पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी "सनबर्न' संगीत महोत्सव होणारच हा दावा आयोजकांनी अखेर खरा करून दाखवलाच. सुरक्षेच्या कारणावरून राज्यातील किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केलेल्या राज्य सरकारकडूनच आज नाताळ व नववर्षांच्या निमित्ताने आशियातील सर्वांत मोठा "नाईट म्युझिक' महोत्सव समजल्या जाणाऱ्या "सनबर्न' उत्सवाला परवानगी देण्याचा प्रकार घडला. कांदोळी येथे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाच्या आयोजकांनी आपली राजकीय ताकद वापरून खुद्द गृह खात्यालाच आपला आदेश बासनात गुंडाळण्यास भाग पाडले.
या आयोजनास नकार दिलेला आदेश बदलून परवानगी देण्याचा नवा आदेश जारी करण्यात आल्याने हा सध्या बराच चर्चेचा विषय बनला आहेच परंतु पोलिसांवर दबाव आणून त्यांना तीन वेळा अहवाल सादर करण्यास भाग पाडल्याने पोलिस खाते व वरिष्ठ अधिकारीही बरेच नाराज बनले आहेत. प्राप्त माहितीनुसार म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गुंडू नाईक यांनी २० डिसेंबर रोजी म्हापशाचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी महेश खोर्जुवेकर यांच्याकडे या पार्टीस परवानगी नाकारण्याची शिफारस केली होती. ही पार्टी खुल्या ठिकाणी होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती धोकादायक ठरण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली होती. पोलिसांनी सादर केलेल्या या अहवालानुसार श्री.खोर्जुवेकर यांनी सदर आयोजकांकडून केलेला अर्ज फेटाळला व या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याचे २४ रोजी आयोजकांना सांगण्यात आले. त्यानंतर २५ रोजी पुन्हा एकदा नव्याने पोलिस अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आयोजकांकडून सुरक्षेची हमी देण्यात येत असल्याने त्यांना परवानगी देण्यास हरकत नसावी,असे कळवण्यात आले होते. यावेळी सदर कार्यक्रमाची जागा कुंपणाने वेढून, प्रवेशव्दारावर "मेटल डिटेक्टर', खाजगी सुरक्षा रक्षक तशा सुरक्षेचे सर्व उपाय घेण्याचे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, यावेळी श्री.खोर्जुवेकर हे मात्र आपल्या निर्णयाशी ठाम राहीले.
एवढे करूनही पोलिसांकडून आज नव्याने अहवाल सादर केला. हा कार्यक्रम किनाऱ्यावर होणार नाही व यावेळी सुरक्षेचे सर्व उपाय घेण्यात आले असून त्यांना परवानगी देण्यात यावी,अशी शिफारस करण्यात आली. यावेळी आयोजकांकडून अग्निशमन दल, वीज खाते व जमीन मालकाकडून ना हरकत दाखला आणण्याची सक्ती करण्यात आली. बार्देश तालुक्यातील कांदोळी येथे "सनबर्न' या कंपनीतर्फे महा संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव २७ ते २९ डिसेंबर या काळात होणार आहे. या संगीत रजनीसाठी देशविदेशातील बड्या कलाकारांना आमंत्रित केले जाते. या महोत्सवाची जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करून खास या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात पर्यटक येत असतात. गेल्या काही वर्षांत उत्तर गोव्यातील नाताळ व नववर्षाच्या काळातील सर्वांत मोठे आकर्षण बनलेल्या या पार्ट्या यंदा सुरक्षेच्या कारणांमुळे बंद होणार असल्याने आयोजकांचे धाबे दणाणले आहेत.
आयोजकांनी आपले नियोजित कार्यक्रम होण्यासाठी सरकार दरबारी जोरदार प्रयत्न चालवले होते. कळंगुटचे आमदार आग्नेल फार्नंडिस यांनी यासंबंधी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांशीही वारंवार चर्चा केल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुळातच या पार्ट्यांत मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थाचे व्यवहार होत असल्याचीही चर्चा सुरू होती. यावेळी मात्र आयोजकांनी "अमलीपदार्थ मुक्त' पार्टी होणार असल्याचे घोषित करून यंदाच्या या महोत्सवात शांतता व विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करण्याचे जाहीर केले होते. या महोत्सवात "फुड स्टॉल्स', मनोरंजनात्मक कार्यक्रम,फ्ली मार्केट अशा अनेक गोष्टींचा सहभाग असतो. यासंबंधी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्नील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पार्ट्यांना म्हापशाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कळंगुट पोलिसांच्या शिफारशीवरून परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याकडे आहे. या कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे आपल्याला काहीही माहिती नाही,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
गृहमंत्री काय करताहेतः उपेंद्र गावकर
खुल्या पार्ट्यांवर बंदी घालूनही "सनबर्न' कार्यक्रमाला परवानगी देण्याची कृती धोकादायक आहेच; परंतु गृहखात्याची विश्वासाहर्ता घालवणारी ठरली आहे. कधीकाळी गृहमंत्री म्हणून गाजलेले रवी नाईक आता एवढे नरम व शांत कसे काय,असा सवाल शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी केला. आपल्या निर्णयाशी ठाम राहणे या सरकारला जमतच नसून वारंवार निर्णयात फेरफार करून हसे करून घेण्याची सवयच या सरकारला जडली आहे,अशी टीकाही त्यांनी केली. गृहमंत्र्यांनी राज्याच्या सुरक्षेशी तडजोड करू नये व राजकीय दडपणाला अजिबात बळी पडता कामा नये. या पार्ट्या बंद झाल्याच पाहीजेत,अशी मागणी गावकर यांनी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment