Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 14 February 2010

वाहतुकीचा बट्ट्याबोळ
कार्निव्हलची मिरवणूक मोठ्या झोकात काढण्यात आली खरी, तथापि, पणजी शहरात त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडाला. पाटो पूल परिसरात वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे कुर्मगतीने वाहतूक पुढे सरकत होती. वाहतूक पोलिसांचे त्यावर कसलेच नियंत्रण नसल्याचे संतापजनक चित्र दिसून आले. त्यामुळे अनेकांना चरफडत आपल्या वाहनांतच बसून राहावे लागले. अखेर जेव्हा ही मिरवणूक संपली तेव्हा कोठे वाहतुकीची कोंडी संपुष्टात आली.
पणजीत "किंग मोमोची' राजवट सुरू
रंगारंग कार्निव्हलमध्ये ९० चित्ररथांचा सहभाग

पणजी, दि.१३ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- "खा प्या आणि मजा करा,' असा संदेश देत पणजी शहरात आज "किंग मोमो'ने आपल्या चार दिवसीय राजवटीस प्रारंभ केला व त्याचबरोबर रंगारंग कार्निव्हलला सुरुवात झाली. पाटो पूल येथून सायंकाळी ४ वाजता पर्यटक मंत्री मिकी पाशेको यांनी झेंडा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. चित्ररथ पाहण्यास असंख्य लोकांनी मांडवीच्या तीरावर गर्दी केली होती. अनेक इमारती, झाडांवर चढून लोकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. ९० हून अधिक चित्ररथांचा सहभाग असलेल्या या चित्ररथ मिरवणुकीत विदेशी ललना नृत्यात दंग असलेल्या जास्त प्रमाणात दिसत होत्या. काही चित्ररथ वगळता विविध उत्पादकांच्या जाहिरातींच्या चित्ररथांचा भरणा अधिक होता. दणदणीत संगीत आणि नृत्ये यामुळे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. मात्र पाटो पूल ते कलाअकादमीपर्यंतच्या मिरवणुकीमुळे वाहतुकीचा पूर्ण खेळखंडोबा झाल्याने घरी परतण्यासाठी कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. वाहनांची तर जबरदस्त कोंडी झाली होती. त्यात अनेक वाहने अडकून पडल्यामुळे प्रामुख्याने लहान मुलांची खूपच गैरसोय झाली. गोव्यात १५४० साली पोर्तुगीजांनी या उत्सवाला आरंभ केला. आता तर त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. शिवाय कार्निव्हलच्या माध्यमातून पर्यटकांनाही गोव्याकडे आकर्षित केले जात आहे.
बेकायदा खाण व्यवसायात
खुद्द सरकारच मश्गुल..!
मुख्यमंत्र्यांनी वाजवला नव्या समितीचा बिगुल

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांना खाण उद्योगात बेसुमार लयलूट करण्याचा परवानाच दिला आहे की काय, असा खडा सवाल विरोधकांनी केला आहे. असंख्य समस्या व अडचणींनी हैराण झालेल्या नागरिकांना वेळ देण्यास सरकारला फुरसत नाही, त्यामुळे विद्यमान सरकार खनिज उत्खननातच मश्गुल आहे की काय, असा टोलाही विरोधकांनी लगावला आहे.
राज्यात बेकायदा खाण उद्योगावर नियंत्रण आणण्याचे सोडून हे संकट अधिकाधिक गंभीर बनत चालले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मागील विधानसभा अधिवेशनात बेकायदा खाण उद्योगाबाबत सरकारवर गंभीर आरोप केले होते. सत्ताधारी पक्षातीलही काही आमदारांनी बेकायदा खाणींवरून मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्र्यांना लक्ष्य बनवले होते. यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी सहा महिन्यात बेकायदा खाणी बंद करू, असे आश्वासन सभागृहात दिले.मात्र बेकायदा खाणी बंद तर झाल्याच नाहीत. उलट आता सरकारातील काही नेते प्रत्यक्ष खाण व्यवसायात उतरले आहेत. या नेत्यांकडूनच बेकायदा खाण उद्योग सुरू असल्याचे जाहीर आरोप होऊ लागले आहेत.
वाळपई आंबेली येथील बेकायदा खाण प्रकरणांतही एका मंत्र्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या बेकायदा खाणीचा विषय वृत्तपत्रांतून उघड झाल्याने खाण खात्याने कारवाई केली खरी; मात्र ही कारवाई केवळ तोंडदेखली ठरल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. बेकायदा खाणींबाबत चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेली समिती ही पूर्णपणे राजकीय दबावाखाली वावरत आहे. त्यामुळे या खाणींबाबत कडक कारवाई केली जाणे शक्य नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. आहेत. राज्यात सर्वत्र बेकायदा खाणींचा उच्छाद सुरू असून लोकांत तीव्र असंतोष पसरला आहे. मुख्यमंत्र्यांकडून बेकायदा खाणींबाबत एकाही तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली जात नाही, त्यामुळे लोकांच्या रोषाला खतपाणी मिळत असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे.
पुन्हा नवी समिती
एखाद्या प्रकरणी कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्यक्ष कारवाई न करता समिती स्थापन करून वेळकाढूपणा करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी चांगलेच अवगत केले आहे. बेकायदा खाणींबाबतही त्यांनी आता तीच भूमिका घेतली आहे. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून बेकायदा खाणींबाबत चौकशी करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत. ही समिती केंद्र सरकारच्या शिफारशीवरून स्थापन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे व या समितीचा अहवाल केंद्राला सुपूर्द केला जाणार आहे,असेही सांगण्यात आले. दरम्यान, गोव्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कमी दर्जाच्या खनिजाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा एकदा मागणी वाढली आहे, त्यामुळेच कदाचित बेकायदा खनिज उत्खननाचे प्रकार वाढले असावेत,अशी मल्लिनाथी मुख्यमंत्र्यांनी केली.

Saturday, 13 February 2010

स्फोटांबाबतचे गूढ कायम

सरकारी यंत्रणा सुस्त
काणकोण, दि. १२ (प्रतिनिधी)- काल दुपारी काणकोण भागात झालेल्या तीव्र स्वरूपाच्या स्फोटांनी शेजारील कर्नाटक राज्यातील काही भाग हादरला होता. परंतु, विस्फोट नेमका कुठे झाला याबद्दलची निश्चित माहिती अजूनही शासनातर्फे जाहीर झालेली नाही. विस्फोटानंतर २४ तास उलटूनही शासकीय यंत्रणेला घटनेमागचे गूढ उकलण्यात अपयश आल्याने या सुस्त कारभाराबद्दल स्थानिक आमदार विजय पै खोत व रमेश तवडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अतिशय तीव्र स्वरूपाचे एकामागून एक तीन विस्फोट व्हावे व राज्यातील सरकारी यंत्रणेला याबद्दल काहीही माहिती नसावी ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे राज्य तसेच देशाच्या सुरक्षा यंत्रणेबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेत्यांना आपण या बद्दल अवगत केले असून त्यांनी जनतेत निर्माण झालेला हा संभ्रम दूर करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार विजय पै खोत यांनी केले आहे. खुद्द मुख्यमंत्री व सरकारी यंत्रणेला माहिती नसल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप पसरल्याचे आमदार खोत यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
पैंगीणचे आमदार रमेश तवडकर यांनीही सरकारच्या सुस्त धोरणावर कडाडून टीका केली आहे. काणकोणमध्ये जोरदार अफवांना ऊत आला असून नैसर्गिक आपत्तीला सामोरे गेलेल्या जनतेला या घटनेच्या नेमक्या कारणाची माहिती देणे ही सरकारची जबाबदारी आहे. गोंधळाच्या वातावरणाला त्वरित पूर्णविराम द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
सदर प्रकार हा भूकंपाचा प्रकार असल्याचे वृत्त खोडून काढताना आमदार खोत यांनी सैन्यदल किंवा नौदलाच्या गुप्त कार्यक्रमाअंतर्गत विस्फोट होण्याची जास्त शक्यता असल्याचे मत व्यक्त केले. शासकीय यंत्रणेने सत्य जनतेसमोर मांडण्याची मागणी करताना हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
काल रात्रौ उशिरा मिळालेल्या माहितीनुसार माजाळी-कारवार व पोळे दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक मच्छीमाराने एक लढाऊ विमान समुद्रावर घिरट्या घालताना असताना पाहिले होते. नंतर पाण्याच्या जवळ येऊन त्यांनी स्फोट घडविले व या स्फोटांचा प्रचंड आवाज झाला होता. यावेळी समुद्राचे पाणी २० ते २५ मीटर उंच उसळले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना दिली. यामुळे काणकोण परिसर हादरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, तळपण येथील काही मच्छीमारांची होडी स्फोटाच्या वेळी हादरली होती, अशी माहिती मिळाली आहे. पाण्यात क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची शक्यता काही पोलिस कर्मचारी अनौपचारिकपणे व्यक्त करत होते.
या स्फोटामुळे काणकोण पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी संपूर्ण किनारी भागत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले; परंतु विस्फोट कसा झाला त्याची निश्चित माहिती आज दुपारपर्यंत मिळालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

न्या. प्रभुदेसाई निलंबनासंदर्भात १७ ला पणजीत वकिलांची सभा

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- औद्योगिक तंटा लवादाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाचे पडसाद राज्यात अधिक तीव्रपणे उमटत असून त्यांच्या या निलंबनाला विरोध करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. श्रीमती प्रभुदेसाई यांचे ज्या विषयावरून निलंबन झाले आहे त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दक्षिण गोवा वकील संघटनेने १५ रोजी बैठक बोलावली आहे, तर १७ रोजी पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात राज्यभरातील वकिलांच्या एका मध्यवर्ती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मोठ्या संख्येने वकीलवर्ग उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
न्यायाधीश या नात्याने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही वादग्रस्त न ठरलेल्या, कोणत्याही वादात न सापडलेल्या श्रीमती प्रभुदेसाई २००३ व २००४ सालच्या जुन्या खटल्यांसंदर्भात निलंबित झाल्यानंतर राज्यातील वकीलवर्गात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी त्या उघडपणे व्यक्त करून श्रीमती प्रभुदेसाई यांच्याप्रति संवेदना आणि पाठिंबा व्यक्त केला. प्रतिक्रियांची ही मालिका आजही सुरू होती. दरम्यान, येथील एका क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने आमंत्रित करून त्यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

पोंबुर्फा अपघातात महिला जागीच ठार

म्हापसा, दि. १२ (प्रतिनिधी)- पोंबुर्फा पर्वरी रस्त्यावरील गतिरोधकाजवळ एका ट्रकाने स्कूटरला मागून धडक दिल्याने मागे बसलेली ट्रीमा कुडणेकर (२४) या महिलेचे ट्रकखाली सापडून जागीच निधन झाले.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ कुडणेकर व ट्रीमा कुडणेकर जीए ०७ एच १२२५ क्रमांच्या डिओ स्कूटरने पोंबुर्फा येथून पर्वरीच्या दिशेने जात होते. भक्तवाडा चोडण येथील गतिरोधकाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या स्वराज माझडा (क्र. जीए ०२ यू ५८७९) ट्रकाची जोरदार धडक स्कूटरला बसली. यावेळी चालक सिद्धार्थ स्कूटरवरून दूरवर खाली फेकला गेला तर ट्रीमा ट्रकच्या खाली सापडली. यावेळी तिचे जागीच निधन झाले. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रकचालक शैलेश वळवईकर (३५) याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास मिलिंद भुईंदर व हवालदार बाळू जाधव करत आहेत.

तर दफनभूमीचीच सोय करावी लागेल

पंचवाडीवासीयांची उपहासात्मक टीका

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- पंचवाडीसाठी इस्पितळ, शैक्षणिक सुविधा, क्रीडा मैदान, व्यायामशाळा तसेच इथल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची भाषा करणाऱ्या सेझा गोवा खाण कंपनीने राज्यात इतरत्र ठिकाणी आपल्या खाणी असलेल्या गावांतील लोकांना अशा किती सुविधा पुरवल्या आहेत याची माहिती उघड करावी. नियोजित कोडली ते पंचवाडी खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्प हा पंचवाडीचा नाश करणाराच ठरेल, त्यामुळे पंचवाडीवासीयांना या सुविधा पुरवण्यापेक्षा इथे भली मोठी दफनभूमीचीच सोय करा, अशी उपहासात्मक टीका पंचवाडी बचाव समितीने केली आहे.
पंचवाडी बचाव समितीकडून उपसरपंच जॉन ब्रागांझा व पंचायत सचिव प्रदीप नाईक यांच्याविरोधात गटविकास अधिकारी व पंचायत संचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ग्रामसभेचा विरोध डावलून वादग्रस्त खाण प्रकल्पाचे समर्थन करणारा ठराव घाईगडबडीत संमत करून घेण्यात आला. ठराव संमत करून पंचायत कार्यालयातून पलायन करण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना असावी, अशी खिल्लीही यावेळी समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी उडवली. पंचसदस्य लता नाईक, दिलीप गावकर यांनीही उपसरपंच जॉन ब्रागांझा यांना पाठिंबा दिला त्यामुळे या बेकायदा कृतीचे तेही वाटेकरी ठरतात, असाही आरोप यावेळी करण्यात आला.
या नियोजित खाण प्रकल्पाचे समर्थन करण्यासाठी गावातील सुमारे वीस ते पंचवीस लोकांना एकत्र करून फोंडा येथील एका बड्या हॉटेलात दोन वेळा पत्रकार परिषद घेण्यात आली व तिथे संपूर्ण पंचवाडी गावाचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे पत्रकारांसमोर भासवण्यात आले. पत्रकार पंचवाडी गावात आले तर या प्रकल्पाविरोधात येथील ग्रामस्थांत किती रोष आहे हे त्यांना कळेल. यामुळेच फोंडा येथे बड्या हॉटेलात पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले, अशी टीकाही पंचवाडी बचाव समितीने केली आहे. या प्रकल्पाला पाठिंबा देणारे हे मोजकेच लोक आहेत व त्यांना या प्रकल्पातून पंचवाडीचे काय नुकसान होणार याच्याशी काहीही देणेघेणे नाही. हा प्रकल्प उभा राहिल्यास त्यांना मात्र वैयक्तिक फायदा आहे, म्हणूनच ते या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, अशी टीकाही यावेळी समितीने केली आहे.
दरम्यान,राज्यात सर्वत्र खाणप्रभावीत गावांतील लोक खाण प्रकल्पांना विरोध करतात व इथे मात्र काही लोक आपल्या गावचे सोडून वैयक्तिक हित साधण्यासाठी या नियोजित खाण प्रकल्पाचे समर्थन करतात, असा आरोप क्रिस्टो यांनी केला. उपसरपंच जॉन ब्रागांझा, पंचसदस्य लीना नाईक व दिलीप गावकर यांनी खाण समर्थन ठरावाला आपला पाठिंबा दिला आहे. हा नियोजित प्रकल्प कसा असेल, गावच्या नैसर्गिक संपत्तीचे कसे नुकसान होणार नाही, ग्रामस्थांच्या काजू, नारळाच्या बागायती कशा नष्ट होणार नाहीत, शेती कशी टिकेल, धूळ प्रदूषण कसे होणार नाही याची माहिती ते ग्रामस्थांना पटवून देऊ शकतात काय,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रत्यक्षात या प्रकल्पाची काहीही माहिती नसताना निव्वळ कोणाच्या तरी सांगण्यावरून लोकांना रोजगार मिळेल व गावचा विकास होईल, अशी पोकळ आश्वासने देऊन या प्रकल्पाला पाठिंबा देण्याची कृती म्हणजे पंचवाडी गावच्या भवितव्याकडे खेळ मांडण्याचा प्रकार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
"उटा'कडे मदतीची हाक
पंचवाडी गावात होऊ घातलेल्या खाण प्रकल्पामुळे सर्वांत जास्त फटका येथील अनुसूचित जमातीच्या लोकांना बसणार आहे. शेती, बागायती हे येथील लोकांचे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे, त्यामुळे तुटपुंज्या पैशांचे आमिष दाखवून या लोकांना रोजगार व व्यवसायाचे गाजर पुढे करून फसवले जात आहे. पंचवाडीच्या रक्षणार्थ पुढे सरसावलेल्या या लोकांना राज्यातील सर्व अनुसूचित जमातीच्या बांधवांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करून "उटा' संघटनेकडेही या लोकांनी मदतीसाठी हाक मागितली आहे. पंचवाडी गावचे फादर व येथील श्री देवी सातेरी देवस्थान समितीनेही पंचवाडी बचाव समितीला आपला पाठिंबा दिल्याने कोणत्याच पद्धतीत हा गाव सेझा गोवा खाण कंपनीकडे गहाण ठेवण्यास देणार नाही, असा निर्धार या लोकांनी केला आहे.

उत्तर गोवा अधीक्षकांवर चौकशीची जबाबदारी

जेम्स आल्मेदा मृत्यू प्रकरण
कुळे, दि. १२ (प्रतिनिधी) - येथील जेम्स आल्मेदा याच्या गूढ मृत्यूप्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांवर सोपवली आहे.
कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनीच ही माहिती दिल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. जेम्सच्या मृत्यूनंतर काही लोकांनी केवळ चार तासांत त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. ती करताना त्यांनी ज्या आडमार्गाचा वापर केला तो आक्षेपार्ह असल्याने कुळे नागरिक समितीने, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कुळे पोलिसांकडे केली होती. मात्र, कुळे पोलिसांनी घटनेच्या तळाशी न जाता कुळे नागरिक समिती आणि जेम्सच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणारा त्याचा मालक यांच्यात वैरभाव असल्याचा भलताच मुद्दा उपस्थित केला. पोलिसांनी त्याद्वारे सदर प्रकरणाचा रोख भलतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. ते करताना त्यांनी वेळकाढू धोरण तर स्वीकारले आणि त्याचबरोबर चौकशीसाठी आलेल्या केपे विभागीय दंडाधिकाऱ्यांचीही दिशाभूल केली. त्यामुळे केप्याचे उपजिल्हाधिकारी असलेल्या दंडाधिकाऱ्यांनीही नागरिक समिती आणि खाण व्यवसायावरून बार मालकांच्या ताणलेल्या संबंधांवर भर देण्याचा प्रयत्न केला.
या स्थितीमुळे कुळे नागरिक समितीने एकाबाजूने न्यायालयाकडे धाव घेण्याची तयारी चालवली असतानाच त्या आधीची पायरी म्हणून गुरूवार दि. ११ रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून या प्रकरणाची योग्यरीतीने चौकशी व्हावी आणि जेम्सच्या मृत्यूमागचे गूढ उकलून गावात निर्माण झालेले संशयाचे ढग दूर करावे, अशी त्यांना विनंती केली होती. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची व्यक्तीशः भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता सदर प्रकरण उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी "गोवादूत' शी बोलताना सांगितले.

Friday, 12 February 2010

निलंबित न्या. अनुजा प्रभुदेसाईंसाठी शेकडो वकिलांनी कंबर कसली

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राज्यातील औद्योगिक तंटा लवाद न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेल्या निलंबनाचे जोरदार पडसाद सध्या राज्यातील वकील आणि न्यायाधीशांमध्ये उमटले असून या निलंबनाला विरोध करण्यासाठी सध्या राज्यभरातील वकिलांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे कनिष्ठ ते वरिष्ठ पातळीवरील बहुसंख्य न्यायाधीशांनीही श्रीमती प्रभुदेसाई यांना आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांची न्यायाधीश या नात्याने गेल्या अठरा वर्षांची कारकीर्द अत्यंत स्वच्छ आणि निःस्पृह राहिली असल्याचे या वकील व न्यायाधीशांचे म्हणणे असून त्यांचे निलंबन करताना पुढे करण्यात आलेल्या कारणांमुळे आमचे अजिबात समाधान झालेले नाही, किंबहुना श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे न्याय क्षेत्रातील प्रामाणिक लोकांना एक प्रकारचा धक्काच बसल्याची प्रतिक्रिया अनेक वकिलांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाला सर्व स्तरावरून जोरदार विरोध करण्याचा निर्णयही विविध वकील संघटनांनी घेतला आहे. विरोधाची ही तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचे उघड पडसाद लवकरच संपूर्ण राज्यभर उमटण्याची दाट शक्यता आहे.
श्रीमती प्रभुदेसाई यांनी कनिष्ठ न्यायालयापासून ते जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या नात्याने पदभार सांभाळला असून राज्यातील न्यायसंस्था, वकील, सहकारी यांच्यात एक शिस्तबद्ध आणि प्रामाणिक न्यायाधीश अशी त्यांची कायम प्रतिमा राहिली आहे. तथापि, २००४ मधील काही अपघातविषयक खटल्यांमध्ये न्यायाधीश या नात्याने त्यांनी आपद्ग्रस्तांना मंजूर केलेल्या नुकसानभरपाईला तसेच २००३ सालच्या एका भूसंपादन प्रक्रियेवरील निवाड्याच्या कार्यवाहीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयाच्या आढावा समितीने त्यांच्या निलंबनाची शिफारस केली. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे निलंबन अशा वेळी आले आहे की, त्यांच्या भावी कारकिर्दीवर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. येत्या जानेवारी २०११ मध्ये गोव्यातून मुंबई उच्च न्यायालयावर गेलेले न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो हे निवृत्त होत आहेत व त्यांची ही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सहा महिने आधीपासूनच सुरू होणार आहे. गोव्याच्या न्यायपालिकेत श्रीमती प्रभुदेसाई या सर्वांत ज्येष्ठ न्यायाधीश असल्याने या पदासाठी त्या प्रमुख दावेदार होत्या. मात्र आता निलंबनामुळे त्यांना ही संधी मिळणार की नाही यावरून सध्या अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. मागच्या प्रकरणांवरून निघालेले त्यांचे हे निलंबन अशा वेळी आल्याने वकील आणि न्यायाधीश वर्गात सध्या चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांच्या या निलंबनाच्या अनुषंगाने काही ज्येष्ठ वकिलांनी आपल्या तीव्र भावना आणि चिंता व्यक्त केली आहे.
राज्य कायदा आयोगाचे सदस्य मारियो पिंटो आल्मेदा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन ही एक अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे "गोवादूत'शी बोलताना सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई या एक अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या न्यायाधीश म्हणून समस्त वकील आणि न्यायालयीन वर्तुळात ओळखल्या जातात. न्यायाधीश या नात्याने इतक्या वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांचे वर्तन नेहमीच निःस्पृह राहिले आहे. त्यांच्याविरुद्ध इतक्या वर्षात कधीही कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत की त्या वादग्रस्तही ठरल्या नाहीत. त्यामुळे एका चांगल्या व्यक्तीला मिळालेली ही शिक्षा खूप मोठी आहे. इतकी वर्षे वकील म्हणून काम करताना श्रीमती प्रभुदेसाई यांच्याबद्दल आम्हा वकील मंडळींच्या मनात नेहमी आदराचीच भावना राहिली. त्यांच्या हातून कधीही कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य होणार नाही याबद्दल कोणाच्याही मनात संदेह असणार नाही. त्यामुळे न्याय पालिकेनेही त्यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईचा तात्काळ फेरविचार करावा अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले.
येथील एक ज्येष्ठ वकील श्रीमती शुभलक्ष्मी नायक यांचीही प्रतिक्रिया याच सदरात मोडणारी होती. श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाचे वृत्त वाचून आपणास धक्काच बसला. गेली अनेक वर्षे आपण त्यांना ओळखते. आपले काम नेहमीच सचोटीने करणारी एक अत्यंत प्रामाणिक न्यायाधीश हीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या न्यायाधीशावर ही पाळी यावी याबद्दल आपणास अत्यंत वाईट वाटते आहेच परंतु त्याही पेक्षा या घटनेने आपणास जबर धक्का बसल्याचेही ऍड. शुभलक्ष्मी नायक यांनी सांगितले.
लेबर प्रॅक्टिशनर असोसिएशन (कामगार कज्जाविषयक वकील संघटना) चे अध्यक्ष ऍड. माधव बांदोडकर यांनीही श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनामुळे आपणास धक्का बसल्याचे सांगितले. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या निलंबनामागच्या कारणांबाबत आपण भाष्य करणार नाही, परंतु एक प्रामाणिक न्यायाधीश म्हणूनच आम्ही वकील मंडळी त्यांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निलंबनामुळे कामगार कज्जे विषयक कामकाजात अडथळे येणार असल्याचे ते म्हणाले. श्रीमती प्रभुदेसाई यांचे निलंबन दुःखदायी असल्याचे ते म्हणाले.
श्रीमती प्रभुदेसाई या अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक न्यायाधीश म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या निलंबनाने आपणास धक्काच बसल्याचे येथील एक नामवंत वकील ऍड. शैलेश भोबे यांनी सांगितले.
राज्यातील एक आघाडीचे वकील सरेश लोटलीकर यांची प्रतिक्रिया तर अधिकच बोलकी होती. ते म्हणाले, मुळातच विविध घटनांमुळे न्यायप्रणाली बऱ्याचदा वादग्रस्त ठरत असताना, श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासारख्या प्रामाणिक न्यायाधीशाला प्रामाणिकपणाचे हेच फळ मिळत असेल तर नवीन चांगले लोक या क्षेत्रात यायलाच बघणार नाहीत. श्रीमती प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले आरोपपत्र आपण स्वतः वाचलेले आहेत. या आरोपपत्रात त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप अत्यंत तकलादू आहेत. अपघातग्रस्तांना त्यांच्या मागणीपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली हे कारण तर कोणालाही न पटणारे आहे. किंबहुना या आरोपामुळे तर श्रीमती प्रभुदेसाई या खरोखरच प्रामाणिक आहेत हेच सिद्ध होते. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत "नो नॉनसेन्स जज्ज' हीच त्यांची ओळख आहे. आज केवळ आपणच नव्हे तर संपूर्ण बार काउन्सील त्यांच्या पाठीशी उभे आहे. न्यायाधीश म्हटले की त्याच्या निवाड्यामुळे एकटा आनंदी होणे आणि दुसरा वकील नाराज होणे हे आलेच परंतु श्रीमती प्रभुदेसाई यांच्यावर कधीही कोणी तसा राग धरला नाही. त्यांचा निवाडा सगळ्यांनीच खुल्या दिलाने मान्य केला, अशी त्यांची निःस्पृहता आहे. उदाहरणच द्यायचे तर आज मी त्यांच्या पाठीशी राहिलो आणि उद्या त्या पुन्हा न्यायालयात रुजू झाल्या तर माझ्या एखाद्या खटल्यात निवाडा देताना मी त्यांच्या मागे राहिलो होतो हा विचारसुद्धा त्यांच्या मनात शिवणार नाही, इतक्या त्या प्रामाणिक आहेत. त्यामुळे आज त्यांच्या निलंबनाच्या वेळी त्यांना मिळणारा पाठिंबा हा उत्स्फूर्त असून आज सगळेच वकील आणि न्याय यंत्रणेशी संबंधित बहुसंख्य सगळेच त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे ऍड. लोटलीकर पुढे म्हणाले.

काणकोण परिसर स्फोटांनी हादरला

घटनेबाबत तर्कवितर्क
काणकोण, दि. ११ (प्रतिनिधी): आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या तीन प्रचंड स्फोटांच्या आवाजाने काणकोण व परिसर हादरून गेला. समोरच जिलेटिन फुटावा, अशा स्वरूपाचा हा स्फोट नेमका कुठे झाला, याची माहिती संध्याकाळी उशिरापर्यंत सुरक्षा यंत्रणांना मिळाली नव्हती. या घटनेचे रहस्य उलगडलेले नसल्याने काणकोण भागात मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लढवले जात होते.
आज दुपारी समुद्राच्या दिशेने हा आवाज ऐकू आल्यानंतर नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले. या स्फोटाचा प्रभाव एवढा भयंकर होता की काणकोण भागातील घरांमधील अनेक वस्तू गडगडून खाली कोसळल्या, अशी माहिती कॅटरिना परेरा या स्थानिक महिलेने दिली. घराच्या खिडक्या व भिंती हादरून गेल्याचे काही स्थानिकांनी सांगितले. कृष्णा वेळीप यांनी आवाज ऐकून वरून काही तरी खाली कोसळत असल्याचा भास झाल्याचा अनुभव सांगितला.
घटनेनंतर पोलिस यंत्रणेचे कोंबिंग ऑपरेशन खोला, आगोंद, माशे, पाळोळे, पोळे, लोलये या भागात सुरू होते. परंतु, स्फोट कसा झाला याची निश्चित माहिती मिळालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. काणकोण अग्निशामक दलाने निश्चित माहिती मिळालेली नसल्याचे सांगितले. दरम्यान, किनारा रक्षक दलातर्फे हवाई सर्वेक्षण करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या स्फोटाचा आवाज सांगे-साळावली धरण प्रकल्पावर तैनात सुरक्षा रक्षकांना ऐकू आल्याची माहिती त्यांनी "गोवादूत'ला दिली. बाळ्ळी, केपे व कारवार येथेही या स्फोटाचा आवाज नागरिकांनी ऐकल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
येथील नौदलाच्या तळावर दैनंदिन प्रयोग करतेवेळी स्फोट झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत होता.
-----------------------------------------------------------------
नौदलाचे स्पष्टीकरण
वास्को, दि. ११ (प्रतिनिधी): काणकोण येथील स्फोटप्रकरणी नौदलाचे प्रवक्ते महेशचंद्र जोशी यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रवक्ते श्री. जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आवाज झाला त्यावेळी नौदलाच्या लढाऊ विमानाचा सराव नैऋत्य दिशेने सुरू होता. परंतु, यावेळी सदर विमानात कोणत्याच प्रकारचा दारूगोळा नव्हता. यामुळे या विमानामुळे स्फोट होण्याची शक्यता फेटाळून लावताना विमानाचा आवाजच लोकांनी अनुभवला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विमानाचा आवाज तीन वेळा येण्याची शक्यता त्यांनी नाकारली. सदर विमान पूर्णपणे सुरक्षित असून नौदलाची कोणतीच कृती या स्फोटासाठी जबाबदार नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले.

दाभाळ येथे आगीत ४.५ लाखांचे नुकसान

फोंडा व कुडचडे, दि. ११ ( प्रतिनिधी): वयलोवाडो दाभाळ किर्लपाल येथील डॉ. सिद्धार्थ शिरोडकर यांच्या सुपारी, नारळ साठवून ठेवलेल्या गोदामाला आज संध्याकाळी ५ च्या सुमारास आग लागल्याने अंदाजे ४.५ लाख रुपयांची हानी झाली आहे. गोदामात साठवून ठेवलेली सुपारी, नारळ, सुपारी सोलण्याचे एक यंत्र, फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात ४ रिकाम्या गॅस सिलिंडरांचा समावेश होता. फोंडा व कुडचडे येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवली. आग एवढी भयानक होती की ती विझवण्यासाठी तेथील ओहोळातून पाणी खेचण्यात आले. सुमारे १ तास पाणी खेचण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने वर्तवला आहे.