Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 20 December 2008

दूरदर्शनने विश्वासार्हता राखली - शर्मा

पणजी केंद्रावरून लवकरच कोकणी बातमीपत्र

अतिरिक्त स्टुडिओ सेवेचे उद्घाटन

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - प्रसारणाच्या क्षेत्रात व्यावसायिक दूरचित्रवाहिन्यांची मोठी रेलचेल असतानाही दूरदर्शनने त्या स्पर्धेत केवळ विश्वासार्हतेच्या बळावर आपले स्थान टिकवून ठेवले असून ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध आघाड्यांवरील मूकक्रांतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी आज येथे काढले.
आल्तिनो येथील पणजी दूरदर्शन केंद्राच्या अतिरिक्त स्टुडिओ सेवेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री दिगंबर कामत होते. खास निमंत्रित म्हणून खासदार श्रीपाद नाईक व राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलजितसिंग लाली व पणजी दूरदर्शन केंद्राचे संचालक चंद्रकांत बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या सभोवताली काय घडते त्याबद्दल माहिती जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. गेल्या दीड दशकात भारताने विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून भारताच्या या समृध्द सांस्कृतिक वारसा व परंपरा, सामाजिक व आर्थिक विकासाची माहिती जनतेला देण्याचे काम दूरदर्शनने केल्याचे ते म्हणाले.
पणजी दूरदर्शन केंद्र आता इतर राजधानी शहरांच्या दूरदर्शन केंद्रांच्या पंक्तीत बसले असून त्यांच्याकडून मनोरंजन तसेच माहितीपर कार्यक्रमांच्या प्रसारणाची अपेक्षा असल्याचे सांगून कोकणी भाषेतून बातम्या देण्याचीही व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना आपण दिल्याचे त्यांनी सांगितले.
पणजी दूरदर्शन केंद्रावर आजपर्यंत केवळ कार्यक्रम निर्मितीची सुविधा होती. मात्र आज या नव्या सुविधेमुळे हे केंद्र इतर केंद्राच्या तोडीचे बनले असून या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गोमंतकीयांना दर्जेदर कार्यक्रम देण्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे आवाहन याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री कामत यांनी केले. गोवा हे भारतातील समृध्द व विकसनशील राज्य म्हणून ओळखले जात असले तरी त्याची ही ओळख जागतिक पातळीवर व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गोव्यात परिपूर्ण दूरदर्शन केंद्र व्हावे ही गोव्याची जुनी मागणी होती. राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. मात्र आपल्या दूरदर्शन केंद्राकडे कार्यक्रमनिर्मिती सोडल्यास प्रसारणाची सुविधा नव्हती. त्यामुळे कार्यक्रम जनतेपर्यंत पोचविणे शक्य होत नव्हते. गोवा जरी लहान असला तरी येथील संस्कृती व परंपरा समृध्द आहे. दूरदर्शन केंद्र आता अधिक सुसज्ज बनल्याने गोमतंकीयांना आता दर्जेदार कार्यक्रम पाहाण्याची संधी मिळेल असा विश्वास खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
गोव्याला परिपूर्ण केंद्राचा दर्जा मिळावा म्हणून गेली काही वर्षे शासकीय दरबारी सातत्याने पाठपुरावा होत होता. राजधानी शहरात परिपूर्ण दूरदर्शन केंद्र असावे असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे धोरण असतानाही गोव्याला मात्र एवढी वर्षे केंद्राकडून केवळ सापत्नभावाचीच वागणूक मिळाल्याची जोरदार टीका शांताराम नाईक यांनी केली.
पणजी दूरदर्शन केंद्रावरून लवकरच कोकणी भाषेतून बातमीपत्र प्रसारित करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलजीतसिंग लाली यांनी दिली. स्वागतपर भाषणात त्यांनी पणजी दूरदर्शन केंद्राला परिपूर्ण केंद्राचा दर्जा मिळाल्याने गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याचे सांगितले.
आरंभी फित कापून व नंतर समई प्रज्वलित करून केंद्रीय मंत्री शर्मा यांनी दूरदर्शन केंद्राच्या अद्ययावत स्टुडीयो केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले. सूत्रसंचालन तपन आचार्य व रूचिका दावर यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. चंद्रकांत बर्वे यांनी आभार मानले.

No comments: