Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 13 October 2009

मेरशी येथे सापडला

महिलेचा मृतदेह खुनाची शक्यता
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - वयलोवाडो मेरशी येथे २५ ते ३० वयोगटातील एका बिगरगोमंतकीय महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून सदर प्रकार खुनाचा असल्याची शक्यता जुने गोवे पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मृतदेहाचे हात वरच्या बाजूला उचललेल्या स्थितीत घट्ट झालेले असल्याने चोवीस तासांपूर्वी खून करून मृतदेह त्याठिकाणी आणून तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. झरीकडे वयलोवाडे येथे मृतदेह असल्याची माहिती आज सकाळी मेरशीच्या सरपंचांना मिळाल्यानंतर पोलिस स्थानकात तक्रार दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिला आहे. मृतदेह मिळालेल्या घटनास्थळावरून पोलिसांनी एक टर्पटांयनची बाटली जप्त केली असून यातील द्रव्य वापरून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी पोलिसांनी खुन्याचा माघ काढण्यासाठी श्वान पथकाचा वापर केला असता त्याचा अधिक उपयोग झाला नाही. ठसे तज्ज्ञांनी त्या बाटलीवर उमटलेल्या ठश्यांचे नमुनेही गोळा केला आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलिस सध्या ही महिला कोण, याचाच शोध घेत आहेत.
झरीकडे मेरशी येथे हा रस्ता संपतो. रस्त्याच्या सुमारे ५ मीटर अंतरावर हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या शरीरावर वार केल्याच्या किंवा खरचटलेल्या कोणत्याही जखमा प्रथमदर्शनी दिसत नसल्याने खून करून वाहनातून हे प्रेत याठिकाणी आणून टाकले असावे. तसेच जमिनीवर मृतदेह ओढत नेल्याच्याही खुणा दिसत असल्याने वाहनातून हा मृतदेह येथे आणल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या महिलेच्या अंगावर मोरपिशी रंगाचा साडी व ब्लाऊज आहे. तसेच त्याच रंगाच्या हातात बांगड्या आहेत. हातातील एकही बांगडी फुटलेली नाही. त्या महिलेच्या तोंडावर आणि पोटाखालील भाग अधिक प्रमाणात जळलेला आहे. त्यामुळे चेहरा एकदम विद्रूप झाला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आगशी, जुने गोवे, पणजी तसेच पर्वरी या भागातील महिला बेपत्ता आहे का, याची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याविषयीचा अधिक तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचा तात्पुरता ताबा सांभाळणारे आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहे.

Monday, 12 October 2009

खाणींना थारा न देता कोकणचे सौंदर्य जपा

प्रचारसभेत पर्रीकरांचे आवाहन

सावंतवाडी, दि. ११ (प्रतिनिधी) : मायनिंग म्हणजे एका सुंदर तरुणीच्या चेहऱ्यावर फोड यावा, तसे आहे. गोमंतकीयांनी जी चूक केली ती चूक इथे करू नका, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांना विजयी करा, असे आवाहन गोवा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. ते सावंतवाडी गांधीचौक येथील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत संबोधन करत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी खासदार एकनाथ ठाकूर, आमदार परशुराम उपरकर, किरण पावसकर, जिल्हा प्रमुख रमेश गावकर, उपजिल्हाप्रमुख अरुण सावंत, माजी नगरसेवक के.पी. नाईक, दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख प्रकाश रेडकर सावंतवाडी संपर्क प्रमुख राजू नाईक, मायनिंग व औष्णिक चलेजाव फोरमचेे निमंत्रक डॉ. जयंत परूळेकर, नकुल पासकर, तालुका प्रमुख अजित सावंत, एकनाथ नाडकर्णी, महिला आघाडी प्रमुख नेहा परब, स्मिता सोनावणे आदी उपस्थित होते.
पर्रीकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजलेल्या राडा संस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले इथे राडा संस्कृती आली तर पर्यटक कसा काय येणार? गोव्यापेक्षाही सुंदर सिंधुदुर्ग जिल्हा असून मला त्याचा हेवा वाटतो, असे ते म्हणाले. मायनिंगचे दुष्परिणाम हे आमच्या गोव्यातील सांगे, केपे, सत्तरी व डिचोली या तालुक्यांत येऊन पहावे, असेही त्यांनी सांगितले.
आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार शिवराम दळवी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या आरोपाचा समाचार घेतला. दीपक केसरकर यांच्या प्रत्येक प्रश्नाला येत्या २२ तारखेनंतर समोरासमोर येऊन उत्तर देण्याचा इशारा दळवी यांनी दीपक केसरकर यांचे नाव न घेता त्यांना दिला. मायनिंग कंपन्यांशी असलेल्या संबंधाबाबत केसरकर यांच्यावर चौफेर टीका करताना दळवी म्हणाले, रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत एकही मायनिंग प्रकल्प या जिल्ह्यात होऊ देणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी नारायण राणे व केसरकर यांच्यावर शरसंधान केले. यावेळी आमदार किरण पावसकर यांनी दळवी यांना विजयी करून विधानसभेवर पाठवा, असे आवाहन केले.
मायनिंग दलालांना कायमची अद्दल घडवा, असे आवाहन आमदार परशुराम उपरकर यांनी केले. को, ऑप. बॅंकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप टोपले यांनी केले. तर आभार बांदा सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण काणेकर यांनी केले.यावेळी खचाखच भरलेल्या गांधीचौकात जाहीर सभा सुरू असताना पाऊस पडला. परंतु तरीही महिला व शिवसैनिक उठून गेले नाहीत.

लेखनात गुणात्मक वाढ व्हावी - विद्या बाळ

महिला साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - लेखकांच्या संख्येने वाढ होत आहे. मात्र, लिखाणात गुणात्मक वाढ झालेली दिसत नाही, कसदार साहित्य निर्मितीसाठी वाचन, मनन आणि चिंतनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ यांनी आज दुपारी येथे केले आहे.
खडपाबांध फोंडा येथील श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या आल्मेदा विद्यालय सभागृहात आयोजित ७ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ बोलत होत्या. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर, विशेष अतिथी म्हणून मोनिका गजेंद्रगडकर, स्वागताध्यक्ष सौ. मंदा बांदेकर, आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती माधवीताई देसाई, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन देव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
विद्या बाळ पुढे बोलताना म्हणाल्या, आजच्या काळात लेखक लिखाण केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी प्रसिद्धी माध्यमाकडे पाठवून देतो. आजच्या काळात माध्यमाच्या संख्येत वाढ झालेली असल्याने लेखकाचे लिखाण कुठं ना कुठे छापून येते. लेखकाने आपल्या प्रसिद्ध झालेल्या लेखनाचे वाचन करून त्यांच्या गुणात्मकतेवर विचार केला पाहिजे. लेखकाने प्रसिद्धीचा मोह टाळला पाहिजे. कसदार लेखनासाठी मान्यवर लेखकांच्या साहित्याचे वाचन केले पाहिजे. लेखकाने लेखन करताना आत्मशोध घेण्याची गरज आहे. लेखकाने साहित्य निर्मिती केल्यानंतर ताबडतोब प्रसिद्धीसाठी पाठवू नये. त्या लेखनाचा पुन्हा वाचन करून साहित्य निर्मिती आणखी कसदार कशी होईल यासाठी चिंतन केले पाहिजे, असेही विद्या बाळ यांनी सांगितले. विद्या बाळ यांनी आपल्या भाषणात महिला लेखिकांसाठी कसदार लेखनासंबंधी मौल्यवान सूचनाही केल्या. महिलांनी जीवनातील अनुभव शब्दबद्ध करावेत, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी केले. महिला साहित्य संमेलन हे महिलांची दिवाळी पूर्वीची अक्षरांची दिवाळी आहे. महिलांनी महिलांसाठी आयोजित केले जात असलेले एकमेव साहित्य संमेलन आहे. ह्या संमेलनाच्या माध्यमातून गोव्यातील महिलांच्या सुप्त लेखन व कला गुणांना वाव मिळू शकतो. महिलांना आपले लेखन सादरीकरणासाठी व्यासपीठ सुध्दा उपलब्ध झाले आहे, असे डॉ. कार्व्हालो यांनी सांगितले.
स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिजे. साहित्य हा समाजाचा आसरा आहे. त्यामुळे महिलांचे जीवन सुध्दा साहित्यात शब्दबद्ध झाले पाहिजे. महिलांनी जीवनात सोसलेले त्रास, कष्ट याचे चित्रण होणे आवश्यक आहे, असेही कार्व्हालो यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. कार्व्हालो यांनी आपल्या भाषणात साहित्यातील स्त्री साहित्याचा आढावा घेतला.
स्वत्व जपणाऱ्या महिला या समाजात आहेत. फोंड्यातील महिलांनी महिलांच्या अंगातील लेखन गुणांना चालना देण्यासाठी हाती घेतलेला साहित्य संमेलनाचा उपक्रम स्तुत्य आहे, असे अभिनेत्री, निर्माती स्मिता तळवलकर यांनी सांगितले.
छोट्या दिव्याने अनेक दिवे उजळले जातात. त्याचप्रमाणे या लहानशा महिलांच्या साहित्य संमेलनातून महिलांच्या अंगातील सुप्त लेखन गुणांना चालना मिळू शकते. महिला साहित्य संमेलन हा स्त्री शक्तीचा उत्कट सोहळा असून महिला एकत्र झाल्यास काय करू शकतात. हेच फोंड्यातील महिलांनी साहित्य संमेलनाचे आयोजन करून दाखवून दिले आहे, असे मोनिका गजेंद्रगडकर यांनी सांगितले.
या महिला साहित्य संमेलनात वाघिणीशी झुंज देऊन वाघीण पकडण्यासाठी साहाय्य करणाऱ्या काणकोण येथील श्रीमती रंगावती वेळीप या महिलेचा स्मिता तळवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिळून साऱ्याजणी दिपावली विशेषांक २००९ चे प्रकाशन स्मिता तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. डॉ. पूर्णिमा उसगावकर यांच्या "आरोग्य टिप्स' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या उत्कृष्ट बाल वाचक पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी साहित्यिक महाबळेश्र्वर सैल, हरिश्चंद्र खोलकर यांचा सन्मान करण्यात आला.
बा.भ. बोरकर यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त व्यासपीठाला कै. बा.भ. बोरकर यांचे नाव देण्यात आले होते. तसेच व्यासपीठाची सजावटीसाठी पोफळीची झाडे आणि सुपाऱ्यांचा वापर करण्यात आला होता. बा.भ. बोरकर यांची लेखन कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सभागृहात लावण्यात आले होते. तसेच गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्याची माहिती देणारे भित्तिपत्रक सुध्दा सभागृहात लावण्यात आले होते.
संमेलनाच्या सुरुवातीला कु. नेहा करमरकर हिने शारदास्तवन सादर केले. सौ. मंदा बांदेकर यांनी स्वागत केले. डॉ. पूर्णिमा उसगांवकर, सौ. गीता सोमण, अरुणा बधोरिया, स्मिता नाईक, सरिता दळवी, भारती चौगुले, विजया दीक्षित, वंदना जोग, सौ.लक्ष्मी जोग यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माधवी देसाई यांनी प्रास्ताविक केले. महिलांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, महिलांना लिहिते आणि बोलते करण्यासाठी ह्या संमेलनाचा आयोजन दरवर्षी केले जात आहे, असे माधवी देसाई यांनी सांगितले. सूत्रसंचालन संगीता अभ्यंकर यांनी केले. शेवटी डॉ. नूतन देव यांनी आभार मानले.
या संमेलनात "स्पंदने दोन पिढ्यांची...' या परिसंवादात विद्या बाळ, माधवी देसाई, कादंबरी कुलकर्णी, सौ. पौर्णिमा केरकर, प्रांजली देसाई यांनी भाग घेतला. कथाविष्कार सत्रात मोनिका गजेंद्रगडकर यांनी कथा लेखनाबाबत मार्गदर्शन केले.

कळंगुटमध्ये चार डॉक्टरांना तरुणींसोबत रंगेहाथ अटक

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - खोबरावाडो कळंगुट येथील एका गेस्ट हाऊसमध्ये तीन तरुणींसोबत व्यभिचार करताना चौघा डॉक्टरांना कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधित डॉक्टर बेळगाव येथील एका नामवंत वैद्यकीय संस्थेतील असल्याचे सांगण्यात आले. चौघांनाही अटक करून प्रत्येकी दहा हजारांच्या हमीवर सुटका करण्यात आली तर, तिन्ही तरुणींची मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
विचित्र अवस्थेत या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अटकेची संपूर्ण कारवाई होत असताना या डॉक्टरांनी आपल्या तोंडांवर रुमाल बांधले होते.
खोबरावाडो येथील येथील एकागेस्ट हाऊसमध्ये तीन तरुणींबरोबर चौघे तरुण आल्याची माहिती कळंगुटचे पोलिस निरीक्षक नॉलास्को रापोझ यांना मिळाली होती. त्यानुसार रापोझ यांनी पोलिस पथकासह रात्री अचानक त्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून एका खोलीची तपासणी केली असता तीन तरुणींबरोबर चौघा डॉक्टरांना रंगेहाथ पकडले.
या तिन्ही तरुणी मुंबईच्या असून राज आणि विशाल नामक दलालांनी पुरवल्या होत्या, अशी माहिती या डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. आता पोलिस या दोन्ही दलालांच्या शोधात आहेत.

खनिज ट्रक वाहतूक प्रकरण आज चिघळणार?

अद्याप तोडगा नाही आज २०० ट्रक उसगावात ट्रक रोखण्याची शक्यता

फोंडा, दि.११ (प्रतिनिधी) - वड उसगाव येथे गेले आठ दिवस सुरू असलेले सेझा कंपनीचे खनिज मालाची वाहतूक करणारे टिप्पर ट्रक रोको प्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघू न शकल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेझा कंपनीचे खनिज वाहतूक करणारे सुमारे दोनशे ट्रक सोमवार १२ ऑक्टोबर ०९ रोजी सकाळी १० वाजता उसगाव येथे आणले जाणार आहेत. आपली मागणी मान्य न झाल्याने उसगाव येथे सदर ट्रक रोखले जाणार असून त्यावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सेझा खनिज कंपनीने उसगाव, पाळी भागातील टिप्पर ट्रक खनिज माल वाहतूक करण्यासाठी सहभागी करून घ्यावेत. या मागणीसाठी गेल्या ५ ऑक्टोबर ०९ पासून उसगाव वड येथे उसगाव, पाळी भागातील टिप्पर ट्रक मालकांनी "सेझा खनिज आस्थापनेचे टिप्पर ट्रक परतवून पाठवा' आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सेझा कंपनीचे कोडली खाणीवरील खनिज माल आमोणे येथे नेणारी ट्रकांची वाहतूक बंद झाल्याने खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकात नाराजी पसरली आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी कोडली, दाभाळ, धावकोण धारबांदोडा या भागातील ट्रक मालकांनी फोंडा पोलिसांना निवेदन सादर करून या प्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र, ह्या प्रकरणी सात दिवसात कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे कोडली. दाभाळ, धावकोण या भागातील ट्रक मालकात संतापाची लाट पसरली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने सेझा कंपनीच्या खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांनी सोमवार १२ ऑक्टोबरला सुमारे २०० ट्रक रस्त्यावर नेण्याचा निर्धार केला आहे. सदर ट्रक उसगाव येथे आल्यानंतर ते अडविले जाणार आहेत. कारण उसगाव भागातील ट्रक मालकांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. ह्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर फोंड्यातील सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून सोमवारी कोणता पवित्रा घेते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

"गोवादूत'च्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन



"गोवादूत'च्या दिवाळीअंकाचे प्रकाशन करताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर (मध्यभागी) सोबत कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संपादक राजेंद्र देसाई, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे.

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज येथे "गोवादूत'च्या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन "गोवादूत' मुख्यालयात पार पडले.
अल्पावधीत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या दैनिकाच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी श्री. पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संपादक राजेंद्र देसाई, अभिनव पब्लिकेशन प्रा. लि.च्या संचालक ज्योती धोंड, संचालक सागर अग्नी, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, वृत्तसंपादक सुनील डोळे, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत आणि कर्मचारी उपस्थित होते.
नारायण राणेंची "दहशत' संपली ः पर्रीकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या प्रचारासाठी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गेलेल्या श्री. पर्रीकर यांनी, कोकणपट्टीत नारायण राणे यांची "दहशत' संपल्याचे निरीक्षण याप्रसंगी नोंदवले. ते म्हणाले, कोकणवासीयांशी संवाद साधल्यानंतर तेथील मतदार भयमुक्त होत असल्याचे आपणास प्रकर्षाने जाणवले. तसेच महागाईचा मुद्दा यावेळी निर्णायक ठरेल. सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा फायदा झाला असला तरी महागाईचा तेवढ्याच वेगाने आगडोंब उसळल्याने संसाराची सारी गणिते पुन्हा पूर्वपदावर आली आहेत. शिवाय समाजातील असंघटित कामगारांना महागाईमुळे जगणेच महाकठीण बनले आहे. हा घटक सत्तारूढ कॉंग्रेसला अत्यंत अडचणीचा ठरणार आहे.
लोकांनी डोळसपणे आपले लोकप्रतिनिधी निवडण्याच्या गरजेवर श्री. पर्रीकर यांनी प्रामुख्याने भर दिला. लोकांसाठी तळमळीने राबणारा तो लोकप्रतिनिधी, असे सांगून ते म्हणाले, लोकप्रतिनिधी हा निष्क्रिय असू नये आणि दुसऱ्या बाजून तो जनतेच्या आकांक्षा धुळीला मिळवून केवळ स्वतःच्या तुंबड्या भरणाराही नसावा. आपल्या या मुद्यापुष्ट्यर्थ त्यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीत उदाहरणे देऊन जागतिक मंदी, बदलता आर्थिक ढाचा या विषयांवरही विवेचन केले.

Sunday, 11 October 2009

पाक लष्करी मुख्यालयावर दहशतवाद्यांचा हल्लाबोल

चौघे तालिबानी ठार
तालिबानने घेतली जबाबदारी
पाकिस्तानात प्रचंड खळबळ
हल्लेखोर लष्करी गणवेशात

इस्लामाबाद, दि. १० - पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर आज केलेल्या हल्ल्यानंतर मोठी चकमक उडून त्यात चार तालिबानी आणि पाक लष्कराचे काही जवान मारले गेले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
आज दुपारी १२ च्या सुमारास लष्करी गणवेषातील काही तालिबान्यांनी या लष्करी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पहिला दरवाजा त्यांनी पारही केला होता. पण, दुसऱ्या दरवाजापाशी ते आले असता तेथील रक्षकांनी संशयावरुन त्यांना रोखले. त्यावेळी तालिबान्यांनी बेछूट गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार अतिरेक्यांना ठार मारले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे काही जवानही मारले गेले. त्यांची संख्या मात्र लगेच कळू शकली नाही. तालिबान्यांनी हल्ला केल्याचे वृत्त कळताच संपूर्ण परिसरात लष्करी हेलिकॉप्टर्समधून कमांडोज उतरविण्यात आले आणि त्यांनी अतिरेक्यांवर मारा केला. अतिरेकी एका पांढऱ्या रंगाच्या व्हॅनमधून आले होते.
ज्या चार अतिरेक्यांनी मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, ते चारही जण ठार मारण्यात आले आहेत आणि स्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे लष्कराचे मुख्य प्रवक्ते मेजर जनरल अब्बास यांनी पत्रकारांना सांगितले.
तालिबान्यांनी कालच पेशावर येथे केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आज त्यांनी लष्करी मुख्यालयाला आपले लक्ष्य केले. तालिबान्यांचा प्रमुख गड असलेल्या वजिरिस्तानमध्ये येत्या काही दिवसांत लष्कर मोठी कारवाई करेल, असे विधान अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केल्याच्या काही क्षणानंतर हा हल्ला करण्यात आला, हे विशेष.
या हल्ल्यात आमचे काही जवानही मारले गेले आहेत, असे प्रवक्ते अब्बास यांनी सांगितले. पण, ही संख्या सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. किती जवान मारले गेले याचा आम्ही तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरेकी एका व्हॅनमधून आले, पहिल्या द्वारातून प्रवेश करण्यात ते यशस्वी झाले, पण दुसऱ्या दरवाज्याजवळ येताच त्यांना रोखण्यात आले असता त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, असे अब्बास यांनी सांगितले.
रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयावर हल्ला करण्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान या संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात आमचे चार सहकारी मारले गेले आहेत, पण त्यांनी आठ सैनिकांनाही ठार मारल्याचे संघटनेने म्हटले आहे. वायव्य सरहद्द प्रांतातील लष्करी कारवाई ताबडतोब थांबवावी, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
जिओ टीव्हीला टेलिफोनवरून संघटनेने ही जबाबदारी स्वीकारीत असल्याचे म्हटले आहे. हा हल्ला अमजद फारूखी गटाने केल्याचेही सांगण्यात आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरूद्ध खटला चालविण्याची मागणीही या गटाने केली आहे.
एका आठवड्यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता आझम तारिक याने धमकी देताना म्हटले होते की, वजिरिस्तानमध्ये लष्करी कारवाई केल्यास त्याचे अतिशर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल आणि पाकिस्तानी लष्कराला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आमच्या सैन्याने अत्तर आणि दक्षिण वजिरिस्तानकडे कूच केले असून येत्या काही दिवसांत या भागात हल्ला करण्यात येईल.आमच्यापुढे कारवाई करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटले आहे.

तीन जलमार्गांवर सुरू होणार "लॉंच' सेवा

पणजी, दि. १०(प्रतिनिधी)- जवाहरलाल नेहरू शहर पुनर्निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील विविध अशा तीन जलमार्गावर "लॉंच' सेवा सुरू करण्याची तयारी सरकारने केली आहे. कुट्ठाळी ते आगशी या जलमार्गावर "बूट' पद्धतीअंतर्गत "रो-रो' सेवाही सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे,अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
आज येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना श्री.ढवळीकर यांनी नदी परिवहन खात्याच्या कामगिरीचा आढावा घेतला. पणजी ते हळदोणा, पणजी ते पिळगाव व पणजी ते मुरगाव या तीन मार्गावर सुमारे शंभर प्रवाशांची सोय होणार अशा पद्धतीची "लॉँच' सेवा सुरू करण्याचा विचार आहे. याबाबतीत सल्लागार कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक नामांकित कंपनी त्यासाठी इच्छुक आहेत. पुढील आठवड्यात सल्लागार कंपनीचे एक पथक या जलमार्गांची पाहणी करण्यासाठी दाखल होणार आहे,असेही श्री.ढवळीकर म्हणाले.ही योजना प्रत्यक्षात उतरल्यास त्याचा नियमित प्रवाशांना लाभ होईलच, त्याचबरोबर पर्यटकांसाठीही ते आगळे आकर्षण ठरेल, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
आगशी ते कुठ्ठाळी जलमार्गावर "बांधा,वापरा व परत करा' (बूट) तत्वावर "रो-रो'सेवा सुरू करण्यासाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्याची माहितीदेखील श्री.ढवळीकर यांनी दिली. ही सेवा अवजड वाहनांसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूण तीन कंपन्यांकडून यासंदर्भात प्रस्ताव सादर झाले आहेत. पुढील आठवड्यात त्यावर चर्चा होईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराचा कळस हीच गोव्याची खरी ओळख

ऍड. उदय भेंब्रे यांचे परखड प्रतिपादन
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोव्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या नेत्यांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवून गोवेकर कसल्या विकासाची अपेक्षा बाळगून आहेत,असा खडा सवाल करतानाच प्रशासनाचा बट्टाबोळ, भ्रष्टाचाराचा कळस हीच राज्याची ओळख बनत चालली आहे, असे परखड उद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे यांनी काढले.
कै.पांडुरंग मुळगावकर यांच्या ९२ व्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी " भारतातील गोवा- काल, आज आणि उद्या' या विषयावर ओजस्वी भाषण केले.यावेळी व्यासपीठावर स्मृती समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश गुरूदास कामत, "मार्ग'अभियानचे निमंत्रक गुरूनाथ केळेकर, लीबिया लोबो सरदेसाई आदी मान्यवर हजर होते.
गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांनंतरही वीज,पाणी आदी आवश्यक गोष्टींची शाश्वती देता येत नाही, तिथे काय बोलावे."इंडिया टूडे, आयबीएन-७' आदींकडून गोव्याला लहान राज्यांच्या विभागांत उत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जाहीर झाला.लहान राज्यांच्या गटात असलेली मिझोरम,मणिपूर,मेघालय आदी पूर्वांचल राज्ये येतात. अनुसूचित जमातीच्या लोकांचे बहुमत असलेल्या या राज्यांकडे गोव्याची तुलनाच होऊ शकत नाही, तिथे गोव्याला पुरस्कार मिळणे म्हणजे "आंधळ्यात कुड्डो राजा'असाच प्रकार आहे. सर्वांत जास्त भ्रष्टाचार व निष्क्रिय प्रशासनाचा विभाग असता तर त्यात गोव्याचा क्रमांक नक्कीच अव्वल लागला असता असा टोलाही यावेळी ऍड.भेंब्रे यांनी हाणला.
गोव्याच्या मुक्तीला अठ्ठेचाळीस वर्षे संपत आली पण या काळात गोव्याचा विकास कमी आणि दुर्दशाच जास्त झाली आहे. गोव्याच्या अस्मितेबाबत चिंतेचा आव आणून आता "विशेष दर्जाचे' ढोल बडवले जात आहेत. तथापि, "गोंयकारपण' टिकवायचे असेल तर त्यासाठी गोवेकरांनी आपल्या मूलभूत स्वभावात आमूलाग्र बदल करणे अपरिहार्य आहे.अन्यथा गोव्याचा विनाश अटळ आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
गोव्याचा इतिहास, वर्तमान व भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या आपल्या भाषणात ऍड.भेंब्रे पुढे म्हणाले की गोवा मुक्तीनंतर दिशाहीन, तत्त्वहीन, मूल्यहीन सरकारांच्या हातात सत्तेची सूत्रे जनतेने सोपवली. त्यावेळच्या सरकारने केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुढील सरकारांनी सुरू ठेवली आहे. गोवा विलीनीकरण वादाचा आढावा घेतल्यास त्याची जबर किंमत राज्याला भोगावी लागली आहे. समृद्ध, सुखी गोवा व देशाची सेवा करण्याच्या भावनेने पहिल्या निवडणुकीत उतरलेल्या तत्कालीन विचारवंतांना जनतेने झिडकारले व विचारहीन नेतृत्वाकडे सत्ता सोपवली.दगडाला शेंदूर फासून निवडणुकीत उभा केला तरीही तो निवडून येऊ शकतो,अशी भाषा करणारेच श्रेष्ठ ठरले.गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तत्कालीन नेतृत्वाला गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची आस नव्हतीच व आता कालांतराने तोच मुद्दा ऐरणीवर आला आहे.आता गोव्यासाठी विशेष राज्याच्या दर्जाची भाषा केली जात आहे. दर्जा मिळाला तर तो केवळ आर्थिक पॅकेजच्या दृष्टीने मिळेल, राज्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने नसेल,असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या एकूण दारुण परिस्थितीला गोमंतकीय समाजच जबाबदार आहे.गोमंतकीय या नात्याने आपण निष्क्रिय, भ्रष्ट, आळशी, कायद्याचे दुश्मन, हेकेखोर व नेहमीच नकाराचे तुणतुणे वाजवणारे आहोत. हा स्वभावदोष बदलावा लागेल. हे कठीण जरूर आहे व अशक्य नाही.गोव्याला वाचवायचे असेल तर हा स्वभावदोष बदलणे अपरिहार्य आहे,असेही ऍड.भेंब्रे यांनी सांगितले.सुरुवातीला समई प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.निवृत्त न्यायमूर्ती श्री.कामत यांनी स्वागत केले.श्री.केळेकर यांनी विचार मांडले. लीबिया लोबो यांनी आभार मानले.मीनाक्षी मार्टिन्स यांनी सूत्रसंचालन केले.
गोव्याचा नव्हे भारताचा सुवर्णमहोत्सव !
१५ ऑगस्ट हा जरी आपण भारत देशाचा स्वतंत्रदिन म्हणून साजरा करीत असलो तरी तो अपूर्ण आहे.गोव्याच्या मुक्तीनंतरच संपूर्ण भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. त्यामुळे २०११ साली गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा सुवर्णमहोत्सव आहे हे केंद्राला पटवून देण्याची गरज असल्याचे मत ऍड.उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.

मांद्रेची ग्रामसभा आज वादळी ठरणार

पेडणे, दि. १० (प्रतिनिधी) - मांद्रेची उद्या ११ रोजी होणारी ग्रामसभा विविध विषयांवरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गावातील जागृत नागरिक तथा विशेष करून मांद्रे सिटीझन फोरमचे तरुण कार्यकर्ते यांनी पंचायत मंडळ व सचिवांना विविध विषयांवरून कोंडीत पकडण्याची जबरदस्त व्यूहरचना आखली आहे, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मागच्या दोन ग्रामसभा जुनसवाडा मांद्रे येथील तथाकथित "रिवा रिझोर्ट' चे बेकायदा बांधकाम व कुंपणावरून बरीच गाजली होती. उद्याच्या बैठकीत आम्रपाली बांधकाम प्रकल्प, महाशीर हॉटेल प्रकल्प, जुनसवाडा येथील वाळूचे तेंब सपाटीकरण व कुटीरांचे बांधकाम, पंचायत सचिवांच्या बदलीचा घोळ,आश्वे डोंगर कापणी प्रकरण व मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुगार या विषयावरून पंचायत मंडळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मांद्रे सिटीझन फोरमची तातडीची बैठक आज झाली व त्यात ग्रामसभेत मांडण्यात येणाऱ्या विषयांची तयारी करण्यात आल्याचीही खबर प्राप्त झाली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय पातळीवर यंदा "ग्रामसभावर्ष' म्हणून साजरे केले जात आहे. जास्तीत जास्त ग्रामसभा घेणे, ग्रामसभेला मोठ्यासंख्यने नागरिकांना उपस्थित राहण्यास प्रोत्साहन देणे व गावच्या समस्या, प्रश्न व विकासाच्या निर्णय प्रक्रियेत ग्रामस्थांना सहभागी करून घेणे असा उद्देश ठेवण्यात आला आहे. मांद्रे गावातील युवकांनी अलीकडच्या ग्रामसभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध विषयांवरून पंचायत मंडळाला जाब विचारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून आता पेडणे तालुक्यातील इतर गावातील ग्रामसभांनाही गर्दी लोटत असल्याचे चित्र पसरले आहे.
मांद्रे फोरमचा स्तुत्य उपक्रम
मांद्रे गावातील जागृत नागरिकांनी एकत्रित येऊन मांद्रे सिटीझन फोरमची स्थापना केली आहे. वकील, अभियंते, शिक्षक व सुशिक्षित नागरिक यात सभासद म्हणून कार्यरत आहेत. गावात कुणावरही अन्याय झाला तर फोरम लगेच दखल घेतो. मागच्या दोन ग्रामसभांना ग्रामस्थांना जागृत करण्याचे काम मांद्रे फोरमने केले. जुनसवाडा येथील तथाकथित रिवा हॉटेलच्या जागेत राहणाऱ्या मुंडकारांवर मालकांनी केलेल्या अन्यायाला फोरमने वाचा फोडली. हा प्रश्न ग्रामसभेत बराच गाजला होता. फोरमच्या पुढाकाराची पंचायत मंडळाने मात्र बरीच धास्ती घेतली आहे.
आम्रपाली व आश्वे येथील महाशीर हॉटेल बांधकामावरही या सभेत गरमागरम चर्चा होणार आहे.मांद्रे पंचायतीचे सचिव यांची बदली होऊनही ते अजूनही ताबा सोडत नाहीत. या सचिवांची बदली रद्द करण्यासाठी पंचायत मंडळाने मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्याचीही माहिती मिळाली आहे. पंचायतीच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे सोडून सचिवाची बदली रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याचे नेमके कारण काय, असा सवालही ग्रामस्थांना पडल्याने हा विषयही उद्याच्या सभेत उपस्थित होणार आहे. मांद्रेच्या तलाठ्याविरोधातही अनेक तक्रारी असल्याने त्याचाही जाब विचारला जाईल, अशी माहिती देण्यात आली.