Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 14 April 2008

भंगार अड्डे नव्हे; 'ज्वालामुखी...'

प्रशासन व पंचायतीचे दुर्लक्ष
अड्डेवाल्यांना राजकीय वरदहस्त
रासायनिक अपघातांचा धोका
लोकांसाठी पूर्णतः असुरक्षित पट्टा
करासवाडा ते कोलवाळपर्यंत मृत्यूसापळाच

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): म्हापसा - करासवाडा ते कोलवाळपर्यंत राष्ट्रीय महामार्ग १७ ला टेकून मोठ्या प्रमाणावर बेकायदा भंगार अड्डे उभे राहिले आहेत. तेथे नियोजित रहिवासी वसाहती येणार असल्याने हे अड्डे लोकांसाठी अत्यंत घातक ठरणार आहेत. शिवाय या भागात अनेकदा छोटेमोठे अपघात घडूनही या अड्ड्यांचा विस्तार वेगाने सुरू असून हा संपूर्ण पट्टाच भंगारवाल्यांच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
म्हापसा करासवाडा येथील "गोठणीचा व्हाळ' ते थेट कोलवाळ येथील बिनानी कंपनीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाला टेकून असलेल्या पठारावर हे भंडार अड्डे मोठ्या प्रमाणात घालण्यात आले आहेत. हे अड्डे म्हणजे जणू रहस्यकथाच बनले आहेत. तेथे सुरक्षा व इतर कायदे वा नियमांचे बंधन पाळले जात नसल्याचे उघड झाले आहे. अलीकडेच तेथे भंगार अड्ड्याला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले होते. गंभीर म्हणजे याच ठिकाणी विषारी रसायनाची पिंपे तोडताना एकाच कुटुंबातील सुमारे २५ माणसे अस्वस्थ झाल्याने त्यांना म्हापसा येथे एका खाजगी इस्पितळात दाखल करण्याचा प्रकारही घडला होता. या सर्व गोष्टींवर व्यवस्थितपणे पडदा टाकून सर्रासपणे भंगार अड्ड्यांचे जाळे पसरत असल्याने भविष्यात हे महासंकट ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. मुळात हा भाग कोलवाळ पंचायत क्षेत्रात येतो. या अड्डेवाल्यांकडून नियमित "हप्ता" संबंधितांना पोहोचवला जातो, अशी माहिती तेथील एका रहिवाशाने दिली. या अड्डेवाल्यांना म्हापशातील एका बड्या नेत्याचा आश्रय असून त्या जोरावरच हे लोक कुणाचीही पर्वा न करता आपला व्यवसाय करीत आहेत.
प्रत्येकवेळी अपघात घडल्यानंतर या अड्ड्यांच्या स्थलांतराचा विषय चर्चेस येतो; परंतु त्यादृष्टीने कार्यवाही न होताच पुन्हा "येरे माझ्या मागल्या' याप्रमाणे हा व्यवहार सुरू आहे. स्थानिक पंचायत, इतर सरकारी यंत्रणा व राजकीय नेते यांच्या कृपाशिर्वादाने हा व्यवहार सुरू असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भंगार अड्डे औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात असणे बंधनकारक असूनही याठिकाणी ज्या पद्धतीने हा व्यवहार सुरू आहे त्यावरून नाममात्र पैशांच्या लोभापायी येथील नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार सुरू असून या अड्ड्यांमुळे या परिसराचे रूपांतर ज्वालामुखीत बनले आहे.
कोलवाळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन पेट्रोलपंप आहेत. या दोन्ही पेट्रोलपंपाच्या मधोमध सुमारे तीन ते चार भंगार अड्डे आहेत. या अड्ड्यांवर धोकादायक रसायनांचे पिंप व इतर साहित्य हाताळले जाते. याठिकाणी असलेली चिरेखाणही हा औद्योगिक कचरा टाकून बुजवण्यात आली असून आता तिथे पक्के बांधकाम रातोरात उभे राहिले आहे. कहर म्हणजे कोलवाळ येथील "पॉवर ग्रीड' च्या अतिभारीत वीजवाहिन्यांखालीच या अड्ड्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा शिल्लक आहे की नाही,असा सवाल उपस्थित झाला आहे.
विषारी वायूमुळे धोका
या ठिकाणी मोठ्याप्रमाणात औद्योगिक कचरा टाकला जात असल्याने तसेच विविध रसायनाचे पिंप किंवा इतर साहित्य हाताळले जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा अशा कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार होत असल्याने त्यापासून निर्माण होणारी वायू विषारी असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. या धुरामुळे श्वास घेणे असह्य बनते व त्यामुळे उलट्या होण्याचे प्रकारही घडल्याचे लोकांनी सांगितले. सर्व सरकारी यंत्रणांना या लोकांनी विकत घेतल्याने तसेच या लोकांची एकजूट असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे जाण्याचे धाडस कुणीही करीत नसल्याचेही रहिवाशांकडून सांगण्यात आले. या ठिकाणी लागलेली आग सतत चालूच राहते व धुराचे लोट पसरत असतात. अनेकवेळा अग्निशमन दलाला बोलावण्यात येते; परंतु कैकदा पाण्यानेदेखील ही आग विझत नसल्याची माहिती लोकांनी दिली. सरकारने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन या अड्ड्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

No comments: