Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 11 July 2011

भक्तीच्या शिरपेचात आणखी एक तुरा

राष्ट्रीय वूमन्स चॅलेंजर्स स्पर्धा जिंकली

पणजी, दि. १० (क्रीडा प्रतिनिधी)
वूमन्स इंटरनॅशनल मास्टर व वूमन्स ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिने चेन्नई येथे आज (दि.१०) संपलेली राष्ट्रीय वूमन्स चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीत तिने तमिळनाडूच्या मिचेल कॅतरिना हिला बरोबरीत रोखून अजिंक्यपदावर नाव कोरले. भक्तीने हल्लीच श्रीलंकेत झालेल्या आशियाई ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. या जेतेपदाबरोबर भक्ती राष्ट्रीय प्रीमियर (अ गट) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या कामगिरीबरोबर तिने आपण भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटूंपैकी एक असल्याचे दाखवून दिले आहे. धेंपो कार्बन समूहाची प्रचारदूत असलेल्या भक्तीचे तिच्या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष आशिष केणी, सचिव अरविंद म्हामल, खजिनदार किशोर बांदेकर यांनी अभिनंदन केले आहे.

कालका मेलला भीषण अपघात १५ डबे रुळावरून घसरले


३५ ठार, २०० जखमी


फतेहपूर, द. १०
हावड्याहून नवी दिल्लीकडे जात असलेल्या भरधाव कालका मेलचे १५ डबे रुळावरून घसरून झालेल्या भीषण अपघातात किमान ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २०० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आज दुपारी १२.२० च्या सुमारास कालका मेल लखनौपासून १२० किमी अंतरावर असलेल्या मालवा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असताना हा भीषण अपघात झाला. कालका मेलचे १५ डबे रुळावरून घसरले असून, त्यापैकी १० डब्यांची अवस्था भीषण आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांना या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे उत्तर-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एच. सी. जोशी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अपघात झाला त्यावेळी ही गाडी पूर्ण वेगाने म्हणजेच ताशी १०८ किमी वेगाने धावत होती. या भीषण अपघातात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत, अशी माहिती फतेहपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी के. एन. जोशी यांनी दिली. चालकाने आपात ब्रेक लावल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत पथकांना ताबडतोब घटनास्थळी रवाना करण्यात आले. मदत पथकातील कर्मचार्‍यांना अपघातग्रस्त दोन डब्यांमध्ये अजूनपर्यंत प्रवेश करता आलेला नाही, तसेच मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही जास्त समावेश असल्याचे फतेहपूरचे पोलिस अधीक्षक राम भरोसे यांनी सांगितले. अपघातग्रस्त गाडीचे काही डबे अक्षरश: एकमेकांवर चढले, तर काही डब्यांचा पूर्णपणे चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अजूनही अनेक प्रवासी डब्यांमध्ये अडकून पडले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. या कामासाठी लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे.
या भीषण अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, बचाव आणि मदत कार्यासाठी शक्य त्या सर्व पर्यायांचा उपयोग करण्याचे निर्देश रेल्वे मंत्रालयाला दिले आहेत.
या दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख, गंभीर जखमींना एक लाख व जखमींना प्रत्येकी २५ लाखांची मदतही सध्या रेल्वे मंत्रालयाचा कारभार पाहात असलेल्या पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

आवळा देऊन कोहळा काढण्याचाच प्रकार

मळा मार्केट व तलाव ‘पीपीपी’ प्रकल्प

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
पणजी मळा येथील ‘एनजीपीडीए’चा मार्केट व तलाव प्रकल्प ‘पीपीपी’ पद्धतीवर ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक लिमिटेड कंपनी’ला देण्याचा घाट हा ‘आवळा देऊन कोहळा काढण्याचाच’ भाग आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांचे प्रत्यक्ष काम इथे झालेले आहे. आता फक्त अतिरिक्त ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरू शकतो. पण तसे न करता केवळ १ रुपया प्रतिचौरसमीटर भाडेपट्टीवर ६० वर्षांसाठी ही मोक्याची सुमारे ४४, ८०० चौरसमीटर जागा खाजगी कंपनीच्या घशात घालणे याला भ्रष्टाचार नव्हे तर काय म्हणावे, असा खडा सवाल गोवा पीपल्स फोरमचे निमंत्रक ऍड. सतीश सोनक यांनी केला आहे.
म्हापसा जिल्हा इस्पितळाच्या ‘पीपीपी’चा वाद उच्च न्यायालयात पोहोचला असतानाच आता ‘एनजीपीडीए’च्या मळा प्रकल्पावरून बरेच वादळ उठले आहे. राज्य सरकारच्या ‘पीपीपी’ विभागातील प्रशासकीय अधिकारी नेमके कोणत्या निकषांवर काम करतात हेच कळायला मार्ग नाही, असे ऍड. सोनक म्हणाले. ‘ईडीसी’च्या पाटो प्लाझा प्रकल्पाचे काम ठरावीक मुदतीत पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे कंत्राट रद्द केलेल्या कंपनीकडेच ‘एनजीपीडीए’ कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करते, याला काय म्हणावे? ‘पीपीपी’ विभागाला याची माहिती नाही, असे म्हटले तर तो निव्वळ मुर्खपणा ठरणार असल्याचेही ऍड. सोनक म्हणाले. देश-विदेशातील विविध कंपन्यांची माहिती, खास करून काळ्या यादीतील व कायदेशीर कचाट्यात सापडलेल्या कंपन्यांची यादी ‘पीपीपी’ विभागाकडे असणे गरजेचे आहे. गोव्यातील जमिनींवर आधीच अनेक बड्या कंपन्यांचा डोळा आहे. अशा परिस्थितीत क्षुल्लक लाभापोटी ‘पीपीपी’च्या नावे लाखमोलाच्या जमिनी या कंपनींच्या तावडीत देणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्‍नही त्यांनी केला.
‘एनजीपीडीए’ने कंपनीकडे ५ जानेवारी २०११ रोजी केलेल्या करारात दिलेल्या माहितीप्रमाणे याठिकाणी मार्केट प्रकल्पाची प्रत्यक्ष बांधकाम झालेली जागा २६०० चौरसमीटर असल्याचे म्हटले आहे. ‘एनजीपीडीए’ने या प्रकल्पासाठी १९९४ साली नेमलेले वास्तुरचनाकार भास्कर वागळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही आकडेवारी खोटी असल्याचे सांगून प्रत्यक्ष बांधकामाचे क्षेत्र ३७४२ चौरसमीटर असल्याचा दावा केला. कंपनीकडून उभारण्यात येणार्‍या विविध प्रकल्पांच्या बदल्यात राज्य सरकारला ५.४९ कोटी रूपये हप्त्यांनी मिळणार आहेत. परंतु या सर्व पायाभूत सुविधांच्या करांचा बोजा राज्य सरकारला सहन करावा लागणार आहे. प्रतिमहिना ५ लाख रुपये भाडे व भाडे करारानुसार १ रुपया प्रतिचौरसमीटर प्रमाणे वर्षाकाठी ४४,५०० रुपये वार्षिक करार भाडे मिळणार आहे. ही कंपनी याठिकाणी मल्टीप्लेक्स, तारांकित हॉटेल व इतर मनोरंजनात्मक साधनसुविधा उभारणार आहे. कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावातील ९२ खोल्याच्या तारांकित हॉटेलाचाच हिशेब केला तर दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल ही कंपनी करणार असून त्या बदल्यात ‘एनजीपीडीए’ला मिळणारा मोबदला नगण्य असल्याचेही ऍड. सोनक म्हणाले.

१८ रोजी जाहीर सभा
‘एनजीपीडीए’च्या कथीत ‘पीपीपी’ घोटाळ्याला विरोध करण्यासाठी जागृत गोंयकारांची सभा यांच्यातर्फे १८ जुलै रोजी एका जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या प्रकल्पाच्या जवळच असलेल्या के. बी. हेडगेवार विद्यालयाच्या सभागृहात ही सभा होणार आहे. या सभेत या प्रकल्पावर साधकबाधक चर्चा होणार असून मळा व पणजी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजर राहावे, असे आवाहन ऍड. सतीश सोनक यांनी केले.

शांताराम नाईक यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा

म. गो. व मिकी विरोधात


पणजी, दि.१० (प्रतिनिधी)
कॉंग्रेसश्रेष्ठींनी राज्यसभेच्या एकमेव पदासाठी विद्यमान खासदार शांताराम नाईक यांची उमेदवारी जाहीर केली असून उद्या ११ रोजी श्री. नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शांताराम नाईक यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे, तर म. गो. पक्षाने मात्र त्यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
राज्यसभा खासदार या नात्याने शांताराम नाईक यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा या पदावर त्यांची वर्णी लावण्याचा निर्णय कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतला. प्रदेश कॉंग्रेस समिती व विधिमंडळानेही श्री. नाईक यांच्या नावाला आक्षेप घेतला नसल्याने त्यांचा मार्ग अधिक सुकर झाला. विद्यमान आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शांताराम नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आदेश राष्ट्रवादी विधिमंडळ सदस्यांना दिले. या बैठकीला विधिमंडळ गटाचे नेते तथा महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा हजर होते. पक्षाचे बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांनी मात्र शांताराम नाईक यांना पाठिंबा देण्यास नकार दर्शवला. तसेच राज्यसभा खासदार या नात्याने शांताराम नाईक यांनी म. गो. पक्षाला कधीच विश्‍वासात घेतले नाही. प्रियोळ व मडकई या म.गो. कडील मतदारसंघात खासदार निधीमार्फत एकही योजना त्यांनी राबवली नसल्याने त्यांना यावेळी पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय समितीने घेतल्याचे कार्यकारी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले.
प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यसभा निवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. भाजपकडे आवश्यक आमदारसंख्या नाही व त्यामुळे निवडणुकीत स्वतःचा उमेदवार उतरवण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. असे भाजप प्रवक्ते आमदार दामोदर नाईक म्हणाले. वरोधी भाजपकडे - १४ व एकमेव अपक्ष आमदार अनिल साळगावकर आहे. सत्ताधारी आघाडीतील ७ ते ८ आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याची एखाद्या उमेदवाराची तयारी असल्यास भाजपकडून त्याला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.याबाबत भाजप १९ रोजी आपला निर्णय घेईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘त्या’ डीवायएसपीचे आज निलंबन होणार?

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
महिला पोलिस लैंगिक अत्याचार प्रकरणात अडकलेले गुन्हा अन्वेषण विभागाचे उपअधीक्षक उद्या (सोमवारी) सेवेतून निलंबित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची फाईल चौकशी अधिकारी महिला उपअधीक्षक रीना तोरकाटो यांच्या हाती आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, संबंधित पोलिस अधिकार्‍याने आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.
‘त्या महिला पोलिसने केलेल्या तक्रारीची फाईल माझ्या कार्यालयात आली आहे. अद्याप ती माझ्या हातात आली नसल्याने चौकशी सुरू झालेली नाही. उद्यापासून या चौकशीला सुरुवात होणार आहे,’ अशी माहिती उपअधीक्षक रिना तोरकाटो यांनी दिली.
या तक्रारीनंतर अन्य महिला पोलिस शिपायांनाही आता पोलिस अधिकार्‍याकडून होणार्‍या छळाची खुली चर्चा करायला सुरुवात केला आहे. राखीव दलात तसेच, ‘आयआरबी’त असलेल्या अनेकांनी यापूर्वी तोंडी तक्रारी केल्या होत्या. तर, एक महिला शिपाईने छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही याच पोलिस अधिकार्‍यावर आरोप झाल्याची माहिती असून त्याची चौकशीही केली गेली होती. मात्र, त्या चौकशीचे शेवटी काय झाले हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Sunday, 10 July 2011

‘एनजीपीडीए‘कडून ‘पीपीपी’ हा भूखंड घोटाळा

मळा नागरिक फोरमचा सनसनाटी आरोप
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणतर्फे (एनजीपीडीए) मळा येथील सुमारे ४४, ८०० चौरसमीटर जागा ‘पीपीपी’ पद्धतीवर ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक लिमिटेड, मुंबई’ या कंपनीला ६० वर्षांच्या करारावर दिली आहे. सुमारे १०० कोटी रुपयांची ही मोक्याची जागा विकासाच्या नावाखाली क्षुल्लक भाडेपट्टीवर अगापिछा न पाहता ६० वर्षांसाठी देण्याचा हा व्यवहार म्हणजे ‘पीपीपी’च्या नावाखाली झालेला बडा भूखंड घोटाळाच आहे, असा घणाघाती आरोप मळा नागरिक फोरमतर्फे करण्यात आला आहे.
‘एनजीपीडीए’चा मळा बाजार प्रकल्प व गोवा पायाभूत विकास महामंडळातर्फे राबवण्यात येणारा मळा तलाव सौदर्यीकरण प्रकल्प ही दोन्ही कामे मूळ आराखड्यानुसारच व्हावीत. राज्य सरकारने अर्थपुरवठा करून हे प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत, अशी भूमिका फोरमने घेतली आहे. राज्यात इतरत्र विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, मग राजधानीतील या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध नाही, असे कसे म्हणता येईल, असे मत फोरमचे नेते डॉ. गोविंद कामत म्हणाले. मळा बाजार प्रकल्प व तलाव यांचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले होते व तदनंतर निधीअभावी हे काम रखडले. सध्याच्या परिस्थितीत फक्त ५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर हे दोन्ही प्रकल्प दिमाखात उभे राहू शकतात. परंतु असे न करता आता ‘एनजीपीडीए’नेे हे दोन्ही प्रकल्प ‘पीपीपी’ पद्धतीवर खाजगी कंपनीला दिले आहेत. ‘ईडीसी’ कडून पाटो प्लाझातील पायाभूत सुविधा उभारण्याचे कंत्राट दिलेली व हे काम योग्य वेळात पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने हे कंत्राट रद्द करण्यात आलेल्या ‘मेसर्स कनका इन्फ्राटेक लिमिटेड’ या कंपनीकडेच ‘एनजीपीडीए’ने कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाचा करार कोणत्या आधारावर केला, असा सवाल निनाद वाडेकर यांनी केला.
३ जानेवारी २०११ रोजी या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या कराराची कोणतीही कल्पना महापालिकेला नाही. महापालिकेकडून ना हरकत दाखला घेतला नाही. महापालिकेच्या शहर विकास आराखड्यानुसार या प्रकल्पाची फेररचना केली आहे काय, याचीही कुणाला खबर नाही. ‘पीपीपी’ पद्धतीवर याठिकाणी अलिशान व्यापारी, मनोरंजन तथा इतर सार्वजनिक प्रकल्प उभे राहतील. त्यासाठी पर्यावरणीय परिणाम अहवाल, सांडपाणी निचरा, कचरा विल्हेवाट, पार्किंगची सोय, विजेची सोय, रूई दे ओरेम खाडीचे संरक्षण, सीआरझेड परवाना आदी सर्व गोष्टींबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. पणजी बाजारावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठीच मळा येथील लघू बाजार प्रकल्पाची कल्पना सादर झाली. ताळगाव, सांताक्रुझ, मळा व आजूबाजूचे लोक या बाजार प्रकल्पाचा वापर करतील व आपोआपच पणजी शहरातील वाहतूक व लोकांचा लोंढा कमी होईल, अशी योजना होती. आता या नव्या तारांकित प्रकल्पामुळे मळा येथील स्थानिक लोकांचे जगणेच ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. पाटो पुलानंतर पणजीत प्रवेश करण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे रूआ दे ओरेम रस्ता. या संपूर्ण प्रकल्पासाठी याच रस्त्याचा वापर करण्याचे ठरले आहे. आधीच या रस्त्यावर दोन ते तीन विद्यालये आहेत. नेहमीच वाहतुकीने गजबजलेला हा रस्ता या प्रकल्पाचे ओझे वाहू शकेल काय, याचा कुणीच अभ्यास केलेला नाही. या व्यतिरिक्त इतर अंतर्गत रस्त्यांचाही वापर करण्यात येणार असल्याने ही एक नवी डोकेदुखीच स्थानिकांना ठरणारी आहे.
६० वर्षांसाठी फक्त ५ लाख रुपयांचे भाडे कंपनीतर्फे ‘एनजीपीडीए’ला देण्याचे ठरले आहे. सुरुवातीला ५ कोटी रुपयांचा भरणा केला गेला असला तरी या जागेची सध्याची किंमतच १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचते व त्यामुळे हा व्यवहार मान्य करताच येणारा नाही. मल्टीप्लेक्स, फुड कोर्ट, शॉपींग सेंटर, पार्टी हॉल तसेच तलावाठिकाणीही विविध मनोरंजनात्मक प्रकल्प उभारण्याचा मनोदय कंपनीतर्फे करारात व्यक्त करण्यात आला आहे. ‘एनजीपीडीए’चे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांनी याबाबत दिलेले स्पष्टीकरण त्यांचे अज्ञान प्रकट करणारे आहे. त्यांना या प्रकल्पाची कोणतीच माहिती नसल्याचा टोला हाणून त्यांनी मळा नागरिकांसमोर उघड चर्चेसाठी येण्याचे आमंत्रण स्वीकारावे, असे अवाहनही फोरमने केले आहे.

डिचोलीत भाषाप्रेमींची पुलाच्या उद्घाटनप्रसंगी जोरदार निदर्शने

• १७ जणांना अटक • जामीन न देता सुटका
डिचोली, दि. ९ (प्रतिनिधी): डिचोली नदीवरील समांतर पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आज (दि.९) मातृभाषाप्रेमी नागरिकांनी उद्घाटनास आलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव तसेच कामत सरकार विरोधात घोषणा देत काळे बावटे दाखवत निषेध केला. या निषेधाच्या घोषणांतच सभापती प्रतापसिंग राणे यांनी पुलाचे उद्घाटन केले. याप्रसंगी निषेधाच्या घोषणा देणार्‍या १७ कार्यकर्त्यांना अटक केल्याने डिचोलीत तणाव निर्माण झाला. मात्र संध्याकाळी या सर्वांची सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कामत व आलेमांव यांनी डिचोली पालिकेच्या सभागृहातील कार्यक्रमात सहभागी झाल्याने पालिका इमारतीचे गोमूत्र शिंपडून भाषाप्रेमींनी शुद्धीकरण केले.
सरकारचा निषेध करत डिचोलीतील जुना पूल ओलांडत कार्यकर्ते उद्घाटन समारंभाच्या ठिकाणी आले असता तिथे पोलिसांनी दोरखंड घालून त्यांची वाट अडवली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आंदोलनकर्त्यांनी सरकारचा घोषणा देत निषेध नोंदवला. उद्घाटन झाल्यानंतरचा कार्यक्रम पालिका सभागृहात चालू असताना रस्त्यावर घोषणा देणार्‍या १७ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. निदर्शकांना पोलिसांनी वाळपई पोलिस स्थानकात नेले. आंदोलकांनी यावेळी आपला कोणताच दोष नसताना आपल्याला का अटक करण्यात आली असा सवाल केला. यानंतर त्यांना डिचोली पोलिस स्थानकात आणण्यात आले. जामिनावर सुटका करण्यासाठी बॉंडवर सही करण्यास सांगितले असता सर्वांनी नकार दिला. निदर्शकांनीही आक्रमक होत जामीन देणार नाही असा पवित्रा घेतला. यानंतर अनेक कार्यकर्ते पोलिस स्थानकात दाखल झाले. त्यांनी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याची तयारी केली असता पोलिसांनी सतराही जणांची सुटका केली.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भाजपचे खासदार श्रीपाद नाईक, आमदार राजेश पाटणेकर, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, सदानंद तानावडे, अनंत शेट, सतीश धोंड यांच्यासह अनेक नेत्यांनी धाव घेतली. यावेळी खासदार नाईक यांनी कामत सरकारचा निषेध करताना मुख्यमंत्री कामत हे सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. सरकार माध्यमप्रश्‍नावरील आपला निर्णय मागे घेत नाही तोवर हा लढा चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. पार्सेकर यांनी डिचोलीतील कार्यकर्त्यांनी आपले प्रत्येक आंदोलन यशस्वी केले असून आजही अटक केलेल्या कार्यकर्त्यांनी जामीन न देता सुटका करण्यास पोलिसांना भाग पाडत आपली ताकद दाखवून दिल्याचे सांगितले. यावेळी आमदार पाटणेकर, डॉ. सावंत, शिल्पा नाईक, अंकिता न्हावेलकर यांनी सरकारच्या कृतीचा निषेध केला.
दरम्यान, उद्घाटनप्रसंगी निदर्शने होणार असल्याने या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रुग्ण दगावण्याचीच आरोग्यमंत्री वाट पाहत आहेत का?

फ्रान्सिस डिसोझा यांचा खडा सवाल
• आझिलो इस्पितळाची पाहणी

म्हापसा, दि. ९ (प्रतिनिधी): आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे आझिलो इस्पितळात एखादा रुग्ण दगावण्याचीच वाट पाहत आहेत का असा सवाल करत आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या जिवाशी खेळू नये असा इशारा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी दिला. यावेळी त्यांनी इस्पितळाची इमारत केव्हाही कोसळून रुग्णांच्या जिवावर बेतू शकते असा दावा करत येत्या आठ दिवसांत या इस्पितळातील रुग्णांना नव्या इमारतीत स्थलांतरित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
येथील आझिलो इस्पितळाच्या दुर्दशेबाबत दै. ‘गोवादूत’मध्ये आज (दि.९) वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित अधिकार्‍यांनी धाव घेऊन पाहणी केली. स्थानिक आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनीही इस्पितळाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची माहिती करून घेतली. यावेळी त्यांना तेथे अनेक त्रुटी जाणवल्या. यावेळी त्यांच्यासोबत राजसिंग राणे, रुपेश कामत, संदीप फळारी, अखिल पर्रीकर, आस्त्रालीनो डिमेलो, मधुकर नाईख, वल्लभ धाकणकर, महेश तिवरेकर, नागेश मयेकर, मेरी डायस, अभय कामत उपस्थित होते.
आझिलो इस्पितळातील रुग्णांवर या पावसाच्या दिवसांत जलाभिषेक होत असून त्यामुळे खाटा दुसरीकडे हलवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी गळत असल्यामुळे भांडी ठेवण्यात आली आहेत. वीजतारा लोंबकळत असून ‘आयसीयू’ची स्थिती नावाप्रमाणेच झाली आहे. अनेक ठिकाणी इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. भिंतींना तडे गेले असून पुरुष मेडिसीन वॉर्डमधील छपराचे वासे पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे हे छप्पर कधी कोसळून पडेल याचा नेम नाही. इस्पितळाची इमारत तर झाडाझुडपांनी वेढलेली आहे. त्यामुळे सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर वाढला आहे. खिडक्यांची स्थिती तर अगदीच दयनीय झालेली आहे. त्यांना काचा तर नावालाही नाहीत. गज आहेत पण ते गंज आल्याने मोडकळीस आले आहेत. एकंदर स्थिती पाहता सदर इस्पितळ केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी गांभीर्याने पावले उचलावीत अशी मागणी आमदार ऍड. डिसोझा यांनी केली आहे.
इस्पितळाच्या इमारतीचे छप्पर दुरुस्ती करण्यासाठी गेल्या वर्षी सुमारे एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तसा प्रस्तावही संमत करण्यात आला होता. परंतु त्याचे घोडे कुठे अडले ते कळत नाही. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले इस्पितळ ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा आरोग्यमंत्र्यांचा विचार आहे. बहुधा ते एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे, जेणेकरून त्यांची ही इच्छा पूर्ण होईल असा गंभीर आरोप ऍड. डिसोझा यांनी केला.

देशप्रभू व परूळेकर गटांत जुंपली

राष्ट्रवादीतील वाद हातघाईवर
पणजी, दि .९ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वादाचे रूपांतर आज हमरीतुमरीवरून चक्क हातघाईवर आल्याने पक्षात प्रचंड असंतोष पसरला आहे. प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी बोलावलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांचा समर्थक गटही सहभागी झाला व त्यात एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. देशप्रभू व सुरेश परूळेकर यांच्यात झालेल्या धमासानाचे पर्यवसान हातघाईवर होण्याचे तेवढे बाकी होते. अखेर या अंतर्गत वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी हस्तक्षेप करावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
जितेंद्र देशप्रभू यांनी राष्ट्रवादीच्या प्रभारी भारती चव्हाण यांच्यावर केलेल्या बेछूट आरोपांमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सुरेश परूळेकर यांना ज्येष्ठ उपाध्यक्षपद बहाल करण्यात आर्थिक व्यवहार झाला तसेच अनेकांवर विविध पदांची खैरात करून भूखंड व पैशांचे व्यवहार झाल्याचेही देशप्रभू यांनी म्हटले होते. देशप्रभू यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज खास कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला बहुतांश सर्वच कार्यकारिणी सदस्य हजर होते. श्रीमती भारती चव्हाण या गोव्यात आल्या असून त्यांचे वास्तव येथील एका हॉटेलात आहे. त्यांनी दिलेल्या आदेशावरून जितेंद्र देशप्रभू यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे कारस्थान रचल्याचा सुगावा लागताच देशप्रभू यांनी युवा राष्ट्रवादी व सेवा दल यांच्या पाठिंब्याने चव्हाण समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी श्री. परूळेकर व श्री. देशप्रभू यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर श्री. परूळेकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. एकीकडे पक्षाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी अंतर्गत वादात हस्तक्षेपाची मागणी करणारा ठराव घेतला तर दुसरीकडे भारती चव्हाण यांचे प्रभारीपद काढून घेण्याची मागणी देशप्रभू समर्थकांनी केली.
दरम्यान, भारती चव्हाण या गोव्यात असूनही त्यांनी पत्रकारांची भेट घेण्याचे टाळले. संध्याकाळी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करून त्यांनी उद्या १० रोजी पत्रकारांना संबोधीत करण्याचे ठरवले आहे. जितेंद्र देशप्रभू यांनी केलेल्या गंभीर आरोपांना त्या कोणते प्रत्युत्तर देतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास : प्रा. अनिल सामंत

महालक्ष्मी मंदिरात ‘मातृभाषा रक्षण’ परिसंवाद
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): मुळापासून इंग्रजी शिकणार्‍या मुलांचा सर्वांगीण विकास होत नाहीच, मात्र अशा मुलांना अकाली नैराश्य येण्याचे प्रमाण जास्त असते. शिक्षणतज्ज्ञांनी व मानसोपचारांनी केलेल्या निरीक्षण व संशोधनानंतर हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे पालकांनी इंग्रजीचा सोस सोडून द्यावा व आपल्या मुलांना किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सामंत यांनी आज येथे बोलताना केले.
पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजीत‘ मातृभाषा रक्षण’ या परिसवंदात ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, लेखक डॉ. प्रमोद पाठक, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे व निमंत्रक जयेश थळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे प्रा. सामंत म्हणाले की, इंग्रजी भाषा माध्यम हे देशापासून गोव्याला तोडण्याचे एक मोठे षड्यंत्र असून वेळीच सावध व्हावे. हे घडू दिल्यास गोव्याची अस्मिता, संस्कृती, प्रादेशिकता व इतिहास नष्ट होईल. भाषा ही पोटासाठी नसते तर ती व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असते. भाषा स्वाभिमान जागृत करते. भाषा गेली तर अस्तित्वच नष्ट होईल असे प्रा. सामंत यांनी यावेळी सांगितले.
डॉ. पाठक यांनी यावेळी, सरकारने जाणून बुजून मराठी शाळांचा दर्जा खालावला असल्याने पालक इंग्रजीकडे वळले आहेत. सध्या इंग्रजीला मान आहे पण भविष्यात तो असेलच असे नाही.मात्र मराठी ही जुनी परुराणी भाषा असून ती सदैव सन्मान प्राप्त करून देते त्यामुळे इंग्रजीकडे धावणार्‍या पालकांनी याचा विचार करावा असे आवाहन केले.
या वेळी बोलताना जयेश थळी यांनी गोवा वाचवण्यासाठी व गोव्याचे आराष्ट्रीयीकरण रोखण्यासाठी लोकांनी देशाभिमानी राज्यकर्ते निवडून द्यावेत असे आवाहन केले.
कामत सरकारने अल्पशिक्षित व चरित्रहिन राजकारण्याच्या दबावाला बळी पडून जो इंग्रजीकरण करण्याचा चंग बांधला आहे तो देशद्रोह असून अशा पापी लोकांना देहान्ताची शिक्षा देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केले. अल्पसंख्यांच्या मताला राजमान्यता देऊन सत्ताधारी समाजात फूट पाडत असून या अराष्ट्रीय कृत्याविरुद्ध प्रत्येक स्वाभिमानी गोवेकराने उठाव करत हे सरकार उलथून टाकावे असे आवाहन श्री. करमली यांनी केले.
गोव्यात बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाची मागणी मातृभाषेतून शिक्षण हीच असताना गोवा सरकार अल्पसंख्यांकाच्या दबावाला घाबरून बहुसंख्यांवर अल्पसंख्यांकाची इंग्रजी माध्यमाची मागणी लादत आहे. बहुसंख्याकांच्या भावनांचा आदर न करणार्‍या सरकारला बहुसंख्यांकाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे प्रतिपादन रमेश शिंदे यांनी यावेळी केले. परेश प्रभू यांनीही यावेळी यांनीही आपल्या भाषणातून इंग्रजी माध्यमाला विरोध केला व पाचवीनंतरच इंग्रजी ठीक असल्याचे प्रतिपादन केले. सूत्रनिवेदन राजेश कोरगावकर यांनी केले.
------------------------------------------------------------------
विदेशी शिकू लागलेत मराठी
या कार्यक्रमात भारतीय संस्कृती व भाषा विशेषता मराठी भाषेची महती पटून ती आत्मसात करण्यासाठी गोव्यात राहणार्‍या फ्रान्स येथील सिरीयान पालीया यांनी आपण मराठी भाषा शिकत असल्याचे सांगून आपल्या मुलीला मराठी शाळेत दाखल केल्याचे सांगितले. यावेळी सिरीयाना पालीया व त्यांची मुलगी अनास्थासीया यांनी मराठी व संस्कृत प्रार्थना म्हणून दाखवल्या. मराठी व संस्कृत भाषा बोलल्याने व वाचल्याने मनाला शांती मिळून जीवनात सात्त्विकता निर्माण होते असा अनुभव आपल्यास आल्याने आपण मराठीचे अध्ययन करत आहे अशी प्रतिक्रिया सिरीयाना यांनी यावेळी व्यक्त केली.