Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 24 January 2009

प्रणव मुखर्जी सांभाळणार पंतप्रधान कार्यालयाचा कारभार

नवी दिल्ली, दि. २३ : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्दयावरील शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी एम्समध्ये दाखल झाल्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान कार्यालयाचा कारभार सांभाळणार आहेत.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी बायपास शस्त्रक्रिया होत आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा काही दिवसांसाठी त्यांना रुग्णालयातच राहावे लागेल. या काळात प्रणव मुखर्जी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळतील.
मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्याच्या वेळेस प्रणव मुखर्जी यांनी यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकांचे नेतृत्व केले आहे.

पंतप्रधानांवर आज 'बायपास' शस्त्रक्रिया

नवी दिल्ली, दि. २३ : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या ह्दयाची "ऍन्जिओग्राफी' आणि इतर चाचण्या नुकत्याच करण्यात आल्या होत्या. रक्ताभिसरणात काही अडथळे निर्माण झाल्याचे आढळून आल्यामुळे शनिवारी त्यांच्या ह्दयावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पंतप्रधान आज एम्समध्ये दाखल झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते दीपक संधू यांनी, २४ जानेवारीला एम्स रुग्णालयात पंतप्रधानांवर "कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी' केली जाणार असल्याचे सांगितले. एम्स आणि एशिया हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई, येथील चिकित्सकांचा एक गट ७६ वर्षीय डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. शस्त्रक्रिया करणार असलेल्या चिकित्सकांच्या या गटाला एम्सच्या विविध विभागांचे चिकित्सक आणि तांत्रिक कर्मचारी सहकार्य करणार आहेत.
याआधी त्यांच्यावर झालेल्या ऍन्जिओग्राफी आणि इतर चाचण्यांनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयातून गुरुवारी रात्री जारी झालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची देखभाल करणाऱ्या चिकित्सकांच्या गटाकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठीची तयारी करण्यात येत आहे. चिकित्सकांच्या निरनिराळ्या गटांचे नेतृत्व पंतप्रधानांचे वैयक्तिक चिकित्सक डॉ. के. एस. रेड्डी करीत आहेत. पंतप्रधानांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. या अगोदर १९९० मध्ये ब्रिटनमध्ये पंतप्रधानांची "कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी' करण्यात आली होती. काही वर्षानंतर त्यांची "ऍन्जिओप्लास्टी' झाली होती.
पंतप्रधान तपासणीसाठी मंगळवारी इस्पितळात गेले होते. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसात त्यांची "कोरोनरी ऍन्जिओग्राफी' झाली. त्यांना बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या सरकारी निवासस्थानातूनच कार्यालयीन कामे करीत होते. गणतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या समारंभातही पंतप्रधान सहभागी होतील की नाही, याचा निर्णय अजून झालेला नसल्याचे सूत्रांकडून कळते.
शस्त्रक्रिया एम्समध्येच
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील शस्त्रक्रिया अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथेच होणार असल्याची पुष्टी केंद्रीय आरोग्य मंत्री अंबुमणी रामदास यांनी केली. रामदास आज एम्समध्ये पंतप्रधानांना भेटायला गेले होते.

सचिनची सही त्यांना अखेर मिळालीच नाही

वास्को, दि.२३ (प्रतिनिधी): 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर यांचे आज संध्याकाळी गोव्यात आगमन झाले तेव्हा कडक सुरक्षेमुळे त्याच्या चाहत्यांना सचिनचे दूरुनच "दर्शन' घेण्यावर समाधान मानावे लागले. त्यातील अनेकांना सचिनची स्वाक्षरी हवी होती तर काहींना त्याच्याशी संवाद साधायचा होता, मात्र अखेर त्यांच्या पदरी निराशाच पडली.
संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सचिनचे आगमन किंगफीशरच्या विमानातून दाबोळी विमानतळावर झाले. तो गोव्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या चाहत्यांना मिळाली होती. त्यामुळे सुमारे दोन तास त्यांनी विमानतळावरच ठिय्या दिला होता. नंतर ही गर्दी वाढतच गेली. अर्थात, सचिन विमानतळावर दाखल झाला तेव्हा त्याचा ताबा सुरक्षा रक्षकांनी घेतला.
विमानतळावर उतरल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्याला जणू गराडाच घातला होता. त्यामुळे त्याचे छायाचित्र टिपतानाही माध्यमांच्या छायाचित्रकारांना कसरत करावी लागली. नंतर खास गाडीत बसून तो भुर्रकन निघून गेलासुद्धा आणि त्याला पाहण्यासाठी आलेली मंडळी वाऱ्याच्या वेगाने निघालेल्या मोटारीकडे पाहातच राहिली...
मिळालेल्या माहितीनुसार सचिनचे वास्तव्य पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये असेल. तेथेच आयोजित करण्यात आलेल्या एका आस्थापनाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी तो आला आहे. या परिषदेला उपस्थिती लावून नंतर उद्या तो गोव्यातून रवाना होणार आहे. विशेष म्हणजे दाबोळी विमानतळावरून कडक सुरक्षेत बाहेर काढलेल्या सचिनला आपल्या हॉटेलात जात असताना त्याच्यासोबत सुरक्षा जवान दिसून आला नसल्याने उपस्थित चाहत्यांकडून आर्श्चय व्यक्त करण्यात आले.
पणजी व फोंडा, दि. २३ (प्रतिनिधी): फोंडा येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात कथित सहभाग असल्याप्रकरणी "आयआरबी'च्या शांबा जल्मी या जवानाला आज निलंबित करण्यात आले. याविषयीचा आदेश "आयआरबी'चे कमाडंट जयप्रकाश कुडतडकर यांनी काढला.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
त्या युवतीला अस्वस्थ वाटू लागल्याने तिची आई तिला वैद्यकीय उपचारासाठी माशेल येथील एका खासगी इस्पितळात घेऊन गेली. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर मुलीला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात तपासणी साठी नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २१ जानेवारी २००९ रोजी सदर मुलीला बांबोळी येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात सदर मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचे आढळून आले. त्यानंतर २२ जानेवारी २००९ रोजी दुपारी ही माहिती फोंडा पोलिसांना देण्यात आली. फोंड्याचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या समवेत मुलीची जवानी नोंदवून घेतली. मुलीने गावातील तीन युवकांची नावे आपल्या जबानीत दिली. फोंडा पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपास करण्यास प्रारंभ केला. आयआरबीच्या जवानाला रायबंदर येथील कॅम्पमधून ताब्यात घेण्यात आले. तसेच अन्य दोघा संशयितांना गावातून ताब्यात घेण्यात आले आहेत. त्या गावाच्या वाड्यावर एकाच नावाचे तीन युवक असल्याने संशयितास हुडकून काढण्यात पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले.
तिघांच्या वासनेची बळी पडलेली ही युवतीला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. एका विद्यालयात ती शिक्षण घेत आहे. गेल्या सप्टेंबर २००८ ह्या महिन्यात आयआरबीच्या जवानाने तिच्याशी प्रथम मैत्री केली. नंतर सदर युवती इतर दोन युवकांच्या संपर्कात आली, असे पोलिसांनी सांगितले. ह्या प्रकरणातील तिघांचा समावेश असला तरी खरा आरोपी शोधण्यासाठी "डीएनए' चाचणी घेतली जाणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. सदर युवती आणि संशयित आरोपींची बांबोळी येथील सरकारी इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणी निरीक्षक मंजुनाथ देसाई तपास करीत असून संशयितांना पकडण्यासाठी उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, हवालदार प्रताप परब, सावळो नाईक व इतरांनी परिश्रम घेतले.

राज्यावर आर्थिक महासंकट, आगामी विधानसभा अधिवेशनात वाचा फोडणार : पर्रीकर

पणजी, दि.२३(प्रतिनिधी) : गोव्यावर येत्या काळात भीषण आर्थिक महासंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. त्यामुळे राज्याच्या या दारूण आर्थिक परिस्थितीवरच आगामी विधानसभा अधिवेशनात झगझगीत प्रकाश टाकला जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
आज पर्वरी येथे भाजप विधिमंडळ गटाची बैठक झाली. या बैठकीनंतर तेथेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पर्रीकर यांनी ही माहिती दिली.यावेळी विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक व आमदार विजय पै खोत हजर होते.
यंदा आर्थिक पातळीवर सुमारे ८०० ते एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या महसुलात जबरदस्त घसरण झाल्याने राज्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीत सुमारे २५ टक्के कपात होण्याची शक्यताही श्री.पर्रीकर यांनी व्यक्त केली.सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर पडलेला अतिरिक्त ताण व महसुलाच्या इतर स्त्रोत्रांमध्ये झालेल्या घसरणीचे दूरगामी परिणाम राज्यावर संभवतात. त्याबाबत तातडीने गांभीर्याने विचार होण्याची गरज असताना विद्यमान सरकार मात्र "निश्ंिचत' असल्याची टीका श्री. पर्रीकर यांनी केली.
विधानसभा अधिवेशन वर्षाला किमान ४० दिवस चालणे गरजेचे असते. गेल्या वर्षी अधिवेशनाचे १८ दिवस कमी करण्यात आले व आता यंदा सुरूवातच चुकीच्या पद्धतीने होते आहे. हे अधिवेशन मुळात जानेवारी महिन्यात होण्याची गरज होती, त्यात येत्या २ ते ६ फेब्रुवारीपर्यंत जाहीर झालेल्या अधिवेशनात केवळ तीनच प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस मिळतात,असे पर्रीकर म्हणाले.
जनतेच्या विविध समस्या व मागण्यांना न्याय देण्यासाठी हा कालावधी खपूच कमी असून सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळत असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला. दरम्यान, गोव्यात गेल्या काही वर्षांपासून खुद्द सत्ताधारी पक्षाकडूनच अधिवेशन स्थगित ठेवणे किंवा कामकाजात व्यत्यय आणण्याचे प्रकार सुरू आहेत. एरवी विरोधकांमुळे ही परिस्थिती ओढवते; परंतु गोवा त्याला अपवाद ठरल्याचा टोला पर्रीकर यांनी लगावला.
खाजगी विधेयकांना कचऱ्याची टोपली
गेल्या अधिवेशनात संमत झालेल्या विविध खाजगी विधेयकांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. सरकारला या विधेयकांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. परिणामी गेल्या
अधिवेशनात संमत झालेल्या किंवा यापुढे संमत होणाऱ्या खाजगी विधेयकांची सहा महिन्यांत कार्यवाही व्हावी,असे एकमेव खाजगी विधेयक या अधिवेशनात मांडले जाईल,असेही पर्रीकर म्हणाले. गोव्यासाठी विशेष दर्जा,राजभाषेचा वाद,बायणा येथील चौपदरीकरणाचा प्रश्न आदी विविध विधेयकांवर सरकार अजूनही गप्प आहे,याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
खारीवाडा येथील स्थानिक मच्छीमार लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगून त्यांना स्थलांतर करण्याचे प्रयत्न "एमपीटी'ने चालवले आहेत."एमपीटी'सध्या जणू "स्वतंत्र राष्ट्र' असल्याप्रमाणे वागत असून आपले मंत्री केवळ नाराजी व्यक्त करतात हे संतापजनक आहे, असे पर्रीकर म्हणाले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सुरू केलेली कार्यवाही अचानक बंद का झाली,असा सवाल करून संशयित स्थलांतरितांची झडती व कोंबिग ऑपरेशनची कृती अचानक स्थगित का ठेवण्यात आले असा खडा सवाल त्यांनी केला. गोव्यात विदेशींना शिक्षण देणाऱ्या अनेक बेकायदा संस्था सुरू असून त्याकडे पोलिसांचे अजिबात लक्ष नाही,असा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.कॅसिनो व्यवहारात किमान १ ते ३ कोटी रूपयांपर्यंत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हे सरकार अजिबातच चालत नसल्याचे विविध प्रकरणांत न्यायालयाने ओढलेल्या ताशेऱ्यांवरून स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.
-----------------------------------------------------------
'त्यांचे' लागेबांधे बांग्लादेशापर्यंत
मडगाव येथे मोतीडोंगरावर सापडलेल्या तलवारी साठाप्रकरणाचे संबंध संशयास्पद असल्याचे उघड झाले असतानाही राज्य सरकारकडून मात्र याप्रकरणावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.या संशयितांची केंद्रीय गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे लागेबांधे बांग्लादेशापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले आहे. गोव्यात दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतही त्यांच्याकडून चाचपणी झाल्याचेही या चौकशीत दिसून आले आहे.हा मुद्दा आगामी अधिवेशनात चर्चेला येणार असल्याने गृह खात्याकडून काही महत्त्वाच्या संशयितांना मोकळे करून बाकीच्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार विधानसभेत या प्रश्नांवरून गोत्यात येण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनवून हात वर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत,असा आरोपही पर्रीकर यांनी केला.

'बुद्धमुक्त' प्रथम, आतंक द्वितीय; तू मम... तृतीय

नारायण खराडे यांना तिहेरी बहुमान कला अकादमी अ गट नाट्यस्पर्धा
पणजी, दि. २३ : कला अकादमीतर्फे आयोजित ४१ व्या मराठी "अ' गट नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात झाला असून डायनामिक आर्ट एंटरटेन्मेंट, पणजी यांनी सादर केलेल्या "बुद्धमुक्त' नाटकाने पहिला क्रमांक पटकावला आहे. अथश्री, फोंडा यांच्या "आंतक' नाटकास द्वितीय पारितोषिक, तर श्री ब्रह्मदेव युवक संघ, ब्रह्मकरमळी यांनी सादर केलेल्या "तू मम प्रिय सखा' नाटकास तृतीय पारितोषिक मिळाले.
नारायण आनंद खराडे यांनी "बद्धमुक्त' नाटकाच्या दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक पटकाविले असून दिलीप देसाई यांनी "आतंक' नाटकासाठी, तर अभय जोग यांनी "तू मम प्रिय सखा' नाटकासाठी अनुक्रमे द्वितीय व तृतीय बक्षिसे संपादित केली.
पुरुष विभागात उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक नारायण आनंद खराडे यांना "बद्धमुक्त' नाटकातील "तो' या भूमिकेसाठी प्राप्त झाले असून "भूमिवेणा' नाटकातील "अभि' भूमिकेसाठी अमेय बेतकेकर यांना दुसरे बक्षीस प्राप्त झाले.
दिलीप देसाई (पीए, आतंक), उदेक नाटेकर (सरकू, द नूज), अभिषेक म्हाळशी (आनंद बांदेकर, बद्धमुक्त), शांताराम पराडाकर (लाख्या, कायनी) व विश्वनाथ पिंगुळकर (कर्ण, तू मम प्रिय सखा) यांना अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
महिला विभागात "बुद्धमुक्त' नाटकातील "प्रेयसी'च्या भूमिकेसाठी समीक्षा देसाई यांना तसेच अक्षता मराठे यांना "कायनी' नाटकातील "लाली'च्या भूमिकेसाठी अभिनयासाठीची अनुक्रमे प्रथम व द्वितीय पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कविता देसाई (राधाई, तू मम प्रिय सखा) निमिषा चोणकर (मधू, भूमिवेणा), मंगला जांभळे (कुंती, तू मम प्रिय सखा) व वीणा सावंत (सावित्री, कायनी) यांना अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
स्पर्धेतील उत्कृष्ट नेपथ्याचे पारितोषिक आनंद ऊर्फ पराग, पु. खाडिलकर यांनी "तू मम प्रिय सखा' नाटकासाठी प्राप्त केले असून राजा खेडेकर यांना आतंक नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सुशांत नायक यांना "बुद्धमुक्त' नाटकासाठी प्रकाशयोजनेचे पारितोषिक प्राप्त झाले असून विकास चोपडेकर यांना "तू मम प्रिय सखा' नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आली.
वेशभूषेचे पारितोषिक नीता देसाई यांनी "आतंक' नाटकासाठी पटकाविले असून "तू मम प्रिय सखा'साठी लक्ष्मण गाडगीळ यांना प्रशस्तीपत्रक प्राप्त झाले.
पार्श्वसंगीताचे पारितोषिक स्नेहल जोग यांना "बद्धमुक्त' नाटकासाठी प्राप्त झाले असून साईश देशपांडे यांना "आतंक'साठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
साबाजी मोपकर यांना "तू मम प्रिय सखा' नाटकासाठी रंगभूषेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले असून प्रकाश घोणसेकर यांना "कायनी'साठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
उत्कृष्ट नाट्यलेखनाचा प्रथम पुरस्कार नारायण आनंद खराडे यांना "बुद्धमुक्त'च्या संहितेसाठी प्राप्त झाला. "अ'गट नाट्यस्पर्धेचे परीक्षण मुंबईतील प्रदीप कबरे, संभाजी सावंत, रामचंद्र शेळके यांनी केले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येणार आहे.

Friday, 23 January 2009

पाकची आता चीनशी 'गळाभेट' भारत व अमेरिकेशी उघडपणे संघर्षाची भूमिका

इस्लामाबाद, दि. २२ : दहशतवादाचा नायनाट करण्याऐवजी पाकिस्तानने अमेरिका आणि भारताशी उघड संघर्षाची भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी, दहशतवाद्यांवर कारवाई करा नाहीतर लष्करी मदत थांबवू असा इशारा दिल्यानंतर पाकने आक्रमक पवित्रा घेऊन चीनची मदत घेण्याचे संकेत उघडपणे दिले आहेत.
मुंबई हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी भारताकडून आणि तालिबान, अल-कायदाचा खातमा करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव येत असल्यामुळे पाकने चीनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला इशारा देणे सोडा , तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील असे प्रत्युत्तर देणाऱ्या पाकिस्तानने गुरुवारी आणखी पुढे जात २६-११ च्या हल्ल्यासंदर्भात आमची वकिली चीन करेल असे सांगून टाकले आहे!
भारताशी २६-११ च्या विषयावर पाकिस्तानच्यावतीने चीन चर्चा करेल, अशी घोषणाच पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आशियाई उपखंडातील राजकारणाचे सारे संदर्भच बदलणार आहेत. पाकची ताजी घोषणा हे त्याचेच द्योतक असल्याचे मानले जात आहे. हे याफेई या चिनी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करण्यात येणार असून तेच भारताशी बोलणार असल्याचे कुरेशी म्हणाले.
चिनी पथकाशी पाक सरकारने चर्चा केली असून आमची भूमिका त्यांना सांगितली आहे, असेही कुरेशी यांनी सांगितले. भारताशी होणा-या चर्चेची माहिती वेळोवेळी हेच पथक पाक सरकारला देईल असेही त्यांनी सांगितले. पाकचे चिनी वकील लवकरच पाकिस्तान भेटीवर येणार असून त्यांच्याशी भारताशी करायच्या चर्चेबाबत पुन्हा एकदा सविस्तर बोलणार असल्याचेही कुरेशी म्हणाले. भारताशी असलेला तणाव दूर करण्यासाठी चिनी वकिलाची नेमणूक केल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पाकिस्तानने स्वीकारलेल्या चिनी वकिलीबाबत भारत सरकारने अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सेझ भूखंड घोटाळ्यास सरकारकडूनच अभय! 'पीएमएएस' संघटनेचा आरोप

पणजी,दि.२२(प्रतिनिधी) : गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून विशेष आर्थिक विभाग "सेझ' ना वितरित केलेल्या भूखंड व्यवहारांत मोठा घोटाळा झाल्याची सर्व कागदोपत्री पुराव्यांसह केलेल्या तक्रारीला पोलिस खात्याने कचऱ्याची टोपली दाखवली आहे. "पीपल्स मुव्हमेंट अगेन्स्ट एसइझेड' या संघटनेने केलेल्या याबाबतच्या तक्रारीबाबत मूग गिळून गप्प बसलेल्या पोलिस खात्याकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत यासंदर्भात विचारले असता सदर तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य न आढळल्याने ती नोंद करण्यात आली नसल्याचे कारण पुढे केल्याने "सेझविरोधी मंच'ने आश्चर्य व्यक्त केले आहे.
"सेझ विरोधी मंच'तर्फे आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे निमंत्रक चार्ल्स फर्नांडिस यांनी ही माहिती दिली.यावेळी फादर मेव्हरीक फर्नांडिस,प्रवीण सबनीस,अरविंद भाटीकर व श्री.मोंतेरो आदी उपस्थित होते."सेझ'च्या निमित्ताने भूखंड लाटण्याच्या या घोटाळ्यात बड्याबड्यांचे हात ओले झाल्याने सरकारकडून या संशयितांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुळातच या तक्रारीसोबत सादर केलेले पुरावे गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसे होते,असे सांगून सरकारकडे हिंमत असेल तर या व्यवहाराची "सीबीआय' चौकशी करावे असे आव्हान यावेळी देण्यात आले. सर्व नियम धाब्यावर बसवून विविध "सेझ'कंपन्यांना दिलेले हे भूखंड हे बेकायदा असल्याने त्यांना भरपाई देण्याची अजिबात गरज नाही, असेही यावेळी श्री.फर्नांडिस यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री "सेझ'रद्द केल्याचे तावातावाने आपल्या भाषणांत सांगतात. तथापि, मुळात विधानसभेत संमत केलेले "सेझ' धोरण रद्द का केले जात नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला. सरकार "सेझ'प्रकरणी जनतेला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न करीत असून हा बुरखा लवकरच फाडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत "सेझ' विरोधकांचा कोणताही परिणाम झाला नाही व जाहीररीत्या "सेझ'चे समर्थन करणारे फ्रान्सिस सार्दिन हे विजयी झाले होते. यावेळी मात्र "सेझ विरोधी मंच' मोठ्या प्रमाणात सरकारचे दुटप्पी धोरण चव्हाट्यावर आणणार आहे."सेझ'व्दारे रोजगार निर्मितीचे आमिष दाखवून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याच्या कृतीचा निषेध करून यावेळी लोकसभा निवडणुकीत जनता आपली ताकद दाखवणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

'स्लमडॉग'ला ऑस्कर'साठी लाभली तब्बल दहा मानांकने

मुंबई, दि. २२ : सिनेविश्वातला सर्वोच्च सन्मान मानल्या जाणा-या "ऑस्कर' पुरस्कारांसाठी, मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीचे चित्रण असलेल्या "स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटाला तब्ब्ल दहा विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि पटकथेसोबतच "गोल्डन ग्लोब' पुरस्काराचा मानकरी ठरलेला संगीतकार ए. आर. रेहमान याला तीन गटांत नांमाकन मिळाले आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट उद्योगात आत्यंतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
"जय हो' आणि "ओ साया' या दोन गाण्यांच्या संगीतासाठी व चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी ए. आर. रेहमान पुरस्कार शर्यतीत आहे. ऑस्करचा मुख्य पुरस्कार वितरण सोहळा २२ फेब्रुवारीला अमेरिकेत रंगणार आहे.
मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील एक मुलगा टीव्हीवरच्या गेम शोमध्ये जाऊन कोट्यधीश होतो, हे "स्लमडॉग मिलेनिअर'चे कथानक होय. विकास स्वरूप यांच्या कादंबरीवरून सायमन बिउफॉय यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आणि डॅनी बॉयल यांनी "स्लमडॉग' दिग्दर्शित केला. गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने आपली छाप पाडली. ए. आर. रेहमान यांनी तर "जय हो' या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पटकावला आणि तेव्हाच ऑस्कर पुरस्कारांमध्येही या चित्रपटाचा जयजयकार होणार, हे नक्की झाले होते. त्यानुसारच आज ऑस्करसाठी जाहीर झालेल्या नामांकनांमध्ये स्लमडॉग मिलेनिअरने दहा विभागात स्थान मिळवले आहे.
दरम्यान, "द क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन' या चित्रपटानं ऑस्कर नामांकनांच्या शर्यतीत सर्वाधिक १३ नामांकनं मिळवून आघाडी घेतली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि अभिनेत्यासाठी (ब्रॅड पिट) यांना नामांकने जाहीर झाली आहेत. त्यापाठोपाठ स्लमडॉग मिलेनिअरचा नंबर असून, द डार्क नाईट आणि समलिंगींच्या हक्कांवर आधारित "मिल्क' या दोन्ही चित्रपटांना प्रत्येकी आठ नामांकने मिळाली आहेत.
याआधी टायटॅनिक आणि ऑल अबाउट इव्ह या चित्रपटांनी १४ नामांकनं मिळवून पराक्रम केला होता.

पर्यावरण रक्षणासाठी सरसावली तरुणाई 'इंडियन क्लायमेट सोल्युशन रोड टूर' गोव्यात दाखल

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : जागतिक तापमान दिवसेंदिवस वाढत चालल्याने मानवजातील त्याचे गंभीर परिणाम सोसावे लागत आहेत. म्हणून यासंदर्भात जागृती करून तरुणांना सौरऊर्जा वापरण्यास प्रेरित करण्यासाठी "इंडियन युथ क्लायमेट नेटवर्क'ने आयोजिलेली "इंडियन क्लायमेट सोल्युशन्स रोड टूर' आज गोव्यात दाखल झाली. बंगळूर येथून सुरू झालेली ही यात्रा साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करून ४ फेब्रुवारी ०९ रोजी दिल्लीत दाखल होणार आहे.
बॅटरीवर चालणारे "रेव्ह' वाहन घेऊन ही यात्रा सुरू असून या वाहनातून प्रवास करणाऱ्या तरुणांनी आज म्हापसा येथील सेट झेव्हीयर महाविद्यालयाच्या व आल्तिनो येथील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
त्याचप्रमाणे या संघटनेतर्फे सायंकाळी कला अकादमीच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "देशातील तरुणांना तापमान बदलाची माहिती आहे. आता यासंदर्भात कृती करण्याची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत, त्यांची माहिती बाकीच्यांना द्यावी व प्रत्यक्ष कार्यवाहीत आणावेत, असे क्लायमेट सोल्युशन प्रकल्पाच्या समन्वयक कॅरोलिन होवे यांनी सांगितले. पर्यावरण जपण्यासाठी व तशी दृष्टी देण्यासाठी भविष्यातील तरुण नेत्यांना सामावून घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान हे तरुण स्थानिक तरुणांचे जाळे तयार करतील आणि त्या तरुणांनी त्यांच्या पातळीवर त्यांचे प्रकल्प सुरू करावेत, असे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
"क्लायमेट सोल्युशन रोड टूर' हा भारतीय तरुणांनी अशा प्रकारे तयार केलेला पहिलाच उपक्रम आहे. तो सकारात्मक, एकत्रित प्रयत्न असून पुढील काळात अभिमान वाटावा असे भविष्य निर्माण करण्याचा तो एक प्रयत्न आहे. हा रोड टूर "आयवायसीएन' तर्फे सुरू होणाऱ्या पर्यावरण उपाय प्रकल्पाची सुरुवात असून, त्यात भारतातील पर्यावरणविषयी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आणि त्याचे "डॉक्युमेंटेशन' करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
ही यात्रा दि. ३ जानेवारी ०९ रोजी बंगळूर येथून सुरू झाली असून हैदराबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि जयपूर असा प्रवास करीत दिल्ली गाठणार आहेत. या यात्रेत त्यांनी प्रदूषण न करणाऱ्या वाहनांचाच प्रामुख्याने उपयोग केला आहे.