Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 19 April 2010

"इफ्फी २००४' चे सर्व निर्णय एकमताने व पारदर्शी - मुख्यमंत्री

पर्रीकरांच्या विरोधात सीबीआय तक्रारीतील फोलपणा स्पष्ट

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - पहिल्या "इफ्फी'वेळी २००४ साली कुठल्याही गोष्टीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विशेष समिती त्यावर पूरक चर्चा करत असे व अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्यावर यथायोग्य ऊहापोह होऊन मगच तो निर्णय योग्य असल्याचे आढळून आल्यास सर्वानुमते त्याला संमती दिली जात असे, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वपूर्ण निवेदनामुळे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याविरोधातील सीबीआयच्या तक्रारीतील फोलपणाच आज उघड झाला. "पहिल्या इफ्फीच्या आयोजनात मी दोषी असल्याचे सिद्ध करा, मी तुरुंगात बसण्यास तयार आहे,' असे थेट आव्हान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेस सरकार आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. "आपल्या वक्तव्याद्वारे आपण अप्रत्यक्षरीत्या पर्रीकर यांना दोषमुक्त तर ठरवत नाहीत ना' या प्रश्नाच्या उत्तरादाखल, आपण कुणाचीही बाजू घेत नसून, जे सत्य आहे तेच मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्री. कामत यांनी स्पष्ट केले.
"मी स्वतः त्या समितीचा सदस्य होतो... मला नाही वाटत की साधन सुविधांच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेण्यात आले', असे प्रतिपादन दिगंबर कामत यांनी केले. ज्याद्वारे त्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे अप्रत्यक्षरीत्या खंडनच केले आहे.
पत्रकारांशी बोलताना भाजप सरकारातील तत्कालीन शहर विकास मंत्री व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, २००४ साली ज्यावेळी इफ्फीचे राज्यात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते स्वतःही सदस्य होते. त्यामुळे राज्यात इफ्फीच्या आयोजनासाठी आवश्यक साधन सुविधांची निर्मिती व खर्चाबाबत जे अंतिम निर्णय घेण्यात आले त्यात त्यांचाही सहभाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्री. पर्रीकर यांनी भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या आणि इफ्फीसंबंधातील सर्व निर्णय घेताना त्यावेळी सोबत असलेले आणि आता कॉंग्रेस सरकारात मुख्यमंत्री असलेले दिगंबर कामत यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. तसेच, हा "सीबीआय' चौकशीचा ससेमिरा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचाही दावा श्री. पर्रीकर यांनी केला होता.
कॉंग्रेस सरकारने २००७ साली दाखल केलेल्या "इफ्फी २००४' च्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तक्रारीसंदर्भात "सीबीआय'कडून पर्रीकरांना नुकतेच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. कॉंग्रेसचे मावीन गुदिन्हो यांनी राज्य व केंद्र सरकारमधून भाजपची सत्ता गेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या विरोधात खटला नोंदवला होता. २००४ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी साधनसुविधा उपलब्ध करण्यात तत्कालीन भाजप सरकारने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर कामत यांचे आजचे निवेदन त्या तक्रारींतील फोलपणा सिद्ध करणारे आहे,असे दिसून येते.

वास्को येथे कार उलटून ७ जखमी

वास्को, दि. १९ (प्रतिनिधी)- रुमडावाडा येथील वळणावर कामगारांना काम करत असल्याचे दिसताच प्रेमानंद परब (वय ५०) यांनी आपल्या गाडीचा ब्रेक लावल्याने ती रस्त्यावर उलटून येथील कामगारांना धडक दिल्याने प्रेमानंद यांच्यासह सात जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तीन महिला कामगारांची अवस्था गंभीर असल्याने त्यांना "गोमेकॉ' इस्पितळात हलवण्यात आले; तर इतरांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
आज दुपारी ३.१५ च्या सुमारास मुरगावच्या उपनगराध्यक्ष सौ रोहिणी परब यांचे पती प्रेमानंद परब आपल्या "झेन' मोटारीतून (क्रः जीए ०६ ए ६०१५) वास्कोहून सडा येथे घरी परतत असताना तेथील वळणावर त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षण कुंपणाचे काम करणारे कामगार नजरेस आले. त्यानंतर त्यांनी ब्रेक लावल्याने गाडी वळणावर उलटली. मग या गाडीने तेथे असलेल्या सहा कामगारांना जाऊन जबर धडक दिली. सदर अपघात घडल्याचे यावेळी येथे उपस्थित असलेल्यांच्या नजरेस येताच त्यांनी प्रथम गाडी चालवत असलेल्या प्रेमानंद नाईक यांना गाडीतून बाहेर काढले. यानंतर गाडीखाली सापडलेल्या जखमींना बाहेर काढून नंतर सर्वांना चिखलीच्या कुटिर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नीलंमा, कमला व मलकण्णा (रा. बिर्ला) अशी जखमी झालेल्या तिघी महिला कामगारांची नावे आहेत. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. प्रेमानंद परब, मलकप्पा, हनुमंता व मलव्वा (वय सुमारे ३० ते ३५, राः बिर्ला) यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर रस्त्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेला हा सातवा अपघात झाल्याची माहीती उपनगराध्यक्ष सौ. रोहिणी परब यांनी दिली. वळणावर रेती व इतर सामान टाकल्याने हे अपघात होत आहेत. आणखी असे अपघात होण्यापूर्वीच यासंदर्भात पावले उचलण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
मुरगाव पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार गंभीर अवस्थेत असलेल्या सदर महिला कामगारांची प्रकृती सुधारत आहे. उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र वेळीप तपास करीत आहेत.

आणखी काही काळ उन्हाचा तडाखा

नवी दिल्ली, दि. १८ ः उत्तर पश्चिमेसह देशातील अनेक भागांत सुरू असलेला उष्णतेचा तडाखा आणखी काही काळ सहन करावा लागणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे.
भारतीय हवामान खात्याचे संचालक अजित त्यागी यांनी सांगितले की, सध्या देशात बऱ्याच ठिकाणी उन्हाचा विक्रमी तडाखा सुरू आहे. आगामी काही दिवसांत ही परिस्थिती बदलण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. वातावरणातील हा उष्मा आणखी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. दिवस आणि रात्रीचे तापमान सातत्याने वाढत आहे. मध्य भारतात सध्या वाहत असलेले गरम वारे यंदा मान्सून चांगला राहण्याचे संकेत देत आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात गारा किंवा पाऊस पडलेला नाही. याचाच अर्थ, गव्हाच्या पिकाला कोणतेही नुकसान झालेले नाही. बरेचदा मार्चमध्ये होणाऱ्या गारपिटीने गव्हाचे नुकसान होते. सध्याचा वाढता उष्मा पाणी आणि वीज या व्यवस्थांवर भार टाकणारा असला तरी तो मान्सूनच्या दृष्टीने फायद्याचा आहे. एप्रिलमध्ये इतकी गरमी असणे याचाच अर्थ यापुढील दीड ते दोन महिनेही उन्हाचे चटके कायम राहणार आहेत. मे महिन्यात तापमानात आणखी वाढ संभवते, असेही त्यागी यांनी सांगितले.
जर मान्सूनवर याचा चांगला परिणाम होणार असेल तर शेतकऱ्यांसाठी ते शुभवर्तनामच म्हटले पाहिजे. कारण, जर पाऊस चांगला झाला तर मुबलक अन्नधान्याचे उत्पादन होऊन सध्याची महागाई कमी होऊ शकेल, अशी आशा बाळगता येईल. मात्र, एकीकडे अन्नधान्याची कोठारे भरून चालली असली तरी या देशातील ४० कोटींहून अधिक लोक आजही अर्धपोटी राहात असल्याचे वास्तव कायम उरतेच. असे असले तरी चांगला पाऊस होणार ही गोष्ट या उष्मादायी वातावरणातही सुखदच म्हटली पाहिजे!

कसाबच्या भवितव्याचा निर्णय ३ मे रोजी

मुंबई, दि. १८ ः मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा निकाल विशेष न्यायालय येत्या ३ मे रोजी देणार असल्याने सर्वांच्या नजरा या आता मुंबईतील ऑर्थर रोडवरील केंद्रीय कारागृहाकडे लागल्या आहेत. या हल्ल्यात सामील असलेेेेेला आरोपी पाकिस्तानचा अजमल कसाब व दोन भारतीय आरोपींना न्यायालय तीन मे रोजी शिक्षा सुनावणार आहे.
२६/११च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले होते. कसाबवर ऑर्थर रोडवरील केंद्रीय कारागृहातील विशेष न्यायालयात खटला चालू आहे. येथेच अधिकाधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
गेल्या वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. कसाबवर कोणत्याही प्रकारे हल्ला होऊ नये यासाठी त्याला विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या बुलेटप्रूफ तसेच बॉम्बप्रूफ कोठडीत ठेवण्यात आलेले आहे. कसाबची कोठडी व न्यायालयाची खोली यादरम्यान एक बोगदा बांधण्यात आला असून तोही बुलेटप्रूफ व बॉम्बप्रूफ आहे. कसाबची कोठडी तसेच न्यायालयाच्या सुरक्षेवर आतापर्यंत पाच कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

Sunday, 18 April 2010

बंगलोरमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळच स्फोट

पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह
एकूण पंधरा जण जखमी
आयपीएल सामन्यात व्यत्यय
परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

बंगलोर,दि. १७ : आयपीएल स्पर्धेतील मुंबई आणि बंगलोर संघादरम्यानचा सामना सुरू होण्याआधी येथील चिन्नास्वामी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ ठरावीक अंतराने देशी बॉंबचे दोन स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली, असे विविध वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हे विस्फोटक प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करून १२ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीच्या मागे लपवून ठेवण्यात आले होते, असे बंगलोरचे पोलिस आयुक्त शंकर बिदारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे सौम्य स्वरूपाचा स्फोट होता. यामध्ये चार खाजगी सुरक्षारक्षक व एक पोलिस कर्मचारी आणि अन्य दहा जण जखमी झाले आहेत. सामना बंद पाडणे आणि प्रेक्षकांच्या मनात भीती उत्पन्न करणे या दुष्ट हेतूनेच हे स्फोट घडवून आणण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स या अव्वल संघांत खेळला जाणारा सामना बघण्यासाठी ४० हजार प्रेक्षकांनी मैदानात गर्दी केली असतानाच सामना सुरू होण्याआधी ४५ मिनिटे म्हणजे दुपारी ३.१५ च्या सुमारास स्टेडियमच्या १२ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ पहिला स्फोट झाला. यात त्याठिकाणी तैनात असलेले पाच सुरक्षा रक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच दुसरा स्फोट झाला, असे सांगण्यात आले.
घटनास्थळी सापडलेल्या स्फोटकांची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच काही निष्कर्ष काढता येईल, असे बिदारी यांनी सांगितले.स्फोटाचे कारण शोधण्यासाठी राज्य सरकारचेही एक पथक घटनास्थळावर पोहोचले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री व्ही. एस. आचार्य यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्र सरकारनेही या स्फोटांची गंभीर दखल घेतली असून कर्नाटक सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या स्फोटांमागे कोणत्या शक्ती कार्यरत आहेत याचा उलगडा तपासानंतरच होईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या स्फोटांची जबाबदारी अजून कोणीही घेतलेली नाही आणि त्यासंदर्भात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तथापि, या स्फोटांच्या घटनेनंतर स्टेडियमच्या परिसरातील पोलिस बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला. आम्ही कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
सामना तासभर विलंबाने सुरू
स्फोट झाल्याची बातमी प्रेक्षकांना कळल्यावर मैदानात एकच खळबळ उडाली आणि काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रेक्षकांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात बराच वेळ गेल्याने दुपारी चार वाजता सुरू होणारा हा सामना सुमारे एक तास विलंबाने म्हणजेच संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुरू झाला. बॉम्बशोधक आणि निकामी करणारे पथक घटनास्थळावर दाखल झाले व त्यांनी स्टेडियमची कसून तपासणी केली. श्वानांच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तसेच मैदानावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांचीही कसून तपासणी करण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतरच या सामन्याला सुरुवात झाली.

मार्केटिंग फेडरेशन की 'पुनर्वसन केंद्र'

सहकार मंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): सहकारमंत्री रवी नाईक यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक डबघाईतून सावरत असलेले गोवा मार्केटिंग फेडरेशन व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्थेकडे पात्रता व कुवत असलेले कर्मचारी असताना व्यवस्थापनाकडून विविध सरकारी खात्यांतील निवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवर फेडरेशनवर नेमण्याचा धडाकाच लावण्यात आला आहे. त्यामुळे हे फेडरेशन म्हणजे सध्या "पुनर्वसन केंद्र' बनल्याचा थेट आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार मंत्री रवी नाईक यांनी गोवा मार्केटिंग फेडरेशनला सध्या मदतीचा हात दिला आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याबरोबर महिला व बाल विकास खात्याअंतर्गत विविध योजनासाठी लागणारे कडधान्य फेडरेशनतर्फे पुरवण्याची तजवीज करण्यात आली आहे. या स्थितीत फेडरेशन कात टाकण्याच्या तयारीत असतानाच तेथील व्यवस्थापनाकडून अनेक चुकीचे निर्णय घेतले जात असल्याची तक्रार कर्मचारी करीत आहेत. यापूर्वी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सहकार खात्यातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवला जायचा. सरकारी अधिकारी व्यवस्थापकीय संचालकपदावर असल्याने सरकारचेही नियंत्रण फेडरेशनच्या कारभारावर असायचे. माजी उपनिबंधक सी. डी. गावडे यांच्याकडे यापूर्वी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा होता. त्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांना कंत्राटी पद्धतीवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकपदी नेमण्यात आले. गोवा राज्य सहकारी बॅंकेच्या वसुली अधिकारीपदाचाही त्यांच्याकडे ताबा आहे.अलीकडेच गावडे यांनी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा सादर केल्याचे वृत्त असून हा राजीनामा व्यवस्थापनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळते. गावडे यांनाच या पदावर नेमण्याचा हट्ट सत्ताधारी संचालक मंडळाने धरल्याचेही वृत्त आहे.
दरम्यान, सहकार खात्यातील अन्य एका निवृत्त अधिकाऱ्याची लेखा अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करण्यात आली असून त्याला सुमारे १५ ते २० हजार रुपये वेतन दिले जात आहे. एवढेच नव्हे तर आता अन्य एका निवृत्त अधिकाऱ्याची प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तशी जाहिरातही वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आली असून फेडरेशनचे नाव मात्र "गुप्त' ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी फेडरेशनकडे पुरेसे कर्मचारी असताना त्यांना डावलून नव्या मंडळींच्या भरतीची लाट तेथे आली आहे. फेडरेशनवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचा हा प्रयत्न सदर संस्थेच्या अंगलट येण्याचा धोका संभवतो. व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या या प्रकारांबाबत सहकारमंत्री अवगत आहेत की नाही, हे माहीत नाही; पण त्यांनी तात्काळ या कारभारात हस्तक्षेप करून व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.

पेडणेतील जुगाराविरोधी कारवाईचा तपशील द्या

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राने प्रचंड खळबळ
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी पेडणे तालुक्यातील खुलेआम जुगाराबाबत पोलिस खात्याने काय कारवाई केली याबाबतचा सखोल अहवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे मागितल्याने जुगारवाल्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे. "मांद्रे सिटीझन फोरम' तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनास अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल मागवल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशामुळे पेडणे पोलिसांचे धाबे दणाणले असून त्यांनी पेडण्यातील जुगाराविरोधात जोरदार मोहीम उघडल्याचे वृत्त आहे.
"मांद्रे सिटीझन फोरम'ने पेडणे तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक उत्सव, क्रिकेट स्पर्धा आदींना खुलेआम जुगार चालतो, अशी तक्रार राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. जुगार समाजाला कसा घातक आहे, त्याला आळा का बसायला हवा याबाबतही फोरमने जागृती सुरू केली. त्याला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. मांद्रेतील काही समाजिक कार्यकर्ते व समविचारी मंडळींनी फोरमच्या या कार्याचे कौतुक केले. त्यांना पाठिंबा दिला.
"गोवादूत'नेदेखील सातत्याने या मोहिमेचा पाठपुरावा करून फोरमच्या या कार्याला हातभार लावला. तक्रारी करूनही कारवाईच होत नसल्याने फोरमच्या काही कार्यकर्त्यांनी जुगाराचे पुरावेही एकत्र केले. काही सतर्क नागरिकांनी जुगाराचे फोटो व सीडी फोरमकडे सुपूर्द करून त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा दिला. आता माहिती अधिकाराखाली जुगाराबाबत नेमकी काय कारवाई झाली याचा तपशील मिळवण्यासाठी
अर्ज सादर करण्याची मोहीम सुरू झाल्याने या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.
पेडण्यातील जुगार व्यावसायिक त्यामुळे "दुखावले' गेल्याने त्यांनी सध्या फोरमच्या सदस्यांवर दबाव आणण्याचे किंवा त्यांच्या घरी अकस्मात भेट देऊन त्यांना सतावण्याचे सत्र आरंभले आहे. पेडणे पोलिसांनी फोरममुळे जुगार बंद झाला,असे सांगितल्याचेही हे लोक सांगत सुटले आहेत.
जुगार खेळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो बंद करणे पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिस आपली कातडी बचावण्यासाठी आता फोरमचे नाव पुढे करून जुगारवाल्यांना फोरमविरोधात लोकांना भडकावत आहेत. त्यामुळे फोरम सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची तक्रार उपस्थित झाली आहे. पेडणेतून जुगाराचा नायनाट करण्यासाठी सर्व समविचारी, बुद्धिवादी तथा पेडण्यातील स्वाभिमानी लोकांनी फोरमच्या या मोहिमेत सहभागी व्हावे व फोरमला साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जुगारामुळे अनेकांचे संसार धुळीला मिळाले आहेत. बेरोजगार युवक जुगाराच्या आहारी गेल्यामुळे
त्यांच्यात व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. जुगारामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते मिळतात. त्यामुळे पोलिस जुगारवाल्यांना भडकावून फोरमच्या कार्यकर्त्यांत दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असून हे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पेडणे तालुक्यातील असंख्य युवा संघटनांनी याविषयावर एकत्र यावे व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती फोरमने केली आहे.

पवित्र मंत्रोच्चाराच्या जयघोषात गायत्री पुरश्चरण सोहळा सुरू...

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी): पवित्र मंत्रोच्चाराचा जयघोष, हजारो भाविकांचा सहभाग आणि प्रार्थनेचे मंजूळ स्वर अशा भारलेल्या वातावरणात तपोभूमी कुंडई येथे गायत्री पुरश्चरण सांगता सोहळ्याला प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत आज (दि.१७ ) पहाटे ५ वाजता प्रारंभ झाला. या सोहळ्याची समाप्ती रविवार १८ रोजी होणार आहे. संप्रदायाच्या संत समाज संघटन समितीने १ कोटी २४ लाख गायत्री मंत्राचा संकल्प पूर्णत्वास नेला असून यासाठी तीन हजार जपकर्ते लाभले आहेत.
तपोभूमी कुंडई येथे गायत्री पुरश्चरण सांगता सोहळ्यानिमित्त १२ यज्ञकुंड तयार करण्यात आले असून १२ प्रमुख यजमानांच्या नेतृत्वाखाली विविध धार्मिक विधी सुरू आहेत. मठाचे प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या आधिपत्याखाली मठाचे बटू पौरोहित्य करीत आहेत. १७ रोजी पहाटे ५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. तपोभूमीचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
१८ रोजी पहाटे ५ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त पहाटेपासून सांप्रदायिक प्रार्थना, सद्गुरू महापूजा, तीन हजार जपकर्त्यांकडून हवन, जपकर्त्यांकडून मार्जन, जपकर्त्यांकडून तर्पण, ब्राह्मण भोजन, प्रमुख द्वादश यजमानांस अभिषेक असा कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मुख्य पूर्णाहुती, श्रेयोग्रहण, ब्राह्मण संभावना, महाआरती व महाप्रसाद होणार आहे. मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्याकडूनही जप करून घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, पंचायत मंत्री बाबू आजगांवकर, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आमदार नीळकंठ हळर्णकर, दयानंद नार्वेकर, पांडुरंग मडकईकर, श्याम सातर्डेकर, चंद्रकांत कवळेकर, अनिल साळगांवकर, दयानंद मांद्रेकर, दीपक ढवळीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, दामोदर नाईक, वासुदेव गांवकर, राजेश पाटणेकर, दिलीप परूळेकर, मिलिंद नाईक, महादेव नाईक, अनंत शेट, विजय पै खोत, रमेश तवडकर, प्रताप गावंस, दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. तसेच मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, उद्योजक समीर साळगांवकर, उद्योगपती हरीश मेलवानी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोंड्यात युवतीवर प्राणघातक हल्ला हल्लेखोर पळाला, खडपाबांध भागात खळबळ

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी): खडपाबांध फोंडा येथे एका घरकाम करणाऱ्या एका युवतीवर आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास एक व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला असून सदर युवतीवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. अमृता गावडे असे हल्ला झालेल्या युवतीचे नाव आहे.
यासंबंधी तिची बहीण विमल धानू गावडे (गावणे) हिने फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फोंड्यात आठ दिवसांपूर्वी कुंडई येथील एका युवतीवर सुरी हल्ल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच शनिवारी सकाळी आणखी एका युवतीवर हल्ला झाल्यामुळे फोंड्यात खळबळ माजली आहे.
या युवतीवरील प्राणघातक हल्ल्याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी तपासकाम सुरू केले आहे. हल्ला करण्यात आलेली अमृता ही युवती गंभीर जखमी असल्याने तिच्याकडून सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
अमृता गावडे ही युवती मूळची गावणे येथील असून खडपाबांध येथे घरकामाला होती. आज (दि.१७) सकाळी ९ च्या सुमारास एका व्यक्तीबरोबर दुचाकी वाहनावरून जात असताना "त्या' व्यक्तीने येथील आरटीओ कार्यालयाजवळ तिच्यावर दंडुक्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला. जखमी अमृताला प्रथम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. नंतर तिला बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिच्याकडून याप्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक संजय दळवी तपास करीत आहेत.

प्लॅस्टिक सर्जरीने सौंदर्य खुलवणारा वैद्यक जगतातील 'किमयागार'

पणजी, दि. १७ (ज्योती धोंड): शापीत सौंदर्याला उःशाप देणारे एक ऋषिमुनी नुकतेच गोव्यात येऊन गेले. हे कोणी पुराणातले ऋषी नव्हेत बरं.
हे आहेत आधुनिक वैद्यकीय जगतातील एक साधक अन् सौंदर्याचे सौदागर! शस्त्रक्रियेचे पुढारलेले तंत्रज्ञान वापरून ते आपल्या कुशल हातांनी चेहऱ्यावरचे व्यंग दूर करतात व शेकडो कोमेजलेल्या डोळ्यांत आत्मविश्वास भरतात.बेढब फाटलेले ओठ, वाकडेतिकडे किंवा फेंदरे नाक, सुरकुतलेली त्वचा, आगीत होरपळलेली कातडी या सर्वांवर शस्त्रक्रियेद्वारा सौंदर्याचा आगळा साज चढवणारे हे शल्यविशारद म्हणजे बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. मुकुंद थत्ते. डॉ. थत्ते हे अखिल भारतीय प्लॅस्टिक सर्जन संघटनेचे अध्यक्ष असून, या संघटनेचे ७५० प्लॅस्टिक सर्जन सदस्य आहेत.
डॉ. थत्ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ""रिन्होप्लास्टी'' या विषयावर "प्रा. सी. आर. एस. सुंदरराजन राष्ट्रीय प्लॅस्टिक सर्जरी व्याख्यानमालेतील समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "गोवादूत'च्या प्रस्तुत प्रतिनिधीशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्यातून उलगडत गेला "प्लॅस्टिक सर्जरी' या विषयावरील माहितीचा अनोखा खजिना..
प्लॅस्टिक सर्जरीविषयी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशात जरी गेल्या २० - २५ वर्षांत प्लॅस्टिक सर्जरीची प्रगती झाली असली तरी अशा प्रकारची शस्त्रक्रिया ६०० ख्रिस्तपूर्व (६०० बीसी) काळात वैद्य सुश्रुत यांनी सुरू केली होती. त्यानंतर पहिल्या महायुद्धात अनेक जखमी लोकांवर आणि सैनिकांवर ज्यांचे चेहरे, हात, पाय लढाईत छिन्नविछीन्न झाले होते त्यांच्यावर अशा शस्त्रक्रिया युरोप, आशिया खंडात यशस्वीरित्या केल्या गेल्या.
सध्या भारतात वर्षाकाठी सुमारे २ - ३ लाख छोट्या-मोठ्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या जातात.
प्लॅस्टिक सर्जरीविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये असलेल्या गैरसमजुतीबद्दल बोलताना डॉ. थत्ते म्हणाले, " प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याचा अधिकार आहे. सौंदर्याचा थेट संबंध जर एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायाशी असेल तर त्या व्यक्तीने सुंदर दिसण्यासाठी किंवा ते टिकविण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा आधार घेण्यात काहीच वावगे नाही. त्याचबरोबर प्लॅस्टिक सर्जरी ही फक्त सुंदर दिसण्यासाठी केली जाते हा एक फार मोठा गैरसमज समाजात बळावला आहे. काही वेळा प्लॅस्टिक सर्जरी करणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ कॅन्सर, वाहन अपघात, आगीत होरपळणे, एखादे जन्मजात व्यंग, कुरूप चेहरा इत्यादी. आता तर विज्ञान एवढे पुढे गेले आहे की, तीन महिन्यांच्या बालकावर सुद्धा आम्ही प्लॅस्टिक सर्जरी करतो. तसेच ज्यांचे नाक वाकडे आहे किंवा बेढब आहे त्यांना अशी सर्जरी म्हणजे सौंदर्याचे वरदानच ठरते. एखादे व्यंग घेऊन आयुष्यभर कुडत राहण्यापेक्षा, प्लॅस्टिक सर्जरी करून ते व्यंग नाहीसे करण्यात मोठा आनंद असतो. कारण अशी सर्जरी रुग्णाचा आत्मविश्वास वाढवते.
प्लॅस्टिक सर्जन होण्याची त्यांची आवड वैद्यकीय जीवनातच रुजली. गंमत म्हणजे डॉ. थत्ते जेव्हा बसमधून नेहमी प्रवास करायचे तेव्हा आपल्या सहप्रवाशांची नाके कशी असावीत यावर ते बराच विचार करीत असत. चित्रकलेत एकही बक्षीस कधी मिळवू न शकलेले हे डॉक्टर महोदय आज एक निष्णात शल्यविशारद आहेत हे विशेष. ते आपल्या जादुई हातांनी लोकांची नाके सरळ, सुंदर करतात, चेहऱ्यावरील दोष दूर करतात, त्वचेवरील सुरकुत्या घालवतात. देशविदेशांत होणाऱ्या सौंदर्य शस्त्रक्रियांविषयी बोलताना डॉक्टर म्हणतात, " शस्त्रक्रिया करणे हा रुग्णांचा हक्क असतो. मात्र ती करावी किंवा नाही हा फक्त डॉक्टरांचा हक्क असू शकतो. अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाच्या गरजा, शस्त्रक्रियेची आवश्यकता, या तज्ञांनी जरूर तपासल्या पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले'.
रुग्णाच्या मागणीचे अवाजवी लाड करू नका. भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांविषयी बोलताना ते म्हणाले, "आपले डॉक्टर निपुण आहेत पण कमी पडते ती त्यांना जरुरी असलेल्या साधन सामग्रीची, तंत्रज्ञानाची, शासकीय काम करणाऱ्या मनुष्यबळाची. तज्ज्ञ डॉक्टरच जर आपआपल्या विभागात प्रशासकीय काम करू लागले तर त्यांच्या निपुणतेचा फायदा आम जनतेला कसा होणार, याची दखल योग्य त्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने गेल्या ५ वर्षात केलेल्या प्रगतीचे डॉ. थत्तेंनी खूप कौतुक केले. विशेषतः डॉ. सी. पी. दास आणि युरी डायस यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
"गोमेकॉ'त गेल्या ५ वर्षात अशा ५६ शस्त्रक्रीया झाल्या. नाकाचे दोष दूर करणे, वाकडे नाक सरळ करणे, पोपटाच्या चोचीसारखे असणारे नाक सरळ करणे, अति लांब नाक छोटे करणे, अति फुगीर नाक सडपातळ करणे, ओठ सुंदर बनविणे, अपघातात चेंगरलेले नाक पुन्हा उभे करणे, अशा अनेक शस्त्रक्रिया डॉ. दास व युरी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी यशस्वीपणे केल्या आहेत.