Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 20 September 2010

गोव्यात चीनी बनावटीचे डॉप्लर रडार नको

संरक्षण खात्याकडून महत्त्वपूर्ण सूचना

प्रीतेश देसाई
पणजी, दि. १९ ः सुरक्षेच्या दृष्टीने चीनी बनावटीचे "डॉप्लर रडार' न बसवण्याची सूचना संरक्षण खात्याने गोव्यातील हवामान खात्याला केली आहे. केंद्र सरकारने करोडो रुपये खर्च करून चीन कडून वादळाची तीव्रता आणि अचूक दिशा दाखवणारे डॉप्लर रडार विकत घेतले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून हे रडार किनारपट्टीवर असलेल्या कोणत्याही राज्याने बसवू नयेत, अशी सूचना संरक्षण खात्याने केली असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. त्याऐवजी किनारी राज्यांसाठी आता भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी खास रडार बनवणार आहे.
या सूचनेमुळे मुंबईतही हे रडार बसवण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी या चिनी बनावटीच्या रडारना नौदलाने विरोध केला होता. येत्या काही महिन्यांत गोव्यात हे रडार बसवण्यात येणार होते. त्यासाठी बहुमजली टॉवरही आल्तिनो येथे उभारण्यात आला आहे. मात्र, संरक्षण खात्याने केलेल्या या सूचनेमुळे ते रडार पुन्हा माघारी पाठवले जाण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रातील राज्यांसाठी आता भारत इलेक्ट्रॉनिक कंपनी वादळाची तीव्रता आणि दिशा दाखवणारे रडार बनवणार असल्याची माहिती अधिकृत सूत्राने दिली.
संरक्षण खात्याने हा विरोध केला असल्याने हे चिनी रडार बसवले जाणार नाही. परंतु, देशातील ग्रामीण भागात हे रडार बसवण्यास कोणताही हरकत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून बनवले जाणारे रडार हे चिनी बनावटीच्या रडार पेक्षा मोठे असून त्यांची किंमतही कमी आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत गोव्यात हा रडार बसवण्याची शक्यता आहे. चीन बनावटीचे रडार भारतात आले असून काही भागात ते बसवण्यातही आले आहेत. ""या चिनी बनावटीच्या "डॉप्लर रडारना' बसवण्यात आलेल्या "सर्किट'वर संशय घेण्यास जागा राहते. या "सर्किट'द्वारे चिनी वैज्ञानिकांना आम्ही वाट मोकळी करून देतो. त्यामुळे त्यांना किनारपट्टी क्षेत्रात आणि लष्कराचा वावर असलेल्या ठिकाणाच्या आसपास बसवण्यास विरोध केला जात आहे'' असे सूत्रांनी सांगितले.
"फियान'वादळावेळी हवामान खाते या वादळाबद्दल अचूक माहिती देऊ शकले नव्हते. त्यामुळे अशा प्रकारचे रडार बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रडारमुळे येणाऱ्या वादळाची अचूक माहिती उपलब्ध होणार असून त्याची तीव्रताही काढता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चीनी बनावटीच्या या एका डॉप्लर रडारची १२ कोटी रुपये किंमत आहे. तर, भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीद्वारे बनवल्या जाणाऱ्या रडारची किंमत ९ कोटी रु. असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

माशेल येथे आत्महत्या

माशेल, दि. १९ (प्रतिनिधी) ः चिमुलवाडा माशेल येथील रमेश लक्ष्मण शिरोडकर (वय ४०) यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. येथील संजय हॉटेलच्या मागे असलेल्या एका बंद इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रिकाम्या खोलीत ही घटना घडली. मयत शिरोडकर यांनी जवळच असलेल्या आपल्या घरातील नायलॉन दोरखंड घेऊन छपराच्या तुळईला बांधून आत्महत्या केली. त्यापूर्वी बंद खोलीची कुलूपकडी तोडल्याचे दिसून आले. गेली बरीच वर्षे रमेश शिरोडकर हे बेरोजगार होते. त्यातच त्यांना दारूचे व्यसन जडले होते, अशी माहिती त्यांचा भाऊ काशिनाथ शिरोडकर यांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिस उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी पंचनामा करून चिकित्सेसाठी मृतदेह बांबोळी येथे सरकारी इस्पितळात पाठवून दिला आहे.

अफगाणी चित्रपटांतील दुर्दैवाचे दशावतार

पणजीत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या दक्षिण आशिया चित्रपट महोत्सवादरम्यान अफगाणिस्तानचे पाच लघुचित्रपट दाखविण्यात आले. त्या पाचही चित्रपटांतून अफगाणी समाजातील दैन्य, दुःख आणि दुर्दैवाचेच दशावतार पाहायला मिळाले. त्याचे कारणही तसेच आहे. १९८१ साली झालेल्या सोव्हिएत रशियाच्या आक्रमणापासून गेली तीस वर्षे अफगाणिस्तानात राजकीय अराजक आणि लढायांनी थैमान सुरू आहे. कोणाचे दुर्दैव कोणावर कसा घाला घालेल याची काहीच शाश्वती नाही. चित्रपटातील पात्रे त्या विचित्र परिस्थितीची शिकार होताना दिसतात. हिंदी चित्रपटामधील ठरावीक साच्याप्रमाणे शेवटी नायक नायिकेचे मिलन होऊन हे लघुचित्रपट संपत नाहीत; तर विदारक सत्यस्थितीचे चित्रण करतात. "ऍन ऍपल इन पॅराडाईज' या चित्रपटातील म्हाताऱ्या नायकाची दोन तरणीबांड मुले रशियनांशी लढताना शहीद झाली आहेत. तिसऱ्या लहान मुलाला तो काबुलला मदरशात शिकायला त्याच्या विश्वासातील मुल्लाकडे पाठवितो. तो मुल्ला त्या मुलाच्या डोक्यात मरणोत्तर स्वर्गाचे खूळ भरवून तेथे बहात्तर पऱ्यांचा सहवास मिळतो, अशी लालूच दाखवून आत्मघाती बॉंबस्फोट करण्यासाठी पाठवतो. मोठ्या आशेने मुलाला भेटायला गेलेला म्हातारा याकुब ती बातमी ऐकून पूर्ण खचून जातो. त्यानंतर त्याची काबूलमधील रस्त्यावर झालेली परवड मन हेलावून टाकणारीच.
"शेजारी' चित्रपटातील नायक होमायून पियाझ या चित्रपट महोत्सवासाठी उपस्थित होते. त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यादरम्यान मिळाली. अफगाणिस्तानातील चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. पूर्ण देशात जेमतेम एकच स्टुडिओ आहे. तेथेही फार काही करता येत नाही. त्यामुळे बहुतंाश चित्रपटांचे चित्रीकरण बाहेर करावे लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधनसामग्री आणि भांडवलाचा अभाव ही होय. त्यामुळे ज्या कलावंतांना स्वस्थ बसवत नाही ते छोटे चित्रपट तयार करतात. होमायून यांच्या सांगण्याप्रमाणे अफगाणिस्तानात वर्षभरात फारतर पाच सहा पूर्ण लांबीचे चित्रपट तयार होतात. त्यापेक्षा लघुचित्रपटांची संख्या बरीच आहे. त्यांनी स्वतः गेल्या वर्षभरात पाच लघुचित्रपट तयार केले. त्यातील एका चित्रपटाची निवड आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी झाली आहे.
होमायून यांनी वास्तवाची जाणीव करून देणारी माहिती दिली की अफगाणिस्तानातील एक पूर्ण पिढी लढाईच्या छायेत जन्मली आणि वाढली असल्याने त्या पिढीतील कलाकार आणि दिग्दर्शकांकडून प्रणय कथानके असलेल्या रोमॅंटिक चित्रपटांची अपेक्षा करू नये. ते स्वःत उत्तर अफगाणिस्तानच्या पंजिशीर पर्वतीय प्रदेशातील ताजीक ननसमूहाचे आहेत. त्यांनी जवळपास पंधरा वर्षे अहमदशहा मसूद या अफगाणी योद्ध्याच्या बाजूने संघर्षात घालविली. आता ते काबुलमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी स्वतःची अफगाण फिल्मस् ही संस्था सुरू केली आहे.
त्यांची स्वतःची नायकाची भूमिका असलेल्या "शेजारी' या चित्रपटातून बंदिस्त कैद्यांच्या छावणीतील बंडाची घटना चित्रीत केली आहे. या बंडादरम्यान उफाळून आलेली तीव्र द्वेष भावना, बळजबरीने दाबून ठेवलेल्या सामाजिक क्षोभाचे विदारक चित्रण त्यात आहे.
अफगाणिस्तानातील राजकीय स्थितीविषयीही त्यांनी माहिती दिली. सध्या काबूल तसे शांत आहे. दक्षिण अफगाणिस्तानच्या काही भागांत पाकिस्तान सीमेलगतच्या कंदाहर प्रांतातून काही ठिकाणी अजूनही तालिबानी लोकांचा प्रभाव आहे. जवळपासच्या सर्व तालिबानी पश्तु भाषक, पख्तुन जनजातींशी संबंधित अथवा त्यांच्यापैकीच आहेत. पख्तुन लोकांना अफगाणिस्तानात त्यांचे वर्चस्व स्थापन करायचे आहे. त्याला ताजीक, हजारा इ. जमातींच्या लोकांचा विरोध आहे. मी त्यांना प्रश्न विचारला की, ताजीक आणि हजारा लोकांना वेगळे देश करून दिले तर त्यांना ते स्वीकारार्ह आहे काय? माझ्या डोळ्यांसमोर काश्मीरमध्ये सध्या चाललेली बंडाळी होती. गेली साठ वर्षे अनेक प्रकारच्या सवलती इतर भारतीय राज्यांपेक्षा सरसकट सर्वांना कमी किंमतीत मिळणारे अन्नधान्य, शाळा कॉलेजच्या सोयी, भारतात कुठेही निवास करण्याची मुभा; पण इतर भारतीयांना काश्मिरात राहण्यास खास कलमाखाली मज्जाव, अशा सर्व गोष्टी मिळत असताना काही मुस्लिम युवक पाकिस्तानची फूस मिळाल्याने "आझादी'साठी रस्त्यावर उतरलेले दिसतात.
अफगाणिस्तानातून फुटून निघण्याच्या प्रश्नाला होमायून यांनी ठाम नकार दिला. त्यांच्यामते सर्व साधारण ताजीक, हजारा व इतर अल्पसंख्य जमातीवर बहुसंख्य पख्तुन लोकांकडून अत्याचार आणि दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असली तरी त्यांना वेगळा देश नको आहे. तसे पाहिले तर अमुदर्या नदीच्या पार स्वतंत्र ताजिकीस्तान आहे; पण त्यांना एकसंघ अफगाणिस्तानातच राहायचे आहेत. पख्तुन लोकांबाबत त्यांना विचारले असता त्यांनी माहिती दिली की, पख्तुन लोकांतही लोकशाही राज्यघटनेमध्ये राहू इच्छिणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. तालिबान्यांना पाकनकडून साहाय्य मिळते ही वस्तुस्थिती जगाला दुर्लक्षित करून चालणार नाही.
एके काळी अफगाणिस्तानमध्ये हिंदूंची मोठी लोकवस्ती होती. सुमारे हजार वर्षांचे मुस्लिम आक्रमण आणि राजसत्तेला तोंड देत अफगाणी हिंदूंनी आपला धर्म जोपासला होता. तालिबानी आल्यावर मात्र त्यांना केवळ हिंदू आहेत म्हणून परागंदा व्हावे लागत आहे. त्यांचे मूळ अफगाणी, त्यांचे वतन अफगाणिस्तान आहे, मात्र ते हिंदू असल्याने त्यांच्यावर हिंदुस्थानी असल्याचा शिक्का मारला जातो. "लाला ए हिंदू' हा लघुचित्रपट हा अफगाणच्या हिंदूंची व्यथा प्रकट करतो. या चित्रपट महोत्सवातून अफगाणिस्तानचे वास्तव माहिती होण्यास नक्कीच मदत मिळेल.

मडगावी दुकान फोडून १.३० लाखांची चोरी

मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : येथील सूट शिलाईतील अग्रगण्य मानले जाणारे शेख जिना यांच्या "जीन्स सूट रेव्हेन्यू'मध्ये काल रात्री चोरट्यांनी प्रवेश करून १.३० लाखांची रोकड हातोहात लांबवली. शेख जिना यांनी याप्रकरणी आज पोलिसांत तक्रार नोंदवली.
सदर दुकान येथील हरीमंदिराजवळ असून हल्लीच ते सुरू केले होते. पोलिसांनी पंचनामा केला असता चोरटे शटर वाकवून आत शिरल्याचे निदर्शनास आले. या भागांत अनेक आस्थापने असून तेथे सुरक्षा रक्षक असताना झालेल्या या चोरीने पोलिस चक्रावून गेले आहेत. त्यांनी काही संशयितांना आणून तपास केला; पण त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही.

Sunday, 19 September 2010

बसच्या धडकेने वास्कोत वृद्ध ठार

मुलगी गंभीर जखमी
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): इस्पितळात उपचारासाठी दाखल केलेल्या आपल्या मुलाला पाहण्यासाठी जात असताना बसची धडक बसल्याने मोटरसायकलस्वार जयदेव धंजू दिवाडकर (६२, रा. सडा वास्को) जागीच ठार झाले. आज संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास झालेल्या या अपघातात त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली.
सडा येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर राहणारा जयदेव दिवाडकर आज संध्याकाळी आपल्या "सुझुकी मॅक्स १००' या दुचाकीवरून (जीए ०२ एल ०४९६) आपली विवाहित मुलगी मिनाक्षी सुनील शेटगावकर (३०, सडा) हिला घेऊन चालले होते. जयदेव यांचा मुलगा रोहिदास दिवाडकर हा आजारी असल्याने त्याला उपचारासाठी चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघंही त्याला पाहण्यासाठीच चालले होते. यावेळी वास्कोच्या मासळी मार्केटजवळ मडगावहून वास्कोला येणाऱ्या मिनिबसची (जीए ०८ टी ४०३२) त्यांना समोरून जबर धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की दोघंही रस्त्यावर फेकले गेले व त्यांची दुचाकी बस खाली सापडली. घटनेची माहिती मिळताच वास्को पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन जखमींना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्यापूर्वीच जयदेव यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर, मिनाक्षीला गोमेकॉत हालवण्यात आले आहे.
वास्को पोलिसांनी सदर अपघाताचा पंचनामा करून मयत जयदेव याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला आहे.
जयदेव हा एमपीटीचा निवृत्त कर्मचारी असून त्याच्या पश्चात पत्नी, चार विवाहित मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. वास्को पोलिसांनी बस चालक फ्रान्सिस फर्नांडिस (४०, माजोर्डा) याच्या विरुद्ध भा.दं.सं. ३०४(अ) कलमाखाली गुन्हा नोंद केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जयदेव हा सडा येथील बहुतेकांच्या परिचयाचा असल्याने त्याच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्ता पुढील तपास करीत आहेत.

अडवाणींनी घेतली शहा यांची भेट

अहमदाबाद, दि. १८ : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी अटकेत असलेले गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री अमित शहा यांची आज (शनिवार) भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी साबरमती कारागृहात भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे राज्य प्रमुख बलबीर पुंज उपस्थित होते.
या प्रकरणात अमित शहा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २६ जुलै रोजी अटक केली होती. यानंतर त्यांची चौकशी करण्यात येत असून, ते सध्या साबरमती कारागृहात आहेत. अमित शहा यांना कॉंग्रेस पक्ष या प्रकरणात अडकवत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता व काही भाजप नेत्यांची भेटही घेतली होती. भाजपनेही शहा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना हा त्यांना गोवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते.
आज भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी अमित शहा यांची भेट घेतली. संध्याकाळी ४.५० वाजता सेंट्रल जेलमध्ये दाखल झालेले अडवाणी ५.२० वाजता बाहेर आले. यावेळी यांच्यात काय चर्चा झाली ते समजू शकले नाही. शहा यांची भेट घेतल्यानंतर बोलताना अडवाणी म्हणाले की, राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयचा वापर होत आहे आणि हे पूर्णपणे अयोग्य आहे. अमित शहा यांना गोवण्यामागे हाच उद्देश असून जनताच कॉंग्रेसला योग्य प्रत्युत्तर देणार आहे. कथलाल पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल सामान्य नाही, असेही ते म्हणाले. यानंतर दोन्ही नेत्यांनी शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली.

पंचवाडीवासीय मागणार दिल्लीत दाद

सोनिया व राहुल गांधी यांना देणार निवेदन
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी या गावात एका बड्या खाण कंपनीला जेटी तसेच खनिज वाहतुकीसाठी खास रस्ता उभारण्यासाठी गरीब शेतकऱ्यांची जमीन राज्य सरकारकडून सार्वजनिक वापरासाठी म्हणून बळकावण्याचा जो प्रकार घडला आहे, त्याबाबत आता दिल्लीत दाद मागण्याचा निर्णय पंचवाडी बचाव समितीने घेतला आहे. राहुल गांधी यांनी ओरिसातील आदिवासींच्या खाण विरोधी लढ्याला दिलेला पाठिंबा व सोनिया गांधी यांनी गरीब शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाबाबत व्यक्त केलेली नाराजी लक्षात घेऊन या नेत्यांकडे मदतीची याचना करण्याचे समितीने ठरवले आहे.
पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी ही माहिती दिली. पंचवाडी गावात बहुतांश अनुसूचित जमातीचे लोक वास्तव्य करतात. शेती, बागायती हेच या लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या गावात खाण प्रकल्प आणून राज्य सरकारने पंचवाडीचा सत्यानाश करण्याचाच घाट घातला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. खारफुटी वनस्पतीला पर्यावरण जतनाचे खास संरक्षण दिले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही खारफुटी संरक्षणाबाबत वेळोवेळी निर्देश देण्यात येत आहेत. इथे मात्र दिवसाढवळ्या खारफुटीचा विध्वंस सुरू आहे. पंचवाडीवासीयांनी ही गोष्ट वन खात्याच्या नजरेला आणून दिली खरी परंतु संबंधितांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे आढळून आले आहे. पंचवाडी बचाव समितीकडून मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, वनमंत्री आदींची भेट घेऊन या प्रकाराची त्यांना जाणीव करून देण्यात आली परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही, असेही यावेळी श्री. डिकॉस्ता यांनी सांगितले. या खाण कंपनीने काही लोकांना व्यवसायाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले आहे व अशा पद्धतीने गावात फूट घालण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या गावचे फादरही पंचवाडी बचाव समितीच्या पाठीशी ठाम असून कोणत्याही परिस्थितीत पंचवाडी गावचे रक्षण करणे हेच प्राधान्य असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, पंचवाडी गावावर ओढवलेल्या या संकटाची माहिती राहुल गांधी व सोनिया गांधी यांना निवेदनाद्वारे पोचवण्यात येईल. गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारकडून कशा पद्धतीने जनतेची फसवणूक सुरू आहे व कशा पद्धतीने खाण कंपनीवर मेहरनजर ठेवून त्यांच्या फायद्यासाठी सार्वजनिक कारण पुढे करून जमीन संपादन करण्याचा प्रकार घडला आहे, याचीही माहिती या निवेदनातून देण्याचेही समितीने ठरवले आहे.
शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनीही पंचवाडी बचाव समितीच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पंचवाडीचा हा विषय विधानसभेत उपस्थित करून महादेव नाईक यांनी सरकारचे लक्ष याकडे वेधले होते. सार्वजनिक कामासाठी भूसंपादन करून खाजगी खाण कंपनीला जागा देण्याची या सरकारची हिंमतच कशी होते, असा खडा सवालही आमदार महादेव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
"शेतकऱ्यांचो एकवट' ची आज मडगावात बैठक
"शेतकऱ्यांचो एकवट' या संघटनेची महत्त्वाची बैठक उद्या १९ रोजी मडगावात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी विविध गावांतील पिडीत शेतकरी तसेच विविध ठिकाणचे खाण आपद्ग्रस्त शेतकरी हजर राहणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांची ताकद अजूनही सरकारसमोर फिकी पडत असल्याने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एकजुटीने लढा उभारण्याचा विचार सुरू आहे व त्यामुळे उद्याच्या बैठकीत याविषयी सखोल चर्चा केली जाणार आहे.

तर २२ पासून पुन्हा 'काम बंद लेखणी बंद'

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोवा सरकारी कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असून वाढीव वेतनश्रेणीपासून वंचित राहिलेल्या उर्वरित सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वाढ मिळाली नाही तर येत्या २२ सप्टेंबरपासून बेमुदत "लेखणी बंद काम बंद' आंदोलन छेडण्याचा एकमुखी ठराव आज कार्यकारी व तालुका समितीच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
आज गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. राज्य सरकारकडून संघटनेच्या प्रस्तावाबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेतला जात नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वेळोवेळी दिलेली सर्व आश्वासने सरकारने पायदळी तुडवल्याने आता आंदोलनाचा पवित्रा घेणे अनिवार्य आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी दिली. तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या कार्यकारिणीला या आंदोलनात पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. केवळ आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊन इतरांवर अन्याय करण्याच्या या प्रकाराचा निषेध करून सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी आंदोलन काळात परिस्थिती हाताळण्याबाबत संघटनेच्या नेत्यांनी तालुका पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यकारी समितीच्या सदस्यांची तालुकावार नेमणूक करून हे आंदोलन पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही यावेळी श्री. शेटकर यांनी सांगितले. गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने मिळवलेल्या माहितीनुसार सचिवालयातील सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ केली नसून केवळ काही ठरावीक कर्मचाऱ्यांनाच हा लाभ देण्यात आला आहे. अशावेळी सचिवालयातील वंचित कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनाला आपला नैतिक पाठिंबा जाहीर केल्याची माहिती शेटकर यांनी दिली.

वृत्तवाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

अयोध्या निकाल
नवी दिल्ली, दि. १८ : अयोध्या येथील रामजन्मभूमीच्या मालकी हक्काच्या निकालाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच स्तरातून यासाठी तयारी सुरू असून, वृत्तवाहिन्यांनी निकालाबाबत आधीच कुठलेही अनुमान काढू नये आणि १९९२ मधील बाबरी ढाचा उद्ध्वस्त होण्याची दृश्ये वारंवार दाखवू नयेत, यासाठी न्यूज ब्रॉॅडकास्टर्स असोसिएशनने आज काही मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा केली आहे.
अयोध्या वादावरील निर्णय हा अतिशय संवेदनशील मुद्दा असल्याने या बाबतीत वृत्त प्रसारित करत असताना जास्ती काळजी घेण्याची गरज आहे. या निर्णयाबाबतचे वृत्त प्रसारित करत असताना त्यामध्ये खळबळ माजवणारे, चिथावणीखोर किंवा उत्तेजक असे कुठलेही वक्तव्य असू नये, असे असोसिएशनतर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यासंबंधी देण्यात येणाऱ्या प्रत्येक बातमीतून सामाजिक सलोखा कायम राहील, याकडे जातीने लक्ष देण्यात यावे. असे झाल्यास जनतेचे योग्य मत तयार करण्यासाठी त्याची मदत होईल. यासाठी न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वी त्यासंबंधी कुठलेही अनुमान काढू नये आणि न्यायालयाच्या निकालानंतरही जनक्षोभ उसळेल असे काहीही दाखवू नये, असेही यामध्ये म्हटले आहे.
न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी १९९२ च्या घटनेची दृश्ये वारंवार दाखवू नये आणि निकालानंतर देशभरात कुठेही जल्लोष किंवा रोष प्रकट करण्याच्या कुठल्याही घटनांचे चित्रीकरण वाहिन्यांनी दाखवू नये. या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.

पेट्रोलपंप मालकांचा संप स्थगित

नवी दिल्ली, दि. १८ : देशभरातील पेट्रोलपंप मालकांनी सोमवारी संपावर जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे. पेट्रोलपंप मालकांच्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सरकारने समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याने हा संप स्थगित करण्यात आला आहे.
भारतीय पेट्रोल विक्रेते महासंघाचे सचिव अजय बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने काही मागण्या मान्य केल्या असून अन्य मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी मंत्रालयाचे संयुक्त सचिवांनी तेल कंपन्यांचे विपणन अधिकारी व पेट्रोलपंप मालकांची समिती स्थापन केली आहे. तीन महिन्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.