Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 6 June 2010

'त्या' फायलींबद्दल सरकारची विनी कुतिन्हो यांना नोटीस

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): वादग्रस्त सरकारी वकील म्हणून राजीनामा देणे भाग पाडलेल्या श्रीमती विनी कुतिन्हो यांनी आपल्याकडील सरकारी खटल्यांच्या सर्व फायली सरकारला परत न केल्याने अभियोक्ता संचालकांनी त्यांना नोटीस पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. काल ४ जून रोजी ही नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार ७ जूनपासून उच्च न्यायालयाच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे. ३१ मे २०१० रोजी विनी कुतिन्हो यांची उच्च न्यायालयाच्या सरकारी वकील म्हणून सेवा खंडित केल्यानंतर त्यांच्याकडील सर्व खटल्यांच्या फाईल्स सरकारला परत केल्या आहेत की नाही याबाबतचा तपशील समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी माहिती हक्क कायद्याखाली मागितला होता. त्यामुळेच हा नोटिशीचा प्रकार उघडकीस आला. १४ मे २०१० रोजी एका आदेशाद्वारे सर्व खटल्यांच्या फायली सुपूर्द करण्याची सूचना करूनही श्रीमती कुतिन्हो यांनी त्या परत केल्या नाहीत, याची आठवण अभियोक्ता संचालिका श्रीमती शोभा धुमस्कर यांनी सदर नोटिशीत त्यांना करून दिली आहे.
राज्याचे हित पायदळी तुडवून केवळ वैयक्तिक फायद्यासाठी उच्च न्यायालयातील खटल्यांचे श्रीमती विनी कुतिन्हो "फिक्सिंग' तर करीत नव्हत्या ना, याची शहानिशा करण्यासाठी कुतिन्हो यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सर्व खटल्यांच्या फायली कार्यालयाकडे पोहोचल्यानंतर त्यांची सखोल तपासणी करण्याची मागणी ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केली आहे. गेल्या महिन्यात ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांच्याकडे सरकारी वकील विनी कुतिन्हो यांना सेवेतून हुसकावून लावण्याची मागणी केली होती. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून सरकारला श्रीमती कुतिन्हो यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे लागले होते. विनी कुतिन्हो या न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी उत्सुक होत्या, परंतु त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संशय असलेली व अनेक आरोपांची प्रकरणे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी किंवा न्यायिक व्यवस्थेतील कुठल्याही पदासाठी शोभणारी नव्हती, ही गोष्टही ऍड. रॉड्रिगीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहून कळवली होती.

म्हार्दोळ येथे हॉटेलला आग लागून एका कामगाराचा मृत्यू

चौघे होरपळले, एकाची प्रकृती गंभीर
फोंडा, दि.५ (प्रतिनिधी): म्हार्दोळ येथील सातेरी रेस्टॉरंटला शनिवार ५ जूनला पहाटे पावणे तीनच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत होरपळून प्रसन्ना देवराज (वय १८ मुळचा रा. चिकमंगळूर कर्नाटक) या कामगाराचा मृत्यू झाला; तर हॉटेल व्यवस्थापकासह चार जण आगीत होरपळून जखमी झाले. त्यातील हॉटेल व्यवस्थापक सायमन व्हिएगस (४७) यांची प्रकृती चिंताजनक आहे. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे आतमध्ये झोपलेले कामगार बाहेर येऊ शकले नाहीत. आगीमुळे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
हॉटेल व्यवस्थापक सायमन व्हीएगश (४७), कामगार चेतन शंकर (२२ वर्षे), अण्णाप्पा रूद्रप्पा (१८), प्रदीप बसप्पा (२२) अशी जखमीची नावे आहेत. सर्व जखमी चिकमंगळूर कर्नाटक भागातील रहिवासी आहेत. हॉटेल व्यवस्थापक सायमन हा आगीत ६० टक्के होरपळला आहे. पहाटे साखरझोपेत असताना सर्वजण आगीत होरपळले. सायमन हे कामगारांसमवेत हॉटेलमध्ये राहात होते. आगी लागल्याचे समजताच एक कामगार जागा झाला. त्याने इतरांना आगीची माहिती दिली आणि आगीवर पाण्याची फवारणी करण्यासाठी निघून गेला. हॉटेलमध्ये झोपलेल्या इतर कामगारांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. हॉटेलच्या पोटमाळ्यावर आग लागली होती. पोटमाळ्यावर विविध प्रकारचे सामान ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी गॅस सिलिंडरसुद्धा ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट होताच आगीने रौद्ररूप धारण केले. नंतर खाली झोपलेल्या कामगारांवर पोटमाळा कोसळल्याने चारही जण आगीत होरपळले. घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस, फोंडा व कुंडई येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेलमध्ये आगीत होरपळणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना प्रसन्ना नामक कामगाराचा मृत्यू झाला. सांयमडची स्थिती नाजूक आहे. चेतन या कामगाराला प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
भीषण आगीत हॉटेलमधील सर्व साहित्य खाक झाले. शीतपेयांच्या बाटल्या आगीमुळे फुटल्या आहेत. फ्रीज व इतर वस्तू जळाल्या. सिलिंडरचा स्फोट झाल्याने हॉटेलच्या भिंतींना तडे गेले. सातेरी रेस्टॉरंट हे वारखंडे फोंडा येथील यशवंत सूर्या खेडेकर यांच्या मालकीचे असून गेली दोन तीन वर्षे सायमन व्हिएगस याला चालवण्यासाठी भाडेपट्टीवर दिले होते. उत्तर गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस, प्रभारी विभागीय पोलीस अधिकारी देऊ बाणावलीकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. फोंडा येथील अग्निशामक दलाचे अधिकारी श्री. मेंडिस यांना घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक पेडणेकर तपास करीत आहेत.

विकास व सुशासनातूनच सुराज्य शक्य : गडकरी

भाजपच्या राष्ट्रीय सुशासन अधिवेशनाचे उद्घाटन
मुंबई, दि. ५ : विकास व सुशासन हाच भाजपच्या मार्गक्रमणाचा पाया ठरायला हवा. सुशासनाचा आराखडा निश्चित कालमर्यादेत तयार करून त्या दिशेने भाजपची घोडदौड सुरू राहिली तर देशात सुराज्य स्थापन होण्यास अजिबात वेळ लागणार नाही, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
भाजपच्या सुशासन विभागातर्फे आयोजित पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात उद्घाटनपर भाषण करताना त्यांनी हे उद्गार काढले. लोकशाही राज्यपद्धतीशी बांधील राहून ती अधिक मजबूत करण्यासाठी राजकारणाची व्याख्याच पालटून वैयक्तिक व सामूहिकरीत्या एक राष्ट्रीय पक्ष या नात्याने ठामपणे उभे राहावे लागेल. अधिवेशनाच्या दोन दिवसांत जास्तीत जास्त क्षेत्रांचा विचार करून त्यात चांगल्या प्रशासनाचा अंतर्भाव करण्यासाठी काय करता येईल, याचा ऊहापोह इथे होणार असल्याचेही श्री. गडकरी म्हणाले.
जनतेच्या भौतिक, सामाजिक व आध्यात्मिक विकासावरच सुशासनाचा पाया रचला जाऊ शकेल. जनतेला चांगले जीवन जगण्यासाठी तद्रूप परिस्थिती निर्माण करणे, हीच चांगल्या प्रशासनाची गोम आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेप्रती अधिक संवेदनशील बनावे व त्याच वेळी खऱ्या अर्थाने जनतेशी एकरूप होता येईल.सुशासनाची ही संकल्पना भाजपशासित सर्व प्रदेशांमध्ये राबवून त्याव्दारे जनमत तयार करणे हेच पक्षाचे ध्येय राहील. पक्षाच्या सुशासन विभागाचे निमंत्रक मनोहर पर्रीकर यांनी पहिल्यांदाच राबवलेली अशी संकल्पना देशाच्या स्वातंत्र्यापासून एकाही राजकीय पक्षाने राबवलेली नाही, असे म्हणून श्री.गडकरी यांनी पर्रीकर यांची स्तुती केली.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केवळ सुशासन पुरेसे नाही, तर ते लोकाभिमुख हवे आणि त्यात जनता हाच केंद्रबिंदू हवा, असे मत मांडले. ते आजच्या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सुशासनासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे असे सांगून आजकाल सुशासन म्हणजे वाईट राजकारण असे मानले जाते ही खेदाची बाब आहे,असे मोदी म्हणाले. पुढच्या निवडणुकीवर डोळा ठेवून कारभार न करता पुढील पिढीच्या कल्याणाचा प्रथम विचार व्हायला हवा. जनतेचा सहभाग हा सुशासनाचा प्रमुख मुद्दा आहे. पारदर्शकता हा भ्रष्टाचार कमी करण्याचा मार्ग आहे, तर सुशासनाने खुलेपणा येतो. पारदर्शकता हा माहितीचा हक्क आहे, तर खुलेपणा हा सहभागाचा हक्क आहे,असे मोदी यांनी सांगितले. गुजरातचे उदाहरण देताना ते म्हणाले, ई-ग्राम द्वारे १८ हजार गावे एकमेकांशी जोडली गेली आहेत, तर एसएमएसद्वारे संकटकाळात प्रभावीपणे सूचना देता येतात, हे गुजरातने सिद्ध केले आहे. मध्य प्रदेशातील "लाडली लक्ष्मी', छत्तीसगडमधील सार्वजनिक वितरण व्यवस्था, कर्नाटकमधील दस्तऐवजांचे संगणकीकरण. दहावीनंतर मुलांना संगणक, हिमाचलमधील प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, महाराष्ट्रातील मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्ग, ही सुशासनाची काही उदाहरणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुशासन हे केवळ तत्त्वज्ञान नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कामाची गरज आहे. ज्योतीग्राम योजनेखाली साऱ्या गावांना सतत वीजपुरवठा केला जातो. तर कृषी महोत्सव योजनेने गुजरातमध्ये चमत्कार घडविला आहे.
जनतेला मोफत सेवेऐवजी दर्जेदार सेवा देण्याची गरज मोदी यांनी व्यक्त केली. संकटावर तात्पुरती मलमपट्टी करणे हे सुशासन नव्हे, तर भविष्यातील धोका लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिस्तीची जशी गरज आहे, तशीच जनता आणि सरकार यांच्या सहभागाचीही यासाठी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत आयोजित या अधिवेशानाला भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व मंत्री तसेच वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. विविध राज्यांचे सुमारे ६५ मंत्री व राज्यमंत्रीही उपस्थित आहेत. या अधिवेशनाचा समारोप रविवारी संध्याकाळी होणार आहे.

आगोंद वाल येथे विहिर कोसळून दोघेजण गाडले

दोघांना वाचवण्यात यश, एकाची प्रकृती गंभीर
काणकोण, दि. ५ (प्रतिनिधी): आगोंद वाल येथे आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका विहिरीचे बांधकाम सुरू असताना चिरे कोसळून त्याखाली दोघेजण गाडले गेले; तर दोघांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आले. कमलाकर फोंडू वेळीप (४०) व सुकडो वेळीप (५५) अशी गाडले गेलेल्यांची नावे आहेत. ज्यांना वाचवण्यात यश आले त्यांची नावे प्रकाश वड्डो वेळीप (३५) व नारायण पागी (४५) अशी आहेत.
आगोंद वाल येथे दोन दिवसांपूर्वी दुमिंगो फर्नांडिस यांच्या विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. ते जवळपास आठ फूट पूर्ण झाले होते. आज संध्याकाळी "चौक' बसवून फक्त एक चिरा बांधकाम झाले होते. त्यावेळी अचानकपणे एका बाजूने रेतीची जमीन असल्यामुळे हे बांधकाम कोसळले. त्यावेळी आत असलेल्या तिघांनी प्रकाश वेळीप याच्या दिशेने उडी घेतली. दरम्यानच्या काळात चौघेही गाडले गेले. त्यानंतर ताबडतोब याची माहिती काणकोण पोलिस आणि अग्निशामक दल यांना देण्यात आली. त्यांनी सर्वप्रथम प्रकाश वेळीप यांना बाहरे काढले. त्यानंतर रात्री नऊच्या दरम्यान जेसीबी यंत्राच्या मदतीने नारायण पागी याला बाहेर काढण्यात आले. त्यांना ताबडतोब १०८ रुग्णवाहिकेतून इस्पितळात दाखल करण्यात आले. कमलाकर वेळीप व सुकडो वेळीप यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विहिरीचे बांधकाम कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. ही माहिती दुमिंग फर्नांडिस यांची पत्नी रितीन फर्नांडिस यांनी दिली. या घटनेमुळे आगोंद परिसरावर दुःखाचे सावट कोसळले आहे. माजी मंत्री संजय बांदेकर, पंच आग्नेल फर्नांडिस, समाजसेवक गुरू बांदेकर, विनोद देसाई, जॉन फर्नांडिस, रमेश बांदेकर, नितीन देसाई, सूरज गावकर, महेंद्र गावरर यांनी मदकार्यात मोलाचे योगदान दिले. गाडले गेलेल्या दोघांना काढण्याचे काम अंधार पडल्यानंतर दिव्यांच्या उजेडात सुरू होते.
तोपर्यंत ब्रह्मांड आठवले : प्रकाश वेळीप
मी आजच या लोकांबरोबर कामावर आलो होतो. सायंकाळी पाचच्या सुमारास चौक बसविण्याचे काम करून चिरे लावण्यास सुरूवात केली. अचानक एका बाजूने तेव्हा माती कोसळली. त्यावेळी बाजूच्या लोकांनी माझ्या बाजूने आत उडी घेतली. त्यानंतर मी व नारायण पागी कसेबसे वर आलो. तोपर्यंत मला अक्षरशः ब्रह्मांड आठवले, अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रकाश वेळीप याने दिली.
सुकडो वेळीप : कसलेला सुतार
सुकडो वेळीप कसलेला सुतार. अनेकांच्या मदतीला धावून जाणारा. लाकडी कामे व विहिरीचे चौक बसवण्यात तो वाकबगार होता. चार वर्षांपूर्वी त्याची पत्नी येथून पाचशे मीटरवर समुद्रात बुडाली होती. तसेच सुमारे अडीच वर्षांपूर्वी त्याची वयात आलेली मुलगी अल्प आजाराने मरण पावली होती. त्याच्या कुटुंबावर मोठाच आघात नव्याने झाला आहे.

Saturday, 5 June 2010

मिकींची ८ तास कसून चौकशी

आज पुन्हा पाचारण, अटक शक्य
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्युप्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांची आज तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली असून उद्या पुन्हा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी सकाळीच त्यांना गुन्हा अन्वेषण विभागात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. आज सकाळी १०.३० ते रात्री ७.१५ पर्यंत मिकी पाशेको यांची गुन्हा अन्वेषण विभागातर्फे चौकशी करण्यात आली. या दरम्यान, नादियाचे पती विन्स्टन बार्रेटो व नादियाची आई सोनिया तोरादो यांचीही जबानी नोंद करून घेण्यात आली.
तपासात धक्कादायक माहिती हाती येत असून आम्ही योग्य दिशेने तपास करीत असल्याचे यावेळी या प्रकरणाच्या तपास अधिकारी महिला पोलिस निरीक्षक सुनीता सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. "आत्महत्या' आणि "खून' अशा सर्व दिशांनी या प्रकरणाचा तपास करीत असून सर्व संशयितांची चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच, नादिया मृत्यूची तक्रार राज्यातर्फे नोंद करून घेतली असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, सायंकाळी ५ च्या दरम्यान, बार्रेटो यांना गुन्हा अन्वेषण विभागातून पोलिस मुख्यालयात पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी श्री. यादव यांनी त्यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. बार्रेटो हे मिकी याच्या विरोधात तक्रार नोंद करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून त्या तक्रारीवरून मिकी यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिकी यांनी आपल्या वैवाहिक जीवनात कलह माजवला होता, असा आरोप यापूर्वी बार्रेटो यांनी न्यायालयात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात केल्याचे उघड झाले आहे.
तब्बल आठ तास "सीआयडी' अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन ७.१५ वाजता मिकी भांबावलेल्या स्थितीत बाहेर आले. यावेळी सकाळपासून दोनापावला येथील "सीआयडी' कार्यालयासमोर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांना त्यांनी टाळले."मला सध्या काहीही बोलायचे नसून मी पत्रकार परिषद घेऊन काय ते सांगेन', असे सांगून त्याने पत्रकारांपासून सुटका करून घेतली.
यावेळी सर्व पत्रकारांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता "गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा कालच सायंकाळी ताबा घेतला असून तिघांच्याही चौकशीत विविध व नवनवीन माहिती उघडकीस येत आहे', असे सुनीता सावंत यांनी सांगितले. चेन्नई येथील डॉक्टरांनी केलेल्या नादियाच्या शवचिकित्सेचा अहवाल गुन्हा अन्वेषण विभागाला अद्याप मिळालेला नाही. या प्रकरणात प्रत्येकाची भूमिका बारकाईने पाहिली जात आहे. त्यामुळे एकाच वेळी नादियाची आई, पती, भाऊ व तिचा मित्र तथा राज्याचे पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांची जबानी नोंद करून घेण्यात आली. सर्वांच्या चौकशीत वेगवेगळी माहिती बाहेर येत असल्यानेच चौकशीला जास्तवेळ लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-------------------------------------------------------------
मिकींना डच्चू, हळर्णकर मंत्री?
मिकी पाशेको यांची गुन्हा अन्वेषण विभागात चौकशी सुरू असताना मडगाव भागात मिकी यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांना अटकही केली जात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मंत्र्याला अटक करण्यासाठी सभापतीची परवानगी मिळवावी लागत असल्याने, असा कोणताही प्रस्ताव आपल्यापर्यंत आला नसल्याचे सभापती प्रतापसिंह राणे यांनी काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले. तसेच ६ वाजता माझे कार्यालय बंद झाले असून जे काही होईल ते सोमवारीच, असेही ते म्हणाले. मात्र मडगाव शहरात मिकी यांना वगळून त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जात असल्याचेही बोलले जात होते.
---------------------------------------------------------------
छळवणुकीचा पुन्हा आरोप
नादियाची आई सोनिया हिने पोलिस छळ करीत असल्याचा आजही आरोप केला. सकाळपासून आम्हाला येथे बसवून ठेवण्यात आले असून पोलिसांनी मला केवळ तीनच प्रश्न विचारले. जन्म तारीख काय आहे, किती मुले आहेत आणि घरात मोलकरीण आहे का, हे प्रश्न विचारले असल्याचे सोनिया तोरादो हिने सांगितले. दरम्यान, दुपारी तिने पोलिस छळ करीत असल्याची तक्रार महिला आयोगाकडे सादर केली असून त्यावर आयोगाने चौकशी सुरू केली आहे.
--------------------------------------------------------------
रवी-मिकी शीतयुद्ध!
नादियाचा मृत्यू चेन्नई येथे झालेला आहे. त्यामुळे राज्य पोलिसांना या प्रकरणात तपास करण्याचा अधिकार नाही, असा दावा आज मिकी पाशेको यांचे वकील विक्रम वर्मा यांनी केला. याविषयी तपास अधिकारी सुनीता सावंत यांना पत्रकारांनी विचारले असता नादियाचा मृत्यू कुठेही झाला असला तरी तिने विष गोव्यातच घेतले होते व तिच्यावर प्राथमिक उपचार गोव्यातील इस्पितळात झाला होता, असे त्या म्हणाल्या. ऍड. वर्मा आज सकाळपासून "सीआयडी' कार्यालयासमोर तळ ठोकून होते. स्कार्लेट प्रकरणात गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर आरोप करून बरेच गाजलेले विक्रम वर्मा यांना मिकी पाशेको यांनी आपले वकील म्हणून नेमल्याने रवी नाईक आणि मिकी पाशेको असे शीतयुद्ध सुरू होण्याची जोरदार चर्चा आज सुरू होती.

'गोल्डन ग्लो'च्या नावानं चांगभलं!

तिसऱ्या वर्षपूर्तीच्या पुस्तिका छपाईतही गौडबंगाल
माहिती व प्रसिद्धी खात्याचा अजब कारभार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडील खाण व अबकारी खात्यातील कोट्यवधींच्या घोटाळ्यांची प्रकरणे कमी म्हणून की काय, आता कामत यांच्याकडीलच माहिती व प्रसिद्धी खातेही बदनाम होत चालले आहे. ७ जून रोजी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सरकारच्या विविध विकासकामांच्या "यशस्विते'ची माहिती देणारी "गोल्डन ग्लो' नामक पुस्तिका छापण्याचे ठरले आहे. या पुस्तिकांच्या छपाईचे कंत्राटही अजून निश्चित झाले नसताना प्रकाशन सोहळा ७ रोजी सकाळी ११ वाजता कामत यांच्या हस्ते होईल, असेही जाहीर झाले आहे. छपाईच्या निविदा ५ जून रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी उघडल्या जातील व पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा ७ रोजी सकाळी ११ वाजता होईल, यावरूनच यंदाच्या पुस्तिका छपाईतही लाखो रुपयांचा घोटाळा होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने होत असताना अशी प्रकरणे कमी होण्याचे सोडून ती वाढतच चालल्याचा सध्या प्रत्यय येत आहे. गेल्यावर्षींच्या पुस्तिकेत झालेला घोटाळा विधानसभेत उघड करूनही त्यातून कसलाच बोध न घेता यावर्षीही तोच प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहिती व प्रसिद्धी खात्याने आज दिलेल्या जाहिरातीत ५ जून २०१० रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता या पुस्तिका छपाईच्या निविदा उघडल्या जातील, असे म्हटले आहे व कामाचा आदेश दिल्यानंतर दोन दिवसांत या पुस्तिका खात्याकडे पोच करण्याची अट घातली आहे. मुळात या पुस्तिकेचे प्रकाशन ७ रोजी सकाळी ११ वाजता होईल, अशी सरकारी आमंत्रणेही पाठवण्यात आल्याने या जाहिरातीतील फोलपणा उघड झाला आहे. या पुस्तिकेसंबंधीचे कंत्राट आपल्या मर्जीतील मुद्रकाला देऊन केवळ धूळफेक करण्यासाठीच निविदा मागवण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्र कुमार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकाराबाबत त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. सरकारी मुद्रणालयाचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे व या पुस्तिका इथे छापून घेणे सहज शक्य आहे. आपण तसा सल्लाही दिल्याची माहिती त्यांनी दिली. विविध खात्यांकडून विकासकामांसंबंधी उशिरा माहिती मिळाल्याने काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळेच ही छपाई बाहेरून करून घेण्याचे ठरले. खात्याच्या संचालकांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा सल्ला आपण दिला होता. या पुस्तिकांची छपाई सरकारी छापखान्यातूनच होईल, त्यामुळे या जाहिरातीकडे दुर्लक्ष करा, असा चकित करणारा सल्लाच त्यांनी दिला.
दरम्यान, गेल्या वर्षी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचे गोडवे गाणाऱ्या पुस्तिकांच्या छपाईत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला होता. यात खात्याचे संचालक गुंतल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला होता.
नरेंद्र कुमार यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ही केवळ घाईगडबडीमुळे झालेली चूक असल्याचे कारण त्यांनी दिले. दक्षता सचिव व्ही. के. झा व आपण संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्याचे सांगून त्यात कोणताही गैरव्यवहार आढळून आला नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. त्यावेळी ४४ पानी पुस्तिका तयार केली होती व त्याच्या सुमारे ४०,००० प्रती इंग्रजी, मराठी व कोकणी भाषांतून मंत्री, आमदार, कॉंग्रेस कार्यकर्ते, नगरपालिका व पंचायतींना वाटल्या होत्या. मंत्री आणि आमदारांना वाटल्या गेलेल्या पुस्तिका पूर्ण ४४ पानी होत्या; पण नगरपालिका आणि पंचायतींना वाटल्या गेलेल्या पुस्तिकांची फक्त २२ - २४ पाने छपाईने भरलेली होती. बाकीची सुमारे २२ पाने कोरी होती, याचा पुरावाच भाजप आमदारांनी विधानसभेत सादर केला होता.
सरकारला राजभाषेचा विसर
यंदाही सरकारच्या तीन वर्षांच्या पूर्तीची पुस्तिका इंग्रजीतूनच प्रसिद्ध होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सरकारच्या विकासकामांची माहिती देणारी ही पुस्तिका किमान राजभाषेतून अर्थात कोकणी व मराठीतून प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. सरकारने यंदापासून पुनरुज्जीवित केलेले "नवेपर्व' हे सरकारी नियतकालिकही इंग्रजीतूनच प्रसिद्ध करून तिथेही राजभाषेचा अवमान करण्यात आला. कोकणी व मराठी अकादमीला भरीव अनुदान देऊन एकार्थाने त्यांची तोंडेच सरकारने बंद केली की काय, अशी शंका घेतली जाते. सर्व सरकारी व्यवहार इंग्रजीतून करून राजभाषेला वाळीत टाकण्याचेच कारस्थान सरकार दरबारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राजभाषेतीलच पुस्तिकेचे प्रकाशन सरकारकडून व्हावे व कालांतराने इंग्रजी भाषेतील पुस्तिकांचे वाटप व्हावे, अशीही अनेकांची मागणी आहे. सरकारची अधिकृत माहिती राजभाषेतून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवली जाणे ही सरकारची जबाबदारी ठरते. इंग्रजीतून हा सगळा व्यवहार होत असल्याने सामान्य जनता या माहितीपासून वंचित राहात असल्याने हे घटनेचे उल्लंघन असल्याचाही आरोप होत आहे.

माजी मंत्री मडकईकरांविरूद्ध दक्षता खात्याकडे तक्रार

-नंबरप्लेट कंत्राट घोटाळा
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): उच्च सुरक्षा नंबरप्लेटच्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. शिमनीत उत्च कंपनीला बहाल केलेल्या या कंत्राट प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे मुख्य सचिवांच्या अहवालावरून प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने याप्रकरणी माजी वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर व इतरांच्या भूमिकेची दिवाणी व फौजदारी चौकशी व्हावी, अशी लेखी तक्रार सुदीप ताम्हणकर यांनी दक्षता खात्याकडे केली आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधीक्षकांना केलेल्या या तक्रारीत या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर आपण इतरही अनेक महत्त्वाचे पुरावे सादर करू, असेही सुचवण्यात आल्याने श्री. मडकईकर अडचणीत येण्याचीच शक्यता आहे.
अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी आज सकाळी ११ वाजता ही तक्रार दाखल केली. सध्या ही लेखी तक्रार स्वीकारण्यात आली असली तरी अद्याप ती नोंद करून घेण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. "हायसिक्यूरिटी नंबरप्लेट' अर्थात उच्च सुरक्षा नंबरप्लेटच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनात श्री. ताम्हणकर यांनी सक्रियपणे भाग घेतला होता. विरोधी भाजपकडूनही या निर्णयाविरोधात आंदोलन छेडल्याने व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत हा घोटाळा उघड केल्याने या प्रकरणाची मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशी झाली होती. हा अहवाल सरकारला सादर होऊनही अद्याप त्याबाबत काहीच होत नसल्याने सुदीप ताम्हणकर यांनी ही तक्रार केली आहे.
माजी वाहतूकमंत्री या नात्याने उच्च सुरक्षा नंबरप्लेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या. या निविदेत केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार अटी घालण्यात आल्या. मुळात हा विषय महत्त्वाचा असतानाही श्री. मडकईकर यांनी मंत्रिमंडळात तो आणला नाही, असा ठपका श्री.ताम्हणकर यांनी ठेवला आहे. निविदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदीही वाहतूकमंत्रीच होते. या निविदाप्रक्रियेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सहभागी होण्यास मज्जाव केला असतानाही एका शिमतीन उत्च कंपनीचा एका संचालक अशा प्रकरणात गुंतल्याचे उघड झाले आहे. या निविदेसाठी अर्ज करताना शिमनीत उत्च कंपनीकडून अनेक गोष्टी लपवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. नितीन शहा या संचालकाबाबतीत अनेक गोष्टी सदर कंपनीकडून लपवण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. एवढे ठाऊक असूनही वाहतूकमंत्री या नात्याने हे कंत्राट शिमनीत उत्च कंपनीला देण्यात आले. विदेशातील अनुभवाचा दाखला सादर करण्याबाबतही गलथानपणा करण्यात आल्याचेही दिसून आले आहे.याप्रकरणी मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात निविदा प्रक्रियेतील सर्व गैरप्रकार उघडकीस आणले आहे व त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होण्याची गरज आहे.
या चुकीच्या निर्णयामुळे विनाकारण जनतेवर आर्थिक भूदर्ड लादण्यात आला. या निर्णयामुळे सरकारचेही नुकसान झाले व जनतेला रस्त्यावर येणे भाग पडले. या सर्व प्रकरणांत वाहतूकमंत्री या नात्याने श्री.मडकईकर यांची संशयास्पद भूमिका असल्याने त्यांची दिवाणी व फौजदारी पद्धतीने चौकशी व्हावी,अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.

गाजलेल्या 'आयपीएल' प्रकरणात पवार यांचीही कोट्यवधींची गुंतवणूक!

मंत्रिपदावरून हकालपट्टीची भाजपकडून मागणी
नवी दिल्ली, दि. ४ : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ११७६ कोटी रुपये सिटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवले असल्याचा ठोस आरोप एका राष्ट्रीय दैनिकाने शुक्रवार ४ जून रोजी पुराव्यांनिशी केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून देशाला पूर्णवेळ कृषिमंत्री उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे केली आहे.
शरद पवारांची आयपीएलमधील आर्थिक पाळेमुळे खूपच खोलवर असल्याचे या बातमीमुळे स्पष्ट झाले आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार व कन्या सुप्रिया सुळे यांच्या १०० टक्के मालकीच्या "लॅप फायनान्स' व "नम्रता फिल्म एन्टरप्राईजेस' या दोन कंपन्यांनी सिटी कॉर्पोरेशन या कंपनीचे ३३ लाख ६० हजार शेअर्स विकत घेऊन सिटी कॉर्पोरेशनमध्ये १७ टक्के भागीदारी विकत घेतली आहे. यातून शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी ११७६ कोटी रुपयांची गुंतवणूक "पुणे आयपीएल' चमूसाठीच केली असल्याचे या बातमीतून स्पष्ट झाले आहे.
ही सर्व माहिती शरद पवार व त्यांच्या कुटुुंबीयांनी केंद्र सरकारला निवडणुकीवेळी भरून दिलेल्या शपथपत्रामध्ये दिली असल्याचा दावाही या वृत्तपत्राने केला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या स्थितीत आणि ज्या पद्धतीने विदेश राज्यमंत्री शशी थरूर यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली, त्याच पद्धतीने शरद पवारांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात यावे, अशी जोरदार मागणी भाजप प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.
यापूर्वी २० एप्रिलला शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे आयपीएल चमू खरेदीमध्ये माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सहभागी नसल्याचे सांगितले होते. २६ एप्रिलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी शरद पवारांचा आयपीएलशी संबंध नसल्याचे सांगून आयकर विभागाचासुद्धा हवाला दिला होता. शरद पवार यांनीही स्वत: २८ एप्रिलला आयपीएलच्या लिलावामध्ये आपला आर्थिक संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, या प्रकरणात जे सत्य बाहेर आले आहे, ते देशाच्या प्रतिमेस काळिमा फासणारे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
पवारांनी आरोप फेटाळले
"आयपीएल पुणे' टीम विकत घेण्यासाठी जी बोली लावण्यात आली होती, त्यामध्ये माझा किंवा कुटुंबीयांचा अजिबात संबंध नव्हता, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले. सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या एमडींनी वैयक्तिक पातळीवर "आयपीएल'ची बोली लावली होती, असे सांगत पवारांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले.
मी यापूर्वीही वारंवार स्पष्ट केले आहे की, कोणत्याही आयपीएल टीम खरेदीच्या बोलीमध्ये मी किंवा माझे कुटुंबीय कधीही सहभागी झालो नव्हतो. त्याच विधानाचा मी आजही पुनरूच्चार करत आहे, असे पवार यांनी दिल्लीत स्पष्ट केले. सिटी कॉर्पोरेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरूद्ध देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर बोली लावली होती. देशपांडे, "आकृती बांधकाम कंपनी' व "महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन' यांनी मिळून पुणे टीम खरेदी करण्याचा प्रयत्न केला. सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोली लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. १६ आणि १७ मार्चला त्याबाबतचा ठराव करण्यात आला. मात्र त्याचवेळी देशपांडे यांना वैयक्तिक पातळीवर बोली लावण्यासाठी परवानगीही देण्यात आली. देशपांडे यांनीच स्वतः त्याबाबतचा खुलासा केला आहे, असे पवारांनी सांगितले.
पुणे टीम खरेदीसाठीची सिटी कॉर्पोरेशनची बोली अखेर अयशस्वी ठरली. सहारा उद्योगसमूहाने शेवटी "पुणे टीम' खरेदी केली. जर मी माझ्या संबंधांचा वापर केला असता तर टीम खरेदी करण्यात आमची कंपनी अयशस्वी ठरली असती का, असा उलटसवाल पवार यांनी केला.

'पंचवाडी बचाव समिती'ला सलाम!

जागतिक पर्यावरणदिन विशेष
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उद्या ५ रोजी राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन जरी केले असले तरी फोंडा तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व विश्व रचनाकाराची खास मेहरनजर प्राप्त झालेल्या पंचवाडीवासीयांसाठी मात्र या दिनाचे वेगळेच महत्त्व आहे. नियोजित खाण प्रकल्पाच्या विळख्यातून आपल्या गावचे सौंदर्य व पर्यावरणीय संपत्ती जतन करण्यासाठी गेली अनेक वर्षे हे भूमिपुत्र अविरतपणे झटत आहेत. या लढ्यात पंचवाडीवासीयांना पर्यावरणवाद्यांचे समर्थन प्राप्त जरी झाले असले तरी राजकीय पातळीवर पंचवाडीवासीयांत दुफळी माजवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. निसर्गाशी अतूट नाते जोडलेल्या पंचवाडीवासीयांना सत्ता व पैशांच्या जोरावर वेगळे करण्यासाठी हरतऱ्हेच्या प्रयत्नांची शिकस्त खाण कंपनीकडून सुरू आहे पण पंचवाडी बचाव समितीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने या संकटाला तोंड देत आहेत ते पाहता पर्यावरणदिनाच्या या निमित्ताने त्यांच्या लढ्याला सलाम करावाच लागेल.
केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने यंदा या दिनानिमित्त " जैविक विविधता - निसर्गाशी नाते' असा मंत्र दिला आहे. सामाजिक, राजकीय तथा शैक्षणिक स्तरावर हा दिवस साजरा होईल. पर्यावरणाच्या रक्षणार्थ विविध स्पर्धा, चर्चासत्रे, परिसंवाद होणार आहेतच. अनेक ठिकाणी पर्यावरणवाद्यांकडून जनजागृती होईल. काही कार्यक्रमांसाठी आपले राजकीय नेतेही हजर असतील व पर्यावरण रक्षणाचे धडे ते सर्वसामान्य लोकांच्या गळी उतरवतील. गोव्यात खास करून खाण व्यवसायाने पर्यावरणाचा गळा घोटला आहे व त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आत्तापासूनच जाणवायला लागले आहेत. पर्यावरणाशी खरे नाते असलेले व पारंपरिक पद्धतीने पर्यावरणाचे जतन करणारे अनुसूचित जमातीचे बांधव व इथले भूमिपुत्र खाण व्यवसायामुळे विस्थापित होण्याच्याच मार्गावर आहेत. काणकोण, सांगे, सत्तरी, केपे, डिचोली आदी तालुक्यात पर्यावरणाची कशी नासाडी सुरू आहे याचीच ओळख या दिनाच्या निमित्ताने करून देणे उचित ठरले असते. शेती हा पंचवाडीवासीयांचा मुख्य व्यवसाय पण त्यांना ट्रक व इतर व्यवसायाचे आमिष दाखवून पैसे कमावण्याची आमिषे दाखवली जात आहेत. अजून खनिज प्रकल्प यायचाच आहे पण एव्हानाच गावातीलच काही लोक अलिशान गाड्यांतून फिरताना दिसत आहेत व खनिज प्रकल्प आल्यास गावचा कायापालट होईल व गावचा विकास होईल, अशी भाषा ते बोलू लागले आहेत. आपल्या या भरकटलेल्या बांधवांची समजूत काढून या गावच्या रक्षणार्थ पंचवाडी बचाव समितीचे कार्यकर्ते करीत असलेले काम खऱ्या अर्थाने दखल घेण्यासारखेच ठरले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत गावावर खाणीचे संकट ओढवू देणार नाही असा दृढ निश्चय त्यांनी केला आहे. या भूलथापांना बळी पडून आपल्या गावचा नाश होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. एका बड्या खाण कंपनीचा व राजकीय नेत्यांना रोष पत्करणे कुणालाही परवडणारे नाही, पण गेली कित्येक वर्षे समर्थपणे या दडपशाहीला तोंड देऊन पंचवाडी बचाव समितीने नियोजित खनिज प्रकल्प थोपवला आहे. गावच्या रक्षणाची व ग्रामस्थांच्या हिताची जबाबदारी असलेल्या पंचायत मंडळातील काही सदस्यांनीही गावाला विकण्याचाच घाट घातला आहे. या प्रकल्पाला ग्रामसभेची मंजुरी आहे, असे भासवण्यासाठी हरेक प्रयत्न सुरू आहेत पण गावच्या विरोधातील प्रत्येक बाबतीत दक्ष असलेल्या पंचवाडी बचाव समितीने त्यांचे सगळे डाव धुळीला मिळवले आहेत. पर्यावरणदिनानिमित्त खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे रक्षक असलेल्या पंचवाडी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांचा गौरव होणे अपेक्षित आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पर्यावरण रक्षकांच्या या लढ्याला पाठिंबा देऊन प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली तरच हा लढा यशस्वी होईल. पंचवाडी बचाव समितीच्या धाडसाचे व जिद्दीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटना घोषित

नवी दिल्ली, दि. ४ : प्रतिबंधित सिमी आणि पाकस्थित लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेशी संलग्न असलेल्या इंडियन मुजाहिदीन या संघटनेला सरकारने आज दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
राजधानी दिल्ली, उत्तरप्रदेश, बंगलोर आणि मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनांमध्ये या संघटनेचा हात असल्याचा सरकारला संशय असून, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत सरकारने या संघटनेचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेेेश केला आहे. इंडियन मुजाहिदीन आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या इतर संघटनांचा समावेश या यादीत करण्यासंबंधीचा आदेश आज जारी करण्यात आला आहे, असे गृहमंत्रालयातर्फे आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहेे.
२३ फेब्रुवारी २००५ रोजी वाराणसी येथे आठ जणांचा बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर इंडियन मुजाहिदीन ही संघटना प्रकाशझ्रोतात आली होती. या संघटनेवर पाकच्या आयएसआय या संघटनेचे थेट नियंत्रण असल्याची सरकारला शंका आहे. या संघटनेने आतापर्यंत देशभरात बॉम्बस्फोटाच्या किमान १० घटना केल्या असून, या घटनांमध्ये सुमारे ५०० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. २००६ मध्ये राजधानी नवी दिल्लीत केलेले साखळी बॉम्बस्फोट ही या संघटनेने केलेली आतापर्यंतची भीषण घटना आहे. या घटनेत ६५ जणांचा मृत्यू झाला होता.