Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 27 December 2008

तेल कंपन्यांना पेट्रोल मिळतय् पाण्यापेक्षाही स्वस्त!

मुंबई, दि. २६ : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. जागतिक मंदीचा परिणाम म्हणून की काय १५० डॉलर्स प्रतिपिंप एवढी विक्रमी वाढ, आता अचानक कमी होऊन आज ती ३६ डॉलर्स प्रतिपिंपपर्यंत कमी झालेली आहे. या कमी झालेल्या किमतीमुळेच भारतातील तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल बिसलरीपेक्षाही म्हणजेच पाण्यापेक्षाही स्वस्त मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांना सध्या पेट्रोल फक्त ११ रुपये लीटर व डिझेल १३ रुपये लीटर इतक्या कमी किमतीत मिळत आहे. यात वाहतूक आणि इतर खर्चांचा समावेश करण्यात आलेला नाही. या किमतींची बिसलरी बॉटल्समध्ये मिळणाऱ्या मिनरल वॉटरसोबत तुलना केली तर भारतीय कंपन्यांना पेट्रोल व डिझेल या वॉटर बॉटलपेक्षाही कमी दरात मिळत आहे. आज भारतीय बाजारपेठांमध्ये एक लीटरच्या मिनरल वॉटर बॉटलची किमत १२ ते १५ रुपये दराने उपलब्ध आहे.
एका पिंपात (बॅरलमध्ये) १९० लीटर कच्चे तेल असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका पिंपाचा भाव ३८ डॉलर आहे. म्हणजेच कच्च्या तेलाची किमत प्रती लीटर अवघी दहा रुपये होते. (ही किमत प्रती डॉलर ५० रुपये या विनिमय दरावर आधारित आहे.) प्रत्येक बॅरलमधील कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणानंतर सरासरी २८-२९ लीटर पेट्रोल व ८५ लीटर डिझेल तयार होते. अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्पातले तंत्रज्ञान आणि कच्च्या तेलाच्या दर्जावर आधारित उत्पादनाची सरासरी अवलंबून असते. जर इतर कोणतेही कर आणि शुल्क नसतील तर इंधनाची किमत प्रती लीटर किती पडेल, ही आकडेवारी काढणे तसे गुंतागुंतीचे आहे. त्याचे कारण केंद्र व राज्य सरकारचे कर आणि लेव्ही तसेच विक्रेत्यांचे कमिशन, वाहतूक खर्चाची लेव्ही या सर्वांची बेरीज करून किमत निर्धारित करण्यात येते. हे सर्व कर आणि लेव्ही पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री किमतीच्या जवळपास ४५-५५ टक्के व्यापतात. म्हणूनच दिल्लीत पेट्रोल ४५ रुपये लीटर भावात उपलब्ध होते. त्यात कर आणि लेव्ही २२ रुपये आणि सरकारी तेल कंपन्यांचा १२ रुपये नफा समाविष्ट असतो. हीच बाब डिझेलचीही आहे. दिल्लीत डिझेल ३२ रुपये लीटरप्रमाणे विकत मिळते. यात कच्च्या तेलाची किमत असते फक्त १३ रुपये लीटर. एक लीटर डिझेलमागे तेल कंपन्यांना तीन रुपयांचा फायदा होतो.
कच्च्या तेलापासून पेट्रोल आणि डिझेलप्रमाणेच केरोसिन, विमानाचे इंधन, गॅस आणि नाफ्थ्याचेही उत्पादन करण्यात येते आणि त्याचा परिणाम अंतिम किमत निश्चितीवर होतो.
ही सारी पार्श्वभूमीवर बघता पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मधल्या काळात कच्च्या तेलाचे भाव वाढले असताना आणि गॅसवर दिली जाणारी सबसिडी लक्षात घेता तेल कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. हे नुकसान भरून काढण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली असल्यामुळेच सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्यात आलेले नाहीत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते निश्चितच कमी होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. तोपर्यंत तेल कंपन्यांनाही आपले नुकसान भरून काढण्याची संधी आणि अवधी उपलब्ध आहे, हे येथे उल्लेखनीय.

No comments: