Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 17 October 2009

केंद्रीय समितीची काणकोणला भेट

आगोंद, दि. १६ (वार्ताहर) : दोन ऑक्टोबर रोजी काणकोणला झालेल्या जलप्रलयामुळे काणकोणवासीयांना बसलेल्या फटक्याने झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निरीक्षण समितीने आज सकाळी काणकोणला भेट दिली.
या केंद्रीय पथकात राजीव सिन्हा, डॉ.अनुपमा बारीक, डॉ. रंगा रेड्डी, दिनेशचंद, वाय.सी.श्रीवास्तव या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, त्यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, मामलेदार विनायक वळवईकर व अन्य अधिकारी होते. त्यांनी पाहणी पथकाला हानीची माहिती दिली. देळे, मैयक, अर्धफोंड, भाटपाल, सादोळशे, पैंगीण, खोतीगाव येथे सकाळी भेट दिली, तर दुपारी अन्य भागात हे पथक गेले.
केंद्रीय गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव आ.पी.नाथ हे या पथकाचे प्रमुख आहेत. त्यांनी काल उत्तर गोव्याच्या काही भागांचा दौरा केला होता. या पथकाच्या अहवालानंतर केंद्राकडून अधिक निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.

Wednesday, 14 October 2009

मोठा पोलिस फौजफाटा उसगाव येथे दाखल

..ग्रामस्थांत चर्चेचा विषय
..आंदोलन शांततेत सुरूच

तिस्क उसगाव, दि.१३ (प्रतिनिधी): उसगाव वड येथे टिप्पर ट्रक मालक संघटनेच्या झेंड्याखाली ट्रक मालकांचे आपल्या मागणीसाठी आंदोलन शांत वातावरण सुरू असताना आज सकाळी ११.३० वाजता अचानक मोठ्या प्रमाणात दोघा पोलिस अधिकाऱ्यांसमवेत मोठा फौजफाटा दाखल झाल्याने ग्रामस्थांत तो चर्चेचा विषय ठरला. यावेळी काही ट्रक मालक उसगाव वड येथे हजर होते. त्यावेळी सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक काही प्रमाणात सुरू होती.
आज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यत फोंड्याच्या संयुक्त मामलेदार संगीता नाईक या भागात जीपमधून उसगाव तिस्क ते उसगाव बाराजण (वड) पर्यंत सतत फेऱ्या मारत होत्या. सकाळी ११.३० च्या सुमारास अचानक कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर, फोंड्याचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर फौजफाटा उसगावात दाखल झाला. वातावरण शांत असताना एवढा फौजफाटा उसगावात कशासाठी तैनात करण्यात आला, असा प्रश्न स्थानिकांना पडला. उसगावच्या शेजारील डिचोली तालुक्यातील पाळी भागात अज्ञातांकडून सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक करणारे टिप्पर ट्रकांची नासधूस करण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र तिथे पोलिस बंदोबस्त नाही. उसगाव भागात मात्र कोणताच अनुचित प्रकार घडलेला नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करून सरकारी पैशांचा अपव्यय पोलिस खात्याकडून केला जात नाही ना, यावर गृहखात्याने तसेच स्थानिक आमदार तथा राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी विचार करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
सेझा खनिज आस्थापनाची माल वाहतूक सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवावी, असा आदेश न्यायालयानेच दिला आहे. या खनिज आस्थापनाच्या रात्री होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे स्थानिकांची झोपमोड होते. यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहे. यापुढे या परिस्थितीत फरक पडला नाही तर आता अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.कारण खनिजाची वाहतूक करणारे टिप्पर ट्रक चालक बेदरकारपणे वाहने हाकतात. त्याचा स्थानिकांना त्रास होतो.यामुळे वाटसरूंना चालणेही कठीण बनले आहे. या टिप्पर ट्रकांतून क्षमतेपेक्षा जादा माल भरून वाहतूक केली जाते. त्यामुळे उसगावात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होऊ लागले आहे. तथापि, वाहतूक कायदा व नियमांचे पालन न करणाऱ्या या ट्रकांच्या चालकांवर फोंडा, कुळे व डिचोलीतील पोलिस अधिकारी कारवाईच करत नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. याची दखल गृहमंत्री नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, तसेच पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी घ्यावी. या लोकप्रतिनिधींनी संबंधित सरकारी यंत्रणेला जाग आणून या भागातील स्थानिकांना न्याय द्यावा. अशी उसगाववासीयांची मागणी आहे.
उसगाव, पाळी भागातील टिपर ट्रक मालकांची सेझा खनिज आस्थापनाच्या खनिज माल वाहतुकीत ट्रक सामावून घ्यावे, या उसगाव,पाळी भागातील ट्रक मालकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सतावणूक न थांबल्यास उद्या 'बस वाहतूक बंद'

उत्तर गोवा खाजगी बस वाहतूक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी पर्रीकरांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला. (छायाः सचिन आंबडोस्कर)

वाहतूक मंत्र्यांचा राष्ट्रीयीकरणाचा इशारा
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूकदार व वाहतूक खाते यांच्यातील वाद आता चिघळण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी झाली नाही किंवा खाजगी बस वाहतूकदारांची सतावणूक बंद झाली नाही तर गुरुवार १५ रोजी अखिल गोवा खाजगी बस वाहतूक बंद करू, असा इशारा संघटनेने दिला आहे तर खाजगी बस वाहतूकदारांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही तर त्यांचे परवाने रद्द करू त्याचबरोबर विविध मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू,असे प्रतिआव्हान वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले.
...तर गुरुवार १५ रोजी गोवा बंद
वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराने गाठलेला कळस व प्रवासी बस वाहतूकदारांची खात्याकडून होत असलेली सतावणूक याविरोधात उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. उपोषणाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिली. उद्यापर्यंत काहीही तोडगा निघत नसेल तर गुरुवार १५ रोजी गोव्यातील खाजगी प्रवासी बस वाहतूक बंद करावी लागेल,असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर हे अहंपणाने वागतात. सुमारे चार हजारांच्या आसपास खाजगी बसमालक आहेत. त्यांच्या समस्या व अडचणी ऐकून घेण्यासही ते तयार नाहीत. संघटनेत फूट घालण्यासाठी व बस वाहतूकदारांवर दबाव घालण्यासाठी ते राष्ट्रीयीकरणाचा धाक दाखवत आहेत. त्यांना हिंमत असेल तर त्यांनी हा निर्णय घेऊन दाखवावा,असे आव्हान यावेळी श्री.कळंगुटकर यांनी दिले. राष्ट्रीयीकरण करा व बस मालकांसह, चालक व वाहकांना नोकरीवर घ्या,असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. महाराष्ट्रात कर्जाचा बोजा वाढल्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या तोच प्रसंग आता खाजगी बस मालकांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खाजगी बस वाहतूकदारांवर प्रवाशांची सतावणूक करण्याचा आरोप केला जातो पण प्रत्यक्षात वाहतूक खात्याकडून या बसमालकांची पिळवणूक होते त्याबाबत मात्र वाहतूकमंत्री "ब्र' काढीत नाहीत. "कोंबड्यांची झुंज लावून मजा पाहत बसावे' त्या पद्धतीने आज वाहतूक खाते खाजगी बस वाहतूकदारांचीच आपापसात झुंज लावून त्यांची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.याप्रसंगी दक्षिण गोवा खाजगी बस मालकांनीही श्री.ताम्हणकर यांना आपला पाठिंबा दर्शवला व संघटितपणे हा लढा लढण्याचा निर्धारही केला.
आंदोलन थांबवा, अन्यथा मार्गांचे राष्ट्रीयीकरण करू ढवळीकर
उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे काही नेते केवळ आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यांचा वापर करून सरकारला व पर्यायाने प्रवाशांना वेठीस धरण्याचे प्रयत्न करतात. त्यांच्या या बेशिस्तीला व धमकीला सरकार अजिबात ढळणार नाही.हे आंदोलन मागे घेतले नाही तर आंदोलनात सहभागी झालेल्या बस मालकांचे परवाने रद्द करू व प्रसंगी खाजगी बस मालकांची दयेमुळे स्थगित ठेवलेला राष्ट्रीयीकरणाचा विषय निकालात काढू,असा इशारा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.
आज "कामाक्षी'या आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर,उपसंचालक अशोक भोसले,साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई व इतर अधिकारी हजर होते.वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराबाबत तोडगा काढण्यासाठी आपण संपूर्ण खात्याच्या संगणकीकरणावर भर दिला आहे.त्यासाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूकही करणार असल्याचे ते म्हणाले.अशोक भासले यांच्यावर होत असलेले आरोप हे वैयक्तिक असूयेपोटी होत असून त्यांना दक्षता खात्याने दोषमुक्त केले आहे.प्रल्हाद देसाई हे वाहतूकमंत्र्यांच्यावतीने पैसे मागतात हा आरोपही निव्वळ खोटारडा आहे,असे स्पष्टीकरण श्री.ढवळीकर यांनी यावेळी दिले.
खाजगी बस वाहतूकदारांच्या पोटावर लाथ मारावी लागेल म्हणूनच आपण राष्ट्रीयीकरणाचा विषय बाजूला ठेवला आहे.आता बस वाहतूकदारच जर बेशिस्तीने वागू लागले व वारंवार सरकारला वेठीस धरण्याच्या धमक्या देऊ लागले तर राष्ट्रीयीकरणावर भर देणे भाग पडेल,असा इशारा यावेळी श्री. ढवळीकर यांनी दिला. संघटनेने बंद पुकारल्यास कदंब महामंडळाची मदत घेऊन तसेच प्रसंगी शेजारील राज्यांतून बसगाड्या मागवून प्रवाशांची सोय करू,अशी माहितीही श्री.ढवळीकर यांनी दिली. प्रवाशांकडून खाजगी बस वाहतूकदारांच्या मनमानी कारभाराबाबत अनेक तक्रारी येतात त्याचीही गंभीर दखल घेऊ, असेही यावेळी श्री.ढवळीकर म्हणाले.
------------------------------------------------------------------
पर्रीकरांचा बस वाहतूकदारांना पाठिंबा
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज सुदीप ताम्हणकर यांची भेट घेतली व विचारपूस केली.यावेळी संघटनेतर्फे सुदीप ताम्हणकर यांनी आमरण उपोषणाचा हा निर्णय का घ्यावा लागला याचे कारण पर्रीकरांना कथन केले. वाहतूक खात्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची यादीच त्यांनी पुराव्यासहित पर्रीकरांसमोर ठेवली. या सर्व प्रकरणांबाबत अभ्यास करू, असे आश्वासन देऊन पर्रीकर यांनी संघटनेला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

राज्यात आणखी दोन महिलांचे खून

वेर्णा, मेरशीनंतर खोर्जुवे व सुकूर येथे सापडले मृतदेह
चारपैकी तीन खून एकाच पद्धतीने!

पणजी, म्हापसा, वास्को, दि. १३ (प्रतिनिधी): क्रूरकर्मा महानंद नाईक याने केलेल्या तब्बल सोळा खुनांचे थरारक प्रकरण ताजे असतानाच, मेरशी व वेर्णानंतर खोर्जुवे आणि सुकूर येथे गेल्या अठ्ठेचाळीस तासांत चार तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने राज्यात जबरदस्त खळबळ माजली आहे. यापैकी तीन तरुणींचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले असून यामागे एकाच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता आहे. सुकूर येथे सापडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. खुनी व्यक्तीने पूर्वतयारी करूनच हे खून केले असल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे. या मृतदेहांची अद्याप चिकित्सा करण्यात आली नसल्याने मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, या भयंकर खुनमालिकेने पोलिसांबरोबर जनतेचीही झोप उडवली आहे. त्यामुळे हे खून म्हणजे पोलिस खात्यासाठी आव्हान ठरले आहेत.
उद्या बुधवारी सकाळी "गोमेकॉती'ल डॉक्टरांचे खास पथक या या मृतदेहांची चिकित्सा करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, वेर्णा येथे काल रात्री सापडलेला "तो' मृतदेह ताळगाव येथून बेपत्ता असलेली १६ वर्षीय एविटा रॉड्रिगीस हिचा असल्याचे सिद्ध झाले आहे. आज सकाळी तिची आई सपना रॉड्रिगीस हिने मृतदेहाची ओळख पटवली.
वरील चार ठिकाणी मिळालेले महिलांचे मृतदेह एकसारख्या पद्धतीने जाळण्यात आले आहेत.
"सीरियल किलर' महानंद नाईक याच्यानंतर आता या पाच तरुणींचे मृतदेह सापडल्याने पुन्हा एकदा गोवेकरांची झोप उडाली आहे. या प्रकारामुळे राज्यात महिला किती सुरक्षित आहेत, याभोवतीच प्रश्नचिन्ह लागले आहे.
हे "सीरियल किलर'चे कृत्य असू शकते; तथापि, या खुनामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने त्याबाबत एवढ्यातच ठोस भाष्य करणे कठीण आहे, असे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काल सकाळी मेरशी येथे एका अज्ञात तरुणीचा जाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना आज सकाळी खोर्जुवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर असलेल्या एका झुडपात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा पंचनामा करून म्हापसा पोलिस स्थानकावर पोहोचतात न पोहोचतात तोच रात्री सुकूर पर्वरी येथील एका झुडपात आणखी एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी सदर मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवून दिला.
खोर्जुवेतील 'ती' नवविवाहित?
खुर्साचीवाडी मरड खोर्जुवे येथे रस्त्यापासून ५ मीटर अंतरावर २५ ते ३० वयोगटातील तरुणीचा जळालेला मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर पिवळा चुडीदार असून हातावर आणि पायावर मेंदी घातली आहे. त्याचप्रमाणे "आयब्रो ट्रीम' केल्या असल्याने तो नवविवाहितेचा मृतदेह असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर तरुणीच्या एका हातात दोन बांगड्या तर दुसऱ्या हातात एक बांगडी आहे. तसेच पायात चांदीचे पैंजण असून दोन्ही पायांत जोडवी असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
या तरुणीची उंची ५.२ इंच आहे. खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असून तिच्या शरीराचा काही भाग होरपळला आहे. शिवाय मृतदेहावर दोन ठिकाणी चपला सापडल्या आहेत. त्यामुळे खून करणारी व्यक्ती विकृत असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह सापडला तेथे सनफ्लॉवर ब्रॅंडची काड्यापेटी (मॅच बॉक्स) पोलिसांना सापडली आहे. यावेळी श्वान पथकाची मदत घेतली असता त्याचा फारसा फायदा झाला नाही.
सुकूर येथेही मृतदेह
दरम्यान, रात्री ७ वाजता खैरा सुकूर येथे सरकारी विद्यालयाच्या समोरील दाट झाडीत अज्ञात तरुणीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत मिळाला. खैरे सुकूर येथे निर्जनस्थळी नेऊन सरकारी शाळेतील आवारात रक्ताचे डाग दिसत असल्याने तिचा त्याच ठिकाणी खून करून मृतदेह दाट झाडीत टाकला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्र झाल्याने आणि घटनास्थळी विजेची सोय नसल्याने पोलिसांच्या तपासकामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी "गोमेकॉ'मध्ये पाठवण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक सेमी तावारीस, म्हापशाचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई, उपनिरीक्षक विजय राणे घटनास्थळी दाखल झाले होते.

वास्कोहून एविटा परतलीच नाही!

पणजी, दि. १३ (प्रीतेश देसाई): वास्को येथे परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आपल्या मैत्रिणीबरोबर घरून निघालेली एविटा रोड्रिगीस पुन्हा घरी परतलीच नाही. "आम्ही तिला कुठेच जायला देत नव्हतो. परीक्षा केंद्र पाहण्यासाठी जाऊया म्हणून व्हायलट नावाची तिची मैत्रीण मागे लागली होती. त्यामुळे दि. ११ रोजी ती ११.३० वाजता तिच्याबरोबर घरून निघाली होती, अशी माहिती एविटाची आजी लीलावती शांताराम नाईक हिने दिली. सातवीला नापास झाल्याने ती घरीच राहत होती. त्यामुळे तिच्या आजोबाने गेल्यावर्षी खुल्या विद्यालयात तिला दाखल केले होते. त्याची परीक्षा उद्या दि. १४ ऑक्टोबर रोजी वास्को येथे होणार होती. त्यामुळे ती ते पाहण्यासाठी म्हणून मैत्रिणीबरोबर गेली होती.
दि. ११ रोजी रात्री उशिरापर्यंत एविटा घरी परतली नसल्याने तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आला. परंतु, तो बंद असल्याने तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तिची आई सपना रोड्रिगीस हिने व्हायलट हिच्याशी मोबाईल संपर्क साधला. यावेळी ती घरी जायला निघाली असून थोड्या वेळात पोचेल असे तिने सांगितले. परंतु मध्यरात्रीपर्यंत परतली नसल्याने तिने पुन्हा व्हायलट हिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तोही बंद मिळाला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा व्हायलट हिला दूरध्वनी करून एविटा हिच्याविषयी चौकशी केली असता, आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे एविटा बेपत्ता झाल्याची पोलिस तक्रार पणजी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली.
पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी व्हायलट हिची चौकशी केली असता त्यादिवशी व्हायलट ही वास्को येथे गेलीच नाही. ती संपूर्ण दिवस आपल्या वडिलाबरोबर होती, असे तपासात उघड झाले असल्याचे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले. व्हायलट हिच्याबरोबर जाते म्हणून निघालेली एविटा मग कोणासोबत गेली, घरून निघण्यापूर्वी एविटाला मोबाईलवर दूरध्वनी आला होता. तो दूरध्वनी कोणाचा होता. याचा तपास घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. मृतदेह मिळाला त्याठिकाणी तिचा मोबाईलही मिळालेला नाही.
बादलीभाट करंझाळे ताळगाव येथे काही वर्षापूर्वी युसाफ रोड्रिगीस व सपना नाईक यांचा विवाह झाला होता. त्यानंतर एविटा ही एकुलती एक मुलगी त्यांच्या घरी जन्माला आली होती. सध्या युसाफ हा घरी राहत नसल्याने एविटा ही आजीच्या घरी राहत होती. तर, आई सपना नोकरीला जाऊन तिचे पालन पोषण करीत होती.
----------------------------------------------------------------
त्या तरुणाची चौकशी करण्याची मागणी
सहा महिन्यापूर्वी ताळगाव येथे एवीटा हिच्या गळ्यातील सोनसाखळी मेरशी येथील एका तरुणाने हिसकावून घेतली होती. त्यानंतर तो व्यक्ती एविटा हिच्या मोबाईलवर संपर्क साधून सोनसाखळी परत हवी तर, आपल्याला भेटायला ये, म्हणून धमकावत होता. त्यामुळे तिने तो मोबाईल नंबर बदलून दुसरा नंबर घेतला होता, असे तिच्या आजीने सांगितले. ही माहिती तिच्या काकाला मिळाल्याने त्याने मेरशी येथील त्या तरुणाच्या घरी जाऊन सोनसाखळीची परत करण्याची मागणी केली होती. तो तरुण गुंडगिरी करणारा असून त्याचीही चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी तिच्या काकाने केली आहे.

राजीनामा देऊ करणारे क्रीडामंत्री कुठायत?

आमदार पार्सेकर यांचा खोचक सवाल
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेत अडीच हजारांपेक्षा जास्त झाडे असल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असे विधानसभा अधिवेशनात जाहीर आव्हान देणारे क्रीडामंत्री बाबू आजगावकर आता तोंडघशी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीपूर्वीपासून क्रीडा खात्यातर्फे सुरू करण्यात आलेले या जमिनीचे सर्वेक्षण अद्यापही सुरू असून तेथील झाडांची मोजणी करून या अधिकाऱ्यांची दमछाक झाली आहे. मात्र आतापर्यंत केवळ २५ टक्केच झाडांची मोजणी झाली असल्याने हा आकडा दहा हजारांचा पल्ला पार करणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या विषयाला पुन्हा हात घातला आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात आपण वारंवार धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेबाबत सत्यस्थिती क्रीडामंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. क्रीडामंत्री मात्र काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी काहीही आधार नसताना आपला दावा फेटाळून लावला होता. क्रीडानगरीसाठी नियोजित केलेल्या ठिकाणी किमान दहा हजार विविध प्रकारची झाडे आहेत, असा दावा आपण केला होता. क्रीडामंत्री आजगावकर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर या ठिकाणी अडीच हजारांहून जास्त झाडे असल्याचे स्पष्ट झाले तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी गर्जनाही त्यांनी सभागृहात केली होती. आमदार पार्सेकर यांनी त्या गर्जनेची आठवण करून देताना राजीनाम्याची भाषा करणारे क्रीडामंत्री आता कुठे गेले,असा खोचक सवाल केला आहे.
क्रीडाखात्यातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात झाडांचे मोजमाप करून खात्याचे अधिकारी आताच थकले आहेत. त्यामुळे तेथील झाडांच्या संख्येबाबत क्रीडामंत्र्यांनीच स्पष्टीकरण देणेच उचित ठरेल, असा टोलाही आमदार पार्सेकर यांनी हाणला.
आपल्या शेतजमिनी व बागायतींच्या रक्षणासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांनी टाहो फोडून सरकारला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला; पण बहिरेपणाचा आव आणून सरकारने त्यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केले. यासंदर्भात नेमके खरे कोण व खोटे कोण हे आता क्रीडामंत्र्यांनीच सांगितलेले बरे, असे खोचक उद्गारही आमदार पार्सेकर यांनी काढले.

Tuesday, 13 October 2009

ट्कमालकांच्या मागण्या डावलून पोलिस संरक्षणात खनिज वाहतूक

विरोध करणाऱ्या १६० ट्रकमालकांना अटक

तिस्क उसगाव, दि.१२ (प्रतिनिधी)- " सेझा खनिज आस्थापनाने माल वाहतुकीत आमचे टिपर ट्रक सामावून घ्यावेत.' या मागणीसाठी गेले आठ दिवस सुरू उसगाव वड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज वेगळे वळण मिळाले.आज सकाळी सेझा खनिज आस्थापनाच्या वाहतूक ठेकेदारांमार्फत कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक उसगाव वड येथे अडविण्यात आले. टिपर ट्रक मालक आंदोलनकर्त्याची मागणी पूर्ण न करताच पोलिस बंदोबस्तात खनिज माल वाहतूक सुरू करण्यात आल्याने आंदोलक टिपर ट्रक मालकांनी स्वतःला अटक करून घेतली.
आज सकाळी १०.३० वाजता पोलीस बंदोबस्तात सेझा खनिज आस्थापनाच्या वाहतूक ठेकेदारांमार्फत कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक उसगाव वड येथे पोचताच आंदोलनकर्त्या टिपर ट्रक मालकांनी ते अडविले. मागणी पूर्ण झाल्याशिवाय सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक उसगावमार्गे करू दिली जाणार नाही, असा हेका त्यांनी धरला. यावेळी कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू तिथे दाखल झाले. त्यांनी खनिज माल वाहतूक ठेकेदारांचा प्रस्ताव आंदोलनकर्त्या ट्रक मालकांसामोर मांडला. खनिज माल वाहतूक ठेकेदारामार्फत खनिज माल पणसुले बगलमार्ग येथे खाली करण्यात येईल. दर दिवशी गेल्या वर्षी पेक्षा दोन हजार टन जादा खनिज माल तिथे खाली करण्यात येईल. गेल्या वर्षी ८ हजार टन माल तिथे खाली करण्यात येत होता. यावर्षी १० हजार टन खनिज माल दर दिवशी तिथे खाली करण्यात येईल. गेल्या वर्षी प्रती टन ७८ रुपये दिले जायचे.त्यात यंदा २ रुपये वाढ करून ८० रुपये प्रति टन दिले जाईल. हा प्रस्ताव आंदोलनकर्त्या ट्रक मालकांना मान्य झाला नाही. या संदर्भात नंतर फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू, तसेच उसगाव ट्रक मालक संघटनेचे सचिव संतोष नाईक व इतर पदाधिकारी गेले होते. या बैठकीत काहीच निर्णय होऊ शकला नाही.
दुपारी १.१५ वाजता फोंडा उपजिल्हाधिकारी जयंत तारी, फोंडा संयुक्त मामलेदार संगीता नाईक, फोंडा पोलिस उपअधीक्षक सेराफीन डायस, फोंडा पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील, कुळे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी उसगाव वड येथे येऊन आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा या संदर्भात फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.१६ ऑक्टोबर रोजी पणजी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत या संदर्भात सेझा खनिज आस्थापनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. आंदोलनकर्त्या ट्रक मालकांच्या मागणीवर यावेळी तोडगा काढण्यात येईल. आज सेझा खनिज आस्थापनाचा खनिज माल घेऊन आलेल्या टिपर ट्रकांना वाहतूक करू द्या, अशी विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते टिपर ट्रक मालक खवळले. मागणी पूर्ण केल्या शिवाय कोणत्याही परिस्थितीत सेझा खनिज आस्थापनाची खनिज माल वाहतूक करू दिली जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ट्रक मालकांनी यावेळी दिला. पोलिस बंदोबस्तात खनिज माल वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न यावेळी पोलिस उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी केला. त्यावेळी सर्व आंदोलनकर्त्या टिपर ट्रक मालकांनी स्वतःला अटक करवून घेतली.
उसगाव टिपर ट्रक मालक संघटनेचा बॅर्नर, त्यांच्या चार प्लॅस्टिक खुर्च्या, वाळूत लपवून ठेवलेले बांबूचे २५ दांडे पोलिसांनी जप्त केले. सेझा खनिज आस्थापनाच्या खनिज मालवाहू टिपर ट्रकांनी उसगाव पूल पार केल्यानंतर पोलीस फौजफाटा तेथून हालविण्यात आला.
अटक करवून घेतलेल्या १६० टिपर ट्रक मालकांना फर्मागुडी पोलिस स्थानकावर रीतसर १५१ कलामाखाली अटक करण्यात आली. नंतर सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
आंदोलनकर्त्या ट्रक मालकांची मागणी पूर्ण होईपर्यत कोणत्याही परिस्थिती सेझा खनिज आस्थापनेची उसगाव मार्गे कोडली ते आमोणा खनिज माल वाहतूक होऊ द्यायची नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आज फक्त फोंडा उपजिल्हाधिकारी जयंत तारी यांच्या विनंतीला मान (आदर ) देऊन खनिज माल वाहतूक ट्रक सोडण्यात आले आहेत. सदर खनिज माल वाहतूक करणारे टिपर ट्रक कोणत्याही नियमाचे पालन करीत नाहीत. रात्रीच्या वेळी ही खनिज माल वाहतूक करीत असल्याने या भागातील ग्रामस्थांची झोपमोड होते. १० टनापेक्षा जादा खनिज माल वाहतूक सदर टिपर ट्रकांमधून केली जात असल्याने उसगाव भागात धूळ प्रदूषण होते. या संदर्भात आता न्यायालयात याचिका सादर करण्यात येणार आहे,अशी माहिती संबंधित ट्रक मालकांनी आज दिली आहे. १७ ऑक्टोबरपर्यत ट्रक मालकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास शांततेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन अधिक चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत.
कोडली दाभाळ भागातून पंच सदस्य व ग्रामस्थही संघर्षाच्या तयारीने उसगाव येथे आले होते. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टळला.

...तर खाजगी बस वाहतूक बंद !


सुदीप ताम्हणकर यांचे आमरण उपोषण सुरू


पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांबाबत उद्या दुपारपर्यंत सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही तर संध्याकाळी पणजी ते कळंगुट मार्गावरील खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात येईल. तेवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर गोवा बंदची हाक देणे अपरिहार्य ठरेल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिला.
राज्य वाहतूक खात्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार, खात्यातील अधिकाऱ्यांमार्फत खाजगी बसमालकांना मिळणारी हीन वागणूक, गैरकारभाराबाबत पुराव्यासहित दाखल केलेल्या तक्रारींकडे होणारी डोळेझाक, संघटनेच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आदी अनेक मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्तर गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी जुन्ता हाऊस मधील वाहतूक खात्याच्या मुख्यालयासमोर आजपासून आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. उत्तर गोव्यातील बहुसंख्य खाजगी बसमालकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करून सरकारला जागे करण्याचा हा उपाय हाती घेतला आहे. महात्मा गांधींच्या जयंतीदिनी त्यांची महती सांगणारी मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्या या नेत्यांना त्यांची कितपत चाड हे आता लवकरच कळेल,असा टोलाही यावेळी श्री.ताम्हणकर यांनी हाणला.
दरम्यान, संघटनेतर्फे वाहतूक खात्यासमोर ठेवलेल्या मागण्यांत खात्यासाठी पूर्णवेळ संचालकाची नेमणूक करणे, वाहतूक खात्यातील साहाय्यक संचालक प्रल्हाद देसाई यांच्यावर कारवाई करणे, "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रद्द करणे, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठीचे दर कमी करणे, प्रवासी बसगाड्यांना रेडियम टेप्स बसविण्याची सक्ती मागे घेणे, उपसंचालक अशोक भोसले, श्री. कुंडईकर यांच्यावर कारवाई करणे आदींचा समावेश आहे. सरकारकडून या मागण्यांबाबत वेळोवेळी चालढकल केली जात असल्याने त्याचा निषेध म्हणूनच आपण उपोषणाला बसल्याचे श्री. ताम्हणकर म्हणाले.
वाहतूक खात्याला पूर्णवेळ संचालकांची गरज आहे. केपे, मडगाव (नोंदणी विभाग), फोंडा आणि मडगाव (अंमलबजावणी) साठी पूर्णवेळ साहाय्यक संचालकांची आवश्यकता आहे. यासंबंधी वारंवार वाहतूक खात्याला व मंत्र्यांना निवेदने सादर करुनही कुणी लक्ष देण्यास तयार नाही. सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराबाबत अनेकजण बोलतात पण इथे भ्रष्टाचार व गैरकारभाराचे पुरावे असूनही कारवाई होत नाही.न्यायालयात जाणे हे सामान्य लोकांना परवडणारे नाही. सरकारी पातळीवर या तक्रारींची दखल घेऊन कारवाई होण्याची गरज आहे.वाहतूक खात्यात कशा पद्धतीने भ्रष्टाचार चालतो याची प्रत्यक्ष माहिती हवी असेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळवलेली सर्व कागदपत्रे आहेत, असेही ते म्हणाले.यावेळी महेश नायक,ऍड.सुभाष सावंत आदींनी श्री.ताम्हणकर यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतावणूक करण्याचा डाव वाहतूक अधिकाऱ्यांनी सुरुवात केला आहे.संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांच्या गाड्या पणजी ते कळंगुट मार्गावर धावतात.तिथे कुणालाही विश्वासत न घेता एका नव्या बस मालकाला तात्पुरता परवाना दिला आहे.तसेच इतर काही मार्गावरही असाच प्रकार घडला आहे. एकीकडे तात्पुरता परवाना देण्यास नकार देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्या मर्जीतील लोकांना लगेच हा परवाना दिला जातो हे कसे काय, उद्यापर्यंत हा परवाना रद्द करण्यात आला नाही तर या मार्गावरील बसगाड्या बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

अन्यायग्रस्त गाडेवाल्यांनी घेतला मूळ जागेचा ताबा


स्थलांतराचा निषेध


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - पणजीतील गाडेवाल्यांचे स्थलांतर नवीन बाजार संकुलात करून महापालिकेने या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली आहे. नव्या जागेत या गाडेवाल्यांना काहीही व्यवसाय होत नाही, त्यामुळे त्यांच्यासमोर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला असून महापालिकेच्या या जुलमी निर्णयाच्या निषेधार्थ त्यांनी आज आपल्या मूळ ठिकाणी सिने नॅशनलसमोरील फुटपाथवर उघड्यावर वस्तू विक्री करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
पणजीत पोर्तुगिजकाळापासून विविध ठिकाणी असलेल्या गाडेवाल्यांना महापालिकेने अलीकडेच गेल्या फेब्रुवारी महिन्यात नव्या बाजारसंकुलात स्थलांतर केले.या ठिकाणी थेट तिसऱ्या मजल्यावर या गाडेवाल्यांची सोय करण्यात आली परंतु याठिकाणी त्यांना काहीही व्यवसाय होत नसल्याची त्यांची तक्रार आहे.मुळात बाजारात खालच्या मजल्यावरच सगळे सामान ग्राहकांना मिळते तर ते ग्राहक तिसऱ्या मजल्यावर कशाला येतील,असा सवाल त्यांनी केला.सुरुवातीला महापालिकेने त्यांना खाली जागा देण्याचे आश्वासन दिले होते व मोठी दुकाने दाखवली होती परंतु प्रत्यक्षात तिसऱ्या मजल्यावर एका दुकानाचे दोन भाग करून या गाडेवाल्यांना फसवण्यात आले, अशी टीकाही त्यांनी केली.या गाड्यांची सोडत काढतानाही गाडेवाल्यांना विश्वासात घेतले नाही, असा आरोपही करण्यात आला. गेले नऊ महिने व्यवसायासाठी धडपडणाऱ्या या गाडेवाल्यांचा विश्वास ढळला आहे. काही गाडेवाल्यांनी रोजंदारीवर जाण्यास सुरुवात केली आहे तर काही आपल्या नशिबाला दोष देत रडत आहेत.आता या अन्यायाविरोधात रस्त्यावर येणे भाग असून त्यामुळेच या निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.जो पर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत हा निषेध सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गाडेवाल्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक साहाय्याची योजनाही फुसका बार ठरला आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडे कैफियत मांडली असून त्यांनीही या गाडेवाल्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यमान महापालिकेतील सत्ताधारी मंडळ हे ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे आहे, त्यामुळे आता या गाडेवाल्यांना केवळ तेच न्याय देऊ शकतात,असा विश्वास व्यक्त करून त्यांच्यासमोर मागण्या ठेवण्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपस्थित गाडेवाल्यांत राजू देवगी,धना नाईक,प्रसाद नाईक,राजेश सावंत,रामा शिरोडकर,गजानन आमोणकर,सुरेश नाईक,शेख सादीक आदी हजर होते.

काणकोण मूत्रपिंड संकटावर आयुर्वेद उपचार शक्य


डॉ. वैद्यचुडामणी रघुवीर भिडे यांचा विश्वास


पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)-काणकोण भागातील जादातर लोकांना मूत्रपिंडाचा त्रास होतो हे आता राज्य सरकारच्या सर्वेक्षणातही सिद्ध झाले आहे व त्यामुळे त्याबाबत गंभीरपणे विचार व्हायला हवा. या संकटावर आयुर्वेदाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मात करता येणे शक्य आहे, असा विश्वास डॉ.वैद्यचुडामणी रघुवीर पां.भिडे यांनी व्यक्त केला. सरकार किंवा एखाद्या स्वयंसेवी संघटनेची त्यासाठी तयारी असल्यास आपण याबाबत पुढाकार घेण्यास राजी आहोत,असेही ते म्हणाले.
गोवा विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या आयुर्वेद परिषदेसाठी उपस्थित राहिलेले डॉ.वैद्यचुडामणी रघुविर भिडे यांनी अलीकडेच काणकोण भागाला भेट दिली. या परिषदेवेळी झालेल्या चर्चेत सरकारी आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी डॉ.राजेंद्र तांबा यांनी काणकोणातील मूत्रपिंडाच्या विषयावर सविस्तर माहिती दिली. या परिषदेत आयुर्वेद व एलोपथी अशा दोन्ही क्षेत्रातील डॉक्टरांनी एकमेकांशी संवाद साधल्याने याविषयावर सविस्तर चर्चा झाली.डॉ.भिडे यांनी डॉ.तांबा व डॉ.दिवाकर वेळीप यांच्या सोबत या भागात भेट दिली व अनेक रुग्णांची तपासणी केली. या तपासणीत मूत्रपिंड रुग्णांची भयानकस्थिती त्यांच्या लक्षात आली. हा विषय या लोकांसाठी केवळ आरोग्याशी संबंधित राहिला नाही तर तो एक सामाजिक विषय बनला आहे. सरकारने अलीकडेच या रुग्णांचा "डायलेसीस'चा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे ही स्तुत्य गोष्ट आहे पण त्यासाठी या रुग्णांना इस्पितळात जावे लागते. औषधांचा खर्च येतो. साधारणतः एका रुग्णाला दिवसाकाठी १४० रुपयांचा खर्च येतो,असेही पाहणीत आल्याचे ते म्हणाले. मूत्रपिंडाचा त्रास वाढल्यानंतर रुग्णाला डायलेसीसचा आधार घ्यावा लागतो हे खरे पण नव्या लोकांना या आजाराची लागण होणार नाही, यासाठी सरकारकडे काहीही उपाययोजना नाही.
आयुर्वेद हे अलीकडच्या काळात सर्वमान्य व एक परिपूर्ण आरोग्यशास्त्र आहे हे सर्वांनी मान्य केले आहे.या शास्त्राच्या आधारावर या संकटावर मात करणे शक्य आहे. या आजाराचा नव्यानेच त्रास सुरू झालेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यास ते या संकटापासून वाचू शकतात.या औषधांचा खर्चही कमी असेल.साधारणतः दिवसाला ३० ते ४० रुपये या प्रमाणे औषधांचा खर्च असून किमान चार ते पाच महिन्यांचा हा औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास त्याचा लाभ अनेकांना मिळेल,असा विश्वास यावेळी डॉ.भिडे यांनी दिला. सरकार "डायलेसीस'वर खर्च करतेच पण त्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करून या लोकांवर आयुर्वेद उपचाराची संधी त्यांना देत असेल तर त्यासाठी पुढाकार घेता येईल,असेही ते म्हणाले.
सगळीकडे उपचार घेऊन झाल्यानंतरच लोक अखेर आयुर्वेद वैद्याकडे येतात हे खरे तर या शास्त्राचे दुर्भाग्य. "ऍलोपथी' केवळ रोगावर तात्पुरती मात करतो पण आयुर्वेदाव्दारे दोषांचे निराकरण होतेच व शरीरस्वास्थ पूर्ववत होण्यासही मदत होते.काणकोणवासियांना आयुर्वेदाचे वरदान मिळू शकेल याची आपल्याला पूर्ण खात्री आहे पण त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे शेवटी ते म्हणाले.