Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 16 June 2010

भाजपप्रवेशासाठी जसवंतसिंग सज्ज

नवी दिल्ली, दि. १५ : पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्यावर आपल्या पुस्तकात स्तुतिसुमने उधळल्याबद्दल भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेले जसवंतसिंह हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.
जसवंतसिंह यांच्या भाजपप्रवेशासाठी पक्षनेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. याविषयीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात पाटणा येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहायला रवाना होण्यापूर्वी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी जसवंतसिंह यांची भेट घेतली होती. जसवंतसिंह यांच्या भाजप पुनर्प्रवेशाविषयी पक्षाच्या अन्य नेत्यांशी चर्चा करता यावी, यासाठीच गडकरी यांनी ही भेट घेतली होती. "भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपल्याला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेण्याची इच्छा आहे,'अशी इच्छा जसवंतसिंह यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवरच गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती. "जसवंतसिंह यांचा भाजपप्रवेश कोणत्याही क्षणी होऊ शकतो,'असेही भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

केपेजवळ कॅंटरवर धाडसी दरोडा मिरची पूड टाकून दीड लाख पळविले

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यात या दिवसात चोऱ्यांचे प्रकार वाढत असताना आज भरदिवसा केपेजवळ आंबावली येथे एक मालवाहू कॅंटरवर दरोडा घालण्याचा प्रकार घडला. दोन मोटरसायकलवरून आलेल्या पाच जणांनी कॅंटर अडवून त्यातील चालक व सेल्समनच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याकडील दीड लाखाची रक्कम असलेली बॅग पळविली व त्यामुळे या भागात खळबळ माजली, पोलिसांचीही धावपळ उडाली.
केपेचे पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नावेली येथील पॅरीस पाश्कॉल यांच्या मालकीच्या ग्रेसी इंटरप्राईझेसचा जीए ०८ यू १९५८ हा कॅंटर नेहमीप्रमाणे आपला माल वितरकांना देऊन त्यांच्याकडून वसुली करून परतत असताना शेळपे आकामळ, आंबावली येथील गतिरोधकाजवळ हा प्रकार घडला. या कॅंटरमध्ये चालक अँथनी जुजे लोबो(पेडे -लोलये), सेल्समन अमर अनंत गावकर (गुडी पारोडा ) व रमेश महादेव गावकर व अशोक कुष्टा वेळीप हे दोघे लोडर होते.
माल देऊन त्यांची वसुली करून साधारण दीड लाखाची रक्कम घेऊन ते परतत होते. वाटेत सेंट पोप जॉन पॉल हायस्कूलकडे एक पिवळी रंगाची करिझ्मा मोटरसायकल घेऊन कोणीतरी उभे असलेले त्यांनी पाहिले. नंतर ते कॅंटरमागून येऊ लागले व शेळपे आकामळ येथील गतीरोधकाजवळ ते कॅंटरला मागे टाकून पुढे गेले व त्या पुढच्या गतिरोधकाजवळ त्यांनी मोटरसायकल रस्त्यात आडवी घातली व कॅंटर अडविला . इतक्यात एका पल्सरमोटरसायकल वरुून आणखी तिघे तरुण तेथे आले ते कोकणी मिश्रीत हिंदी बोलत होते. त्यांनी कॅंटरचे दार उघडून मिरची पावडर आंतील चालक व सेल्समनच्या डोळ्यात फेकली व त्याच्याकडूील पैशांची बॅग हिसकावून ते निघून गेले.
तो भाग निर्जन असून नंतर त्यांनी केपे पोलिसांत येऊन हा प्रकार विदीत केल्यावर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला पण कोणीच सापडलेले नाही. पोलिसांनी त्या चौघांची तक्रार नोंदवून घेऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे. या भागांतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान गेल्यावर्षी नावेली येथील याच एजंटाची बॅंकेत भरण्यास आणलेली साधारण दोन लाखांची रक्कम बॅंकेच्या दारांतून अशीच पळविली गेली होती.
दक्षिण गोव्यात नाकाबंदी
दरम्यान, या दिवसात वाढू लागलेल्या चोऱ्यांच्या प्रकारांची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी रात्रौ ९ ते १ दरम्यान नाकाबंदी करण्याचे आदेश दक्षिण गोव्यातील सर्व पोलिस स्टेशनांना जारी केले आहेत.

Tuesday, 15 June 2010

हळर्णकर अद्याप बिनखात्याचे मंत्री!

राष्ट्रवादीमध्ये तीव्र असंतोष
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मिकी पाशेको यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात आले आहे. मंत्रिपद बहाल केले खरे पण आता पाशेकोंकडील खाती देण्यावरून मात्र मुख्यमंत्री दिगंबर कामत काहीसे हात आखडते घेत असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बनली आहे.
नीळकंठ हळर्णकर यांना गेल्या मंगळवार ८ जून रोजी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दोन दिवसांत खाती देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री आता सहा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटपाबाबत निर्णय घेत नाहीत, यामुळे राष्ट्रवादीत कमालीची नाराजी पसरली आहे. मिकी पाशेको यांच्याकडील खातीच राष्ट्रवादीला देण्याचे स्पष्ट संकेत दिल्लीतील राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दिले आहेत. आता असे असतानाही मुख्यमंत्री हा विषय नेमका कोणत्या कारणांसाठी पुढे रेटीत आहेत, याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. मिकी पाशेको यांच्याकडील पर्यटन खात्यावर खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीच नजर आहे, असेही आता उघडपणे बोलले जाते. कला व संस्कृती खात्याप्रमाणे पर्यटन खात्यातही महोत्सव वा अन्य उत्सवांना वाव आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे व त्यामुळे या खात्यात काम करण्यासारखे बरेच काही आहे. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून हे खाते मिकी पाशेको यांना देणे भाग पडले होते. कामत यांच्याकडे हे खाते आल्यास कलाकारांबरोबर त्यांना पर्यटन उद्योजकांतही आपली प्रतिमा उंचावण्याची नामी संधी प्राप्त होणार आहे. दरम्यान, नीळकंठ हळर्णकर यांनी खात्यांचा भार हा पूर्णपणे श्रेष्ठींच्या हवाली केला असून श्रेष्ठी सांगतील ते आपल्याला मान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रदेश राष्ट्रवादीने यापूर्वीच मिकी पाशेको यांच्याकडील सर्व पदे नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गृह निर्माण खाते नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे देण्यात येणार असले तरी गृह निर्माण महामंडळाच्या अध्यक्षपदी युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांची नेमणूक करावी,असा प्रस्तावही मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर असल्याची खात्रीलायक खबर आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठीही युवा कॉंग्रेसच्या एखाद्या पदाधिकाऱ्याची नेमणूक करावी,असाही आग्रह आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी इच्छुक असल्याने हा गुंता कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
दरम्यान, पर्यटन खाते आपल्याकडे ठेवले तर नीळकंठ यांना कुठले खाते द्यावे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उभा राहिला असून सध्या त्यांच्याकडे असलेली खाण, नगर नियोजन, कायदा, माहिती तंत्रज्ञान,कला व संस्कृती आदी खाती देण्यासही ते राजी नाहीत.पर्यटन खाते मिळवण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळाचे खातेपालट करण्याचाही त्यांचा विचार होता पण त्यामुळे अधिक घोळ होईल, या भीतीने ते व्यथित झाले आहेत. कामत हे जाणीवपूर्वक खाते वाटपासंदर्भात वेळकाढू धोरण अवलंबून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिजवण्याचा तर प्रयत्न करीत नसतील ना,असाही सवाल या पक्षाचे पदाधिकारी करू लागले आहेत.

वास्कोत जुन्या घराची भिंत कोसळून तरुण गंभीर जखमी

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी) - वास्कोत पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास वेळी देस्तेरोवाडा येथे असलेल्या "एलमॉंत थिएटर'मागील डोंगराळ भागात एका घरावर अन्य एका बंद घराची भिंत कोसळल्याने सुनील विनायक साखळकर हा (३५) तरुण गंभीर जखमी झाला. डोंगरी भागातील सदर जुन्या घराची भिंत कोसळून ती स्व. रजनीकांत साखळकर यांच्या घराच्या खोलीवर कोसळून सदर खोलीचे छप्पर खाली आले. यात सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भिंत कोसळली तेव्हा खोलीत सुनील साखळकर हा सदर खोलीतील पलंगावर झोपला होता. त्याच्या अंगावर सदर खोलीचे छप्पर व मोठे दगड कोसळले. या दुर्घटनेत सुनीलच्या उजव्या पायाचे हाड तुटले असून त्यास अन्य जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला उपचारासाठी त्वरित १०८ च्या रुग्ण वाहिनीने बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. भिंत कोसळलेले घर जुने होते व तेथे कोणीही राहात नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
वास्को अग्निशामक दलाने तेथील ढिगारे दूर करतानाच सुमारे ३० हजाराची मालमत्ता वाचवली. या दुर्घटनेत साखळकर यांच्या घरातील धुलाई यंत्र, पंखे व फर्निचर आदी सामानाची हानी झाली.
साखळकर यांच्या घरात आठ जण राहत असून ज्यावेळी भिंत त्यांच्या खोलीवर कोसळली तेव्हा सुनील वगळता इतर सर्वजाण दुसऱ्या खोलीत होते. घरातील दोन लहान मुले शिकवणीला गेल्याने मोठा अनर्थ टळला. ही माहिती साखळकर यांच्या परिवारातील एका सदस्याने दिली. सुनील यांच्या उजव्या पायाला आज दुखापत झाली व या पायावर यापूर्वी चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी त्याची खबर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याने दिली. नंतर दलाच्या जवानांनी तेथे पोहोचून मदतकार्य केले. मुरगाव पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

"इंग्रजी प्राथमिक'साठी आता मासिक ८०० रु. शुल्क !

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - इंग्रजी प्राथमिक विद्यालयांसाठी प्रती महिना १३५० रुपये प्रवेश शुल्काबाबत शिक्षण खात्याने जारी केलेले परिपत्रक अखेर मागे घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले. सरकारी अनुदानविरहित संस्थांनी पहिली ते चौथीसाठी प्रतिमहिना केवळ ८०० रुपये शुल्क आकारावे, असे नवे परिपत्रक लवकरच जारी केले जाईल, असा शब्दही त्यांनी मुष्टिफंड विद्यालयाच्या संतप्त पालकांना दिला.
राज्यातील इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांनी यंदा अचानकपणे आपल्या शुल्कदरात वाढ केल्याने पालकांत तीव्र संतापाची लाट पसरली.
शिक्षण खात्याकडून प्राथमिक शिक्षकांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन द्यावे तसेच या संस्थांसाठी शुल्क आकारणी तक्ताही देण्यात आला होता. या नव्या शुल्क रचनेनुसार प्रती महिना १३५० रुपये शुल्क प्राथमिक विद्यार्थ्यांना लागू करण्याचे परिपत्रकही जारी केले होते. राज्यातील खाजगी संस्थांनी तात्काळ या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्याने पालकांसाठी ही वाढ धक्कादायकच ठरली. येथील मुष्टिफंड संस्थेच्या पालकांनी याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. याविषयी पालकांनी स्थापन केलेल्या समितीने आज पर्वरी मंत्रालयात शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेट घेतली व याविषयावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी शिक्षण संचालिका डॉ. सेल्सा पिंटो या देखील हजर होत्या. शुल्क दरवाढ ही अन्यायकारक आहे व त्यामुळे सर्वसामान्य पालकांसाठी ती परवडणार नसल्याने सरकारने त्याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी पालकांनी केली. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पालकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी त्यांनी सर्व अनुदानविरहित संस्थांना वर्गवार विद्यार्थी संख्येबाबतचा अहवाल खात्याकडे सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही शुल्कवाढ केवळ ८०० रुपये प्रतिमहिना करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. यासंबंधीचे नवे परिपत्रक लवकरच जारी केले जाईल, असेही त्यांनी यावेळी पालकांना सांगितले.

लिंडन यांनी सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहावे

उच्च न्यायालयाचा आदेश

अर्ज मागे घेण्यासंबंधात
आज सुनावणी होणार


पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित तथा माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचे विशेष सेवा अधिकारी लिंडन मोंतेरो हे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जावरून आता चांगलेच अडचणीत आले आहेत. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी १७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांनी आज दिले. लिंडन यांच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेण्यासाठी पत्र सादर केले असता त्यावरील सुनावणी उद्या १५ रोजी होणार आहे.
मडगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लिंडन मोंतेरो यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज हा अर्ज सुनावणीस आला असता न्यायमूर्ती श्री. साळवी यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्याने लिंडन यांना आता पोलिसांना शरण येणे भाग पडेल. माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ सदोष मनुष्यवध व कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) असे आरोप ठेवण्यात आले आहेत तर लिंडन मोंतेरो यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न याअंतर्गत कलम २०१ अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. हे दोघेही सध्या भूमिगत असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
आज हा अर्ज न्यायालयासमोर सुनावणीस आला असता तो चुकीच्या पद्धतीने सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी केला. लिंडन मोंतेरो यांचा जामीन अर्ज त्यांच्या आईच्यावतीने सादर करण्यात आला आहे याकडेही ऍड.रॉड्रिगीस यांनी लक्ष्य वेधले. फोैजदारी दंड संहितेच्या कलम ४३८ नुसार ज्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता असते तीच व्यक्ती अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर करू शकते. उच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसारही हे बंधनकारक आहे, असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी केला. एखादी व्यक्ती कोठडीत असल्यास आरोपीच्या वतीने कुटुंबीय किंवा मित्र फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अंतर्गत अर्ज सादर करू शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अटकपूर्व जामिनासाठी फक्त संशयित आरोपीच अर्ज करू शकतो, हे पटवून देण्यासाठी ऍड. रॉड्रिगीस यांनी ११ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुस्ताव फिलीप कुटो यांनी दिलेला निकाल पुराव्यादाखल सादर केला.
ऍड. रॉड्रिगीस यांनी केलेल्या युक्तिवादाचे मुद्दे उचलून धरून न्यायमूर्ती श्री.साळवी यांनी हा अर्ज कायद्याला धरून नसल्याचे लिंडन मोंतेरो यांच्या वकिलाला सांगितले. दरम्यान, सदर जामीन अर्ज मागे घ्यावा की नाही यावर आपण सल्लामसलत करूनच पुढे सांगू असे त्यांच्या वकिलांनी सांगितले असता या अर्जावरील पुढील सुनावणीस १७ रोजी लिंडन मोंतेरो यांनी स्वतः हजर राहावे,असे आदेश न्यायमूर्तीनी दिले.

हप्तेखोरांची चौकशी दक्षता खात्याकडून

वरिष्ठ पोलिसांची कोलांटी
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)- पेडणे पोलिस स्थानकातील हप्तेखोर पोलिसांची खात्याअंतर्गत चौकशी होईल, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून काल देण्यात आले, तोच आज अचानक याविषयावरून पोलिसांनी कोलांटी घेण्याचा अजब प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नाही, कदाचित दक्षता खात्यामार्फत ही चौकशी सुरू असावी, अशी काहीशी संभ्रमित प्रतिक्रिया पोलिस खात्याचे जनसंपर्क अधिकारी तथा गुन्हा विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त करून सर्वांनाच पेचात टाकले आहे.
"हप्तेखोर पेडणे पोलिसांच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या "गोवादूत' च्या वृत्ताने आज संपूर्ण पोलिस खातेच दणाणून गेले. पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी हे आदेश जारी केल्याचे कालपर्यंत पोलिस सूत्रांकडून सांगितले जात होते. आज पोलिस खात्याचे अधिकृत जनसंपर्क अधिकारी आत्माराम देशपांडे यांनी मात्र ही चौकशी दक्षता खात्यातर्फे सुरू आहे, असे सांगून खात्यांंतर्गत चौकशीच्या वृत्ताला बगल देण्याचाच प्रकार घडला. पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये व दोन पोलिस शिपाई हे ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करीत असल्याच्या तक्रारी पोलिस खात्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पेडणे पोलिस हरमल येथील सनी नामक "खबऱ्या' च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरूनही अडचणीत आले आहेत. ड्रग्स व्यवसायाशी संबंधित असलेल्या या व्यक्तीचा पूर्ण परिचय असूनही त्याच्या मृत्यूची नोंद अज्ञात व्यक्ती अशी करून पेडणे पोलिसांनी उघडपणे हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला, असाही आरोप आता होऊ लागला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असूनही या घटनेच्या चौकशीचे आदेश निघत नाहीत, यावरून वरिष्ठ पातळीवर समझोता करून यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशीही चर्चा सुरू आहे.
या प्रकाराबाबत वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्यासही तयारी दर्शवली नाही. रात्री ९ वाजता आत्माराम देशपांडे व पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. पोलिसांच्या हप्ते प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी होणेच शक्य नाही, अशी माहिती पोलिस खात्यातीलच काही गुप्त सूत्रांनी दिली. प्रत्येक पोलिस स्थानकावरील हप्त्यांचा वाटा हा वरिष्ठांपर्यंत पोहचत असतो व त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा आदेश हाच मुळी एक विनोद आहे, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पेडणे पोलिस स्थानकात केवळ ड्रग्स व्यावसायिकांकडूनच नव्हे तर पत्रादेवी चेकनाका, जुगार व वेश्याव्यवसायाचेही लाखो रुपयांचे हप्ते पोलिसांकडूनच गोळा केले जातात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हरमल येथील सनी नामक या खबऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास पोलिस व ड्रग्स व्यावसायिकांच्या संबंधाचे आणखी एक रॅकेट उघडकीस येईल व त्यामुळेच हे प्रकरण पडद्याआड टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नादिया तोरादो मृत्यू प्रकरणामुळे पोलिसांना आपल्या ड्रग्स प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचे लक्ष्य विचलित करण्याची आयतीच संधी प्राप्त झाल्याने पेडणे पोलिसांच्या या दोन्ही प्रकरणांवर पडदा टाकण्याचीच धडपड सुरू असल्याचीही खबर मिळाली आहे.

Monday, 14 June 2010

हप्तेखोर पेडणे पोलिसांच्या खात्यांंतर्गत चौकशीचे आदेश

"उदय परब ते उत्तम राऊत देसाई
तेरा वर्षांच्या ड्ग्स हप्तेगिरीचा प्रवास'


पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई व इतरांकडून ड्रग्स व्यावसायिकांना सरंक्षण देण्यासाठी हप्ते गोळा केले जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल पोलिस उपमहानिरीक्षक रविंद्र यादव यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश जारी केल्याने पोलिसांचे धाबेच दणाणले आहेत. पोलिस खात्यावरच झालेल्या या आरोपांमुळे खात्याची संपूर्ण विश्वासार्हताच संशयात सापडली असून गेल्या तेरा वर्षांपूर्वीच्या कटू गतस्मृतींना नव्याने उजाळाही मिळाला आहे. उदय परब ते उत्तम राऊत देसाई असा हा पेडणे पोलिसांच्या हप्तेगिरीचा प्रवासच यानिमित्ताने सर्वांसमोर उभा राहिला आहे.
तेरा वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ साली पेडणे पोलिस स्थानकाचे तत्कालीन प्रभारी उपनिरीक्षक उदय परब व दोन पोलिस शिपाई यांना विदेशी पर्यटकांकडून पैसे उकळण्याच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले होते. विदेशी पर्यटकांना अडवून त्यांच्या खिशात स्वतःहूनच अमलीपदार्थ टाकायचे व अमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असले धंदे हे पोलिस करीत होते असा ठपका त्यांच्यावर होता. याप्रकरणी काही विदेशी पर्यटकांनी थेट आपल्या दूतावासाकडेच तक्रार नोंद केली व तेव्हाच हा प्रकार उघडकीस आला. तत्कालीन पोलिस महानिरीक्षक पी. एस. आर. ब्रार यांनी तात्काळ खात्यांंतर्गत चौकशी करून उदय परब व अन्य दोन पोलिस शिपायांना निलंबित केले होते. कालांतराने प्रकरण निवळले व हे सर्व पोलिस पुन्हा सेवेत रुजूही झाले. उदय परब यांना त्यानंतर निरीक्षकपदी बढतीही मिळाली. या घटनेचा मागोवा घेताना या गुन्ह्यासाठी संबंधित पोलिसांवर कडक कारवाई झाली असती तर निदान आता तेरा वर्षांनंतर पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती टाळता आली असती. पेडणेचे विद्यमान पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये, व अन्य दोघे पोलिस शिपाई ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करतात, अशा दोन लेखी तक्रारी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पोलिस खात्यात व गृह खात्याकडे दाखल झाल्या. या तक्रारींकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष जरी झाले असले तरी प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस उपमहानिरीक्षक रविंद्र यादव यांनी या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश जारी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सध्या अशाच एका प्रकरणावरून एक निरीक्षक, उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई आपली नोकरी गमावून बसले आहेत. आता या प्रकरणी पेडणे पोलिस स्थानकातील या हप्तेखोरांचीही त्यात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"खबऱ्या'चा केला घात !
हरमल येथील पोलिसांचा "खबऱ्या' म्हणून परिचित असलेला सनी ऊर्फ संदीप याचा संशयास्पद मृत्यू होऊनही अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची नोंद करून पेडणे पोलिसांनी कहरच करून टाकला. सनीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका उघड झाली आहे. निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांना यासंबंधी विचारले असता मयत सनी ऊर्फ संदीप हा आपला खबऱ्या नव्हता, असा दावा त्यांनी सुरुवातीला केला. त्याला गावात पैसे मागण्याची सवय होती व अनेकवेळा माहिती देतो असे म्हणून आपल्याकडूनही पैसे नेल्याचेही ते मान्य करतात व त्यामुळे उत्तम राऊत देसाई यांनी नकळतपणे सनी याचा परिचय उघड केला आहे. एवढे असूनही त्याच्या मृत्यूची नोंद अज्ञात व्यक्ती अशी करून पोलिस नेमके काय लपवण्याचा प्रयत्न करीत होते, असाही सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, सनी नामक ही व्यक्ती विदेशी नागरिकांना ड्रग पुरवठा करायची व त्याचबरोबर पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही तो वावरत होता, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. सनी याला या परिसरात ड्रग व्यवसायाशी संबंधित संपूर्ण माहिती होती. हरमल किनारी भागातील ड्ग्स व्यावसायिकांचा तो पर्दाफाश करील म्हणूनच कुणी तरी त्याचा काटा काढला व त्यातूनच त्याची हत्या झाली असावी, असाही संशय व्यक्त होऊ लागला आहे. सनी मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित लवेश ऊर्फ लक्ष्मण लुडू नाईक हा पेडणे पोलिसांना शरण आला असून सनी याच्या मृत्यूनंतर पाच दिवस उलटले तरी, त्याला ताब्यात घेण्यात पेडणे पोलिसांना अपयश आले होते. सनी मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करून प्रसारमाध्यमांनी पेडणे पोलिसांवर शरसंधान केल्यानेच या प्रकरणाची चौकशी करणे पोलिसांना भाग पडले आहे.

कुणाच्या फायद्यासाठी ती घटना दडपली?

महेश पारकर, शिरोडा
(तालुकाः फोंडा)
नागरिक बातमीदार स्पर्धा

साधारणतः दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. घटनेची चर्चा गावातील आम जनतेमध्ये आजही चालू आहे. परंतु सदर घटना बातमी रूपांत किंवा अन्य स्वरूपात गोव्यातील वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकांत छापून आलेली नाही. कारण घटना जिथे घडली होती, ती संस्था गोव्यातील एक उच्च पदस्थ राजकीय व्यक्तीच्या मालकीची आहे ! तसेच सदर घटनेचा बोभाटा झाल्यास त्या संस्थेवरती होऊ शकणाऱ्या परिणामाबरोबर त्या उच्च राजकीय व्यक्तींच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी, यामुळेच ती घटना कसोशीने दडपली गेली आहे.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी वर्ग कर्मचारी वर्ग आपापल्या कामामध्ये दंग अन् इथे स्टाफरूम मध्ये एक प्राध्यापक काहीतरी काळेकृत्य करण्याच्या पावित्र्यात येरझारा टाकीत होते. शिरोड्यातील मध्यवर्ती भागातील ही संस्था. त्यामुळे भोवतालच्या पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी तिथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरील विद्यार्थिनी त्या खरे म्हणजे प्राध्यापकाला भगिनी किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलींसारख्या. परंतु आजची सामाजिक स्थिती विचित्र बनलेली आहे. सरळ सांगायचे म्हटल्यास टीव्हीच्या प्रभावामुळे, शारीरिक ओढीला आजकाल कसलाच ताळतंत्र राहिलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून असेल सदर प्राध्यापक महोदयांनाही तो मोह आवरला नसावा.
त्या मागची कारण मीमांसा आज लोक अनेक प्रकारे बोलून दाखवितात. कुणी म्हणतात, ती विशिष्ट विद्यार्थिनी परीक्षेला नापास होणार हे निश्चित होते. अशा तिच्या अगतिकतेच्या फायदा घेऊन तिला पास करायचे आमिष सदर प्रोफेसरांनी दाखविले. अन् संस्थेच्या भव्य अशा इमारतीच्या निर्मनुष्य ठिकाणी तिला नेऊन अतिप्रसंग केला. तो प्रत्यक्ष केला की प्रयत्न केला, याबद्दलही सर्वत्र साशंकाच आहे. कुणी म्हणतात की, या प्रोफेसराविरूद्ध आजवर अनेक तक्रारी दाखल झालेल्या असून, केवळ उच्चपदस्थांच्या आशीर्वादामुळे हा नामानिराळा राहू शकलेला आहे ! म्हणून हा कट अन्य शिक्षक वर्गानेच जाणून बुजून करविला असेही बोलले जाते.
खर खोटं देवास ठाऊक किंवा त्या प्रोफेसरला किंवा बदनाम झालेल्या मुलीला! परंतु घटनेनंतर लगेच त्या मुलीच्या सांगण्यावरून तिच्या भावाने तसेच अन्य कुटुंबीयांनी या उच्चशिक्षित प्रोफसराची भरपूर धुलाई केली. हे सगळ्या गावाने पाहिलं आहे. एरवी कृतिशील, थोेडासा प्रसिद्धी लोलूप अशी ही व्यक्ती, स्वतःच्या पेशाला काळिमा फासणारं कृत्य करायला कशी प्रवृत्त झाली? संस्थेचा प्रारंभापासून ही व्यक्ती म्हणजे अविभाज्य घटक! शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकून समाजात स्थिर झालेले आहेत. स्वतःच्या पेशाची पंचविशी पूर्ण करीत आलेल्या या व्यक्तीला ही अवदसा का आठवली असावी? अशा अचंब्याने लोकांच्या भुवया विस्तारल्या जात आहेत.
ती व्यक्ती जिथे त्याच्या कुटुंबीयांसह रहात होती तिथे ती सध्या नाही. कुणी म्हणतात, गोवा सोडून ती व्यक्ती अज्ञात स्थळी गेली असावी. तर कुणी म्हणतात, त्याला तसे करण्यास भाग पाडून संस्थेतील ही घाण दूर झाली हे बरेच झाले! संस्थेच्या व्यापक भविष्याच्या दृष्टीने त्याचा काटा काढला गेला असावा!
एवढी मोठी घटना घडून ही ती वर्तमानपत्रामधून लोकासमोर का आली नाही? ज्या घटनेचे चर्वितचर्वण सामान्य लोकांमध्ये होऊन ही एखाद्या वार्ताहराला त्याचा वास लागलाच नाही असे म्हणता येईल? संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सदर घटनेकडे पाहिल्यामुळे ती बातमी सर्वच वर्तमानपत्रांनी टाळली? असं असेल तर मग हे प्रोफेसरमहाशय अन्य ठिकाणी जाऊन तसलेच रंग उधळायला मोकळे! आणखी एखादे दुसऱ्या विद्यार्थिनीचा बळी द्यायला आपण त्याला परवाना दिल्यासारखं होणार नाही का!
वाचकहो, आपणही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. आपल्या परिसरातील एखादी घटना अथवा समस्या, संस्था यांच्याविषयी सुमारे ५०० शब्दांत बातमी पाठवून बक्षीस जिंका. पणजी, फोंडा, म्हापसा, काणकोण, वास्को, कुडचडे अथवा मडगाव कार्यालयात बातमी देऊन या स्पर्धेत भाग घ्या. अंतिम तारीख २५ जून २०१०

प्रेमभंगातून तरुणीचा भोसकून खून

मडगावातील घटनाः हल्लेखोर तरुणास लागलीच अटक

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) - प्रेमभंगाने व्यथित झालेल्या एका तरुणाने आज येथील जुन्या बसस्थानकाजवळ आपल्या प्रेयसीचाच सुऱ्याने भोसकून खून करण्याचा प्रकार घडला. सदर तरुणीने रक्ताच्या थारोळ्यात तेथेच प्राण सोडला तर त्या तरुणाला तेथील लोकांनी पकडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्या अंगावर एकूण २० जखमा आढळून आल्या आहेत.
मयत तरुणी मुस्कान उर्फ मोसुफिया निजाम शेख (२६) ही कारगिल -कुडतरी येथील असून पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोत पाठवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेली मुस्कान व अभिजित पाटील(२५) हा मूळ इचलकरंजीमधील व सध्या रावणफोंड येथे राहणारा तरुण ही येथील एका तारांकित हॉटेलात काम करत होती. तेथे असतानाच त्यांचे सूत जुळले होते व गेली चार वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या.
पण दोन तीन महिन्यांपूर्वी त्यांचे बिनसले व तिने दुसऱ्या कोणाबरोबर तरी मैत्री केली असावी, असा त्याला संशय होता. त्यातून अभिजितची मनःस्थिती बिघडली व त्याला त्या हॉटेलमधून कमी केले गेले होते.
आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदर तरुणी बाजारातून पावसाळी सामान खरेदी करून घरी जाण्यासाठी जुन्या बसस्थानकावर जात असताना केणी पेट्रोल पंपसमोरील "फ्रॅंकी गोवन स्वीट' जवळ पोचली असता आरोपीने तिला पाहिले व तो धावत तिच्यासमोर गेला व आपणाकडील संबंध तोडल्याबद्दल तिला जाब विचारला. यावेळी तिनेही त्याला दुरुत्तरे केली, त्यातून उभयतांत बाचाबाची झाली व पाटीलने खिशांतून चाकू काढून तिच्या पोटात खुपसला. त्याने तिचा गळा, मान आदी भागात वार केले. ती किंकाळी फोडून रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली व मरण पावली.
तेथील लोकांना हा काय प्रकार काय ते कळायला उशीर झाला. ती तरुणी किंकाळी फोडून खाली कोसळल्यावर ते भानावर आले व त्यांनी सदर तरुणास पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो चाकू घेऊन तो त्यांच्या अंगावर चालून आला पण तेथील लोकांनी त्याला शिताफीने पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी त्वरित घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. नंतर पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
अभिजित याने अजून पोलिसांसमोर तोंड उघडलेले नाही. मोसुफियाच्या मृत्यूच्या वार्तेने तिची आईही आजारी पडली असून तिलाही हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले आहे. मुस्कान ही बारावी शिकलेली होती. त्या दोन बहिणी व एक भाऊ . तिचे वडील पूर्वी आखाती देशात कामाला होते ते आता हयात नाहीत व ती भाऊ व आई एकत्र रहात होती.
मडगावातील अशा प्रकारचे व सर्वांदेखत खुनी हल्ला करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. गेल्या महिन्यात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत अशाच प्रेमप्रकरणातून मेल्बा नामक तरुणीचा बंदुकीची गोळी झाडून खून झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे तर लक्कीसिंह हा मुख्य आरोपी अजून फरारी आहे.ज्या बंदुकीने हा खून झाला होता ती साळावली कालव्यालगत झुडपात टाकून दिलेल्या अवस्थेत सापडली होती.