Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 4 May 2010

रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींचा विषय अखेर निकालात

विशेष पदांची निर्मिती
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- गेली पाच वर्षे सरकारी सेवेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व फक्त राजकीय दुःस्वासाचे बळी ठरलेल्या रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना न्याय देण्याची सुबुद्धी अखेर सरकारला सुचली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रशिक्षणार्थींचा विषय अखेर निकालात काढण्यात आला. सरकारी सेवेत रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या सुमारे ७३७ प्रशिक्षणार्थींना कार्मिक खात्याअंतर्गत विशेष पदे निर्माण करून पुढील महिन्यापासून सरकारी वेतनश्रेणी लागू केली जाईल. विविध खात्यांतर्गत निर्माण होणाऱ्या पदांवर कालांतराने त्यांची नेमणूक करून टप्प्याटप्प्याने त्यांना सेवेत कायम करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सुमारे ९४ प्रशिक्षणार्थींना विविध खात्यात कायम करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वर्षाकाठी १२.३० कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडेल. विशेष पदे निर्माण करून प्रशिक्षणार्थींना सरकारी वेतनश्रेणी लागू केली जाणार असली तरी जोपर्यंत त्यांची सेवा नियमित होत नाही तोपर्यंत हे प्रशिक्षणार्थी बढती किंवा इतर तत्सम हक्कांसाठी पात्र ठरणार नाहीत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार सरकारी प्राथमिक शिक्षक - १, स्टेनो- टायपीस्ट- १०४, एल. डी. सी. - ५४२ व चालक - ९० अशी ही पदे आहेत व ती येत्या तीन वर्षांच्या कालावधीत नियमित करण्यात येणार आहेत.
पंचायत खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या वेळी दोन पंचायतींना समान प्रकल्प राबवायचा असेल तर त्यांना स्वतंत्र खासगी यंत्रणेमार्फत हा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा प्रकल्प राबवताना त्याची जबाबदारी पंचायत संचालकांकडे असेल. या व्यतिरिक्त इतरही काही खात्यांत सुमारे शंभर पदे निर्माण करण्यात आली असून त्यांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

माओवाद्यांचा "नेपाळ बंद'

पंतप्रधानांचा राजीनाम्यास नकार
काठमांडू, दि. ३ - पंतप्रधान माधवकुमार नेपाळ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सकाळपासूनच माओवाद्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. पण, यानंतरही पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने देशात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
माधवकुमार नेपाळ यांचे सरकार शांतता प्रक्रियेबाबत अजिबात गंभीर नाही, तसेच राज्यघटना तयार करण्याबाबतही ते उदासीन आहे, अशी टीका माओवाद्यांचे नेते प्रचंड यांनी केली आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच हे आंदोलन पुकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करणारे सरकार देशवासीयांना हवे आहे. सध्याच्या सरकारला जनतेचे समर्थन नाही, असा दावाही त्यांनी केला.
पण, आपल्यावरील सर्व आरोप खोडून काढत नेपाळ यांनी पंतप्रधान पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकार पाडण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, संप, आंदोलन यांनी समस्या सुटत नसतात. माओवाद्यांनी आपले आंदोलन मागे घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आजच्या या संपामुळे नेपाळमधील जनजीवन मात्र विस्कळीत झाले होते.

मांडवी पुलाखाली कामगाराचा मृतदेह

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- मांडवी पुलाखाली असलेल्या गाड्यांच्या मागच्या बाजूला ईस्माईल अब्दुल कादर (३५) या मूळ ओरिसा येथील कामगाराचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी खुनाची घटना नोंद केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी श्रीशेखर श्रीधर कांबळी (३६) याला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली असल्याच दावा पणजी पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी संशयित कांबळी याच्याविरुद्ध भा.द.स ३०२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
ईस्माईल व संशयित कांबळी यांचे काही दिवसापूर्वी कडाक्याचे भांडण होऊन मारामारी झाली होती. यात कांबळी याच्या डोक्याला जखम झाल्याचे चार टाके पडले होते. आज सकाळी मांडवी पुलाच्या खाली असलेल्या गाड्यांच्या मागच्या बाजूस ईस्माईल याचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी संशयित कांबळी याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून ताब्यात घेतले. आज सकाळी तो डोक्यावरील टाके काढण्यासाठी इस्पितळात गेला होता.
मयत ईस्माईल आणि कांबळी हे दोघे मित्र होते. या गाड्यांच्या मागील बाजूस टाकण्यात येणारा कचरा गोळा करून तो विकून ते आपला उदरनिर्वाह करत होते. चार दिवसापूर्वी कांबळी याला ईस्माईल याने जबर मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी कांबळीने काल रात्री ईस्माईलवर अवजड हत्याराने वार केला. यात ईस्माईल ठार झाला, असे पोलिसांनी सांगितले. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

डोंगरकापणी नियंत्रणासाठी भरारी पथक स्थापणार

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- डोंगरकापणी व शेतजमिनीत बेकायदेशीररीत्या भराव टाकण्यावर बंदी घालण्यासाठी राज्य सरकारतर्फे प्रत्येक तालुका पातळीवर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली नगर नियोजन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्य नगर नियोजक मुराद अहमद, नगर नियोजन सचिव, प्रादेशिक आराखडा २०२१ चे नोडल अधिकारी संजित रॉड्रिगीस व उपनगर नियोजक विनोद कुमार हजर होते. नगर नियोजन कायदा, १९७४ मध्ये बदलत्या परिस्थितीनुसार दुरुस्ती सुचवण्यासाठी कायदेतज्ज्ञांची एक विशेष समिती स्थापन करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. एखाद्या प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष मान्यता मिळवलेल्या आराखड्याव्यतिरिक्त चुकीचा आराखडा प्रसिद्ध करून जाहिराती करण्याचे प्रकार वाढल्याने त्याची गंभीर दखल घेण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. प्रादेशिक आराखडा २०२१ जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अतिरिक्त निधीची तजवीज करण्यावरही या बैठकीत एकमत झाले. पर्यावरणीय संवेदनशील भागांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारतर्फे यापूर्वीच समिती स्थापण्यात आली आहे.

महिला आयोग सुस्त, दलाल "बिनधास्त'

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - अमली पदार्थानंतर "सेक्स रॅकेट'च्या व्यवसायाने गोव्यात जम बसवायला सुरुवात केलेली असताना याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याच्या आविर्भावात सरकारी यंत्रणा वावरत आहे. राज्य महिला आयोगाने याची अद्याप कोणतीच दखल घेतलेली नाही. गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा एझिल्डा सापेको यांना याविषयी विचारले असता, "आपल्याला या विषयीची कोणतीही माहिती नाही, तसेच कोणी तक्रार दिल्यास मगच आम्ही त्यावर अभ्यास करून कारवाई करू' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या विदेशी ललनांसाठी ग्राहक पाहण्याचे काम देशी दलाल करीत असून त्यासाठी त्यांनी विशेष यंत्रणा प्रस्थापित केली आहे. संकेतस्थळावर या गोऱ्या ललनांशी संपर्क साधण्यासाठी या दलालांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच, त्या तरुणींची छायाचित्रेही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ग्राहकाने ठरलेली किंमत देण्याचे मान्य करताच एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान खोली आरक्षित करण्यास सांगितले जाते. यानंतर अलिशान वाहनाने त्या तरुणींना ग्राहकांपर्यंत आणून सोडले जाते.
त्याचप्रमाणे, या विदेशी तरुणींना "एस्कॉर्ट' म्हणूनही वापरले जात आहे. विमानतळ ते गोवा सोडेपर्यंत या तरुणींना बरोबर ठेवले जाते. गोव्याबाहेरून येण्यापूर्वी या "एस्कॉर्ट' तरुणींना भली मोठी रक्कम देऊन "बुक' केले जाते. त्यासाठी संकेत स्थळाचीच मदत घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्यवसायातील एखाद्या मोठ्या "डील'साठीही या विदेशी तरुणींची मदत घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अमली पदार्थ व इतर घोटाळ्यांमुळे राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम होत असताना महिलांना अनैतिक व्यवसायात ओढणारा व्यवसाय आपली पाळेमुळे घट्ट करू पाहत आहे. मात्र, महिला आयोगासारख्या संघटनांनी या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेहसूद जिवंत आहे!

महिन्याभरात अमेरिकेवर हल्ल्याचा इशारा

नवे दोन व्हिडिओ जारी
टाइम्स स्क्वेअर हल्ल्याची जबाबदारी

वॉशिंग्टन, दि. ३ - अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला असावा, अशी ज्याच्याविषयी शंका व्यक्त केली जात होती तो पाकिस्तानी तालिबानचा नेता हकीमुल्ला मेहसूद जिवंत असून त्याने नवा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने अमेरिकेवर पुन्हा हल्ल्याची धमकी दिली आहे.
आत्तापर्यंत केवळ अल कायदानेच अशा पद्धतीने अमेरिकेवर हल्ल्यांच्या धमक्या दिल्या होत्या, त्यांचेच व्हिडिओ जारी करण्याचे तंत्र वापरून प्रथमच तालिबानने अमेरिकेला धमकी दिली आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. ४ एप्रिल रोजी तो तयार करण्यात आल्याचे अमेरिकेच्या तपास संस्थांचे म्हणणे आहे.
यात मेहसूद झळकत होता. त्याने म्हटले की, अमेरिकेच्या मोठ्या शहरांवर फियादीन हल्ले होणार आहेत. ती वेळही लवकरच येत आहे. काही दिवसात किंवा एका महिन्यातच जबरदस्त यशस्वी हल्ल्यांचा प्रत्यय अमेरिकेला येणार आहे. माझ्या मृत्यूविषयी बराच अपप्रचार करण्यात आला. पण, काही विरोधकांनी जाणीवपूर्वक हे खोटे वृत्त पसरविल्याचेही मेहसूदने म्हटले आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट करण्यासाठी अमेरिकेने पाक-अफगाण सीमेवर ड्रोन हल्ले सुरू ठेवले आहेत. चार महिन्यांपूर्वी केलेल्या हल्ल्यात मेहसूद मारला गेला असल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर आणि अमेरिकेने केला होता. त्यानंतर सातत्याने तो जिवंत आहे की मेला, याविषयी उलट-सुलट बातम्या येत राहिल्या. पण, आता नव्या व्हिडिओमुळे मेहसूद जिवंत असल्याचा पुरावाच मिळाला आहे.

टाइम्स स्क्वेअर हल्ल्याची जबाबदारी
रविवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर या ठिकाणी फसलेल्या हल्ल्याची जबाबदारीही तेहरिक-ए-तालिबानने घेतली आहे. जारी करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तालिबानने या हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. अल कायदाचे आमचे बांधव आणि तालिबानचे अनेक नेते यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये मेहसूदने म्हटले आहे. विशेषत: बैतुल्लाह मेहसूद याच्या हत्येचा हा बदला असल्याचेही सांगण्यात आले आहे. जितके दु:ख अमेरिकेने आम्हाला दिले आहे तितक्याच वेदना त्या देशाला आता पाहाव्या आणि सहन कराव्या लागणार आहे.
या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मात्र कारी हुसैन दिसतो आहे. हुसैन हा तालिबानच्या आत्मघाती पथकाचा प्रशिक्षक मानला जातो. आणखी एका वेबसाइटने न्यूयॉर्कवरील हल्ल्याचा प्रकार हा इराकी अल-कायदाचे नेते अबू अयूब अल मासरी आणि अबू उमर अल बगदादी यांच्या हत्येचा बदला असल्याचेही म्हटले आहे.

Monday, 3 May 2010

२६।११ च्या खटल्याचा आज निकाल

संपूर्ण जगाचे लक्ष मुंबईकडे
मुंबई, दि. २ - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर २६।११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत आरोपी अजमल आमिर कसाब आणि इतर दोन आरोपींवर चालविण्यात आलेल्या खटल्याचा उद्या निकाल लागणार असून, भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
पाकिस्तानच्या फरीदकोटचा राहणारा कसाब आणि त्याच्या इतर ९ साथीदारांनी हा दहशतवादी हल्ला करून १६६ निरपराध नागरिकांचे बळी घेतले होते. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश होता. याशिवाय ३०४ जण या हल्ल्यात जखमी झाले होते. या दहशतवाद्यांना फहीम अन्सारी आणि शहाबुद्दीन अहमद या दोघांनी मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या दोघांनी लष्कर-ए-तोयबाच्या सांगण्यावरून ज्या ठिकाणांना लक्ष्य करायचे होते त्यांचे नकाशे व इतर माहिती पुरविली होती.
या खटल्यात ह तिघेही दोषी आढळल्यास त्यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या ८ मे रोजी सुरू झालेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. यादरम्यान २७१ कामांच्या दिवसात ६५८ जणांची साक्ष नोंदवून ३,१९२ पानांचे पुरावे गोळा करण्यात आले होते. न्या. एम. एल. तहलियानी यांच्या न्यायालयात एकूण ३० साक्षीदारांनी कसाबची ओळख पटवली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबविरोधात जास्तीत जास्त पुरावे कसे सादर करता येतील यासाठी अथक परिश्रम घेतले. उद्या सोमवारपासून या खटल्याच्या निकालास सुरूवात होणार असून, ही प्रक्रिया आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. एखाद्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भात चालविण्यात आलेल्या खटल्याचा निकाल एवढ्‌या लवकर लागण्याची भारतातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
आर्थर रोड कारागृहात कडक सुरक्षा व्यवस्था
दरम्यान उद्या या खटल्याच्या निकालाची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या पाश्वभूमीवर आर्थर रोड कारागृह आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. न्यायालय परिसर आणि कसाबला ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे त्याभोवती अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.साने गुरूजी मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा चौक्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय कारागृह परिसरात वाळूच्या पोत्यांच्या भिंती तयार करण्यात आल्या असून, त्याठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून चोवीस तास पहारा देत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कारागृहासमोरील रस्त्यावर एकतर्फी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांचे क्रमांक नोंववून ठेवण्यात येत आहेत. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे २०० जवान तैनात करण्यात आले आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

भारत "सुपर एट'मध्ये

सेंट ल्युसिया - मधल्या फळीत सुरेश रैनाने झळकाविलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १४ धावांनी पराभव करून विश्वचषक ट्वेंटी २० स्पर्धेच्या "सुपर एट' गटात प्रवेश केला. त्यापूर्वी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला होता.

मेगा प्रकल्पावरून चिंबल ग्रामसभेत प्रचंड गोंधळ

-वृक्षसंहाराचा मुद्दा दुर्लक्षित
-ज्वलंत प्रश्नांवर चर्चा टाळली


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- झाडांची कत्तल करून मेगा प्रकल्प उभारण्यात येत असल्याच्या मुद्यावर सरपंचांच्या समर्थकांनी विरोधकांना रोखण्याच्या प्रयत्न केल्याने आज चिंबलची ग्रामसभा वादळी ठरली. यावेळी गोंधळ सतत वाढत गेल्याने अखेर ग्रामसभा तहकूब करण्यात आली. ग्रामसभेनंतर सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी सभेत सर्व मुद्यांवर चर्चा झाली असल्याचा दावा केला तर, विरोधकांनी कोणतेच मुद्दे चर्चेस घेण्यात आले नाहीत अथवा एकही ठराव मांडण्यास देण्यात आला नाही, असे सांगितले.
सरपंचांनी भाड्याने आणलेल्या माणसांनी गोंधळ माजवून सभा बंद पाडली असा आरोप चिंबल ग्रामसेवा कला आणि सांस्कृतिक मंचाने केला आहे. झाडांची कत्तल करून मेगा प्रकल्प उभारू पाहणारा विषय चर्चेसाठी आला असता यावेळी सत्ताधाऱ्यांच्या माणसांनी ग्रामसभेत जोरदार गोंधळ माजवला. या गोंधळातच सरपंचानी ग्रामसभा संपल्याचे जाहीर केले. हे पूर्णपणे चुकीचे असून या विषयांवर विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी मंचाचे अध्यक्ष रुमालियो फर्नांडिस यांनी केली आहे.
गेल्या काही ग्रामसभांत सरपंच चंद्रकांत कुंकळ्ळकर यांनी ग्रामसभेचे कामकाज अवैध पद्धतीने हाताळले असून आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून ग्रामस्थांना विविध प्रश्न उपस्थित करण्यास अटकाव केला जातो व महत्त्वाच्या विषयांवर चर्चाच केली जात नसल्याचा आरोप रुमालियो यांनी केला. चिंबल पंचायतीसमोर अनेक समस्या व अडचणी आहेत. या भागातील वृक्षसंहार, मेगा प्रकल्प, अतिरिक्त झोपडपट्ट्या, कचऱ्याची दुर्गंधी, अनुसूचित जमातीच्या लोकांच्या शेतांची नासाडी अशी मुद्यांवर आम्ही वेळोवेळी आवाज उठवला आहे. मेगा प्रकल्पासाठी कशा पद्धतीने बेकायदेशीर झाडांची कत्तल केली आहे, याची छायाचित्रे आज ग्रामसभेत ठेवली असता सत्ताधाऱ्यांनी गोंधळ माजवला, असे ते म्हणाले. बळाचा वापर करून ग्रामस्थांवर दबाव घालण्याचा प्रयत्न पंचायत मंडळाकडून केला जात आहे. असे चित्र आज ग्रामसभेत दिसले.

तीन संशयास्पद वाहने "नाकाबंदी'तून निसटली!

दक्षिण गोव्यात मॉकड्रिल

पणजी, काणकोण, मडगाव, दि.२ (प्रतिनिधी)- अमेरिकेच्या सूचनेनंतर दिल्ली "हाय अलर्ट'वर असतानाच आज अचानक दक्षिण गोवा पोलिसांनी नाकाबंदी केल्याने एकच खळबळ माजली. गोवा पोलिसांची याबाबतची तयारी पाहण्यासाठी आज दुपारी गृहखात्याने पाच वाहनांत बंदुका लपवून त्यांना कोणत्याही वाटेने कारवारला जाण्याची गुप्त सूचना दिली. तर, दुसऱ्या बाजूने संपूर्ण दक्षिण गोव्यात नाकाबंदी करून जे संशयास्पद वाहन दिसेल त्याची माहिती वरिष्ठांना द्या, अशी सूचना करून दुपारी ४ ते ९ पर्यंत नाकाबंदी करण्याचा आदेश देण्यात आला. यात पाच वाहनांपैकी केवळ दोन वाहने जप्त करण्यास दक्षिण गोवा पोलिसांना यश आले तर, तीन वाहने सहीसलामत पोलिसांची नजर चुकवून कारवारच्या दिशेने पसार होण्यास यशस्वी झाले, अशी माहिती रात्री उपलब्ध झाली.
मात्र नाकाबंदी मुळे सर्वत्र गोंधळ माजल्याने आणि लोक भयभीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या नाकाबंदीत आर्ले व केपे येथे बंदुका असलेली दोन वाहने ताब्यात घेण्यास नाकाबंदीवरील पोलिसांनी यश आले. मात्र जी तीन वाहने ज्या मार्गातून गेली व त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली नाही, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याविषयी उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांना विचारले असता, गोव्यात कोणतेही हाय अर्लट नसून हे केवळ "मॉकड्रिल' असल्याचे त्यांनी सांगितले.
काणकोणमध्ये गैरसोय
काणकोण तालुक्यातील क्र. १७ महामार्गावर तसेच काही अंतर्गत रस्त्यांवरून धावणाऱ्या चारचाकी व अन्य मोठ्या वाहनांची तपासणी केली जात होती. या नाकाबंदी मोहिमेचे नेतृत्व पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी केले. शस्त्रसज्ज पोलिस शिपाई त्यांना या कामी मदत करत होते. यावेळी चाररस्ता येथे वाहने थांबवून प्रवाशांची व पर्यटकांच्याही सामानाची तपासणी करण्यात येत होती. तसेच वाहन क्रमांक, वाहन चालकाचे नाव व अन्य माहितीही नोंद करण्यात येत होती.
देवबाग, पोळे, पान्ना, चाररस्ता येथे मोक्याच्या जागी कसून तपासणी केल्यामुळे स्थानिक नागरिक चौकस दिसून आले. याविषयी पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाईंना विचारले असता, ही नेहमीप्रमाणे एक पोलिस कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दक्षिण गोव्यात ही नाकाबंदी करून तपासणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संध्याकाळी ४ वाजल्यापासून नाकाबंदीला सुरुवात करण्यात आली होती. तसेच सावर्डे येथील गार्डियन एंजल चर्चमधील काही मूर्तींना अज्ञातांनी नुकसान पोहोचविल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत असल्यातेही सांगितले जात होते. तर, असोळणे येथील जेटवरून मासळीवाहू वाहने रस्त्यावर रक्तमिश्रीत पाणी सोडत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
काणकोण पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाकाबंदी करण्याविषयीचा आदेश बिनतारी संदेशाद्वारे असल्याने काणकोण पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगितले.