी नव्याने नियुक्त करण्यात आलेले आयुक्त संजीत रॉड्रीक्स प्रयत्नशील असून, त्यांनी तीन महिन्यांत सर्व कामकाज मार्गावर आणण्याची ग्वाही दिली आहे, ते यासंबंधी अहवालही देणार असून, जे दोषी आढळतील, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे स्पष्ट आश्वासन आज नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी विधानसभेत दिले. आपल्या खात्यावरील मागणीला विरोधकांनी सुचविलेल्या कपातीसंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना आलेमाव यांनी महापालिकेने कचरा विल्हेवाटीसंबंधी जो घोळ निर्माण केला आहे, त्याचाही ऊहापोह करताना याबाबतचे सर्व खाजगी करार रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.
सर्व पालिका कर्मचाऱ्यांना समान केडर लागू करण्याबाबत सोपस्कार चालू असून काही श्रेणीतील कर्मचाऱ्यांबाबतची फाईल अर्थ मंत्रालयाकडे निर्णयासाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली.
गणेशचतुर्थीसाठी जादा दिवे बसविण्यासाठी प्रत्येक पालिकेला ३ लाख रुपये मंजुर करण्यात आल्याची माहिती आलेमाव यांनी दिली. असंघटित कामगारांसाठी आणि दारिद्÷यरेषेखालील नागरिकांसाठी विशेष विमा योजना लागू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बांधकाम कंत्राटदाराकडून एक टक्का पैसे वसूल करून विशेष निधी उभा केला जाणार असल्याचे ते म्हणाले. सात तालुक्यांत ईएसआय केंद्रे स्थापन करण्यात आली असून, अन्य तालुक्यांतही अशी केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. मडगाव येथील ईएसआय इस्पितळ ५० खाटांवरून १०० खाटांवर नेण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, तेथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असतील, असे आलेमाव यांनी सांगितले. कुटबण, आगशी, बेतुल व मालिम जेटीचा विस्तार करण्यात येणार असून, वास्को येथे एमपीटीच्या मदतीने ९० मीटर जेटी बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कचरा विल्हेवाटीसाठी १४ पालिकांनी जागा निश्चित करून प्रकल्प बांधणी सुरू केल्याची माहिती आलेमाव यांनी दिली. अन्य पालिका जागा संपादन करीत असून, तेथेही समस्याही सुटेल, असे ते म्हणाले. खात्याने यासाठी आत्तापर्यंत २१ कोटी रुपये पालिकांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. डिचोली पालिकेचा कचरा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मच्छीमार आणि ट्रॉलरसाठी अनेक अनुदान योजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Thursday, 6 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment