Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 7 March 2011

‘पोर्तुगीज छळाचा खरा इतिहास शिकवा’

पणजीत भारतीय स्त्री शक्ती कार्यकर्ता संमेलन
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
गोव्यावर ४५० वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी येथील लोकांवर अमानुष अन्याय व अत्याचार केलेले आहेत. मात्र विद्यमान शिक्षण प्रणालीत या छळाचा खरा इतिहास मुलांना शिकवला जात नाही. त्यामुळे आत्ताची पिढी असंस्कृत बनत चालली आहे. मातांनी स्वाभिमानाचे तेज अबाधित ठेवून आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवून त्यांच्यात देशभक्तीचे स्फुल्लिंग भरावे. जेणेकरून देशात देशभक्तांची संख्या वाढेल व सुसंस्कृत पिढीद्वारे देशाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलींगकर यांनी आज येथे बोलताना केले.
‘भारतीय स्त्री शक्ती’च्या गोवा विभागातर्फे पणजी येथे आयोजित कार्यकर्ता संमेलनात प्रा. वेलींगकर ‘गोव्याचे राष्ट्रजीवन व महिला’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी बोलताना प्रा. वेलींगकर म्हणाले की, गोवा स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पिढीला गोवा मुक्तीचा खरा इतिहास शिकवला गेला नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर छत्रपती शिवाजी वा संभाजी महाराजांचा आदर्श राहिला नाही. काहीजण अजूनही अत्याचारी तथा दुष्ट पोर्तुगीजांचे पोवाडे गात आहेत. हे योग्य नसून प्रत्येक महिलेने गोव्याच्या खर्‍या इतिहासाचा व पोर्तुगीजांच्या अत्याचारी छळाचा इतिहास वाचायला हवा व त्यावरून आपल्या कार्याची दिशा ठरवायला हवी. यावेळी प्रा. वेलींगकर यांनी उपस्थित महिलांना गोवा मुक्तीचा व पोर्तगीजांच्या छळाचा इतिहास कथन केला. या वेळी प्रा. वेलींगकर यांनी आजही पोर्तुगिजांंची भाटशाही करणार्‍यांवर जोरदार ताशेरे ओढले व देशभक्तांच्या कार्यांचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्यामल कामत यांनी प्रा. वेलींगकर यांचे स्वागत केले.
स्वतःवर विश्वास ठेवून कार्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास समाजकारण व राजकारण यात निश्‍चित यश मिळते. असे प्रतिपादन श्रीमती मनस्विनी प्रभुणे यांनी येथे बोलताना केले. भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्ता संमेलनात ‘३३ टक्के आरक्षण व कुटुंबव्यवस्थेवर परिणाम’ या विषयावर बोलताना श्रीमती प्रभुणे यांनी वरील प्रतिपादन केले. त्या पुढे म्हणाल्या की, योग्य नियोजन व आत्मविश्वास याद्वारे कुठल्याही क्षेत्रात कार्यतत्पर राहता येते व त्याबरोबरच कुटुंबसुद्धा चालवता येते.
या सत्रा पूर्वीच्या सत्रात डॉ. राजेश धुमे यांनी ‘महिलांची मानसिकता व कुटुंब’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या अध्यक्षा ऍड. स्वाती केरकर, सचिव सुनिता दांडे, खजिनदार दीपाली बाणस्तारकर व श्यामल कामत यांच्या उपस्थितीत दिवसभर आयोजित या कार्यकर्ता संमेलनाचा समारोप झाला.

मद्यधुंद कारचालकाच्या ठोकरीने करंझाळेत महिला जागीच ठार

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
करंझाळे येथील नोबर्ट फिटनेस स्टुडिओच्या फुटपाथवरून चालणार्‍या शमीम बानू (३६) या महिलेला स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने शमीम हिचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी जबरदस्त होती की स्विफ्टचे पुढील चाक तुटून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला पडले.यावेळी संतप्त जमावाने स्विफ्ट कार चालक मॅलरोन पेद्रू रोड्रिगीस (२२) याची बरीच धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. यावेळी कारमध्ये असलेल्या अन्य तीन तरुणांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली. वाहनात बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवला आहे. तर, चालक मॅलरोन याला झालेल्या मारहाणीमुळे त्याला त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मॅलरोनविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहितीनुसार, स्विफ्ट कार (जीए ०६ सी १९१६) ही मिरामार येथून भरधाव वेगाने दोनापावलाच्या दिशेने जात होती. यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खांबाला त्याने आधी धडक दिली. त्यानंतर रस्त्यापासून सुमारे २० मीटर बाहेर चालणार्‍या मयत शमीम हिला धडक दिली. यात शमीम जागीच ठार झाली. शमीम ही त्याच परिसरात राहणारी असून तिला दोन लहान मुले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घटनेचा पंचनामा पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक बबन पवार यांनी केला असून याविषयीचा अधिक तपास ते करीत आहेत.

Sunday, 6 March 2011

‘पणजी फर्स्ट’ला निवडून द्या : पर्रीकर


(जाहीरनाम्याचे प्रकाशन)

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेची १३ मार्च रोजी होणारी निवडणूक राजधानीतील लोकांची मानसिकता दर्शवणारी ठरणार आहे. स्वच्छ प्रशासन व सुनियोजित विकास यासाठी पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलला निवडून द्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते तथा पणजीचे आमदार मनोहर पर्रीकर यांनी आज येथे बोलताना केले.
‘पणजी फर्स्ट’च्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पर्रीकर बोलत होते. यावेळी खासदार श्रीपाद नाईक, माजी महापौर अशोक नाईक, विद्यमान नगरसेवक मिनीन डिक्रुझ, संदीप कुंडईकर, दीक्षा माईणकर, वैदेही नाईक, वर्षा हळदणकर, रुपेश हळर्णकर, सुरेश चोपडेकर, ज्योती मसुरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
खासदार श्री. नाईक यांच्या हस्ते ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना श्री. नाईक यांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनल पणजीच्या अर्थात पणजीकरांच्या हितासाठी स्थापन झाले असल्याचे सांगून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पणजीच्या मतदारांनी या पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले.
श्री. पर्रीकर यांनी यावेळी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या आगामी योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. या जाहीरनाम्यात पणजीकरांचे हित साधणार्‍या विविध योजना पॅनलतर्फे आखण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पार्किंगचे सुनियोजन, वाहतुकीत सुधारणा व त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा उपलब्ध करून विविध योजनांची कार्यवाही करणे, बाजारसंकुलाच्या तिसर्‍या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करणे, कॅसिनोतील बेकायदा गोष्टींना आळा घालणे, ज्येष्ठांसाठी घरबसल्या विविध सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून योजना आखणे, अस्वच्छतेवर उपाय, मुख्य रस्त्याशेजारील जुन्या घरांचे महापालिकेच्या खर्चाने रंगकाम करणे, मळा मार्केट प्रकल्पाचे काम मार्गी लावणे, महापालिकेचे नियम पणजी महापालिकेला लागू व्हावेत म्हणून प्रयत्न करणे, महापालिकेला असलेल्या विविध अधिकारांचा प्रभावीपणे वापर करून महसूल गोळा करणे व महापालिका क्षेत्रातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास करणे, सरकारी संस्था व इमारतींकडून महापालिकेला येणे असलेला कर निधी वसूल करण्यावर भर आदी अनेक योजनांची माहिती श्री. पर्रीकर यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
मळा तलावाचे सौंदर्यीकरण
पत्रकारांनी मळा तलावाबाबत श्री. पर्रीकर यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, मळा भागाला एैतिहासिक महत्त्व आहे. आपल्या कारकिर्दीत तेथे अनेक विकासकामे झाली. मात्र विद्यमान सत्ताधारी मंडळाने त्यानंतर या भागाकडे दुर्लक्षच केले. मळा तलाव व त्या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार असून त्यासाठी विकास योजना तयार आहे असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
पणजीत येण्यास तिसरा रस्ता
सकाळ - संध्याकाळ पणजीत ये-जा करणार्‍या वाहनचालकांची वाहतूक कोंडीमुळे बरीच तारांबळ उडते. त्यासाठी पाटो प्लाझा वस्तुसंग्रहालय ते नेवगीनगर पणजी शहर असा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे. ‘पणजी फर्स्ट’ पॅनल सत्तेवर आल्यानंतर त्वरित या कामाला सुरुवात होईल. सध्या फक्त प्राथमिक स्तरावर या रस्त्याची आखणी सुरू आहे अशी माहिती श्री. पर्रीकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाचे उत्तर देताना दिली.
दुकाने वाटपांचे फेरसर्वेक्षण
बाजारसंकुलातील दुकाने वाटप घोटाळ्यांची सखोल चौकशी करून त्यामध्ये अडकलेल्यांवर कारवाई व्हावी यासाठी ‘पणजी फर्स्ट’ प्रयत्न करणार आहे. सत्तेवर आल्यानंतर दुकाने वाटपांचे फेरसर्वेक्षण करून अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, असेही एका प्रश्‍नाचे उत्तर देताना श्री. पर्रीकर म्हणाले.
रायबंदर येथे पाणीप्रकल्प
महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ‘पणजी फर्स्ट’चा प्रयत्न असेल. पॅनल सत्तेवर येताच रायबंदर व पाटो परिसरात स्वच्छ पाणीपुरवठा करणारे प्रकल्प उभारण्यात येतील असे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
सांतइनेज नाल्याची स्वच्छता
महापालिकेवर ‘पणजी फर्स्ट’ची सत्ता येताच सांतइनेज नाल्याची स्वच्छता व त्याचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येईल. ‘फक्त सत्ता द्या, वभागवार समित्या स्थापून व विविध विकास योजना आखूनपणजीकरांच्या सर्व आकांक्षांची पूर्तता करू’ असे आश्‍वासन श्री. पर्रीकर यांनी यावेळी बोलताना दिले.


सेमीफायनल नव्हे
पणजी महापालिका निवडणूक ही येत्या विधानसभेची सेमीफायनल आहे का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारताच श्री. पर्रीकर म्हणाले की, पणजी महापालिकेत पणजी विधानसभा क्षेत्राचे तब्बल २१ तर ताळगाव मतदारसंघात फक्त ९ विभाग येतात. त्यामुळे महापालिका निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल ठरू शकत नाही. मात्र, लोकांना ‘भ्रष्टाचार हवा की विकास हवा’ हे यावेळी स्पष्ट होणार असल्याने ही निवडणूक संपूर्ण गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे असे ते म्हणाले.
युवा उमेदवार रिंगणात
‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे अशोेक नाईक सोडले तर सर्व उमेदवार हे तिशीतील म्हणजेच तरुण आहेत. म्हणूनच पणजीच्या मतदारांनी तरुणांच्या हातात महापालिकेची सत्ता द्यावी, असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी केले.
मते द्या, विकास देतो : अशोक नाईक
पणजीतील अनेक नामवंत मंडळींनी आग्रह केल्यामुळेच आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे. पणजीच्या मतदारांनी ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे, आपण मतदारांना सर्वांगीण विकास म्हणजे काय हे दाखवून देऊ, असे ‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे नेते माजी महापौर अशोक नाईक यांनी यावेळी सांगितले.

वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश


एका मुलीची सुटका, दोघाजणांना अटक

म्हापसा, दि. ५ (प्रतिनिधी)
हडफडे - बागा येथे वेश्या व्यवसायात गुंतलेल्या एका रॅकेटचा हणजूण पोलिसांनी पर्दाफाश केला व कोलकाता येथील एका ३० वर्षीय मुलीची सुटका केली. या प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून दोघाजणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार काल सायंकाळपासून पोलिसांनी हडफडे येथील ‘मायोना रेस्टॉरंट’ जवळ सापळा रचला. रात्री ८.३० च्या सुमारास मिळालेल्या माहितीवरून एक मारुती कार अडविली. त्यांचा संशय खरा ठरला व वेश्या व्यवसायात गुंतलेल्या मूळ कोलकाता येथील (सध्या वास्तव्य बोर्डे -मडगाव) एका ३० वर्षीय मुलीची सुटका केली. या अनैतिक व्यवसायात हात असलेली दलाल मधू वसंत पै (३६, रा. पुणे - सध्या वास्तव्य शंकरवाडी - तालीगाव) व कारचालक मधुकर घोटणे (३४, सांताक्रुझ) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चालू आहे.

मामा-भाच्याची वृद्धाला मारहाण

म्हापसा, दि. ५ (प्रतिनिधी)
पूर्ववैमनस्यातून मामा-भाच्याने एका वृद्ध माणसाला गंभीर मारहाण केल्याची घटना आज कुशे - खोर्जुवे येथे घडली
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी श्यामसुंदर बांदेकर (६५) आणि गुरूदास गडेकर या दोन्ही शेजार्‍यांमध्ये पूर्वीपासून वैर आहे. आज त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. श्यामसुंदर हे एकटेच असल्याची संधी साधून गुरूदास गडेकर आणि नीलेश साळगावकर (व्हडले भाट - शिवोली) या मामा-भाच्याने श्यामसुंदर यांना लोखंडी सळईने गंभीर मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी ते धावत सुटले व रक्ताने माखलेल्या कपड्यानिशी घर गाठले. घरातील मंडळींनी लागलीच त्यांना उपचारासाठी म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल केले. त्यांची पत्नी सुशीला बांदेकर यांनी याबाबत वरील संशयित आरोपींविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. निरीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळा जाधव अधिक तपास करीत आहेत.

किडणी कॅन्सरवर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलामुळे व राहणीमानातील भिन्नतेमुळे सध्या किडणी कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यावर आंतरराष्ट्रीय विचारविनिमय करूनच उपाय करता येतील, असे मत अमेरिकेतील किडणी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. कॅरोलीन ब्लँकमिस्टर यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले. दोनापावला येथे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय किडणी कॅन्सर व त्यावरील उपाय’ या परिसंवादात डॉ. ब्लँकमिस्टर बोलत होत्या.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डिचोली शाखेतर्फे आयोजित या परिसंवादाचे उद्घाटन अमेरिकेतील किडणी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रिमो लारा व डॉ. रोनाल्ड बुकोवस्की यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेडिकल असोसिएशनच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पडवळ, डिचोली अध्यक्ष डॉ. शेखर साळकर व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. साळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, गेल्या दहा वर्षांत भारतात किडणी कॅन्सरचे प्रमाण फारच वाढले आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडून यावी यासाठी टाटा इस्पितळ, मुंबई व प्रायझर ऍन्कालॉजी यांच्या सहकार्याने इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दि. १० मार्च रोजी ‘जागतिक किडणी दिना’चे औचित्य साधून दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये जगातील नामवंत किडणी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. रोनाल्ड बुकोवस्की, डॉ. प्रिमो लारा, डॉ. वनिता नोरोन्हा, डॉ. हरिहरन सुब्रह्मण्यम, डॉ. एस. के. रावळ, डॉ. एम. सी. कर, डॉ. अपूर्वा शेट, डॉ. टी. बी. युवराज, डॉ. नरेश सोमानी, डॉ. शरदावत मुखोपाध्याय सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

‘किंग मोमो’ची राजवट सुरू


‘खा, प्या, मजा करा’ घोषणेने कार्निव्हलला प्रारंभ
पणजी, दि. ५ (सांस्कृतिक प्रतिनिधी)
‘खायात पियात मजा करात’ म्हणत किंग मोमोच्या घोषणेने आजपासून गोव्यात कार्निव्हलला सुरुवात झाली. येथील जुन्या सचिवालयाकडून सुरू झालेल्या या कार्निव्हल मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या उपस्थित बावटा दाखवून झाला. त्यामध्ये निसर्ग वाचवा, विटी-दांडू, लगोरी यासारखे पारंपरिक खेळ तसेच प्राणी वाचवा, वाढत्या कचरा प्रकरणावर उजेड टाकणारे चित्ररथ, गोव्यातील पारंपरिक व्यवसाय, क्रिकेट विश्‍वचषक मिरवणूक आदी विषयांवरील चित्ररथ आकर्षक होते.
‘गोंयच्या राखणदारांचो आवाज’ संघटनेने वाढता भ्रष्टाचार, बेकायदा जमीनविक्री प्रकरण, अमली पदार्थांची विक्री, राजकारणात चाललेला धिंगाणा या विषयांवर प्रकाश टाकणारी जाहिरात करून माफिया राज्यकर्त्यांच्या विरोधात दोन हात कण्यासाठी आज आपण एकत्र होणे काळाची गरज आहे अशी पत्रके वाटली. सदर मिरवणुकीत एकूण ९५ चित्ररथ सहभागी झाले होते. ही मिरवणूक जुन्या सचिवालयाकडून कला अकादमीपर्यंत चालली होती.
गोवा ही सांस्कृतिक वारसा असलेली भूमी आहे. या संस्कृतीचा एक भाग म्हणून कार्निव्हल उत्सव साजरा केला जातो, असे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी मिरवणुकीच्या उद्घाटनावेळी सांगितले.



वाहतुकीची कोंडी
या उत्सवामुळे पणजीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. शहरातून बाहेर जाणार्‍या लोकांना बसस्थानकापर्यंत चालत जावे लागले तर स्वतःचे वाहन घेऊन जाणार्‍यांना पाच मिनिटांच्या वाटेसाठी एक तास रखडावे लागले. कार्निव्हल मिरवणुकीची सुरुवात दुपारी ३ वाजल्यापासून झाली होती, परंतु वाहतुकीत बदल फक्त दोन तास अगोदर म्हणजे दुपारी १ वाजता करण्यात आला. त्यामुळेच वाहतुकीची समस्या निर्माण झाली.

पणजी शहराला वाचवण्याची शेवटची संधी : अशोक नाईक

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
गेल्या पाच वर्षांत पणजी महापालिका क्षेत्राच्या विकासाबाबत झालेल्या अक्षम्य फरफटीचा वचपा काढून या सुंदर शहराला एक नवी झळाळी प्राप्त करून देण्याचा संकल्प ‘पणजी फर्स्ट’ पॅनलने सोडला आहे. विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व शहरासमोरील बिकट समस्यांवर मात करणार्‍या कल्पक योजना राबवून राजधानीचे रूपांतर देशातील एका अव्वल शहरात करण्याची योजनाच या गटाने आखली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या कुशल नेतृत्वाचे मार्गदर्शन ही या पॅनलची भक्कम बाजू असून पणजी शहराला वाचवण्याची ही शेवटची संधी आहे असे जाहीर आवाहन माजी महापौर तथा ‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे नेते अशोक नाईक यांनी केले.
पणजी महापालिकेला लागलेले निष्क्रियतेचे ग्रहण दूर करण्याची धुरा आता समस्त पणजीवासीयांना आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या निष्क्रिय नेतृत्वाचे गंभीर परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागत आहेत. राज्यातील विविध भागांत गोमंतकीय जनता गोवा वाचवण्याचा निर्धार करून बाहेर पडली असतानाच पणजी महापालिकेच्या निवडणूक कौलाकडे एका आश्‍वासक व क्रांतिकारी नजरेने ही जनता पाहत आहे. राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरवासीयांनी मनोहर पर्रीकर यांना सतत तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले व एक नवा इतिहास रचला. माजी मुख्यमंत्री व आता विरोधी पक्षनेते या नात्याने श्री. पर्रीकर यांची स्वच्छ व विकासात्मक कार्यपद्धती अजूनही गोमंतकीयांच्या स्मृतीत ताजी आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत संपूर्ण जनता पर्रीकरांकडेच आशेचा एकमेव किरण या नजरेने पाहत आहे. त्यांचेच मार्गदर्शन लाभलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या हाती महापालिकेचे भवितव्य सोपवून एका नव्या राजकीय परिवर्तनाची मुहूर्तमेढ पणजीवासीयांनी रोवावी असे आवाहन अशोक नाईक यांनी केले.
पणजी व पर्यायाने संपूर्ण गोवा वाचवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे एक मिशनच आहे. त्यासाठीच प्रत्येक पणजीकराने आपल्या मतदानाचा हक्क बजावून त्याला यश मिळवून द्यावे. सुशिक्षित, बुद्धिजीवी, जाणकार व त्याचबरोबर कष्टकरी समाज या सर्व घटकांचा मिलाफ येथील मतदारांत होतो. पैशांच्या नोटा व चैनीच्या वस्तूंच्या आमिषांना बळी पडून आपला स्वाभिमान व प्रतिष्ठा विकण्याचा मूर्खपणा पणजीवासीय कदापि करणार नाहीत. मनोहर पर्रीकरांसारख्या नेत्याची निवड केलेला हा मतदार आपली शान महापालिकेच्या निवडणुकीतही कायम राखणार आहे. गोव्याचा विद्ध्वंस करू पाहणार्‍या भ्रष्ट व आपमतलबी नेतृत्वाला सडेतोड प्रत्युत्तर देऊन संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याची सुवर्णसंधी पणजीवासीय वाया घालवणार नाहीत असा विश्‍वासही श्री. नाईक यांनी व्यक्त केला. मतदान हे एकदाच करावयास मिळते पण त्याचे परिणाम मात्र पुढील पाच वर्षे भोगावे लागतात. त्यामुळे मतदान करताना प्रत्येकाने दूरदृष्टीचा विचार करूनच आपला हा हक्क बजावणे अपेक्षित असते. पणजीची चिंता वाहणारे लोक पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्ताने बाबूश मोन्सेर्रात यांच्याविरुद्ध एकवटले आहेत. त्यामुळेच ‘पणजी फर्स्ट’च्या मागे ठामपणे उभे राहून पणजीवासीयांनी या कार्यात आपला सहभाग द्यावा. पुढील पाच वर्षे पश्‍चात्ताप करण्यापेक्षा आत्ताच खबरदारी घेणे उचित ठरेल. साहजिकच पणजी शहराला स्वच्छ व विकासात्मक प्रशासन मिळवून देण्यासाठी ‘पणजी फर्स्ट’ हा एकमेव पर्याय पणजीवासीयांसमोर आहे असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.

द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढला

* विधानसभा निवडणुकीतील चर्चा ङ्गिस्कटली
* यापुढे मुद्यावर आधारित पाठिंबा
* संपुआ सरकार संकटात
* सरकारला धोका नाही : कॉंग्रेस

चेन्नई/नवी दिल्ली, दि. ५
विधानसभेची निवडणूक होऊ घातलेल्या तामिळनाडूत गेल्या सात वर्षांपासून अतूट राहिलेल्या कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यातील युती आज जागा वाटपाच्या मुद्यावरील चर्चा ङ्गिस्कटल्याने संपुष्टात आली. या रागाने द्रमुकने केंद्रातील कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आमच्यातील युतीचे संबंध आता संपुष्टात आले असून यापुढे केंद्र सरकारला केवळ मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्यात येईल, असे द्रमुकने जाहीर केले. दरम्यान, या घडामोडींमुळे संपुआ सरकारवर राजकीय संकट आले असले तरी सरकारला कुठलाही धोका नसल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे.
आज सकाळी द्रमुक आणि कॉंग्रेस यांच्यात तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. आधी ६० जागांवर सहमत झालेल्या कॉंग्रेसने ऐनवेळी तीन अतिरिक्त जागा मागताना पक्षाला पसंतीचे मतदारसंघ निवडण्याची मुभा देण्यात यावी अशी भूमिका घेतली. यावर द्रमुकच्या नेत्यांनी आक्षेप घेत बैठक गुंडाळली. तदनंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्याशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण तोसुद्धा यशस्वी झाला नाही.
लोकसभेत १८ खासदार असलेल्या द्रमुक कार्यकारिणीची आज सायंकाळी निर्णायक बैठक झाली. कॉंग्रेसच्या भूमिकेवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. कॉंग्रेसची भूमिका अमान्य असल्याचे स्पष्ट करीत बहुतांश नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कॉंग्रेसची ही भूमिका द्रमुकला एकाकी पाडण्यासाठी आणि संपुआ सरकारमधून बाहेर काढण्यासाठीच आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे संपुआत कायम न राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे’ असे द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत जाहीर केले. केंद्रातून आपले मंत्री माघारी घेण्यात येणार असून ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसच्या भूमिकेचे आम्हांला आश्‍चर्य वाटत आहे. यापुढे संपुआ सरकारला केवळ मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तामिळनाडूतील द्रमुक-कॉंग्रेस युती कायम राहावी अशी कॉंग्रेसची इच्छा मुळीच दिसत नाही असेही या ठरावात नमूद करण्यात आले.
अलीकडेच स्पेक्ट्रम घोटाळ्यात द्रमुकचे वरिष्ठ नेते आणि माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांना अटक करण्यात आली. या मुद्यावरून दोन्ही पक्षांतील संबंध दुरावले गेले होते. यातच जागा वाटपाच्या मुद्यावरून हा दुरावा आणखीच वाढला आणि त्याची परिणती संपुआ सरकारमधून द्रमुक बाहेर पडण्यात झाली.
धोका नाही : कॉंग्रेस
द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नाही असे कॉंग्रेस पक्षाने आज जाहीर केले. द्रमुकने आपले १८ खासदारांचे समर्थन मागे घेतले आहे, पण सरकारकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे पाठबळ आहे असे या पक्षाने म्हटले आहे.
आधीची घडामोड
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कॉंग्रेस आणि द्रमुक यांच्यात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली होती. २३४ सदस्यीय विधानसभेत कॉंग्रेसने या आधीच ६० जागांवर सहमती दर्शविली होती. पण आज अचानक दिल्लीहून कॉंग्रेस नेतृत्वाचा ङ्गोन आला आणि द्रमुकने कॉंग्रेस पक्षाला ६३ जागा सोडाव्यात, इतकेच नव्हे तर आम्हांला हवे असलेल्या मतदारसंघांची निवड आम्हीच करू असे कळविले. द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. कॉंग्रेसने ऐनवेळी जास्त जागांची मागणी केली आणि सोबतच आपल्या पसंतीचे मतदारसंघ निवडण्याचा अधिकारही मागितला. हे योग्य नसून युतीधर्माच्या चौकटीतही बसत नाही, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

पुणे महापालिकेत भाजपची सरशी

पुणे, दि. ५ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या गणेश बिडकर यांची निवड झाली आहे. पालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असूनही या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी गुंतलेल्या व सीबीआयच्या रडारवर असलेल्या सुरेश कलमाडी यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
भारतीय तटरक्षक दलाने
पकडले ७ पाकिस्तानी
जामनगर, दि. ५
भारतीय तटरक्षक दलाने कच्छ शहराजवळील जखाऊ किनारपट्टीजवळ सात पाकिस्तान्यांना त्यांच्या बोटीसकट पकडल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पाकिस्तानी बोटीमध्ये सात जण संशयास्पदरित्या काल रात्री समुद्रात ङ्गिरताना त्यांना तटरक्षक दलाच्या सुरक्षाधिकार्‍यांनी बोटीसह अटक केली.आहे.
वसंत आगाशे
यांचे निधन
पुणे, दि. ५
महाराष्ट्रातील मिरजचे भूषण असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे अध्वर्यू आणि साहित्यकार वसंत बळवंत आगाशे यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. आगाशे यांचे निधन पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात कर्करोगाने झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. शिक्षकी पेशा असणारे आगाशे लेखक, समीक्षक आणि प्रभावी वक्ते म्हणून प्रसिद्ध होते.
जेपीसीचा अहवाल
लवकरच : चाको
त्रिसूर, दि. ५
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती(जेपीसी) आपला अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सादर करेल, असे समितीचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनी आज सांगितले.
जेपीसीची पहिली बैठक संसदेचे सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मास्टर ब्लास्टरने
नाकारली डॉक्टरेट
बंगलोर, दि. ५
क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका विद्यापीठाने देऊ केलेली डॉक्टरेटची पदवी व्यावसायिक कारण देत नाकारली आहे. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सचिनला डॉक्टरेट देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय असल्याने डॉक्टरेट घेणे शक्य नाही, असे सचिनने पत्रात म्हटले आहे.