Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 28 January 2010

जुगारातून नव्हे, स्वदानातूनच मंदिर उभे राहील

केरी गावातील स्वाभिमानी ग्रामस्थांचा निर्धार

- आसगांवच्या श्रीराष्ट्रोळी देवस्थानचा जुगाराला विरोध

- वास्कोत मटकावाल्यांवर छापासत्र

- आज मोरजीतील जत्रेतही जुगार नाही ?


पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यातील केरी गावचे जागृत देवस्थान असलेल्या श्री देव आजोबा मंदिराच्या नूतनीकरणाला जुगारापासून मिळणाऱ्या पैशांची गरज नाही. या गावात जर खरोखरच स्वाभिमानी व श्री देव आजोबावर श्रद्धा ठेवणारे लोक असतील तर हे मंदिर येथील नागरिकांच्या व जत्रौत्सवाला भेट देणाऱ्या भाविकांच्या दानातूनच पूर्ण होईल. यंदा जत्रौत्सवाला भेट देणाऱ्या भाविकांनी सढळहस्ते मंदिरकामाला दान करावे व जुगाराच्या पैशांच्या बळावर मंदिरे थाटण्याच्या मानसिकतेला सणसणीत चपराक द्यावी, असे जाहीर आवाहन केरी गावच्या स्वाभिमानी ग्रामस्थांनी केले व जुगारविरोधी चळवळीला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
पेडणे केरी येथील जत्रौत्सव २९ रोजी साजरा होत आहे. तालुक्यातील शेवटची व सर्वांत मोठी जत्रा म्हणून नावलौकिक प्राप्त झालेल्या या जत्रौत्सवात दरवर्षी मोठा जुगार भरतो. यंदा मात्र दै. "गोवादूत' ने जत्रौत्सवातील तथा इतर धार्मिक उत्सवांनिमित्त आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात व्यापक जनजागृती चळवळ उभारल्याने जुगारवाल्यांत चांगलीच धडकी भरली आहे. दरम्यान, या जुगाराचे समर्थन करणारे काही लोक या जुगारापासून मंदिराच्या कामाला मिळणाऱ्या देणगीचे निमित्त पुढे करून जुगारविरोधकांना मिळणारा पाठिंबा वळवण्याचे जोरदार प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, या जत्रौत्सवानिमित्ताने पोलिसांना बाजूला सारून थेट वरिष्ठ राजकीय पातळीवर जुगार आयोजित केला जात होता. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जुगाराविरोधात मोहीमच उघडल्याने काही लोक गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडेही पोहचल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. गृहमंत्री इस्पितळांत दाखल झाल्याने त्यांचा बेत चुकला असला तरी आता पोलिसांशी संगनमत करून जुगार थाटण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एरवी जत्रौत्सवाच्या पंधरादिवसांपूर्वी जुगारासाठी मांडण्यात येणारे पाट आता दोन दिवस बाकी असताना अद्याप मांडण्यात आले नसल्याचीही खबर आहे. पेडणे पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांवरही हा जुगार सुरू करण्यासाठी काही प्रतिष्ठित मंडळींकडून दबाव टाकला जात असल्याची खबर आहे. या ठिकाणी जुगारात एकाच रात्रीला लाखो रुपयांची उलाढाल होत असते, त्यामुळे सगळे जुगारवाले एकत्रितरीत्या या जत्रौत्सवात जुगार थाटण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असल्याचीही खबर मिळाली आहे.
"मांद्रे सिटीझन फोरम' आक्रमक
पेडणे तालुक्यातील जुगारविरोधी चळवळीला आता खऱ्या अर्थाने बळ प्राप्त झाले आहे. भारतीय प्रजासत्ताकाच्या हीरक महोत्सवाचे निमित्त साधून "मांद्रे सिटीझन फोरम' च्या युवा कार्यकर्त्यांनी आता जुगाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला. "फोरम' तर्फे मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी केंद्रीय कायदामंत्री तथा कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांना निवेदन सादर करून या लढ्याला पाठिंबा देण्याची विनंती केली. या दोन्ही नेत्यांनी "फोरम' ला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. हा जुगार पेडणेतून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहून एकत्रितरीत्या लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ऍड. खलप यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून पेडणेतील जुगारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
वास्कोत मटकावाल्यांची धरपकड
आज संध्याकाळी वास्को पोलिसांनी अचानकपणे छापासत्र सुरू करून म्हायमोळे येथील एका घरातून मटका घेणाऱ्या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार चारशे रुपयांची रक्कम जप्त केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनेश बांदोडकर, महेंद्र धुरी, बीडू हसन, धीरज सावंत, अरुण सावंत व अशोक नारायण अशी ह्या सहा संशयितांची नावे आहेत. वास्कोचे उपनिरीक्षक वैभव नाईक, उपनिरीक्षक फिलोमिना कोस्ता तसेच पोलिस शिपाई दामू मयेकर, पुरुषोत्तम नाईक व इतरांनी मिळून हा छापा टाकला. याठिकाणी असलेले मटक्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.
आसगांव येथील श्री राष्ट्रोळी देवस्थानचा जुगाराला विरोध
आसगाव येथील श्री राष्ट्रोळी देवस्थानच्या २६ रोजी साजरा करण्यात आलेल्या जत्रौत्सवात जुगाराला थारा देण्यात आला नाही. सदर देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कडक पवित्रा घेतल्याने या जत्रौत्सवात जुगार पूर्णपणे बंद करण्यात आल्याची खबर मिळाली आहे. देवस्थान समितीच्या भूमिकेबाबत गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments: