फोंडा व मडगावात अतिरिक्त निरीक्षक
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याला फाशीपर्यंत नेण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी हे प्रकरण आता पूर्णपणे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दुसऱ्या निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री रवी नाईक यांनी केली. ते आज आल्तिनो येथील सरकारी निवासात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज उपस्थित होते. त्याचप्रमाणे मडगाव भागात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने त्याही पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यावेळी म्हणाले. एकाच पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना ठरणार आहे.
महानंद याची नार्को चाचणी करावी की नाही, याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमधे चर्चा सुरू असून त्यावर पोलिस महासंचालक निर्णय घेतील. या खुनाची मालिका अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व खुनांचे एकच आरोपपत्र दाखल करावे की वेगवेगळे याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
दिवसेंदिवस महानंदचे प्रकरण वाढत असल्याने त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. सी. एल. पाटील या प्रकरणाच्या तपासात गुंतल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
मोर्चा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी पोलिसांना जादा अधिकार देण्याचा विचार सुरू असून त्याविषयीचे येत्या विधानसभा अधिवेशनात गोवा पोलिस कायदा विधेयक सादर करणार असल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली. याविषयीची येत्या दि. १६ जून रोजी चिकित्सा समितीची बैठक होणार असून त्यात या विधेयकावर चर्चा करून नेमके कोणते अधिकार पोलिसांना द्यावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. नवीन बदल करण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिस कायदा नजरेसमोर ठेवून हे विधेयक बनवले जाणार असल्याचे ते म्हणाले.
कोण, कुठली ही पूजा?
महानंदची पत्नी पूजा नाईक हिच्याविषयी गृहमंत्री रवी नाईक यांना विचारले असता कोण...? कोण ही पूजा...? असा प्रति प्रश्न करून ""हा...ती का, जुने गोव्याला कुठे तरी नोकरीला असते ती...'' तिच्या विषयी मला काहीच माहिती नसल्याचे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. तिच्याबद्दल तुम्हांला पोलिस महासंचालक आणि पोलिस निरीक्षकच अधिक माहिती देऊ शकतील, असे म्हणून श्री. नाईक यांनी तिच्याविषयी अधिक काहीही बोलण्यास नकार दर्शविला. पूजा नाईक ही कॉंग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सतत संपर्कात असल्याची जोरदार चर्चा असल्याचे त्यांना विचारले असता असे कार्यकर्ते अनेक असतात पण, कोण कसा आहे, हे काही कळत नाही ना...आणि ती काही माझ्या मतदारसंघातील नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
पूजा नाईकची वागणूक संशयास्पद असल्याने आणि दीपाली जोतकरच्या आईने आपल्या मुलीच्या खून प्रकरणात पूजा नाईक हिची चौकशी करण्याची मागणी केलेली असताना पोलिस तिची चौकशी का करीत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पूजा नाईक ही वेगवेगळी नावे धारण करुन वावरत होती, अशी माहितीही उघडकीस आली आहे. पूजा नाईक हीच रेश्मा देसाई, पूजा कामत अशा नावाने आपला परिचय करुन देत होती. पूजा अशी बनावट नावे धारण करुन का वावरत होती, असा प्रश्न उपस्थित झाला असून याचीही पोलिसांनी चौकशी करण्याची अत्यंत गरज आहे.
Thursday, 4 June 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment