पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)ः देशात होणाऱ्या वाहन अपघातांत गोवा राज्य पहिल्या दहांत येत असून राज्यातील वाढते अपघात टाळण्यासाठी यापुढे वाहतूक नियम तोडणाऱ्यांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. तसेच एप्रिल महिन्यापासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले जाणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार यांनी आज दिली. पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या गुन्ह्यांविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस महानिरीक्षक किशन कुमार व अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते. नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून सहावी व सातवीच्या अभ्यासक्रमात वाहतूक विषय अनिवार्य केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोव्यातील लोकसंख्येपेक्षा गोवा पोलिसांची संख्या नगण्य असल्याने प्रत्येक ठिकाणी नजर ठेवणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांनाच गुन्ह्याचा तपास करावा लागते आहे. परंतु येत्या काही दिवसांत प्रशिक्षणाला गेलेले ६७ पोलिस उपनिरीक्षक दाखल होणार असून त्यानंतर कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्याचा तपास हे दोन वेगळे विभाग केले जाणार असल्याचे श्री. ब्रार यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या तक्रारींवर लक्ष केंद्रित करून आरोपीला ताबडतोब गजाआड करण्यास याची मदत होणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे पोलिस खात्यातील गुप्तहेर विभाग सक्षम करण्यासाठी येत्या काही दिवसांत पोलिस अधिकाऱ्यांना दिल्ली येथील केंद्रीय गुप्तहेर खात्यात खास प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले जाणार आहे.
पोलिस खात्यातील शिपायांची किंवा पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हेगारांप्रमाणे वागणूक सहन केली जाणार नसल्याचा इशारा पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिला.
आतापर्यंत २३ पोलिस अधिकाऱ्यांवर खात्याअंतर्गत चौकशी सुरू असून गेल्या वर्षभरात १८ जणांना निलंबित करण्यात आले, तर १४ जणांना थेट बडतर्फ केले गेले. तसेच ७४ जणांवर अन्य कारवाई करण्यात आल्याची माहिती श्री. कुमार यांनी दिली.
गेल्या वर्षभरात वाहन चालकांनी नियम तोडल्याने १ लाख ९३ हजार ९५६ जणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या चलनांतून २ कोटी ५१ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा दंड पोलिस खात्याने गोळा केला आहे. राज्यात यापुढे वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक नियम तोडणाऱ्या प्रत्येक चालकाचा संगणकावर तपशील तयार केला जाणार आहे. सतत चूक करताना वाहतूक पोलिसांना आढळल्यास त्या वाहन चालकाचा वाहतूक परवाना रद्द केला जाणार असल्याचे श्री. ब्रार यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे उत्तर व दक्षिण गोव्यात ८० अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत, परंतु त्यातील ५० अपघातप्रवण क्षेत्रांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच मिरामार येथे "झिरो टॉलरन्स झोन' म्हणून जाहीर केला गेला आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या वाढत्या अपघातांवर आळा बसवण्यासाठी पोलिस खाते, वाहतूक खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी याची एक समिती निवडण्यात आली आहे. ही समिती सतत एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघात परिसराचा अभ्यास करून त्याठिकाणी रस्ता रुंदीकरण किंवा उपाय योजना करणार आहे.
त्याचप्रमाणे दिल्ली येथील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस व वाहतूक खात्याचे संचालक संदीप जॅकीस यांना पाठवले जाणार आहे.
सन २००७ मध्ये ४०२० झालेल्या अपघातांत ३२२ जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर ३७५ हे गंभीर जखमी झाले आहेत. मृत झालेल्यांमधील १४५ हे दुचाकी चालक होते तर , ४३ दुचाकीच्या मागे बसलेले होते. ८४ टक्के अपघात हलगर्जीपणाने वाहन चालवल्याने झाले असल्याचे श्री. ब्रार यांनी सांगितले. या वर्षी पोलिसांनी ३६२ वाहन चालकांचा परवाना रद्द करण्यासाठी पूर्ण तपशिलासह वाहतूक खात्याला पत्र पाठवले आहे.
यावर्षी अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वर्षभरात ४९,६०८ किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. याची किंमत ५८ लाख ४४ हजार ४०० लाख एवढी होत असल्याची माहिती देण्यात आली. या कारवाईत १४ भारतीय, ५ नेपाळी, १ नायजेरीयन, १ इटालियन व १ डच नागरिकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत २२.११ किलो चरस जप्त केला आहे. याची किंमत २१ लाख ७५ हजार एवढी होते. यात तीन नेपाळी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Thursday, 24 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment