Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 17 November 2009

दोन अपघातांत मुरगावात तीन ठार

जोडप्याचा समावेश
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): सुसाट वेगाने "ओव्हरटेक' करण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्वालीसने स्कूटरला धडक दिल्याने पैरेभाट, वेर्णा येथील इनासीन रिबेलो (३७) व तिचा नवरा आगुस्तीन रिबेलो यांचा मृत्यू झाला. शिवोली येथील २३ वर्षीय जॅक्सन परेरा हा तरुण क्वालीस घेऊन पणजीहून मडगावच्या दिशेने जात असताना दुपारी १.१५ च्या सुमारास कुठ्ठाळी येथे हा अपघात घडला. दरम्यान, दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून जमिनीवर पडल्याने बोगदा, वास्को येथील विश्वनाथ गजानन होबळे या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्वालीस (जीए ०१ आर ३६६२) सांत्रे, कुठ्ठाळी येथील लोटो बारसमोर पोचली असता चालकाने समोरच्या गाडीला "ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला (जीडीएच ५०१९) गाडीची जबर धडक बसली. सदर अपघातामुळे स्कूटरवर असलेले आगुस्तीन व इनासीन हे दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. इनासीन ही जागीच ठार झाली तर जखमी आगुस्तीन यास प्रथम उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मयत इनासीन हिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला. दरम्यान गंभीररीत्या जखमी झालेल्या आगुस्तीनचा इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातात क्वालीसचालक जॅक्सन जखमी झालेला असून त्याच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशांत गावस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे पैरेभाट भागात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. मयत आगुस्तीन व इनासीन यांना दोन मुले असून यात सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यामुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): आपल्या दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून जमिनीवर पडल्याने बोगदा, वास्को येथील विश्वनाथ गजानन होबळे या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. काल (दि १५) संध्याकाळी सदर अपघात घडल्यानंतर जखमी विश्वनाथ यास उपचारासाठी इस्पितळात दाखल केला असता आज त्याचा मृत्यू झाला.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि १५) संध्याकाळी ६.२० च्या सुमारास सदर अपघात घडला. बोगदा, सडा येथील गणेश मंदिरासमोर राहणारा विश्वनाथ होबळे "पॅशन' दुचाकीवरून (जीए ०६ सी ६५१३) सडा येथील अँटार्टिक सेंटरच्या दिशेने जात असता कबरस्तानाजवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटला. सुमारे पाच ते दहा मीटर फरफटत गेल्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या, त्याला त्वरित चिखली येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची अवस्था गंभीर असल्याने त्याला बांबोळीच्या गोमेकॉत हालवण्यात आले. गोमेकॉत उपचार घेत असता आज (दि १६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. मुरगाव पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सांताक्रुझ येथे भावाचा खून

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यावर कुदळीच्या साह्याने वार करून खून केल्याची घटना सान्ताक्रुज पणजी येथे काल रात्री घडली. या हल्ल्यात ईश्वर गावस (४०) याचा मृत्यू झाला असून धाकटा भाऊ श्याम गावस (३०) याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे.
काल रात्री दोघा भावात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर श्याम याने कुदळीने ईश्वर याच्या डोक्यावर जोरदार वार केला. यावेळी जखमी अवस्थेत त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास जुने गोवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

तिकीट घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): मडगाव येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट घोटाळ्यात माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर दोषी असल्याचा पेंडसे अहवाल कॉंग्रेस सरकारने फेटाळून लावल्याने त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली आहे. यात माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर, राज्य सरकार, गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा क्रिकेट संघटनेला प्रतिवादी करण्यात आले आहेत.
एप्रिल २००१ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्यावेळी तिकीट घोटाळा झाल्यानंतर भाजप सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एम. एल.पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. या आयोगाने या घोटाळ्यातील सर्व संशयित दोषी असल्याचे स्पष्ट करून त्यांना गोवा क्रिकेट संघटनेची पुन्हा निवडणूक लढवण्यास मज्जाव करावा, असे म्हटले होते. गोव्यात स्थापन झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आयोग फेटाळून लावण्यात आला होता. त्यावेळी क्रीडामंत्रीपदी दयानंद नार्वेकर होते, असा दावा याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे.
एकदा विधानसभेत आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मागे घेत येत नाही, असा दावाही याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेची दखल घेऊन गोवा खंडपीठाने सदर याचिका दाखल करून घेतली.

पत्रकारिता वस्तुस्थितीपासून दुरावलीय: पी. साईनाथ

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): जनसंपर्क व वस्तुस्थिती यामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. वृत्तपत्रे ही एकतर उद्योगपती किंवा राजकारणी यांच्या हाती जाण्याची सुरू झालेली प्रक्रिया याचे कारण आहे, भारतीय लोकशाहीचा तोच खरा धोका आहे, असे परखड विचार मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी आज येथे काढले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभात "भारतीय पत्रकारितेतील बदलते स्वरूप' या विषयावर बीजभाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. वृत्तपत्रे हा शेवटी लोकमंच आहे याचा विसर पडू देऊ नका. लोकांच्या भावनांचे, आशा आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात उमटायला हवे, त्या जागांवर कोणाचेही अतिक्रमण होता कामा नये, लोकहित हेच सर्वश्रेष्ठ राहिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
माहिती खात्याने गोवा संपादक संघ, गोवा श्रमिक पत्रकार संघटना व गोवा छायाचित्र पत्रकार संघटना यांच्या सहकार्याने येथील रवींद्र भवनात आयोजित या समारंभाला व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्रकुमार, माहिती संचालक मिनीन पिरीस, गोवा सरकारचे वृत्तपत्र सल्लागार विष्णू सूर्या वाघ, संपादक संघाचे अध्यक्ष आश्र्विन तोंबट, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कामत, सरचिटणीस सुदेश आर्लेकर व छायाचित्रपत्रकार संघटनेचे अध्यक्ष बेर्नाबे सापेको उपस्थित होते.
आपल्या भाषणात साईनाथ यांनी स्वातंत्र्यपूर्वकालीन पत्रकारिता व आत्ताची पत्रकारिता यामधील फरक सविस्तरपणे मांडला. सध्याच्या पत्रकारितेत माहिती व तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे गुणांबरोबरच दोषही आले आहेत. पत्रकारितेचा एकंदर चेहरामोहराच बदलत असताना त्यात दुटप्पीपणा शिरल्याचेही त्यांनी नमूद केले. झपाट्याने बदलत असलेल्या या प्रक्रियेत पत्रकार संघटना देखील शिल्लक राहिलेल्या नाहीत, पत्रकारिता क्षेत्रात आता रुजत असलेली कंत्राटी पद्धत हा पत्रकारितेवर पडलेला सर्वांत मोठा घाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
काहींना पत्रकारिता हा व्यापार-उद्योग असल्याचे वाटते, ते तसा दावाही करतात. तथापि, त्यांचा तो दावा बिनबुडाचा आहे, असे मत ठामपणे मांडताना वृत्तपत्र हा उद्योग असेल, व्यापार असेल पण पत्रकारिता हा कसाच व्यापार-उद्योग असू शकत नाही, असे ते म्हणाले.
गेल्या १५-२० वर्षांत पत्रकार वस्तुस्थितीपासून दूर जाऊ लागले आहेत, असे स्पष्ट करताना साईनाथ यांनी सांगितले की, लोकशाहीसाठी ही धोकादायक बाब आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अमुक प्रसिद्ध करा हे सांगण्याऐवजी अमुक प्रसिद्ध करू नका असे पत्रकारांना बजावणारी प्रवृत्ती वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता वस्तुस्थितीला पारखी होत आहे, हीच खरी चिंतेची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
हल्लीच्या काळात सामाजिक प्रश्र्नांपासून वृत्तपत्रे कशी दुरावत चालली आहेत, त्यात व्यापारावर कसा भर दिला जात आहे ते त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. या व्यापारीकरणाच्या जमान्यात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रांकडे वृत्तपत्रे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. देशाची ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे पण तेथील समस्या अपवादात्मक स्थितीतच प्रसिद्ध होणे ही बाब खचितच भूषणावह नाही. वृत्तपत्र क्षेत्राचे झपाट्याने होत असलेले व्यापारीकरण हेच त्याचे कारण आहे, असे ते म्हणाले.
'पेड न्यूज' शरमेची बाब
हल्लीच्या निवडणुकांत प्रचलित झालेल्या व लोकशाहीसाठी सर्वांत चिंतेच्या ठरलेल्या "पेड न्यूज'चा प्रश्र्न त्यांनी आपल्या भाषणात हिरिरीने मांडला. ही पद्धत अशीच सुरू राहिली तर वृत्तपत्रीय विश्र्वासार्हताच संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकांत एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला अनुकूल बातम्या प्रसिद्ध करणे व जाहिरातीप्रमाणे त्याची किंमत वसूल करणे ही प्रथा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब आदी राज्यांतील निवडणुकांत सुरू झालेली असून ती झपाट्याने पसरत चालली आहे. त्यातून शेकडो कोटींचा व्यवहार झालेला असून एकप्रकारे हा दुहेरी भ्रष्टाचार आहे कारण जाहिरातस्वरूप या बातम्यांबाबत कोणतीच पावती मिळत नाही. यामुळे उमेदवार ह खर्च आपल्या निवडणूक खर्चांतही दाखवू शकत नसल्याने निवडणूक आचारसंहितेच्या भंगात हे प्रकरण मोडते. यामुळे यासंदर्भात आता निवडणूक आयोगानेच कृती करणे आवश्यक ठरते, असे सांगून पत्रकारितेसाठी ही सर्वांत शरमेची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. हे प्रकरण सुमारे ४०० कोटींवर पोचलेले असून अप्रत्यक्षपणे तो संघटित खंडणीचाच प्रकार ठरतो, असे त्यांनी सांगितले.
वृत्तपत्र उद्योग हा आता बव्हंशी राजकारणी व धनदांडगे यांच्या हाती गेल्याचे व त्यामुळे यात अनेक अनिष्ट प्रवृत्ती शिरल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हा बिनभांडवली व अल्पावधीत कोट्यधीश होण्याचा मार्ग बनलेला आहे, असे सांगताना निवडणुकीत उभा राहून निवडून आलेला, मंत्री झालेला, केंद्रात मंत्री झालेला राजकारणी यांच्या संपत्तीत कशी शेकडो पटींनी वाढ होत जाते ते त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याविरुद्ध काहीच करू शकत नाही का? याबद्दल पी. साईनाथ यांनी खंत व्यक्त केली.
पत्रकारितेवर मोठी जबाबदारी
या बदललेल्या परिस्थितीत आपली विश्र्वासार्हता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी पत्रकारितेवर आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी देशासमोरील ज्वलंत समस्येवर परखड टिप्पणी हवी आहे. ती करावयाची झाली तर समर्पित वृत्ती हवी, पण तीच कुठे दिसत नाही. जागतिक मंदीपूर्वी महाराष्ट्रात २० लाख लोकांना गमावाव्या लागलेल्या नोकऱ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युनोविकास कार्यक्रमात भारताची झालेली पीछेहाट सारख्या प्रश्र्नांवर आवाज उठविण्यात पत्रकारिता का कमी पडली त्याचे विश्र्लेषण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Monday, 16 November 2009

६८ जण बेपत्ता असल्याने अन्य खलाशीही धास्तावले!

खलाशांअभावी मच्छीमारी मंदावली

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - समुद्रात "फियान' चक्रीवादळाचे पाहिलेले तांडव, बुडालेल्या बोटी आणि वादळाच्या पाचव्या दिवशीही ६८ खलाशी बेपत्ताच असल्याने अनेक खलाशी सध्या समुद्रात जाण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आज पाचव्या दिवशीही अनेक जण मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यास ट्रॉलरवर चढले नाहीत. याचा परिणाम मच्छीमारीवर झाला आहे.
आपले सहकारी बेपत्ता असल्याने अन्य खलाशी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे मांडवी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो यांनी सांगितले. मात्र, आज पहाटे १५ ट्रॉलर समुद्रात गेले तर, २५ ट्रॉलर उद्या किंवा परवा मच्छीमारीसाठी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रीवादळ झाले त्यावेळी समुद्रात असलेल्या खलाशांनी प्रत्यक्ष या वादळाचा अनुभव घेतला आहे. जे या वादळाच्या तडाख्यातून वाचले आहेत, त्यांनी आपल्याच बोटीवरील आपले साथीदार बुडून दिसेनासे झाल्याचे पाहिले आहे. ती भीती त्यांच्या मनात अजुनीही घर करून आहे. त्यामुळे कोणीही बोटीवर जाण्यास तयार होत नाहीत आणि आम्हीही त्यासाठी हट्ट धरलेला नाही, असे आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर समुद्रात बेपत्ता झालेल्या खालाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाही. यातील अनेकांची वाचण्याची शक्यता आता कमीच दिसायला लागली आहे. जे देवगड किंवा मालवणच्या बंदरावर सुखरूप पोचले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र या ६८ जणांशी पाच दिवसानंतरही कोणताच संपर्क झालेला नाही, असे श्री. आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर सर्व वर्तमानपत्रातून आणि वृत्त वाहिनीवर मोठ्या प्रमाणात खलाशी बेपत्ता असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातील त्यांचे कुटुंबीयांनी गोव्यात धाव घेतली आहे. तर, जेटीवरील अनेक खलाशी घरी जाण्याचा मनःस्थितीत आहे. यातील बरेचसे खलाशी आपल्या गावात निघून गेले आहेत. त्यामुळे मच्छीमारीसाठी ट्रॉलर समुद्रात सोडणेही ट्रॉलरच्या मालकांना कठीण झाले आहे. सध्या मालिम जेटीवरील ट्रॉलरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्थलांतरितांच्या सर्वेक्षणासाठी बेताळभाटी ग्रामसभेची समिती

मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी) - बेताळभाटी पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एकूण सारी चचार्‌र झाली ती पंचायतकक्षेत वाढलेल्या परप्रांतीयांच्या संख्या व समस्येवर व अखेर संपूर्ण पंचायत कक्षेचे सर्वेक्षण करून किती परप्रांतीयांचे वास्तव्य आहे ते शोधून काढण्यासाठी एक १४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मायकल फर्नांडिस हे होते. पंचायत कक्षेत भाड्याने दिलेली घरे व त्यात राहणारे भाडेकरू, तेथील वातावरण, भाडेकरूंसाठी उपलब्ध केलेल्या मूलभूत सोयी या सर्वांची पाहणी करून सदर समितीला येत्या १३ डिसेंबरच्या ग्रामसभेपूर्वी तो पंचायतीस सादर करावा लागणार आहे.
पंचायत कक्षेतील बेकायदा बांधकामावरही सभेत खडाजंगी झाली व येत्या ग्रामसभेपूर्वीं तमाम बेकायदा बांधकामावर कारवाई केली जावी व अहवाल सादर करावा असा निर्णय आजच्या सभेने घेतला. पंचायत कक्षेत नोंद झालेले गुन्हे व पोलिस तपास यावरही चर्चा झाली.
मेगा प्रकल्पांचाही प्रश्र्न चर्चेस आला असता मेगा प्रकल्पांच्या फायली प्रथम ग्रामसभेत सादर करून मंजूर कराव्यात व नंतर पुढील सोपस्कार पार पाडावेत असा निर्णय सभेने घेतला. यावेळी सरपंच मायकल यांनी पंचायतीने अजून एकाही मेगा प्रकल्पाला वास्तव्याचा दाखला दिलेला नसल्याचे सांगितले.
सभेने बालहक्करक्षण कायद्यावर एक अभ्यास समिती स्थापन केली. ती समिती या कायद्याखालील गुन्ह्यांचा अभ्यास करील. ग्रामसभा चालू असताना अकस्मात वीज गेली व साधारण २० मिनिटे काळोखांतच काम चालले. यावेळी वीजमंत्र्यांच्या नावे गदारोळ माजविला तर काहींनी आगामी ग्रामसभेत वीजमंत्र्यांना पाचारण केले जावे अशी मागणी उपस्थितांनी केली. वीजमंत्र्यांनी अन्य भागात भूमिगत वीज केबल टाकल्या पण बेताळभाटी अजून त्यापासून वंचित असल्याने तेथे ही योजना राबवावी अशी मागणी सदस्यांनी केली.

कळंगुट येथे इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जखमी

पणजी व म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) - नाईकावाडो कळंगुट येथे आज दुपारी नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगार जखमी झाले. जखमींना त्वरित डॉ. धारवाडकर क्लिनिकमध्येे हलवण्यात आले. जखमीमध्ये अमोल राय (३०), जीतू राय (२४), संगप्पा नालबड (३०), शर्नम लक्ष्मण हाडपड (४०) व मनोज कुमार यांचा समावेश आहे. यातील किरकोळ जखमीना उपचार करून घरी पाठवण्यात आले. तर, गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेला जबाबदार धरून कंत्राटदार तन्मय खोलकर व सुपरव्हायझर उमेश गावस यांच्याविरोधात भा.दं.सं. ३३७ फौजदारी गुन्हा ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री उशिरा दोघांनाही अटक करून वैयक्तिक हमीवर सुटका केली असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. पालासो प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेडतर्फे हे बांधकाम केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार आज सकाळपासून नाईकावाडो येथील सर्व्हे क्रमांक १४५/२मध्ये रिता स्टुडिओ आणि बी एल के अर्पाटमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील मागच्या बाजूला स्लॅब घालताना ही दुर्घटना घडली. यात स्लॅब घालण्याचे काम करणारे कामगार जखमी झाले. घटनेनंतर स्लॅब घालण्याच्या कामाला किती कामगार लागले होते, याची अधिकृत माहिती दिली जात नव्हती. सायंकाळी उशिरापर्यंत पडलेला स्लॅब काढण्याचे काम सुरू होते. याविषयीची अधिक तपास कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष गावस करीत आहेत.

मुलायमसिंग विश्वासघातकी

कल्याणसिंग यांचे टीकास्त्र
राजबीरचा सपाचा राजीनामा

लखनौ, दि. १५ - मुलायमसिंग यादव यांच्याकडून मानहानी झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे डोळे आता उघडले आहेत. मुलायमसिंग हे "विश्वासघातकी' आहेत, असे सांगून कल्याणसिंग यांनी भाजपत परतण्याचे संकेत दिले आहेत तसेच कल्याणसिंग यांचा मुलगा राजबीरसिंगने समाजवादी पार्टीचा राजीनामा दिला आहे.
""मुलायमसिंग हे विश्वासघातकी आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोेटनिवडणुकीत झालेला सपाचा दारुण पराभव पचविण्याचीही ताकद त्यांच्यात नाही. पराभवाचे खापर त्यांनी माझ्या माथी फोडले आहे. माझ्या जीवनात मी अनेक चुका केल्या आहेत. मुलायमसिंग यांच्याशी दोस्ती स्वीकारणे ही त्यातीलच एक मोठी चूक आहे,'' असे कल्याणसिंग म्हणाले. काल मुलायमसिंग यांनी कल्याणसिंग कधीच सपात नव्हते व पुढेही राहणार नाहीत असे घोषित केल्यानंतर कल्याणसिंग आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
आता आपल्या पुढील योजना काय, आपण पुन्हा भाजपात जाणार का असे विचारले असता कल्याण सिंग उत्तरले की, सर्व पर्याय खुले आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मी संघाचा स्वयंसेवक होतो व आताही आहे.
मुलायमसिंग व सपाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी दिल्ली व लखनौ या दोन्ही ठिकाणी माझी भेट घेऊन आपण सपात यावे अशी विनंती केली; परंतु त्यांचा हा प्रस्ताव मी अमान्य केला असा दावा कल्याणसिंग यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत सपाचा जो पराभव झाला त्यासाठी मुलायमसिंग यांनी माझ्यावर खापर फोडले आहे. कल्याणसिंगांमुळेच मुस्लिम मतदार सपापासून दूर गेले असा दावा मुलायमसिंग यांनी केला आहे. परंतु त्यांना मी विचारू इच्छितो की, मग ४० टक्के मतदारांनी फिरोझाबादमध्ये सपाला का मते दिली नाहीत. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय, ब्राम्हण, ठाकूर, निषाद व इतर जातीच्या लोकांनीही सपाला का मतदान केले नाही. मुलायमसिंग हे ना हिंदूंचे आहेत ना मुसलमानांचे, ना मागासवर्गीयांचे; ते केवळ मतलबी आहेत. स्वार्थ साधण्यासाठी ते कोणालाही धोका देऊ शकतात, असे कल्याणसिंग यांनी सांगितले. आपला पराभव का झाला हे मुलायमसिंग यांनी आत्मचिंतानाद्वारे जाणून घ्यावे.
कल्याणसिंग पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजबीरही होता. यावेळी बोलताना राजबीरने आरोप केला की, मुलायमसिंग यांनी माझ्या वडिलांच्या भावना दुखावल्या आहेत. कालच्या त्यांच्या वक्तव्याने आपण फार दुखावलो गेलो. माझ्या वडिलांवर त्यांनी ज्याप्रकारे आरोप केले त्यामुळे आपण व्यथित झालो व ज्या पक्षात माझ्या वडिलांचा तसेच कार्यकर्त्यांचा अपमान होत असेल त्या पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही, सबब मी सपाचा राजीनामा देणेच उचित समजलो.
भाजपाला दुर्बल करण्यासाठी मुलायमसिंग यांनी माझे सहकार्य घेतले. परंतु आता मला याचा पश्चाताप होत आहे, असे कल्याणसिंग म्हणाले. भाजपात परतण्यासंदर्भात विचारले असता त्यावर थेट उत्तर न देता सांगितले की, पर्याय खुले आहेत. मी भाजपात जाईन वा न जाईन परंतु भाजपा मजबूत करण्यासाठी काम करत राहीन.

राहुल भटला "क्लीन चिट' नाही

नवी दिल्ली,दि. १५ - भारतावर हल्ला करण्याची योजना बाळगून असणारा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडलीची चौकशी सुरूच असून त्या प्रकरणी कोणालाही, अगदी राहुल भटलाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असा खुलासा केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लई यांनी केला आहे.
पिल्लई म्हणाले की, हेडलीविषयी चौकशी सुरूच आहे. त्याने भारताविरुद्धच्या कारस्थानांची कबुली देणे ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी सुरूच आहे. जोवर ही चौकशी पूर्ण होत नाही तोवर या प्रकरणी संशयित असणाऱ्या कोणालाही क्लीन चिट दिली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून डेव्हिड हेडलीला अमेरिकेच्या एफबीआयने मागील महिन्यात अटक केली होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरदरम्यान तो भारतातच होता आणि हल्ल्याच्या पाच दिवस आधी मुंबईतही आला होता, हे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचे या हल्ल्याशी असणाऱ्या संबंधाचे धागे शोधण्याचे काम सध्या पोलिस करीत आहेत.
ही चौकशी सुरू असतानाच महेश भट्ट यांचा मुलगा राहुल आणि हेडलीचे संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. भारतातून लष्कर-ए-तोयबाशी संपर्क साधताना आपल्या ई-मेलमध्ये हेडलीने "राहुल' या कोडवर्डचा वापर केला होता. तो राहुल मीच असल्याची कबुली स्वत: राहुल भट्टने दिली आहे. त्यामुळे त्याच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, राहुलने आपली बाजू स्वत:च स्पष्ट केली. ब्रीच कॅण्डीच्या जिममध्ये आपली हेडलीशी ओळख झाल्याचे त्याने सांगितले होते. पण, तो तोयबा किंवा अन्य अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, असेही स्पष्ट केले. त्याच्या सत्यतेविषयी खात्री पटल्याने पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिल्याची चर्चा होती. पण, या वृत्ताचा पिल्लई यांनी इन्कार केला आहे.