पणजी, दि. ९ (सांस्कृतिक प्रतिनिधी): मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन ही संस्था १००व्या वर्षात पदार्पण करत असून त्या निमित्ताने दि. २३, २४ व २५ एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष अशोक कारे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत शताब्दी समारंभ समितीचे अध्यक्ष सुरेश कारे, कार्यकारी अध्यक्ष दत्ता नाईक आणि संस्थेचे खजिनदार राजेश के. नाईक उपस्थित होते.
संस्थेचा वर्धापनदिन ४ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साजरा झाला. परंतु, संस्थेच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्याने येत्या २३ पासून शताब्दी समारंभ साजरा करण्यात येणार आहे. १९१२ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच काशिनाथ नाईक, केशव नाईक, अच्युत नाईक व इतर काही मोजक्या युवकांनी सारस्वत ब्राह्मण समाज या संस्थेची स्थापना करून वाचनालयाची सुरुवात केली होती. कालांतराने या संस्थेची भरभराट होत गेली आणि ती केवळ एका विशिष्ट समाजाची न राहता समस्त गोमंतकीयांची झाली म्हणून या संस्थेचे गोमंत विद्या निकेतन असे नामकरण करण्यात आले, अशी माहिती श्री. कारे यांनी यावेळी दिली. आज ही संस्था १०० व्या वर्षात पदार्पण करत असून याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. कारण एखादी संस्था स्थापन करणे हे सोपे असते; परंतु ती १०० वर्षे टिकवणे हे मोठे आव्हान असते. गोव्यात अशा अनेक संस्था स्थापन झाल्या. परंतु, त्या काळाच्या ओघात नाहीशा झाल्या. काही मोजक्याच संस्था ज्या टिकून राहिल्या त्यातीलच एक म्हणजे गोमंत विद्या निकेतन असेही ते म्हणाले.
समाजप्रबोधन, समाज संघटन व सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून स्थापन केलेल्या या संस्थेचे आज सुसज्ज असे वाचनालय आहे. त्यात सुमारे ४ हजारांहून अधिक पुस्तके असून काही दुर्मीळ पुस्तकांचाही त्यात समावेश आहे. आजही दर दिवशी सुमारे ५०० वाचक या वाचनालयात येतात. शिवाय बाल विभाग वेगळा असून लहान वाचकांना याचा मोठा फायदा होतो आहे. केवळ वाचनालयच नव्हे तर समाजसुधारकांना आमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित करणे, गोमंतकीय समाजातील सर्वप्रकारचे भेद दूर करून तो एकसंध बनविण्यासाठी प्रयत्न करणे यांसारखे उपक्रम संस्था राबवत आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे आणि वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने साहित्यसम्राट न. चिं. केळकर, डॉ. चिंतामणराव देशमुख, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्यायमूर्ती बी. लॅटीन यांच्यापासून डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, सत्यदेव दुबे, विनय हर्डीकर यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर येथे येऊन गेले असल्याचे सुरेश कारे यांनी यावेळी सांगितले. गोव्यातील गोमंतक मराठी अकादमी आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळ स्थापन करण्यात या संस्थेचा मोठा सहभाग आहे. मराठी विज्ञान परिषद, गोवा विभाग, सिने मॅजिक, अनाहतनाद, काव्य मैफल, आस्वाद अशा विविध उपक्रमांतून वैज्ञानिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि इतर कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात, असेही संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना सुरेश कारे यांनी सांगितले.
यावेळी दत्ता नाईक यांनी शताब्दी कार्यक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदन निलेकणी उपस्थित राहणार असून डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. नरेंद्र जाधव यांसारखे अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. शताब्दीच्या निमित्ताने ‘शतकातील गोमंतक’ हा गोव्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर सर्व क्षेत्रांचा चिकित्सक व तटस्थपणे आढावा घेणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच ‘२१ व्या शतकातील नैतिकता ः मर्यादा आणि आव्हाने’, ‘गोवा काल आज आणि उद्या’ या विषयांवर नामवंत विचारवंतांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. तसेच वाचनालयातील दुर्मीळ ग्रंथांचे प्रदशर्र्न आणि गोव्यातील मोजक्याच ज्या संस्थानी १०० वर्षे पूर्ण केली आहेत त्या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. शताब्दी समारंभाच्या निमित्ताने वर्षभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.
Sunday, 10 April 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment