Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 24 December 2008

राज्यात कडेकोट बंदोबस्त खास बैठकीत सुरक्षेचा सर्वंकष आढावा

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): नाताळ व नववर्षाच्या काळात गोव्यात "फिदायीन'(आत्मघाती) हल्ल्याची भीती असल्याने कोणताही धोका न पत्करण्याचे धोरण राज्य पोलिसांनी अवलंबले आहे. त्यामुळे सावधगिरीसाठी गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लष्कर, नौदल, हवाई दल, किनारा रक्षक दल व मुरगाव पोर्ट ट्रस्टची मदत घेण्यात आली आहे. आज सकाळी सुमारे दोन तास या संघटनांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी चर्चा करून सुरक्षेचा आढावा घेतला. नंतर या चर्चेचा अहवाल राज्यपाल एस.एस. सिद्धू यांना सुपूर्त करण्यात आला.
या बैठकीत गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव जे.पी. सिंग, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तसेच पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली तसेच कोणते निर्णय झाले याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
"फिदायीन हल्ला होण्याची ठोस माहिती नसली तरी तशी शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही "रिस्क' घेणार नाही. कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी सुरक्षा दल सज्ज आहे' असे आज सायंकाळी गोव्याचे स्पेशल सेल प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील सहा सीमा "सील' केल्या असून त्यावर कडक नजर ठेवण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यांवर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गरजेच्या ठिकाणी पुरेशी "बंकर'ही उभारण्यात आले असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
ख्रिसमस व नव्या वर्षाच्या संगीत रजनीबाबत ते म्हणाले, अद्याप समुद्र किनाऱ्यांवर पार्टी करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. कोणाचाही परवानगी मिळवण्यासाठी अर्ज आल्यास पोलिस त्याठिकाणीच पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतील व नंतरच त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. त्यानंतर कोणाला परवानगी द्यायची वा नाकारायची याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत, असे ते म्हणाले. रात्री दहानंतर कर्णकर्कश आवाजात संगीत लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
गोव्यात दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकांच्या सहा कंपन्यातील तीन कंपन्या उत्तर गोव्यात, तर तीन दक्षिण गोव्यात तैनात करण्यात आल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

No comments: