Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 14 September 2008

दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी धागेदोरे सापडल्याचा पोलिसांचा दावा

"सिमी'शी संबंधित सहा अटकेत
नवी दिल्ली, दि.१४ - शनिवारी नवी दिल्लीच्या काही भागांत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला असून, लवकरच याबाबत ठोस माहिती उघड केली जाईल, असे म्हटले आहे.रात्री उशिरा सहा जणांना संशयावरून अटक करण्यात आली असून त्यांचा "सिमी'शी संबंध असल्याचे समजते.
आज दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयात सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने यासंबंधी बोलताना याप्रकरणी गुंतलेल्या सर्वांना गजाआड केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या बॅाम्बस्फोटांमागे "इंडियन मुजाहिद्दीन' ही संघटना असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब पेरणाऱ्यांनी अमोनियम नायट्रेट आणि बॉल बेअरिंगचा वापर करून त्यांची तीव्रता वाढविली. एका कचऱ्याच्या पेटीत एक काळी पिशवी टाकताना ज्या मुलाने दोघांना पाहिले होते, त्याला पोलिस मुख्यालयात बोलाविण्यात आले असून, त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. या १२ वर्षांच्या फुगेविक्रेत्याने दोन उंच व दाढीवाल्या व्यक्तींनी रिक्षातून येऊन पिशवी टाकल्याचे पाहिले होते. रिगल चित्रपटगृहाच्या रक्षकाने एका संशयितास पकडले आहे, त्याच्याकडूनही माहिती मिळविण्यात येत आहे
आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तजिंदर खन्ना होते. पोलिसांनी अनेक हॉटेल्सवर छापे टाकण्याचे सत्र सुरू ठेवले असून, स्थानिक रहिवाशांच्या मते बॉम्ब पेरणारे हे दिल्लीबाहेरचेच आहेत. देशातील अनेक शहरांत यापूर्वी झालेल्या स्फोटांमागे "सिमी'ही बंदी घालण्यात आलेली मुस्लिम संघटना असून, दिल्लीतील स्फोटांमागे हीच संघटना असल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ५६ बळी घेणाऱ्या अहमदाबादमधील स्फोटांचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला अबू बशीर हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून माहिती मिळविण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक गुजरातला भेट देणार आहे.
आज राजधानीच्या शहरात शांतता होती. तथापि नेहमीची वर्दळ दिसत नव्हती. वाहतूकही कमी प्रमाणात चालू असल्याचे दिसून आले. मार्केट, चित्रपटगृहे, इस्पितळे व मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शनिवारी रात्री सात ते आठ जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कॅनॉट प्लेस, करोल बाग व ग्रेटर कैलास हे दिल्लीतील सर्वात अधिक वर्दळीचे भाग मानले जातात. काल आठवड्याच्या अखेरच्या दिवशी तेथे अधिक गर्दी होती. यापैकी दोन ठिकाणी तर मोठी आर्थिक उलाढाल चालू असते. पोलिसांनी कॅनॉट प्लेस व इंडिया गेटजवळून तीन बॉम्ब ताब्यात घेऊन ते निकामी केले.
दरम्यान, पोलिसांनी साक्षीदारांच्या माहितीवरून पाच संशयितांची रेखाचित्रे तयार केली आहेत. ग्रेटर कैलास येथे बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या सायकलच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या रिक्षातून संशयितांनी प्रवास केला, त्या चालकाला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.
आप्तांना भेटण्यास गर्दी
राजधानीत शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी आप्तांच्या प्रचंड मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी झाली होती.
शनिवारी झालेल्या स्फोटात सुमारे २५ जण ठार झाले. जखमींची संख्या १०० च्या वर आहे. या जखमींना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वाधिक जखमी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे तेथे भेटणाऱ्यांची संख्याही अधिक होती. रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आर.के.शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे शनिवारी ६० जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३१ जणांना आज सकाळी सुटी देण्यात आली. १० जखमींची प्रकृती मात्र अद्यापही गंभीर आहे. १९ जणांवर उपचार सुरू आहेत.
या स्फोटात आपल्या नातेवाईकांपैकी कोणी जखमी आहेत, असे कळताक्षणी विविध रुग्णालयात फोन करून नावासह विचारपूस करणाऱ्यांचीही संख्या बरीच होती. आप्तांविषयीची काळजी येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
हुबळीत शिजला कट
गेल्या महिन्याभरात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट कर्नाटकमधील हुबळी येथे शिजला होता, असे उघडकीस आले आहे. हुबळीस झालेल्या बैठकीत देशातील प्रमुख शहरांत स्फोट करण्याचा कट शिजला. तेथील बसस्थानकाजवळच एका मैदानात अतिरेक्यांना यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. उघड्या मैदानावर असा कॅम्प घेतल्याने कुणास संशय येण्याचे कारण नव्हते. ही माहिती कर्नाटकमधील स्फोटासंदर्भात अटक केलेले रियाझुद्दीन नसीर व कमरुद्दीन नागोरी यांच्या नार्को चाचणीत उघड झाली होती.

"मास्टरमाईंड'सिमीचा तौकीर?

नवी दिल्ली, दि.१४ - राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागचा "मास्टरमाईंड' सुभान कुरेशी हाच असल्याचा संशय पोलिसांना आहे. सुभान कुरेशी याला तौकीर या नावानेही ओळखले जाते. तौकीर हा "स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया'चा (सिमी) कार्यकर्ता असून सद्यस्थितीत तो बेपत्ता झालेला आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे.
दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेमागे तौकीर हाच मास्टरमाईंड असण्याविषयी पोलिसांना संशय आहे. तौकीर हा आतापर्यंत मुंबईबाहेरच्या मीरा रोडमधील नयानगरचा रहिवासी होता. तो बेपत्ता झालेला आहे. "विप्रो'च्या थेट सेल्स एजन्सीमध्ये तो कामाला होता. मात्र, १९९८ मध्येच त्याने कंपनी सोडली होती व त्याने "सिमी'मध्ये प्रवेश केला होता. प्रसिद्धीमाध्यमांना ई-मेल पाठविणारा हा तौकीरच असल्याचा संशय पोलिसांना आहे. स्फोटके बनविण्यात तौकीर हा निष्णांत आहे. त्याच्याशी त्याच्या कुटुंबीयांचा २००१ पासून संपर्क झालेला नाही.
मुंबईत रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर २००६ मध्ये तौकीरची चौकशी करण्यात आली होती. चौकशी केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सिमीप्रमुख सफदर नागौरी यानेच तौकीरची ओळख एहतेशाम सिद्दिकी याच्याशी करून दिली होती. एहतेशाम हा रेल्वेतील बॉम्बस्फोटांमागचा मास्टरमाईंड होता.

अकरावीत नापास विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसला!

शिक्षण उपसंचालकांचा कारवाईचा आदेश
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - वास्को येथील दीपविहार उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीत नापास झालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण करून बारावीच्या परीक्षेला बसवल्याचा प्रकार दक्षिण गोवा शिक्षण उपसंचालक एस.डी.जंगम यांनी केलेल्या चौकशीत उघडकीस आला आहे. या घोटाळ्यामुळे या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य व्हिक्टोरिया डिलीमा याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अहवालावरून दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आदेश शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल व्ही. पवार यांनी मुरगाव पोर्ट ट्रस्ट एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांना दिला आहे.
अकरावीला नापास झालेल्या विद्यार्थ्याला बारावीत बसवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक एस.डी. जंगम यांना दिला आहे. मात्र याच प्रकरणात गोवा शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एल.एम.टी. फर्नांडिस यांनी दिप विहार विद्यालयाच्या प्राचार्य डिलीमा यांना "क्लीन चीट दिली' होती. त्यामुळे निवृत्त झालेले मंडळाचे माजी अध्यक्ष फर्नांडिस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
कु. गीसन तेलीस याच्या गुण पत्रिकेनुसार तो बारावीच्या वर्गात पोचल्याचे म्हटले आहे. या विद्यालयात अकरावी केल्यानंतर तेलीस याने बारावीला अन्य एका उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळवला होता. परंतु, त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात "रिमार्क' च्या चौकटीच्या पुढे केवळ एक छोटी ओळ मारलेली आहे. त्यामुळे कोणी मुद्दामहून केले असल्याची शक्यता अहवालात व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे तेलीस याचा गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर २१ जुलै २००७ असा दिनांक लिहिलेला आहे. हा दाखला दि. २७ जुलै रोजी कोणा "जिला सावंत' नावाच्या व्यक्तीने घेतला आहे. नियमानुसार शाळा सोडल्याचा दाखल केवळ त्याचे पालक किंवा सदर विद्यार्थी सही करून घेऊ शकतो. तेलीस याने एमईएस उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीला प्रवेश मिळवला. परंतु, बारावीची परीक्षा देण्यासाठी त्याला दीपविहार विद्यालयात जावे लागले. यावेळी त्याठिकाणी त्याला शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने पाहिल्यावर तेलीस याचे रहस्य बाहेर आले. त्याच शिक्षिकेच्या विषयात तसेच अन्य अशा तीन विषयांत तेलीस नापास झाला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणामुळे दिप विहार विद्यालयाच्या प्राचार्य डिलिमा आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फर्नांडिस अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जुने गोव्यात दुहेरी खून

बेपत्ता महिलांचे मृतदेह सापडले
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - जुने गोवे येथून गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या दोन्ही वृद्ध महिलांचे मृतदेह मिळाले असून त्या दोघींचाही खून करण्यात आल्याचे वैद्यकीस अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. दोन्ही महिलांच्या चेहऱ्यावर, गळ्यावर व डोक्यावर तीक्ष्ण वार केल्याचे अहवालात उघड झाले आहे. अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या या दुहेरी खुनामुळे जुने गोवे परिसरात खळबळ माजली असून पोलिसासमोर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या खून प्रकरणाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बेपत्ता असलेली महिला सत्यवती फातर्पेकर (करमळी ६२) हिचा मृतदेह आज सकाळी बेती वेरे येथे मांडवी नदीत मिळाला असून पर्वरी पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तर, मंजूळा भोमकर(६५ करमळी) हिचा मृतदेह काल कुप्रसिद्ध "स्मगलर' नारायण सुकूर बाखिया यांच्या भाटाच्या बाजूच्या मांडवी नदीत सापडला होता. दोन्ही मृतदेहांची शवचिकित्सा करण्यात आली असून दोघांचेही मृत्यू गळा दाबल्याने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या दोघीही वृद्ध महिलांचे कपडे बाखियाच्या भाटात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मिळाले आहेत, तर ज्याठिकाणी ही पिशवी सापडली आहे, त्याच्या थोड्या अंतरावर काही जागा साफ केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे याच ठिकाणी त्या दोघांचा गळा दाबण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी मिळालेल्या मंजूळा हिच्या अंगावरील कपडे त्या पिशवीत सापडले आहेत, तर मंजूळाच्या अंगावर ब्लाऊज सोडल्यास अन्य कोणतेही कपडे नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बाखियाच्या भाटात या दोन्ही महिलांच्या खून करून त्यानंतर त्यांचे मृतदेह बाजूच्या मांडवी नदीत टाकण्यात आले आहेत.
कुप्रसिद्ध स्मग्लर बाखिया याच्या मृत्यूनंतर हे भाट बेवारस झाले असून सध्या या मालमत्तेचा अधिकार तिसवाडी मामलेदारांकडे आहे. या बेवारस भाटात अनेक माड असल्याने त्याचे पडलेले नारळ जमा करण्यासाठी शेजारीशेजारी राहणाऱ्या या दोन्ही महिला बरोबर जात होत्या. या बेवारस भाटावर एका राजकीय व्यक्तीचाही डोळा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर भाट ताब्यात घेण्याचाही प्रयत्न यापूर्वी झाला आहे.
एकावेळी या ठिकाणी किमान तीसच्या आसपास नारळ या महिलांना मिळत होते. या दुहेरी खुनामागील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचा दावा जुने गोवे पोलिसांनी केला आहे. आज दिवसभरात उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपविभागीय उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, डिचोली उपविभागीय उपअधीक्षक बोसुयट सिल्वा व पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. याविषयाची अधिक तपास जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे करीत आहे.

विमान अपघातात रशियात ८८ ठार

मॉस्को, दि.१४ - रशियातील पेर्म या शहराजवळ स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात ८८ जण ठार झाले.
बोईंग-७३७ एअरक्राफ्टला हवेत आग लागली आणि काही वेळातच विमान पेर्म विमानतळाजवळ कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मॉस्को येथून उड्डाण भरणाऱ्या या विमानातील सात मुले आणि २१ विदेशी नागरिकांसह ८८ जण ठार झाले. अपघातात ठार झालेल्या २१ विदेशी नागरिकांपैकी ९ अजरबैजानचे असून पाच नागरिक युक्रेनचे आहेत. फान्स, जर्मनी, इटली आदींसह अमेरिकेतील प्रत्येकी एका नागरिकाचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघाताच चौकशी रशियन अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

बॉंबस्फोटांनी दिल्ली हादरली

लागोपाठ पाच धमाके २५ ठार, १०० जखमी; दोघांना अटक; सिमीने जबाबदारी घेतली
नवी दिल्ली, दि. १३ : अनंत चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच देशाची राजधानी नवी दिल्ली हादरली. येथील दाट वस्तीच्या गफार मार्केट, कॅनॉट प्लेस, बाराखंबा रेाड,सेंट्रल पार्क, गे्रटर कैलाश या पाच ठिकाणी संध्याकाळी ६.१० ते ६.३३ दरम्यान वेळेत तीव्र स्वरूपाचे बॉम्बस्फोट होऊन त्यात किमान २५ जण ठार झाले; तर शंभराहून अधिक जण जखमी झाले. "इंडियन मुजाहिद्दीन' म्हणजेच "सिमी' या दहशतवादी संघटनेने हे स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच देशातील सर्वच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना अतिदक्षतेचा आदेश केंद्राकडून देण्यात आला आहे. राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील व लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी या स्फोटांचा तीव्र निषेध केला आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथील बॉंबस्फोटांसारखीच पद्धत या स्फोटांसाठीही अवलंबण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्फोटांसंदर्भातील इमेल चेंबूर मुंबईहून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अहमदाबाद येथील स्फोटांसाठीचा इमेलदेखील मुंबईहूनच पाठवण्यात आला होता. जखमींवर येथील राममनोहर लोहिया व सुचेता कृपलानी इस्पितळांत उपचार सुरू असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केवळ २२ मिनिटांत हे धमाके घडवून आणण्यात आले. आतापर्यंत १८ जणांच्या मृत्यूची खातरजमा करण्यात आली आहे.
एकूण नऊ स्फोट होणार होते. मात्र त्यातील चार जिवंत बॉंब सेंट्रल पार्क व कॅनॉट प्लेस भागात सापडले व ते लष्कराच्या खास यंत्राद्वारे तातडीने निकामी करण्यात आले. इमेलद्वारे यावर प्रकाश पडला. एक बॉंब रिगल सिनेमा या ठिकाणी निकामी करण्यात आला. बॉंब पेरणारे लोक काळ्या कपड्यांत आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे बॉंब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. आता मुंबईच्या लोकांनी बॉंबस्फोटांसाठी सज्ज राहावे, असे इमेलद्वारे सूचित करण्यात आले आहे. स्फोट होताच लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटले. जेथे स्फोट झाले तेथील चित्र विदारक दिसत होते. तेथे रक्त व मानवी अवयवांचा खच पडला होता. ते पाहून अंगावरून सरसरून काटा येत होता. रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री पाटील यांनी दोन्ही इस्पितळांना भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
शनिवारी सरकारी कार्यालयांना सुटी होती. तथापि, स्फोट झालेली ठिकाणे विविध वस्तुंच्या व्यापारपेठा असल्यामुळे सामान्य माणसाला घाबरविण्याचा आणि त्याचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा हेतू स्फोटामागे असू शकतो. पोलिसांचा संशय प्राथमिक पाहणीवरून सिमी या इस्लामी आतंकवादी संघटनेकडे झुकत असून इंडियन मुजाहिद्दीन या सिमीच्याच दुसऱ्या नावाने काम करणाऱ्या नव्या संघटनेने स्फोटाची जबाबदारी घेतली आहे.
हे स्फोट करण्यासाठी दहशतवाद्यांनी सायकल, कचराकुंडी, चार चाकी वाहने यांचा साधन म्हणून उपयोग केला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सायंकाळी बोलाविलेल्या मंत्र्यांच्या गुप्त बैठकीत गृहमंत्रालयाने त्यांना प्राथमिक अहवाल सादर केल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये जे बॉॅम्बस्फोट झाले त्याचा मुख्यमंत्री नरेद्र मोदींच्या नेतृत्वाखालील तेथील राज्य सरकारने अगदी खोलवर जाऊन अल्पावधीत हे बॉम्बस्फोट करणाऱ्या सिमी या संघटनेची पाळेमुळे खणून काढली. तिच्या म्होरक्यांना देशाच्या वेगवेगळया भागातून हुडकून काढून त्यांच्याकडून भारताच्या विनाशाच्या त्यांच्या संकल्पित योजनांची माहिती घेतली. गुजरात पोलिसांच्या या कार्यक्षमतेवर संतप्त सूडाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी दहशतवाद्यांनी दिल्लीतच बॉम्बस्फोट केले आणि आम्ही थकलेलो नाही, घाबरलेलो नाही तर पुन्हा मैदानात उतरलो आहोत हे दाखविले असा अर्थ जाणकार लावत आहेत.
दिल्लीमध्ये मुंबईइतक्या मोठया प्रमाणावर नव्हे पण लक्षणीय स्वरूपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. पाच हजार गणेशमूर्तीची एकत्रित मिरवणूक उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी चांदणी चौकातून यमुना नदीकडे जात असते. प्राप्त परिस्थितीत हा मिरवणुकीचा मार्ग कदाचित बदलला जाईल अशी अटकळ व्यक्त करण्यात येत आहे.
दहशतवाद्यांनी दिल्ली आमच्या हिट लिस्टवर आहे हे घोषित केलेले आहे. गणेशोत्सव आणि रमजान हे उत्सव देशभर मोठया उत्साहात आणि झुंडीने साजरे होत असताना राजधानीतच स्फोट करण्याचे धाडस दाखवून दहशतवाद्यांनी भारताच्या राजकीय इच्छा शक्तीला नमविण्याचा प्रयत्न चिकाटीने करीत आहेत असा या स्फोटाचा अर्थ जाणकार लावीत आहेत.
-----------------------------------------------------
मोदींनी पूर्वकल्पना दिली होती
विशेष म्हणजे दिल्लीत नजीकच्या काळात अशा स्वरूपाचे स्फोट होऊ शकतात, याची पूर्वकल्पना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांना दिली होती. अहमदाबादेतील स्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जबानीतून ही बाब उघड झाली होती.
मृत व जखमींना भरपाई
मृतांच्या नातेवाइकांना सरकारने पाच लाख तर जखमींच्या नातेवाइकांना पन्नास हजार रुपये भरपाईदाखल देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
केवळ अर्ध्या तासांत...
या मालिकेतील पहिला स्फोट गफार मार्केटमध्ये संध्याकाळी ६.१० वाजता, दुसरा सेंट्रल पार्क कॅनॉट प्लेस येथे ६.३० वाजता, तिसरा बाराखंबा येथे ६.३३ वाजता आणि एमब्लॉक मार्केट ग्रेटर कैलाश येथे ६.२९ व ६.३३ येथे लागोपाठ दोन स्फोट झाले. यातील सर्वाधिक हानी झाली ती गफार मार्केट येथे. टायमरचा वापर या स्फोटांसाठी करण्यात आला. एका बारा वर्षांच्या मुलाकडून याकामी महत्त्वाची माहिती मिळवण्यात येत आहे.

१०० कोटींच्या खाण कर वसुलीसाठी वाहतूक खात्याचीही धडक मोहीम

रॉयल्टी देत असलेल्या वाहतुकदारांसाठी
लोह,मॅंगेनिज व बॉक्साईट खनिज- प्रतिटन २० रूपये
रॉयल्टी देत नसलेल्या वाहतुकीसाठी
लोह मॅंगेनिज व बॉक्साईट खनिज - प्रतिटन ५० रूपये
कोळसा, कोक व रेतीसाठी - प्रतिमीटर १० रुपये

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून खाण उद्योजकांना मोकळे रान सोडल्याचा विरोधकांकडून होणारा आरोप खरा ठरण्याची अनेक प्रकरणे सध्या उघडकीस येत आहेत. "गोवा ग्रामीण विकास व कल्याण कायदा २०००' या अंतर्गत सर्व खनिज तथा कोळसा,कोक व रेती वाहतूकदारांवर लादलेला अतिरिक्त कर वसूल करण्यात वाहतूक खात्याला पूर्ण अपयश आले आहे व उपरोल्लेखित व्यवसायिकांवर मेहेरनजर करण्याच्या उद्देशानेच या गोष्टीकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करण्यात आल्याचे सध्या मानले जात आहे. विशेष म्हणजे अलिकडेच वाहतूक खात्याचा ताबा घेतलेले वाहतुकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी यासंदर्भात पुढाकार घेण्याचे ठरवून या करापोटी व मागील थकबाकी धरून चालू आर्थिक वर्षी किमान शंभर कोटींचा महसूल वसूल करणार असल्याचा निर्धार केला आहे.
वाहतूक खात्याने अलीकडेच केलेल्या एका आदेशाद्वारे राज्यातील सर्व खनिज तसेच कोळसा,कोक व रेती वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना आपली सर्व वाहने व या वाहनांद्वारे वाहून नेणाऱ्या मालाचे प्रमाण अशा गोष्टींची खात्याकडे नोंद करण्याची सक्ती केली आहे. या नोंदणीसाठी १९ सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आल्याने वाहतुकदारांत खळबळ उडाली आहे. वाहतूक संचालक पी. एस.रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकारने "गोवा ग्रामीण विकास व कल्याण निधी कायदा २०००' संमत केला आहे. खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांची तसेच परिसराची होणारी नासधूस लक्षात घेऊन हा अतिरिक्त कर वसूल करून या महसूलाचा वापर परिसराची दुरुस्ती व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाईल असे तेव्हा ठरले होते. राज्य सरकारने हा कायदा अंमलात आणला खरा; परंतु खाण उद्योजकांचा रोष पत्करायचे धाडस कुणी न दाखवल्याने ही वसुली केवळ नाममात्र मिळत राहिली. गेल्या दोन वर्षांत केवळ आठ ते साडे आठ कोटी रुपयेच त्यातून जमा होऊ शकले. प्रत्यक्षात या सेसमधून सरकारी तिजोरीत वर्षाकाठी किमान ३५ ते ४० कोटी रुपये जमा होणे आवश्यक होते. विद्यमान वाहतूकमंत्र्यांनी मात्र हा विषय गांभीर्याने घेतला आहे. मागील दोन वर्षांच्या थकबाकीसह संपूर्ण वसूली करून सुमारे शंभर कोटी रुपये या कराच्या रूपात जमा करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
दरम्यान, विद्यमान सरकारचे खाण उद्योजकांबाबत असलेले मवाळ धोरण पाहता ढवळीकर यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो याबाबत अनेकजण साशंक आहेत.सद्यस्थितीत खनिज किंवा इतर कोळसा,कोक, रेती आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेमकी संख्या किती, याचा हिशेब वाहतूक खात्याकडे नाही. मुळात बहुतेक खाण कंपन्यांकडून खनिज वाहतुकीचे काम कंत्राटदाराकडे सोपवण्यात येते. त्यामुळे या कराबाबत त्यांच्याकडूनही जबाबदारी स्वीकारली जात नसल्याची माहिती मिळाली आहे. खनिज मालाची क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे तसेच बनावट परवाने वापरून वाहने चालवणे आदी प्रकारही सर्रास सुरू असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. मुळात वाहनांद्वारे नेल्या जाणाऱ्या खनिजावर हा सेस लादण्यात आल्याने कोणत्या खाणीवरून किती खनिजाची वाहतूक करण्यात येते याचा आकडाच वाहतूक खात्याकडे नोंद होणार आहे. अनेक वाहतूकदार घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा अतिरिक्त खनिजाची चोरट्या पद्धतीने वाहतूक करीत असल्याने त्यांच्यासमोर या अटीमुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. वाहतूक खात्याने सध्या हा कायदा काही प्रमाणात शिथिल ठेवला आहे. खनिज वाहतूक दारांनी प्रत्येक फेरीदरम्यान तपासनाक्यावर हा कर भरण्याची सोय केली आहे. या अटीमुळे प्रत्येक फेरीवेळी तपासनाक्यावर थांबावे लागणार असल्याने त्याचा फटका ट्रक वाहतूकदारांना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या बदल्या
दरम्यान,वाहतूक खात्याला येणारा महसूल हा मुख्यत्वे तपास नाक्यावरून वसूल करण्यात येतो. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास ही वसुली कुठेतरी स्थिर किंवा कमी होत असल्याचे आढळले आहे. अनेक तपासनाक्यावरील अधिकारी ते दोन दोन वर्षे एकाच जागी असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे आता दर तीन महिन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्याचा विचार सरकार दरबारी सुरू आहे. तपास नाक्यांवर योग्य पद्धतीने वसुली होते की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांचे भरारी पथकही स्थापन केले जाईल. राज्यातील विविध खाणींवर भेट देऊन तेथील बिगरगोमंतकीय चालकांचे परवाने तपासण्याची मोहीम लवकरच उघडली जाईल. मुख्यत्वे झारखंड आदी राज्यांतील चालक या वाहनांवर काम करीत असून त्यांच्याकडील चालक परवाने तथा या लोकांची इतर माहिती गोळा केली जाईल,असे त्यांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचाराचा विषय हाताळताना न्यायालयांनी सक्रिय व्हावे : न्या. रंजना देसाई

पणजी, दि.१३ (विशेष प्रतिनिधी): महिलांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी, राज्यातील न्यायालयीन अधिकाऱ्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यावर त्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी अधिक दक्ष व संवेदनशील बनण्याची गरज व्यक्त केली.
येथील हॉटेल फिदाल्गो मध्ये आयोजित एक दिवसीय " घरगुती हिंसा महिला संरक्षण कायदा २००५ ' या विषयावरील परिसंवादातील बीजभाषणात त्यांनी, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देण्यासाठी न्यायालयीन अधिकाऱ्यांनी वरील कायद्याचा व भारतीय संविधानाचा पूर्णपणे वापर करावा असा सल्ला दिला.
"" महिलावरील हिंसेचे गुन्हे हाताळताना न्यायालयाने सामंजस्य, वास्तव, व यथार्थपणाचा दृष्टिकोन समोर ठेवून तांत्रिकता, दुराग्रही वृत्ती, व पारंपरिकतेचा दृष्टिकोन बाजूला ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना, न्यायालयीन अधिकाऱ्यांनी आग्रही व काटेकोर बनण्याची गरज नाही. मात्र हे करताना आपली कृती बेकायदा ठरणार नाही, पुरुषांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी या परिसंवादाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गोवेकरांना दिला.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात न्या. देसाई यांनी महिलांवरील अत्याचार हा जागतिक विषय असला तरी तो मानवी हक्काचाही विषय असल्याचे सांगितले. "घरगुती हिंसाचार महिला संरक्षण कायदा २००५ ' हा महत्वाचा कायदा असून तो केवळ विवाहित महिलांपुरता मर्यादीत नसून, पुरुषाबरोबर विवाहितेसारख्या राहणाऱ्या महिलांनाही तो लागू होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांवरील गुन्ह्यांचे मुख्य सूत्रधार पुरुष असतात यावर जोर देताना, आपल्यासमोर येणाऱ्या दहापैकी निदान आठ खटले तरी महिलांवरील अत्याचाराचे असतात, असे त्यांनी नमूद केले. महिलांना सुरक्षेची जरूरी असून,या कायद्यानुसार ती प्रत्यक्षात येते, असे त्या म्हणाल्या. आपले वैयक्तिक मत व्यक्त करताना, महिलांकडून पुरुषांवर क्वचितच अत्याचार होतात, मात्र ९८ टक्के घटना या याच्या विरुध्द असतात. पुरूष महिलांचे बळी ठरल्याच्या घटना होऊ शकतात. मात्र या क्षुल्लक घटनांसाठी संसदेत नव्या कायद्याची गरज असल्याचे आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
महिलांचे हित राखण्याची ही योग्य वेळ आहे. कारण त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. आता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील सर्व स्तरावर माध्यमे व बिगर सरकारी संस्था यांच्यामार्फत महिलांत या कायद्याबाबत जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून महिलाच महिलेची चांगला मैत्रीण बनू शकते असे त्या म्हणाल्या.
"" महिलेला रस्त्यावर फेकली तर ती लढा देऊ शकत नाही. या कायद्या प्रमाणे तिला स्वतःच्या पतीच्या घरात किंवा आसरा घेतलेल्या घरात राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तिच्या विरुध्द झालेल्या अन्यायाविरुध्द लढण्यासाठी तिला या कायद्याचे पूर्ण संरक्षण असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
न्या. देसाई यांनी पोलिस व न्यायालये यांनी महिलांबाबत गुन्ह्यांवर प्रशिक्षित व संवेदनशील बनण्याचे आवाहन केले."" या कायद्याचा हेतू न्यायालयाच्या लक्षात आला पाहिजे, त्यासाठी गतीची आवश्यकता आहे. आपण सजग बनलो नाही तर कायद्याचा मुख्य हेतूच नष्ट होईल असे त्या म्हणाल्या.
गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात, दुर्गा मानण्यात येणाऱ्या महिलेला कवडीमोल ठरविण्यात येते ही खेदजनक बाब असून तिची पुरुष व खुद्द महिलांकडूनही शारिरीक, मानसिक, भावनिक, आर्थिक व शाब्दिक अवहेलनेतून मुक्तता होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सुशिक्षित पुरूष व महिलांकडून बालिकांची होणारी भृणहत्या हा सुध्दा हिंसेचाच प्रकार आहे.भारतातील पुरुष स्त्रियांची सरासरी ही जागतिक प्रमाणात एकदम कमी असून बालिकांची गर्भाशयातच हत्त्या ही सुशिक्षितामध्येच जास्त असते असे न्या. ब्रिटो पुढे म्हणाले.
"दर २१व्या मिनिटाला एका निरपराधी महिलेला अटक करण्यात येते व आज १.२१ लाख महिलांना चुकीच्या पध्दतीने वेगवेगळ्या गुन्ह्यात गुंतवण्यात आले आहे, अशी माहिती देऊन, या कायद्याची गंभीरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना केली.
शाळेत विद्यार्थ्यांना "जॅक अँड जिल' शिकविण्यापेक्षा पालक, समाज,परिसर, यांच्याप्रती नीतिमत्तेचे धडे द्यावे जेणेकरुन त्या पाल्यांमध्ये आपल्या मातेप्रती व पर्यायाने महिलांप्रती बघण्याचा योग्य दृष्टिकोन निर्माण होईल असे ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी या कायद्याचा मुख्य हेतू महिलांना सन्मानाने जगू देण्याचा आहे असे सांगितले. न्यायालयात जाणे हा क्लेशकारक अनुभव असून मुद्दाम कोणी न्यायालयाची पायरी चढण्याचे धाडस करीत नाही. ज्यावेळी एखादी महिला न्यायालयात येते त्यावेळी तिने आपल्या आशा सोडलेली असते. आपल्या घराची लक्ष्मण रेषा ओलांडून ती न्यायालयात पाऊल ठेवते म्हणूनच तिच्यावरील अन्यायाविरुध्द प्रत्येकाने तिला संरक्षण दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. जयसिंग यांची हल्लीच महिलांवरील होणारे अत्याचार व त्यावरील उपाय यासंबंधीच्या १८२ देशांच्या आंतरराष्ट्रीय समितीवर भारताच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्यानी महिलांच्या संरक्षणासाठी १९६१ पासूनअनेक कायदेशीर दुरुस्त्या करण्यात आल्याचे सांगून हा कायदा म्हणजे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सांगितले. न्यायालयाने महिला जिवंत असताना की मृत झाल्यानंतर कारवाई करायची असा प्रश्न त्यांनी उपस्थितांसमोर उभा केला. या कायद्याअंतर्गत पुरुषांकडून महिलेवर होणाऱ्या अत्याचारावर कठोर कारवाईची तरतूद असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांनी स्वागत केले. गोवा राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एन. नंदापुरकर यांनी आभार मानले. शैला डिसोझा यांनी सूत्रसंचालन केले.

बाबूशविरोधात आणखी एक तक्रार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी निवडणूक लढवताना शैक्षणिक पात्रतेसंदर्भात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची तक्रार "ऊठ गोंयकारा'चे प्रवक्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी उपजिल्हाधिकारी तसेच तेव्हाचे निवडणूक अधिकारी साबाजी शेटये यांच्याकडे केली आहे.
मोन्सेरात यांनी ताळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांत शैक्षणिक पात्रतेबाबत दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा ऍड.रॉड्रिगीस यांनी केला आहे. या प्रतिज्ञापत्रात बाबूश यांनी वांद्रे मुंबई येथील सेंट तेरेझा विद्यालयात शालान्त परीक्षा दिल्याचे म्हटले आहे; परंतु कोणत्या वर्षी याची नोंद नाही. दरम्यान,सेंट तेरेझा विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार बाबूश यांनी १९ जून १९७५ रोजी या विद्यालयात सहावीत प्रवेश घेतला होता. त्यांनी ७ सप्टेंबर १९७८ या दिवशी आठवीत असताना मध्येच शाळा सोडली,अशी माहिती देण्यात आली आहे. बाबूश यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेली माहिती यावरून निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे ऍड.रॉड्रिगीस म्हणाले. दरम्यान,२ जून २००४ या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य तथा संघराज्यांना काढलेल्या एका आदेशात एखाद्या उमेदवाराकडून खोटी माहिती दिल्याची तक्रार नोंद झाल्यास व या तक्रारीबाबत आवश्यक पुरावे सादर झाल्यास त्या उमेदवाराविरोधात कारवाई करण्याचे अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कायद्याच्या आधारे निवडणूक अधिकाऱ्यांनी बाबुश यांच्यावर त्वरित कारवाई करावी,अशी मागणी यावेळी ऍड.रॉड्रिगीस यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी ऍड. रॉड्रिगीस यांनी याप्रकरणी पणजी पोलिस स्थानकातही तक्रार केली आहे.

आम. दिलीप परुळेकरांना अपात्र ठरवण्याची मागणी

पणजी, दि.१३(प्रतिनिधी): बाबूश मोन्सेरात यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वादंग सुरू असताना आता माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांनी साळगावचे भाजप आमदार दिलीप परूळेकर यांनीही निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत साळगाव मतदारसंघातून पहिल्यांदाच पराभूत झालेले डॉ. विली यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार दिलीप परूळेकर यांचा आता पिच्छा पुरवण्यास सुरुवात केली आहे. आमदार परूळेकर यांनी निवडणूक आयोगाकडे आपली माहिती देताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ. विली यांनी केला आहे. स्थावर मालमत्तेची माहिती देताना त्यांनी आपल्या मालकीच्या कोणत्याही आस्थापनाची माहिती दिलेली नाही; परंतु करांची माहिती देताना व्यावसायिक कर भरत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परूळेकर यांचे दुकान भक्ष्यस्थानी पडले होते. या दुर्घटनेबाबत अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने केलेल्या पंचनाम्यानुसार हे दुकान त्यांच्या मालकीचे आहे,असे म्हटले आहे. या दुकानाचा विमाही त्यांनी आपल्या नावावर उतरवला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आमदार या नात्याने अग्निशमन दल संचालनालयाला पत्र पाठवून आपल्या दुकानाच्या पंचनाम्याबाबत लेखी व्यवहारही केला आहे,असे डॉ.विली यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकारांत या दुकानाची कोणतीही माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सादर केली नाही,असा दावा त्यांनी केला.
दिलीप परूळेकर यांनी निवडणूक अर्ज भरताना शैक्षणिक पात्रतेबाबत प्रतिज्ञापत्र सादरच केले नाही,अशी टीका डॉ.विली यांनी केली. साळगाव मतदारसंघाचे एक मतदार ज्योकीम अग्नेलो डायस यांनी माहिती हक्क कायद्याव्दारे त्यांच्या निवडणूक अर्जाची संपूर्ण माहिती मागितली असता या माहितीतून शैक्षणिक पात्रतेचे प्रतिज्ञापत्रच गायब असल्याचे डॉ. विली म्हणाले. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे शैक्षणिक प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे उघड होते व जर का त्यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला अर्धवट माहिती देण्यात आल्याचे सिद्ध होईल असेही डॉ. विली यांनी म्हटले आहे. याप्रकरणी राज्य माहिती आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी ज्योकीम डायस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याबाबत चौकशीचा आदेश गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. याप्रकरणी पुढे काय झाले याबाबत मात्र काहीच माहीत नसल्याचे डॉ. विली म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने आदेश देऊनही राज्य प्रशासन काहीही कृती करीत नसल्याने त्यांनी प्रशासकीय कारभारावरही टीका केली. जर येत्या काही दिवसांत याप्रकरणी कारवाई झाली नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा डॉ. विली यांनी दिला.
--------------------------------------------------------
ही वृद्धत्वाची लक्षणेः दिलीप परूळेकर
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षे राजकारणात असलेले व खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री बनलेल्या डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांना साळगाववासीयांनी पराभूत केल्याने त्यांचा उतारवयात तोल ढळला आहे,असा टोमणा साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांनी हाणला. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप व आपल्या अपात्रतेची केलेली मागणी ही त्यांच्या वृद्धत्वाची स्पष्ट चिन्हे असल्याचा शेराही त्यांनी मारला.
डॉ. विली नमूद करीत असलेले दुकान आपण चालवतो ही गोष्ट खरी असली तरी ती जागा आपल्या मालकीची नाही. सेरूला कोमुनिदादच्या मालकीची ही जागा करारपद्धतीने आपण घेतली असून तिथे आपण व्यवसाय करतो. या दुकानाचा व्यवसायिक कर आपण भरतो. तसेच तेथील सामान हे आपल्या मालकीचे असल्याने त्याचा विमाही आपल्या नावावर असणे स्वाभाविक आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करावयाच्या अर्जात स्थावर मालमत्तेची मालकी याबाबत माहिती मागितली होती. या दुकानाची मालकी आपली नसल्याने तिथे आपले नाव असण्याची गरजच काय,असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबतचे प्रतिज्ञापत्र आपण सादर केल्याचा दावा करून ते सादर केले नाही,असा आरोप करणारे डॉ. विली यांना अजूनही आमदारकीची स्वप्ने पडत असावीत,अशी खिल्लीही त्यांनी उडवली. आजपर्यंत आपल्या इशाऱ्यावर राजकीय सूत्रे हलवण्याची सवय जडलेल्या डॉ. विली यांच्या हातातील ही सूत्रेच नाहीशी झाल्याने घोड्याविना रथात बसलेल्या सारथ्यासारखी त्यांची अवस्था बनली आहे, असेही श्री. परुळेकर म्हणाले.