कॉंग्रेस - राष्ट्रवादी हातमिळवणीमुळे
आणखी कोणाची गरज नाही - विली
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आमदार संख्या २१ बनल्याने सरकार चालवण्यासाठी आता अन्य कोणाचीही गरज नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी केले. आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो हजर होते.
मगोप, अपक्ष आमदार विश्वजित राणे व अनिल साळगावकर, तसेच ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सरकारला पाठिंबा दिला आहे, त्याचे आपण स्वागत करतो, असेही डॉ. विली यांनी यावेळी सांगितले. सध्याचे सरकार आता अन्य कोणावरही अवलंबून नसल्याने राष्ट्रवादीचे तिसरे आमदार नीळकंठ हळर्णकर यांची मंत्रिपदी वर्णी लागावी, अशी मागणी पक्षाकडून समन्वय समितीसमोर ठेवण्याचे संकेतही त्यांनी देत विश्वजित राणे यांना पेचात पकडले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मगोपचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी मगोप, राष्ट्रवादी व विश्वजित या सहा आमदारांची वेगळी आघाडी स्थापन करून दिगंबर कामत सरकारला पाठिंबा देण्याची जी घोषणा केली आहे त्यात काहीही तथ्य नसल्याचे डॉ. विली यांनी सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची युती निवडणूकपूर्व असल्याने नव्या आघाडीचा सवालच उपस्थित होत नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. आता सेव्ह गोवा फ्रंटप्रमाणे मगोपला राष्ट्रवादीत विलीन व्हायचे असेल तर त्यांचे स्वागतच असेल, असा टोला हाणून त्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ऍड. रमाकांत खलप, डॉ. काशिनाथ जल्मी, प्रा. सुरेंद्र सिरसाट यासारखे नेते इतर पक्षांत असल्याने ढवळीकरांनाही ते अशक्य नाही, परंतु पक्ष विलीन करण्यास या पक्षाचे तळागाळातील कार्यकर्ते मात्र नक्कीच विरोध करतील असाही टोला त्यांनी हाणला. भाषावादासंबंधी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका मगोपला न परवडणारी आहे असे सांगून कोकणी ही एकमेव राजभाषा हे राष्ट्रवादीचे धोरण मगोपला मंजूर असल्यास त्यांनी विलीनीकरणाच्या प्रस्तावावर विचार करावा, असा चिमटाही डॉ. विली यांनी श्री. राऊत यांना काढला.
विधानसभा अधिवेशनकाळात दिगंबर कामत सरकार केवळ पेडणे येथे झालेल्या रस्ता अपघातामुळे वाचले असे डॉ. विली म्हणाले. त्यानंतर विधानसभा संस्थगित करून बंडखोरांच्या मागण्यांवर चर्चा करून या बंडावर तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेत्यांशी बंडखोर गटातील नऊही सदस्यांबरोबर चर्चा झाली. याबाबत नंतर दिल्लीत बोलणी केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांसह स्थानिक प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांची समन्वय समितीची बैठक येत्या दोन दिवसांत गोव्यात होणार आहे व त्यावेळीच या चर्चेअंती घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल व कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल येत्या दोन दिवसांत गोव्यात दाखल होणार आहेत. आघाडीतील इतर घटकांना आता काहीही महत्त्व राहिले नाही असे सांगून अपक्ष आमदार विश्वजित राणे यांच्याकडील मंत्रिपद राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना मिळवून देण्याचा प्रस्ताव केंद्रीय समन्वय समितीकडे ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत डॉ. विली यांनी दिले.
सेव्ह गोवामुळे कॉंग्रेस "अनसेफ" कॉंग्रेसपासून गोव्याला वाचवा असे म्हणून सेव्ह गोवा पक्षाची स्थापना केलेल्या चर्चिल यांनी अखेर कॉंग्रेसला वाचवण्यासाठी सेव्ह गोवाच विलीन केला, अशी प्रतिक्रिया डॉ. विली यांनी व्यक्त केली. सेव्ह गोवाच्या विलीनीकरणामुळे कॉंग्रेसची सदस्यसंख्या वाढली खरी, परंतु त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद अधिक तीव्र होणार असल्याचे ते म्हणाले. फ्रान्सिस सार्दिन व लुईझिन फालेरो यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणलेल्या चर्चिल यांना ते कितपत स्वीकारतील यात शंका असल्याचेही ते म्हणाले. लुईझिन यांनी इतर पक्षातील लोकांना कॉंग्रेसमध्ये घेऊन जो प्रयोग केला होता तो कसा अंगलट आला याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
Friday, 25 January 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment