Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 28 January 2010

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाने राजकीय कलाटणी?

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : गोव्यात सत्ताधारी कॉंग्रेसमधील असंतुष्टांनी नेतृत्व बदलासाठी पुन्हा खाल्लेल्या उचलीच्या पार्श्र्वभूमीवर येत्या शनिवारी बेताळभाटी येथे आयोजित केले गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाअधिवेशन हे गोव्यातील राजकारणाची दिशा निश्र्चित करणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महसूलमंत्री जुझे फिलीप यांनी कॉंग्रेसवर डागलेली तोफ या अधिवेशनाचा एकंदर रोख कसा असेल ते दर्शवणारी आहे, असेच मानले जात आहे.
या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल,पी. ए. संगमा, तारीक अन्वर ही नेते मंडळी उपस्थित रहाणार असल्याने तसेच महागाई प्रश्र्नावरून दिल्लीत पवारांवर झालेले शरसंधान व त्यानंतरच्या राजकीय घडामोडी याचे बरेच पडसाद या अधिवेशनात उमटतील तसेच पक्षाचे गोव्यातील स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात ठोस निर्णय घेतले जातील,अशी अपेक्षा राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
पवार यांचे कॉंग्रेसशी बिनसले तर त्याचे परिणाम फक्त दिल्लीतील व महाराष्ट्रातील राजकारणावरच नव्हे तर गोव्यातील राजकारणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचेच केवळ नव्हे तर राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळातील दुसरे सदस्य असलेले जुझे फिलीप यांनी कॉंग्रेसवर जाहीरपणे आगपाखड करून त्याचे प्रत्यंतर आणून दिले आहे व कॉंग्रेस प्रत्येकबाबतीत राष्ट्रवादीला गृहीत धरत असल्याचा ठपका ठेवला आहे.
गोव्यात सत्ताधारी गटात सध्या जो असंतोष आहे,त्याला राष्ट्रवादीच्या या अधिवेशनामुळे आणखी खतपाणी मिळेल अशीच एकंदर चिन्हे आज दिसत आहेत. एका पाहणीनुसार संपूर्ण सासष्टीत या अधिवेशनामुळे कॉंग्रेसला गळती लागण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षावर नाराज असलेले पण दुसरा पर्याय नसल्याने कॉंग्रेसची कास धरून असलेले मोठ्या संख्येतील कार्यकर्ते या अधिवेशनाचा लाभ उपटतील,असा अंदाज खुद्द कॉंग्रेसवालेच व्यक्त करताना दिसतात.
त्यामुळेच काही सत्ताधारी नेत्यांनी या अधिवेशनाची धास्ती घेऊन या अधिवेशनाला अपशकून करण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी अधिवेशनाची जागा असलेल्या ठिकाणी जाणारा रस्ता अडविण्याचा तसेच तेथील कामावर जाणाऱ्या कामगारांची वाहने अडवून त्यांना तालाव देण्याचे प्रकारही घडले असे आरोप राष्ट्रवादीतून केले जात आहेत. या अधिवेशनाचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी नंतर या प्रकारांची माहिती शरद पवार यांना दिली.घातपात घडविणाऱ्यांची नावे ३० जानेवारीनंतर आपण उघड करू, असेही त्यांनी सांगितले आहे.
या अधिवेशनाचा मुहुर्त साधून राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षाच्या नावाची घोषणा करताना पक्षाची राज्यातील आगामी वाटचालीची दिशा व पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार यांची घोषणाही ते करतील असे स्थानिक पक्षसूत्रांतून सांगण्यात आले.
दरम्यान, या अधिवेशनाची तयारी सध्या जोरात चालू असून मिकी पाशेको यांनी तो प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. एकंदर तयारीवर ते स्वतः लक्ष देताना दिसत आहेत. हे अधिवेशन संस्मरणीय ठरावे असाच त्यांचा एकंदर कटाक्ष असल्याचे जाणवत आहे.

No comments: