Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 6 February 2008

"सेझ' विरोधी लढ्याचा आदर्श
जनतेच्या भावनांशी व अस्तित्वाशी खेळ करण्याचे धाडस केल्यास व जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास कशा पद्धतीने बंड होऊ शकते हे गोमंतकीय लोकांनी "सेझ" रद्द करण्यास सरकारला भाग पाडून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. अशा पद्धतीने गोव्याचा आदर्श राखून अन्यायाविरुद्ध व आपल्या सभोवताली घडणाऱ्या अमानवी कार्यपद्धतीबद्दल आवाज काढून बंड केल्यास ही परिस्थिती बदलणे अजिबात कठीण नाही, असे उद्गार पी.साईनाथ यांनी काढले.

चितांच्या प्रकाशात मेजवान्या
झोडू नका ः पी. साईनाथ

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः ""रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या सम्राट निरो याच्यापेक्षा सभोवताली माणसांच्या चिता रचून त्यांच्या प्रकाशाने रात्री मेजवानी झोडणारे पाहुणे अधिक क्रूर होते. जीवनात कधीच अशा निरोचे पाहुणे बनू नका'' असा भावनिक सल्ला मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे आज दिला.
कै. दामोदर कोसंबी शताब्दी महोत्सवाच्या "विचार उत्सव" व्याख्यान मालिकेत आज दैनिक "हिंदू'चे ग्रामीण पत्रकार व मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे "वाढती विषमता, मानवतेसमोरील धोका" या विषयावर व्याख्यान झाले.
जागतिकीकरणाच्या तालावर "इंडिया शायनिंग" चा झगमगाट आपल्या डोळ्यांना दीपवून टाकत आहे, तर दुसरीकडे याच झगमगाटामागे देशातील कित्येक लोक अजूनही केवळ जगण्यासाठी काळोखात चाचपडत आहेत. केवळ अन्नासाठी मोताद बनलेले लोक या देशात आहेत याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ते म्हणाले. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मुलीचा लग्न सोहळा जगातील सर्वांत खर्चिक म्हणून वर्णिला जातो व येथे आपल्या मुलींना लग्न करण्याची ऐपत नसल्याने कित्येक शेतकरी पालक फासावर चढून देहत्याग करतात, हे भीषण चित्र अजूनही आपल्या संवेदनांना स्पर्शही कसे करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. रिलायन्सवाले अंबानी दर मिनिटाला ४० कोटी रुपये कमावत आहेत, तर दुसरीकडे देशातील २.४ दशलक्ष लोकांचे उत्पन्न दिवसाकाठी १७ रूपयांपेक्षाही कमी आहे, ही दुरावत जाणारी विषमता केवळ लोकशाहीच्या विद्ध्वंसाचीच नव्हे तर अमानवीपणाची बीजे रोवणारीच ठरेल, असा इशारा श्री. साईनाथ यांनी दिला.
देशात २.१ दशलक्ष बालमृत्यू होतात. सर्वांत श्रीमंत राज्य म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रात १९९५ पासून ३६ हजार शेतकरी केवळ परिस्थितीला शरण जाऊन फासावर लटकवून घेतात, या भयानक चित्राला देशाच्या विकासात अजिबात स्थान मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. राज्याराज्यांतील पाण्यासाठीचे तंटे पाहता यापुढे देशात पाण्याचे खाजगीकरण होणार नाही, असे ठामपणे सांगता येणार नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. गेल्या १५ वर्षांत ज्या प्रमाणात विषमता वाढत चालली आहे ती धोक्याची सूचनाच आहे. भुकेच्या यादीत आपला देश जगात ९४ वा, तर मानव विकासात १२८ क्रमांकावर आहे. शून्यातून पुन्हा उभे राहिलेले देशही आपल्या पुढे आहेत, हे कशाचे चित्र आहे, असा सवाल त्यांनी केला. केवळ रोजगारासाठी शहरी भागांकडे लोटणाऱ्या या लोकांसाठी रोजगारही नसल्याने ते केवळ घरगुती कामगार म्हणून राबत आहेत. जागतिकीकरणाआड भांडवालदारशाहीची सत्ता येण्याची ही चाहूल असल्याचे ते म्हणाले. देशासमोरील या भीषण परिस्थितीचे चित्र दाखवण्याचे सोडून एकीकडे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वृत्तांकन करण्यासाठी केवळ ६ पत्रकार व मुंबई येथे आयोजित लॅक्मे फॅशन शो साठी ५१२ पत्रकारांची झुंबड लोटते ही परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. आपल्या सभोवती अशी परिस्थिती असताना ती पाहून आपले विचारवंत व सुशिक्षित लोक मुकाट्याने याकडे पाहत बसले आहेत हे असंवेदनशीलतेचे व अमानवतेचे लक्षण तर नव्हे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

No comments: