Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 25 January 2008

पवार म्हणाले, "फेकून द्या'
पटेल म्हणाले "गरज नाही"


पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)ः दिगंबर कामत सरकाराविरोधात पुढे सरसावलेल्या बंडखोर नेत्यांत राष्ट्रवादीचे आमदार कसे काय सामील झाले, याची कथा सांगताना डॉ. विली यांनी आज खासगीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. १६ जानेवारी रोजी एका वृत्तवाहिनीवर दिगंबर कामत सरकार संकटात असल्याचे वृत्त प्रक्षेपित झाले. या वृत्ताची दखल घेत पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ताबडतोब आपल्याशी मोबाईलवर संपर्क साधून राष्ट्रवादीचे नेते यात सामील आहेत काय, असा सवाल केला. आपण याबाबत शंकानिरसन करून त्यांना होकाराचे उत्तर दिले तेव्हा त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया देताना "थ्रो देम आऊट" असे म्हटले. यावेळी स्थानिक पक्षाची भूमिका काय असावी याबाबत लेखी आदेश "फॅक्स" करण्याची विनंती त्यांना केल्याचे डॉ. विली म्हणाले.
दरम्यान, त्यांनी गोव्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपाल, सभापती, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली होती व ताबडतोब पक्षश्रेष्ठींना गोव्याकडे पाचारण केले. यावेळी त्यांनी हा आदेश "फॅक्स" न करता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय विमानवाहतूकमंत्री प्रफुल पटेल व डॉ. त्रिपाठी यांच्यासोबत पाठवला. हा आदेश नक्की काय होता, असा खोचक प्रश्न त्यांना केला असता ते हसले. श्री. पटेल व डॉ. त्रिपाठी यांनी बंडखोर नेत्यांशी चर्चा केली व त्यानंतर कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणी करून या नेत्यांमधील मतभेद दूर केले. सदर पत्रावर दिलेला आदेश हा केवळ "जर तोडगा निघाला नाही तर..."" अशा शब्दात कळवल्याने तडजोडीचे प्रयत्न यशस्वी झाल्याने श्री. पटेल यांनी "नोबडी विल बी थ्रोन आऊट" असे सांगून या नाट्यावर पडदा टाकला.

"सेझ" संबंधी भूमिका स्पष्ट करा
राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडी स्थापन करण्याची वक्तव्ये करणाऱ्या मगोप व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी "सेझ" संबंधी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन डॉ. विली यांनी केले. "सेझ" गोव्याला परवडणारे नाहीत, असे म्हणून ते रद्द व्हावेत अशी भूमिका पहिल्यांदाच पक्षाने मांडली होती. मगोपचे आमदार दीपक ढवळीकर यांनी केरी येथील "सेझ" चे जाहीर समर्थन केले आहे व विश्वजितही "सेझ" पाठिंबा देताहेत त्यामुळे या नेत्यांचे राष्ट्रवादीकडे कसे काय जुळणार असे डॉ. विली यावेळी म्हणाले.

No comments: