Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 6 June 2009

खाण ट्रकचालकांपुढे "आरटीओ'ही हतबल

वाहतूक संचालकांची अस्थायी समितीसमोर कैफियत

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करण्यास गेल्यास ते "आरटीओ'च्या वाहनांवर आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करून मारहाण करतात, अशी माहिती आज वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक आणि पंचायत खात्याच्या संसदीय अस्थायी समितीच्या बैठकीत दिली. आमदार बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक तसेच फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. लोलयेकर यांच्या या माहितीवरुन वाहतूक खाते या ट्रकमालक व चालकांसमोर हतबल झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी परिसरात निष्काळजीपणे खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमुळे सामान्य दुचाकी वाहनचालकांचे बळी जात असल्याने या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. या प्रश्नावर उत्तर देताना संचालक लोलयेकर म्हणाले, या ट्रकचालकांवर कारवाई करणे ही डोकेदुखी झाली आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली तर, चार "आरटीओ'ना दीडशे ट्रकचालक मारहाण करण्यास आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या ट्रकचालकांवर पोलिसही कारवाई करीत नसल्याचे ते म्हणाले. श्री. लोलयेकर यांच्या या उत्तरामुळे खनिज वाहतूक होणाऱ्या परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाळी भागात गेल्या सात महिन्यांत १९० अपघात झाले आहे, तर सहा महिन्यांत सहा जणांचे प्राण गेले आहेत. रस्ता अरुंद असल्याने भरधाव येणारे ट्रक दुचाक्यांना धडक देतात, त्यामुळे कोणतीही चूक नसताना दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागतात. दिवसांतून ५ ते ६ वेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी त्याठिकाणी पोलिसही उपस्थित नसतात. खनिज मालाचे ट्रक तासंनतास रस्त्याच्या बाजूला उभे करून ठेवले जातात. रस्त्याची एकदम दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करून त्याचा अनुभव घ्यावा, असेही डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
वाहतूक विषयावर बोलताना माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस म्हणाले की, गोव्यात सार्वजनिक वाहतूक अत्यंत कमकुवत आहे. रस्ते अरुंद आहे. सा. बां. खात्याने दर पाच वर्षांनी कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता प्रत्येक रस्त्याची दुरुस्ती करुन तो हॉटमिक्स करावा, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. दर पाच पाच वर्षांनी रस्त्याचे दुरुस्ती काम करण्यास खात्याकडे एवढा निधी नसून ते करण्यासाठी किमान पाचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे यावेळी खात्याचे मुख्य अभियंते वाच्यासुंदर यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम सुरूच असून याला लोक विरोध करीत असल्याचे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. लोकांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे रुदींकरण करणे सोपे होईल,असे ते म्हणाले.
फोंडा येथे बसस्थानक उभारण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत तर, साखळी येथे असलेला बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याचा मुद्दा यावेळी सागर जावडेकर यांनी मांडला. फोंड्यातील बसस्थानकाचा तसा उपयोगही होत नाही. परंतु, त्यावर करोडो रुपये खर्च झाले आहेत. शिरोडा येथे भव्य बसस्थानक उभारण्यात आला मात्र ते वापराविना तसाच पडलेला आहे. बसस्थानक बांधण्यासंदर्भात सरकारने धोरण स्पष्ट करावे, असे श्री. जावडेकर म्हणाले.

गोव्यात फिल्म इंस्टिट्यूट स्थापना व्हावे - नाना पाटेकर

मडगाव, दि. ५ - गोव्यात चांगले कलाकार आहेत, येथील वातावरणही चित्रपटसृष्टीला पोषक आहे, स्थानिक कलाकारांना वाव देण्याकरिता गोव्यात फिल्म इंस्टिट्यूट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नामवंत चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केले.येथील रवींद्र भवनात आयोजित नारायण बांदेकर गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पाटेकर यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सरकार राज्यात फिल्म इंस्टिट्यूटच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, मिलिंद सोमण,नीना कुलकर्णी, मकरंद अनासपुरे हे प्रसिद्ध मराठी कलाकार तसेच सभापती प्रतापसिंग राणे, उद्योगपती नारायण बांदेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. या क्षेत्रात अनेक तरुण व गुणी कलाकार पुढे येताना दिसतात. त्यांना मोठे भवितव्य आहे.त्यांना अधिक वाव देण्यासाठी यापुढे असाच मराठी चित्रपट महोत्सव चालू राहणे आवश्यक आहे. सरकारने पुरस्कर्ता होऊन अशा उपक्रमाला राजाश्रय देण्याची गरज आहे, असे नाना पाटेकर यांनी पुढे म्हणाले.
गोव्यात आता केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच होत नाहीत, तर प्रादेशिक चित्रपट महोत्सवही यशस्वी होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रदेशात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण तयार होत असल्याचे नमूद केले. नव्या पिढीत चित्रपट, कला याविषयी मोठे आकर्षण असून, या क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी फिल्म इंस्टिट्यूट स्थापन करण्यास सरकार पुढाकार घेईल, राजेंद्र तालक, ज्योती कुंकळकर असे कलाकार चित्रपट निर्मितीत असल्याने चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचीही मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले. सोनाली कुलकर्णी व मकरंद अनासपुरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मराठी चित्रपट सृष्टीचा आढावा या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला, त्यात जुन्या काळापासून आजवरच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. ही गाणी प्रसिद्ध गायक प्रवीण गावकर व सहकाऱ्यांनी सादर केली. राजेश पेडणेकर यांनी त्यावर केलेल्या अभिनयाला खुद्द नाना पाटेकर यांनीही दिलखुलास दाद दिली.

भिकारी प्रकरणी तिघे पोलिस दोषी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - शॅल्टोन नामक भिकाऱ्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकल्याप्रकरणी पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस हवालदार, पोलिस शिपाई व वाहन चालक दोषी आढळले असून पोलिस महानिरीक्षक त्यांच्यावर शिस्तभंगाची योग्य कारवाई करणार असल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकारांना दिली.
उपअधीक्षक शांबा सावंत यांनी केलेल्या तपासात भिकाऱ्याला घेऊन गेलेल्या त्या पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनात असलेले पोलिस हवालदार पी. म्हामल, पोलिस शिपाई एस. कुडणेकर व वाहन चालक आर आर. तांबसे हे तिघे दोषी आढळून आले आहेत. पोलिस खात्याला न शोभणारे असे या पोलिसांनी कार्य केले असून यापुढे पुन्हा अशा घटना घडू नयेत, त्यासाठी सर्व पोलिस स्थानकासाठी परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. यापुढे अशा घटना हाताळताना पूर्ण काळजी घेण्याचीही सल्ला पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिस नियंत्रण कक्षात असलेल्या पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून आपली ड्यूटी केली पाहिजे. तत्पर सेवा देण्यासाठी आणि अडचणीत सापडलेल्यांना आधार देण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. आधीच दुःखात असलेल्या आणि आजारी असलेल्या भिकाऱ्यांना अशी वागणूक मिळाल्यास ते योग्य होणार नसल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.
पोलिस चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पणजी बाजारातून पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला की, एका व्हाईन शॉपच्या समोर एक भिकारी असून तो उपद्रव करतो. या दूरध्वनीची दखल घेऊन बाजाराच्या जवळ असलेल्या नियंत्रण कक्षाच्या पोलिस वाहनाला माहिती देण्यात आली तसेच १०८ रुग्णसेविकेला त्याठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली. सर्वांत आधी त्याठिकाणी १०८ रुग्ण सेवा वाहन पोचले. त्याच्यापाठोपाठ पोलिस वाहन गेले. यावेळी १०८ वाहनातील सेविकेने त्या भिकाऱ्याच्या आरोग्याची तपासणी केली. त्याला कोणताही आजार नसल्याचे उघड झाल्याने त्यांनी आम्ही त्याला इस्पितळात नेत नसल्याचे सांगितले. तसेच याच भिकाऱ्याला यापूर्वी १०८ वाहनाने अनेकवेळा इस्पितळात दाखल केल्याचे त्या रुग्णसेवा वाहनाच्या चालकाने पोलिसांनी सांगितले आणि ते निघून गेले. त्यानंतर तो दुकान मालक त्या भिकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या मागे लागल्याने त्याला पोलिसांनी आपल्या जीपमधे घेतले आणि कदंब बसस्थानकाच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी त्या भिकाऱ्याने कंापाल येथे एका गल्लीत आपला ओळखीची व्यक्ती राहत असल्याने त्याठिकाणी नेऊन सोडण्याची विनंती केली. त्यामुळे कंापाल येथे त्याला सोडण्यात आल्याचे आपल्या बचावासाठी त्या पोलिस शिपायांनी चौकशी अधिकाऱ्याला दिली. परंतु, त्या भिकाऱ्याला कंापाल येथे सोडण्यात आल्याची माहिती त्याचवेळी बिनतारी संदेशाद्वारे नियंत्रण कक्षाला देण्यात आली नसल्याने आणि त्यांच्या जबानीत तफावत आढळून आल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हा एका भिकाऱ्याचा प्रश्न नसून शहरात उपद्रव करणाऱ्या अन्य भिकाऱ्यांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न असून त्यासाठी कायद्यात योग्य बदल करण्याची गरज असल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले. शहरात येणारे ९९.९९ टक्के भिकारी हे बिगर गोमंतकीय आहे. यातील सर्वच भिकारी हे परिस्थितीने बनवलेले नसून त्यात काही व्यावसायिक भिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. भिकारी प्रतिबंधक कायदा अपुरा पडत असून त्यात बदल करण्याची गरज आहे. तसेच या भिकाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी समाज कल्याण खात्याने याची दखल घ्यावी, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

"कमिशन'नसल्यानेच चर्चिल यांचा विकास प्रकल्पांना विरोध

जितेंद्र देशप्रभू यांचा घणाघाती आरोप

पणजी, दि.५ (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ व सहापदरी महामार्ग हे दोन्ही बडे प्रकल्प केंद्र सरकारतर्फे उभारण्यात येणार आहेत. तेव्हा अशा प्रकल्पांतून १५ टक्के कमिशन मिळण्याची शक्यता नसल्यानेच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे या विकासात्मक प्रकल्पांना खो घालीत असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र देशप्रभू यांनी केला.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. देशप्रभू यांनी चर्चिल आलेमाव यांच्यावर शरसंधानच केले.चर्चिल यांना गोव्याच्या भवितव्याचे किंवा विकासाचे काहीही पडून गेलेले नाही ते केवळ वैयक्तिक व आपल्या कुटुंबीयांच्या उद्धाराचाच विचार करतात.गोव्याचा विकासाचा ठेका त्यांना देण्यात आला नसून त्यांच्याकडून विकासाला होत असलेल्या विरोधामुळे गोव्याचे मोठे नुकसान होत असल्याची टीकाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याप्रकरणी जनतेला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे,अशी मागणीही त्यांनी केली. खुद्द सरकारातील मंत्र्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याने जनतेचा गैरसमज होणे स्वाभाविक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकासात्मक धोरणाची घोषणा करावी,अशी मागणीही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केली.
आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाच्या कामाला चालना मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.या विमानतळामुळे गोव्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे तसेच स्थानिकांना छोटे उद्योग व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.खुद्द पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मोपा विमानतळाला हिरवा कंदील दाखवला असताना चर्चिल यांच्याकडून विरोध केला जाणे हे दुर्दैव असल्याचेही ते यावेळी म्हणाले. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोपा विमानतळासह दाबोळी विमानतळही कायम राहणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. दाबोळी विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून तीनशे कोटी रुपये मंजूर करून या कामाची पायाभरणीही केली आहे,असे असून देखील चर्चिल यांच्याकडून अशी बेजबाबदार वक्तव्ये केली जाणे ही गोव्याच्या हिताविरुद्ध असल्याचा टोलाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी हाणला. मोपा विमानतळाचे काम हे "बांधा,वापरा व परत करा' (बूट) पद्धतीवर होईल तसेच सहापदरी महामार्गाचे कामही सार्वजनिक, खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीवर होईल,त्यामुळे राज्य सरकारला या दोन्ही बड्या प्रकल्पांच्या बांधकामात काहीही भूमिका नसल्याने अशा बड्या प्रकल्पांवर १५ टक्के कमिशन उकळण्याचे मनसुबे धुळीस मिळत असल्यानेच त्यांचा तोल गेला आहे व ते काहीही बरळत असल्याचा आरोपही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केला.
सहापदरी महामार्गाबाबत जनतेची दिशाभूल
सहापदरी महामार्गाबाबत चर्चिल आलेमाव जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीकाही श्री.देशप्रभू यांनी केली. या महामार्गासंबंधी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या महामार्गासाठी सुमारे ८०० बांधकामावर कारवाई करण्याचे सुचवण्यात आले आहे. यापैकी केवळ २२७ बांधकामे ही कायदेशीर असून बहुतांश बांधकामे ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती श्री.देशप्रभू यांनी दिली आहे.या बेकायदेशीर बांधकामांत गाडे,धार्मिक स्थळे व महामार्गालगत राहणाऱ्या लोकांनी केलेले अतिक्रमणांचा समावेश आहे.चर्चिल या महामार्गाला विरोध करून या बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केला.महामार्गालगतच्या अशा बेकायदेशीर बांधकामांमुळेच रस्ता अपघात होतात,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. महामार्गाचा हा प्रकल्प सुमारे साडेतीनशे कोटींचा आहे. एवढ्या बड्या रकमेच्या या प्रकल्पातून त्यांना काहीही मिळणार नाही तसेच या महामार्गावर टोल आखण्याचा अधिकारही केंद्राकडे राहणार असल्याने त्यांना या टोलाचे कंत्राट आपल्या कुटुंबीयांना देण्याची संधीही मिळणार नाही,असा टोलाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी हाणला आहे.कर्नाटकातील कारवार,सुपा व हल्याळ भाग गोव्याला जोडण्याबाबतचे वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचे सांगून या भागांत खाण कंत्राट तर त्यांनी घेतले नाही ना,अशीही खिल्लीही श्री.देशप्रभू यांनी उडवली आहे.

आणखी एका संशयिताच्या जामिनावर आज सुनावणी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - पेडणे येथील कथित वेश्या व्यवसाय प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब ऊर्फ प्रभूदेसाई याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या ६ रोजी सुनावणी होणार आहे. उद्या या सुनावणीला तो न्यायालयात हजर राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. नेताजी याचा अर्ज फेटाळला गेल्यास त्याला अटक होईल व या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश होईल या भीतीनेच सध्या या प्रकरणांत गुंतलेल्यांची गाळण उडाली आहे.
पोलिसांनी सध्या पेडणे येथील हे तथाकथित प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. विशेष करून स्थानिक मुली तसेच खुद्द महिला पोलिसांना फसवून त्यांचे अश्लील "क्लिपींग्स' काढण्यात आल्याची माहितीही उघड झाली आहे.विशेष विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी या टोळीला बळी पडलेल्या पिडीत महिलांनी व महिला पोलिसांनी आपली कैफियत वरिष्ठ पोलिसांकडे मांडावी,असे आवाहन करून त्यांना पूर्ण संरक्षण देण्याची हमीही दिली आहे.राजेश सावंत या निलंबित पोलिस शिपायाला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर काल जामीन मंजूर करण्यात आला.राजेश सावंत यानेच नेताजी परब ऊर्फ प्रभूदेसाई याचे नाव उघड केले होते.राजेश सावंत याच्या जबानीत पोलिसांनी या प्रकरणी अनेकांची माहिती मिळवली असून त्यांच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम पेडणे पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली आहे. नेताजी परब याच्याकडे यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल,असे सांगून या टोळीचा भांडाफोड लवकरच होईल,असाही विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान,जुगारी अड्डे चालवण्यासाठी गुन्हा विभागाचे हफ्ते गोळा करणाऱ्या सदर म्होरक्या सरपंचांची माहितीही पोलिस मिळवत आहेत. पेडणे भागातून मोठ्या प्रमाणात हफ्ते पणजीत गुन्हा विभागाला पोहचत असल्याच्या वृत्तामुळे राजधानीतही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. गुन्हा विभागावर उघडपणे झालेल्या या टीकेमुळे या विभागातील काही अधिकारीही बिथरले असून त्यांनीही सावध भूमिका घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळवली आहे. गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडे यासंबंधी एका शिष्टमंडळाने चर्चा केल्याचीही खबर आहे. रवी नाईक यांनी मात्र या शिष्टमंडळाला थेट परतवून लावून या प्रकरणांत पोलिसांना चौकशीचे पूर्ण स्वतंत्र देण्यात आल्याचे सांगितले आहे. पोलिस महासंचालकांना यासंबंधी माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी सांगितल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. पेडणे भागांत जुगारी अड्डे चालवण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्याचे वृत्त पसरल्याने व यासंबंधी येथील स्थानिक जनताही अवगत आहे, त्यामुळे आपली बदनामी टाळण्यासाठी पोलिसांनी काही लोकांवर कारवाई करण्याची तयारीही दर्शवल्याची खबर मिळाली आहे.

Thursday, 4 June 2009

सीरियल किलर प्रकरणाचा तपास पाटील यांच्याकडेच

फोंडा व मडगावात अतिरिक्त निरीक्षक

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याला फाशीपर्यंत नेण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी हे प्रकरण आता पूर्णपणे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दुसऱ्या निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री रवी नाईक यांनी केली. ते आज आल्तिनो येथील सरकारी निवासात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज उपस्थित होते. त्याचप्रमाणे मडगाव भागात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने त्याही पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यावेळी म्हणाले. एकाच पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना ठरणार आहे.
महानंद याची नार्को चाचणी करावी की नाही, याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमधे चर्चा सुरू असून त्यावर पोलिस महासंचालक निर्णय घेतील. या खुनाची मालिका अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व खुनांचे एकच आरोपपत्र दाखल करावे की वेगवेगळे याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
दिवसेंदिवस महानंदचे प्रकरण वाढत असल्याने त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. सी. एल. पाटील या प्रकरणाच्या तपासात गुंतल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
मोर्चा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी पोलिसांना जादा अधिकार देण्याचा विचार सुरू असून त्याविषयीचे येत्या विधानसभा अधिवेशनात गोवा पोलिस कायदा विधेयक सादर करणार असल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली. याविषयीची येत्या दि. १६ जून रोजी चिकित्सा समितीची बैठक होणार असून त्यात या विधेयकावर चर्चा करून नेमके कोणते अधिकार पोलिसांना द्यावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. नवीन बदल करण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिस कायदा नजरेसमोर ठेवून हे विधेयक बनवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

कोण, कुठली ही पूजा?
महानंदची पत्नी पूजा नाईक हिच्याविषयी गृहमंत्री रवी नाईक यांना विचारले असता कोण...? कोण ही पूजा...? असा प्रति प्रश्न करून ""हा...ती का, जुने गोव्याला कुठे तरी नोकरीला असते ती...'' तिच्या विषयी मला काहीच माहिती नसल्याचे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. तिच्याबद्दल तुम्हांला पोलिस महासंचालक आणि पोलिस निरीक्षकच अधिक माहिती देऊ शकतील, असे म्हणून श्री. नाईक यांनी तिच्याविषयी अधिक काहीही बोलण्यास नकार दर्शविला. पूजा नाईक ही कॉंग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सतत संपर्कात असल्याची जोरदार चर्चा असल्याचे त्यांना विचारले असता असे कार्यकर्ते अनेक असतात पण, कोण कसा आहे, हे काही कळत नाही ना...आणि ती काही माझ्या मतदारसंघातील नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
पूजा नाईकची वागणूक संशयास्पद असल्याने आणि दीपाली जोतकरच्या आईने आपल्या मुलीच्या खून प्रकरणात पूजा नाईक हिची चौकशी करण्याची मागणी केलेली असताना पोलिस तिची चौकशी का करीत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पूजा नाईक ही वेगवेगळी नावे धारण करुन वावरत होती, अशी माहितीही उघडकीस आली आहे. पूजा नाईक हीच रेश्मा देसाई, पूजा कामत अशा नावाने आपला परिचय करुन देत होती. पूजा अशी बनावट नावे धारण करुन का वावरत होती, असा प्रश्न उपस्थित झाला असून याचीही पोलिसांनी चौकशी करण्याची अत्यंत गरज आहे.

आणखी पर्यटकच नको, मोपाही नको - चर्चिल

द्रुतगती महामार्गला पर्यायी प्रस्ताव

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - गोव्यात सध्याच्याच परिस्थितीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे त्यामुळे ही संख्या आणखीन वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र विरोध केला आहे. पर्यटकांची संख्या आणखीन वाढवायची गरज नाही, त्यामुळे गोव्याला अतिरिक्त मोपा विमानतळाचीही गरज नाही, असा दावा करून त्यांनी पुन्हा एकदा मोपा विरोधाचेही टुणटुणे वाजवले.
आज पर्वरी येथे आपल्या दालनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. गोव्यात पर्यटन उद्योग फोफावतो आहे हे खरे जरी असले तरी त्याचा लाभ मात्र गोमंतकीयांना फारच कमी होतो, असे ते म्हणाले. वाढत्या पर्यटकांमुळे येथे निर्माण होणाऱ्या विविध समस्या पाहिल्या तर राज्याच्या भवितव्याबाबत चिंता वाटते, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या दाबोळी विमानतळाकडून जेवढ्या पर्यटकांची सोय होते तेवढी बस्स झाली. मोपा विमानतळ बांधून आणखीन पर्यटकांना गोव्यात येण्याची सोय अजिबात नको, असे विधानही त्यांनी यावेळी केले. सध्या गोव्याला भेट देत असलेल्या पर्यटकांमुळेच एवढा ताण पडतो तर भविष्यात ही संख्या वाढली तर गोव्याचे काय होईल, असे सांगून त्यांनी आपल्या या विधानाचे समर्थनही केले.
चौपदरी महामार्गासाठी नवा प्रस्ताव
केंद्र सरकारने तयार केलेल्या द्रुतगती महामार्गाच्या प्रस्तावामुळे अनेकांना स्थलांतरित करण्याची वेळ येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी प्रस्ताव तयार केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार पत्रादेवी ते पोळे रस्त्याचे चौपदरीकरण व काही ठिकाणी सहापदरीकरण करण्यात येणार असून त्यात केवळ ३० ते ४० बांधकामे हटवावी लागणार आहेत, अशी माहिती चर्चिल आलेमाव यांनी दिली. येत्या १५ दिवसांत आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह दिल्लीला जाणार असून त्यावेळी हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प "बूट' पद्धतीवर राबवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाचे काम हे रस्ता वाहतूक व महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाते परंतु गोव्याच्या हिताच्या दृष्टीने हा प्रस्ताव खास स्थानिक सा.बां.खाते अभियंत्यांनी तयार केल्याचेही ते म्हणाले. या महामार्गाबाबत विविध ठिकाणी बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते,असे सांगून केंद्र सरकारचा प्रस्ताव लागू केल्यास गोव्यात क्रांती होईल,असा टोलाही त्यांनी हाणला.

भिकारी प्रकरण पोलिसांना शेकणार!

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - पोलिस नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी भिकाऱ्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकल्याच्या प्रकरणाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून या घटनेची सखोल चौकशी करून उद्या सकाळी दि.५ जून रोजी संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिला.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस उपअधीक्षक शांबा सावंत यांना देण्यात आले असून उद्या सकाळी अहवाल आपल्यापर्यंत पोचल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. तर, पोलिसांमुळे चर्चेत आलेला भिकारी शॅल्टोन याने आज अनेक दिवसानंतर थंड पाण्याने आंघोळ केली. कांपाल येथे असलेल्या एका संघटनेने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली असून त्याला पोटभर जेवण आणि अंगावर घालण्यासाठी चांगले कपडेही देण्यात आले आहेत. शॅल्टोन याला कचऱ्याची पेटी दाखवणाऱ्या घटनेची चौकशी सूरू झाली असून त्यारात्री पणजी पोलिस स्थानकात ड्युटीवर असलेल्या दहा पोलिस शिपायांची तसेच पोलिस नियंत्रण कक्षाच्या शहरात गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनात असलेल्या पोलिसांचीही जबानी नोंद करुन घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार त्यादिवशी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून एका व्यक्तीने हॉटेलच्या समोर भिकारी असल्याची माहिती दिली होती. ही माहिती टिपून घेणाऱ्या पोलिसाने ती माहिती गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनाला दिली. त्यांनी त्या भिकाऱ्याला वाहनात घेतले मात्र तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला यावर गूढ निर्माण झाले आहे. याचा उलगडा उद्याच्या अहवालात होण्याची शक्यता आहे.

मुस्लिम देशांशी संबंध सुधारणार - ओबामा

काहिरा, दि.४ - अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये असलेले संशयाचे आणि वादाचे चक्र आता संपवायला हवे. अमेरिकेचे मुस्लिम राष्ट्रांसोबत असलेले संबंध सुधारले जावेत, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.
मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर असलेले ओबामा इजिप्तची राजधानी काहिरा येेथे असताना त्यांनी दिलेल्या आपल्या महत्त्वपूर्ण भाषणात त्यांनी वरील आवाहन केले. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूंमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे, हे मान्य करून ओबामा म्हणाले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांचा सन्मान करायला हवा. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुरळीत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
काहिरा विद्यापीठातील आपल्या या संबोधनात ओबामा यांनी मुस्लिम देशांसोबतच्या अमेरिकेच्या संंबंधावरच जास्त जोर दिला.
मी येथे अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये एक नवीन शुभारंभ करण्यासाठी आलो आहे. हा शुभारंभ आपसातील हित आणि एकदुसऱ्याच्या सन्मानावर आधारित राहणार आहे, असेही ते म्हणाले.
हिंसक कट्टरपंथीयांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंमध्ये जे संशयाचे आणि वादाचे चक्र सुरू झाले आहे ते आता थांबवायला हवे, असेही ओबामा म्हणाले. माझ्या एका भाषणाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे चक्र थांबणार नाही, अविश्वासाचे वातावरण निवळणार नाही, असेही त्यांनी मान्य केले.
ज्या गोष्टी आधी बंद खोलीत केल्या जात होत्या त्या आता दोन्ही बाजूंनी खुलेपणाने करायला काहीच हरकत नाही. इस्लाम नेहमीच अमेरिकेसोबत जुळलेला आहे, असेही ओबामा म्हणाले.
जे आमच्या देशात येतात त्यांच्यासाठी तेथील संधीचे स्वप्न भंग झाले आहे, असे समजू नये. अमेरिकेत येऊन आपले स्वप्न साकारणाऱ्यांमध्ये ७० लाख मुसलमानांचा समावेश असतो, अशी माहितीही ओबामा यांनी दिली.
इराक आणि अफगाणिस्तानचा उल्लेख करून ते आपल्या भाषणात म्हणाले की, या दोन्ही देशांत स्थायी लष्करी तळ ठोकण्याचा अमेरिकेचा अजीबात विचार नाही. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हिंसक कट्टरपंथीय नाही, असा विश्वास जेव्हा निर्माण होईल तेव्हा आम्ही स्वत:च आनंदाने तेथील आमच्या सर्व सैनिकांना परत बोलावून घेऊ. या कट्टरपंथीयांचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त अमेरिकी लोकांना मारण्याचाच आहे. आज या भागातील परिस्थिती हाताबाहेर गेली असल्यामुळेच तेथे अमेरिकेचे लष्कर तैनात करण्यात आले आहे, असेही ओबामा यांनी सांगितले.

महिला आरक्षण विधेयक तातडीने संमत करणार

नवी दिल्ली, दि. ४ - पंधराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर गुरुवारी प्रथमच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात पारंपरिक पद्धतीने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे अभिभाषण झाले. यात संपुआ सरकारने केलेली कामे व येत्या १०० दिवसांच्या आत केंद्र सरकारद्वारे उचलल्या जाणाऱ्या पावलांवर कटाक्ष टाकण्यात आला. त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांत सरकारद्वारे राबविली जाणारी धोरणे व कार्यक्रमांची रूपरेषाही मांडण्यात आली. संसद आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के व पंचायती अन् महानगर पालिकांमध्ये ५० टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर संमत करून घेण्याच्या दृष्टीने सरकार येत्या १०० दिवसांमध्येच प्रभावी पावले उचलेल, अशी ग्वाही प्रतिभा पाटील यांनी दिली.
अभिभाषणाच्या वेळी दोन्ही सभागृहातील बहुतेक सदस्य व केंद्रीय कक्षात उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लोकसभा सभापती मीरा कुमार, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, संपुआ प्रमुख सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली उपस्थित होते.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी "१०० डेज मिशन' याआधीच घोषित केले आहे. या मिशनअंतर्गत सरकार कोणती पावले उचलणार, याचा तपशील पाटील यांनी यावेळी सांगितला. सुमारे ५५ मिनिटे चाललेल्या अभिभाषणात राष्ट्राध्यक्षांनी बहुतेक सर्व महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांचा उल्लेख केला.
अभिभाषणादरम्यान पाटील यांनी अनेकदा "माझे सरकार' शब्दाचा वापर केला. त्यांनी मोकळ्या आवाजात सामान्यापेक्षाही जरा जास्त गती ठेवत हिंदीतून अभिभाषण दिले. यादरम्यान पाटील यांनी श्रीलंका व तेथील तामिळांबाबत चर्चा सुरू केल्यानंतर एमडीएमकेचे सदस्य ए. गणेशमूर्ती आपल्या जागेवर उभे राहून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करू लागले. याच कालावधीत अभिभाषणाच्या स्वागतार्थ सदस्यांनी टाळ्या वाजविल्यामुळे एमडीएमके खासदाराचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. विशेष बाब अशी की, सभागृहातील वातावरण उत्साहवर्धक राहिले.
येत्या पाच वर्षांत देशातील प्रत्येक महिलेला साक्षर बनविण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता अभियानाची पुनर्रचना केली जाईल असे पाटील यांनी सांगितले. अभिभाषणात महिलांच्या सबलीकरणावर विशेष जोर देण्यात आल्याचे दिसून आले. २००१ मध्ये देशात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५४ टक्केच होते. परंतु, राष्ट्रीय साक्षरता अभियान प्रभावीपणे राबविल्यानंतर यात मोठया प्रमाणात वाढ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना आरक्षण दिले जाईल. यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करतील. सोबतच महिला सक्षमीकरणासाठी एका राष्ट्रीय मिशनची स्थापना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक मंदीमुळे चालू आर्थिक वर्षात विकास दर साधारण राहू शकतो. त्यामुळे दमदार व्यवस्थापनाद्वारे आर्थिक विकास दर वाढविण्याला आम्ही प्राधान्य देऊ. यासाठी उद्योगांचा विकास, उत्पादन आणि निर्यात वाढीवर लक्ष, लघु व मध्यम आकाराचे उद्योग आणि गृहनिर्माण यासारख्या पायाभूत उद्योगांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अभिभाषण संपल्यानंतर उप-राष्ट्रपती अन्सारी यांनी भाषणाच्या इंग्रची प्रतीचे पहिले व अंतिम पान वाचले. उर्वरित भाग वाचला असल्याचे समजण्यात आले.
मुख्य मुद्दे :
१. १०० दिवसांच्या आत महिला आरक्षण विधेयक
२. ५ वर्षांत झोपडपट्टीरहीत भारत
३. विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी कारवाई
४. अंतर्गत सुरक्षा व जातीय सद्भाव कायम राखणार
५. खाद्यान्न सुरक्षा कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ३ रुपये दराने २५ कि.ग्रॅ.तांदूळ किंवा गहू देणार ६. कृषी रोजगार व उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक विकास वाढविणार
७. रोजगार, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण संरचना, शहर नूतनीकरण कार्यक्रमांची नव्याने आखणी, खाद्यान्न सुरक्षा व कौशल्य विकास कार्यक्रमांना सुरुवात
८. महिला, युवक, मुले, अन्य मागास वर्ग, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अल्पसंख्यांक व ज्येष्ठांच्या कल्याणासाठी संघटित कृती आणि सुदृढ समाज व्यवस्थेवर जोर देणार
९. नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी संघटित प्रयत्न
१०. चांगल्या समन्वयासाठी महिला केंद्रीत कार्यक्रम मिशन म्हणून राबविण्याची योजना
११. नद्यांच्या स्वच्छता मोहिमसाठी ऐच्छिक राष्ट्रीय युवा संघटनेची स्थापना, गंगा नदीपासून सुरुवात
१२. पंचायत सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी मागास क्षेत्र अनुदान निधीवर विशेष लक्ष
१३. बिन लष्करी माहिती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक धोरणाची आखणी
१४. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणणार. जबाबदारी ठरविण्यासाठी सामाजिक लेखा परीक्षण
१५. जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान मोहिमेला गती देण्यासाठी व्यावसायिक व तांत्रिक समित्यांची स्थापना
१६. न्याय यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी ६ महिन्यांत नवी योजना
१७. शासकीय व्यवस्थेत सुधारणा
१८. राजकोषाचे विवेकपूर्ण व्यवस्थापन
१९. ऊर्जा सुरक्षेसोबतच पर्यावरणाचे संरक्षण
२०. जगासोबत रचनात्मक आणि सृजनशील ताळमेळ
२१. सर्वच क्षेत्रात आधुनिकीकरणाला प्राधान्य
२२. उद्योग आणि विकासात्मक नव्या विचारसरणीचे संवर्धन