Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 17 December 2008

वास्कोत मदरशावर छापा, ८८ विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्यावर पुन्हा मदरशात रवानगी, मदरसा प्रमुखांकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) : दहशतवादापासून सतर्क राहण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत वास्को पोलिसांनी येथील एका मदरशावर छापा घालून आज ८८ विद्यार्थिनींना ओळख तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे मुस्लिम नेत्यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला. नंतर पोलिसांना संबंधित मदरशाच्या चालकांकडून आवश्यक सहकार्य देण्यात आल्यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या अटकेची कारवाई टाळली.
या ८८ विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेले पडताळणी अर्ज आठवड्यापूर्वी सूचना देऊनही न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांना पोलिस स्थानकावर आणल्यावर वास्को पोलिसांनी त्यांना जेथून आणले तेथेच पुन्हा नेले.पोलिस स्थानकावर केली जाणारी त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया मदरशात पार पाडण्यात आल्यामुळे लोकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज सकाळी ११.३०च्या सुमारास वास्कोच्या प्रवासी इमारतीत असलेल्या "जामीया अहल्ले सुन्नीत आशरालिया ऍन्ड अश्रफूल बन्नत' या मदरशात पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिसांनी छापा मारून ८८ विद्यार्थिनी (९ ते २० वयोगटातील) व ६ शिक्षिकांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना वास्को पोलिस स्थानकावर आणण्यात आले. सुमारे १० दिवसांपूर्वी पोलिसांनी या मदरशात असलेल्यांचे पडताळणी अर्ज भरण्याची सूचना केली होती. त्याची कार्यवाही न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मदरशातून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याने संतप्त झालेले मदरशाचे अध्यक्ष ताहीर दाऊद तसेच प्रमुख शेख अब्दुल मुनाफ यांनी या कारवाईचा पोलिस स्थानकात येऊन निषेध केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून दरमहा आम्ही पोलिस स्थानकात या मदरशाबाबत पूर्ण माहिती देतो. तरीही आज पोलिसांनी अचानक कारवाई करून विद्यार्थ्यांची सतावणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
४ डिसेंबरला पोलिसांनी येथील विद्यार्थ्यांचे व इतरांचे पडताळणी अर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले होते हे त्यांनी यावेळी मान्य केले. मात्र ईदच्या सुट्टीमुळे काही विद्यार्थी गोव्यात नव्हते. त्यामुळे सर्व अर्ज एकत्र द्यायचे, असा आमचा विचार होता. त्यादरम्यानच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी छापा घातला तेव्हा त्यांची सतावणूक केल्याचे मुनाफ व ताहीर दाऊद यांनी सांगून ८८ विद्यार्थिनी व ६ महिला शिक्षिकांना नेण्याकरिता केवळ दोनच महिला पोलिस व इतर पुरुष आले होते असे ते म्हणाले.दरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व जणांचे पडताळणी अर्ज भरण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
यासंबंधी वास्कोचे पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता, ४ डिसेंबर रोजी त्यांचे पडताळणी अर्ज भरण्यासंबंधी सूचना देऊन नंतर दोन तीन वेळा त्यांना आठवणही करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांची सतावणूक केली नसून उलट आमचे कर्तव्य आम्ही पार पाडले, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिकांना परत मदरशात नेऊन त्यांचे पडताळणी अर्ज भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला हे खरे आहे काय, या प्रश्नाला निरीक्षक मडकईकर यांनी बगल दिली.
मदरशातून विद्यार्थी आणि शिक्षिका यांना ताब्यात घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने त्यांना नंतर मदरशात नेऊन त्यांचे अर्ज भरण्याची केलेली कारवाई पोलिसांनी आधीच केली असती तर काय बिघडले असते, असा सवाल आपण पोलिसांना केल्याचे मदरसा प्रमुख शेख अब्दुल मुनाफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुनाफ यांनी "गोवादूत'ला सांगितले की, वास्को पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वास्को पोलिस स्थानकाच्या वरिष्ठांना अशी सूचना केली की, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिका यांची मदरशात परतपाठवणी करावी. त्यानंतर पोलिसांनी काहीशी नरमाईची भूमिका स्वीकारली, असे शेख यांनी स्पष्ट केले.
--------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांचा पोलिसांशी संपर्क
यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कारवाईचा तपशील जाणून घेण्यासाठी हा संपर्क साधण्यात आल्याची पुस्ती त्यांनी जोडली. या मदरशात एक काश्मिरी असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.संध्याकाळी उशिरा भरण्यात आलेल्या पडताळणी अर्जांपैकी एक दोन वगळता इतर सर्व अर्ज बिगरगोमंतकीयांचे असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्यांना आम्ही अटक करणार होतो; तथापि, त्यांनी आवश्यक सहकार्य दिल्याने ते पाऊल उचलण्यात आले नाही, असे बाणावलीकर यांनी स्पष्ट केले.

No comments: