Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 17 September 2008

किनारपट्टी क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या सर्वेक्षणाचा आदेश

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - गोव्याच्या किनारपट्टी क्षेत्रात किती बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, त्यात १९९१ पूर्वीच्या आणि नंतरची किती, दोनशे मीटरवर आणि पाचशे मीटरवर किती, याचे सर्वेक्षण करून ते न्यायालयात सादर करण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिला. या कामासाठी एका वर्षाचा कालावधी सरकारने मागून घेतला आहे.
भरती रेषेपासून आत असलेल्या बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याचा आदेश यापूर्वी खंडपीठाने किनारपट्टी भागात येणाऱ्या सर्व पंचायतींना दिला होता. कळंगुट पंचायतीने या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्यावर अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या पंचायतीचे माजी सरपंच आग्नेल फर्नांडिस व उपसरपंच रुपा खराडे यांनी खंडपीठाची माफी मागितल्याने त्यांच्यावरील अवमान याचिका निकालात काढण्यात आली.
सचिव नसल्याने कोणताही कारवाई करण्यास अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे अनेक पंचायतीचे दुखणे आहे. सचिवांची संख्या कमी आहे की, नक्की कोणती अडचण आहे, असा प्रश्न यावेळी न्यायालयाने सरकारला केला. त्यावेळी न्यायालयाला सरकार पक्षातर्फे समर्पक उत्तर देता आले नाही.
२६ मार्च ०८ रोजी कळंगुटचे माजी सरपंच फर्नांडिस यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याचप्रमाणे २६ सप्टेंबर ०७ ते ४ फेब्रुवारी ०८ दरम्यान या पंचायतीच्या सचिवपदी असलेल्यांनाही "कारणे दाखवा' नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. २००६ साली गोवा खंडपीठाने, किनाऱ्यांवर बेकायदा बांधकामे उभारल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्यात सर्वच किनारपट्टी भागांतील पंचायतींना प्रतिवादी करून घेतले होते.
कळंगुट पंचायतीत सरपंच व उपसरपंच यांच्यावर अनेकदा अविश्वास आल्याने या आदेशाचे पालन करण्यास वेळ मिळाली नाही, अशी अडचण माजी सरपंचाच्या वकिलाने न्यायालयात मांडली. किनाऱ्यांवरील बेकायदा बांधकामांवर सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचे यापूर्वी न्यायालयात स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे भरती रेषेपासून दोनशे मीटरवर किती बांधकामे उभी राहिले आहेत, याची कोणतीही माहिती सरकारकडे नसल्याचे दिसून आले होते.

"रवींद्र भवना'साठी बहुतांश नेते आग्रही

राजीव कला मंदिराला चढणार नवी झळाळी
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी) - मडगाव येथे कित्येक कोटी रुपये खर्चून आकर्षक रवींद्र भवन उभारल्याने आता सरकारातील इतर नेत्यांना आपल्या मतदारसंघातही अशीच रवींद्र भवने हवीत असे स्वप्न पडू लागले आहे. गृहमंत्री रवी नाईक यांनी तर चक्क सध्याच्या राजीव गांधी कला मंदिराचा (फोंडा) पूर्ण कायापालट करण्याची योजना आखली आहे.
राजीव गांधी कला मंदिराच्या नूतनीकरणाचे काम गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रकरणी वास्तूरचनाकार राहुल देशपांडे यांना सल्लागार नेमण्यात आले असून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बहुगुणा यांनी दिली. हे केवळ दुरुस्तीकाम व काही किरकोळ बदल असतील, असे जरी भासवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रवी नाईक यांनी हा प्रकल्पच नव्याने उभारण्याचा घाट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
प्रत्येक तालुक्यात एक रवींद्र भवन उभे करण्याचा संकल्प सरकारने सोडला असताना तसे न करता केवळ मंत्र्यांच्या इच्छेखातर कोट्यवधींचा खर्च करणे कितपत योग्य आहे,असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजीव कला मंदिराचे बांधकाम १९९२ साली रवी नाईक हे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. त्यानंतर अनेक वर्षे हे काम रखडले. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरच तब्बल दहा वर्षांनी या प्रकल्पाला नव्याने चालना मिळाली व अखेर हे कला मंदिर जनतेसाठी २००२ साली खुले करण्यात आले. पणजीतील कला अकादमीनंतर फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिर हे एक उत्कृष्ट नाट्यगृह आहे. अनेक व्यावसायिक नाटकेही तेथे सादर केली जातात व त्यांना प्रेक्षकांचा जोमदार प्रतिसाद मिळत आहे.
या कला मंदिराच्या इमारतीच्या बांधकामाला कित्येक वर्षे झाल्याने आता छप्पर जुने झाले असून पावसाचे पाणी आत झिरपत असल्याचे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या छताचे "वॉटर प्रूफिंग' करूनही हे पाणी थांबत नसल्याची माहिती बहुगुणा यांनी दिली. कला मंदिरातील मा. दत्ताराम नाट्यगृह, परिषद सभागृहातही पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे कला मंदिराच्या संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे.
दरम्यान, कला मंदिराची इमारत ही मडगाव येथील रवींद्र भवनाप्रमाणे लक्षवेधी नसल्याने या इमारतीलाही नवी झळाळी देण्याचे ठरले आहे. नूतनीकरणाच्या काळात कला मंदिरातील कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत. कला मंदिरातील नाट्यगृहात नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याची योजना आहे. अशा प्रकारे हे नाट्यगृह विकसित केले जाणार आहे.

रेशनकार्डाच्या वादातून वास्कोत काकाचा पुतण्याकडून खून

वास्को, दि.१६ (प्रतिनिधी) - पुतण्या व काका यांच्यात आज (दि.१६) सकाळी रेशन कार्डावरून झालेल्या वादात श्रीकांत (परशाप्पा, १९) याने शशी नागवी (४३) याचा खून केला. मंगोरहील येथे राहणाऱ्या श्रीकांतने आपले काका शशी यांच्यावर लोखंडी सळीने वार केले. त्यावेळी गंभीर अवस्थेत शशी यांना बांबोळी येथे गोमेकॉत दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला.
श्रीकांतने सकाळी काका शशी यांच्याकडे रेशन कार्ड मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. श्रीकांतने लोखंडी सळी आणून शशी यांना मारहाण केली. सकाळी ९.३०च्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या शशी यांना उपचार घेत असताना संध्याकाळी ६ च्या दरम्यान मृत्यू आला. वास्को पोलिसांनी या प्रकरणी संशयित म्हणून श्रीकांत याला त्वरित अटक करण्यात आले आहे. रेशनकार्डमुळे यापूर्वी श्रीकांत व शशी यांच्यात खटके उडाल्याचे शशी यांचा मुलगा सुनील यांनी पत्रकारांना दिली. शशी हे पेंटिंगचे काम करत होते. श्रीकांत हा स्क्रॅप यार्ड येथे काम करत होता. याच स्क्रॅप यार्डमधून सळी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्को पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. निरीक्षक हरिण मडकईकर तपास करीत आहेत.

मेगा प्रकल्पही रद्द होणे अशक्य!

सरकारसमोर कायदेशीर पेचप्रसंग
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी) - विशेष आर्थिक विभागाप्रमाणेच (सेझ) आता मेगा प्रकल्पाचे लोढणेही सरकारच्या गळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकामांसाठी आवश्यक सर्व ना हरकत दाखले व विविध खात्यांची मान्यता प्राप्त करूनही केवळ स्थानिक जनतेच्या विरोधामुळे या प्रकल्पांचे काम रखडल्याने कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गेल्या विधानसभेत मेगा प्रकल्पांबाबत पंचायत संचालकांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देणार अशी घोषणा केली होती. याप्रकरणी पंचायत संचालक मिनिनो डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी सरकार गांभीर्याने चर्चा करीत असल्याचे सांगितले. मुळात "मेगा प्रकल्पा'ची व्याख्याच अजून स्पष्ट झालेली नाही. विविध पंचायत पातळीवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांविरोधात स्थानिक जनतेत अस्वस्थता निर्माण झाल्याने त्यांनी या प्रकल्पांना कडाडून विरोध दर्शवला आहे.
या प्रकल्पांमुळे काही गावांची रचनाच बदलणार आहे. तसेच एरवी वीज,पाणी,कचरा आदी गोष्टींबाबत अनिश्चितता असल्याने लोकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. लोकांकडून पंचायत संचालकांवर आरोप केले जातात ही गोष्ट योग्य नाही. स्थानिक पंचायत मंडळांकडून सुरुवातीस सर्व परवाने दिल्यानंतर व इतर खात्यांकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे प्रकल्प बंद पाडणे चुकीचे आहे.
पंचायत खात्याने जर बळजबरीने हे प्रकल्प बंद पाडले व सदर बांधकाम कंपनी न्यायालयात गेल्यास सरकारला भरपाईपोटी लाखो रुपये त्यांना द्यावे लागतील,असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याप्रकरणी स्थानिक जनतेला विश्वासात घेण्याची, लोकांशी चर्चा करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या शंका दूर करणे तसेच लोकांच्या सूचनाही विचारात घेण्याची गरज आहे.सरकार याबाबत निश्चित धोरण आखत असून लवकरच याप्रश्नी तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tuesday, 16 September 2008

एकाच कुटुंबातील तिघांचा मोले येथे अपघातात मृत्यू

मोले, दि.१५ (वार्ताहर): फोंडा - मोले राष्ट्रीय महामार्गावर सुकतळी मोले येथे आज (दि.१५) दुपारी सव्वा एकच्या सुमारास खनिजवाहू टिप्पर ट्रक (केए २२- बी - ०३७९) आणि मारुती कार (जीए ०८ ए - १०९८) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोले येथील थोरात कुटुंबातील सुनील मारुती थोरात, त्यांची पत्नी सौ. ज्योती आणि सहा महिन्यांचा मुलगा विनायक या तिघांचा मृत्यू झाला; तर सुनील यांची तीन वर्षाची मुलगी सृष्टी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मारुती कार धारबांदोडा येथून मोलेला येत होती, तर टिप्पर ट्रक मोलेहून धारबांदोड्याला जात होता. त्याचवेळी सुकतळी येथे धोकादायक वळणावर हा अपघात झाला. मारूती कार आणि टिप्पर ट्रक यांच्यात जोरदार टक्कर झाल्याने कारगाडी चालविणारे सुनील थोरात, पत्नी ज्योती, मुलगा व मुलगी गंभीर जखमी झाले. तिघांचेही इस्पितळात नेत असताना निधन झाले.
अपघाताची माहिती मिळताच मोले येथील नागरिक व्हेरॉन वाझ, मंजुनाथ जाधव, रामू गवळी व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मोले पोलीस चौकी, कुळे पोलीस स्टेशनवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. सुरुवातीला सौ.ज्योती, मुलगा विनायक आणि मुलगी यांना रुग्णवाहिकेतून फोंडा येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. अपघातानंतर सुनील थोरात गाडीच्या केबिनमध्ये अडकून पडले होते. गाडीचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढण्यात आले. कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर, उपनिरीक्षक प्रवीण गावस, साहाय्यक उपनिरीक्षक जयदेव गावस, शिपाई महेश गावकर, महादेव गावकर यांनी पंचनामा केला. अपघातानंतर टिप्पर ट्रकचा चालक सुभाष शिरोडकर याने अपघातस्थळी न थांबता त्वरित मोले पोलिस चौकी गाठून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी ट्रक चालक शिरोडकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
खंदा सामाजिक कार्यकर्ता
सुनील थोरात यांचा मोले भागात सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असायचा. मोले येथील गोल्डन स्पोट्र्स क्लबचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळत होते. तसेच भारतीय जनता पक्षाच्या सावर्डे मतदारसंघातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सावर्डे मतदारसंघाचे सचिव म्हणून ते कार्यभार पाहात होते. मोले येथील महादेव देवस्थानच्या बांधकाम समितीवर कार्यरत होते.
भाजपच्या सावर्डे मतदार संघ समितीचे अध्यक्ष तथा साकोर्ड्याचे उपसरपंच कमलाकांत नाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. सुनील यांच्या अपघाती निधनामुळे पक्ष एका कार्यक्षम कार्यकर्त्याला मुकला आहे, असे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
----------------------------------------------------------
देवदर्शन करून परतत होते...
सुनील थोरात हे दुपारी देवदर्शनाला जात असल्याचे सांगून पत्नी व मुलांसह घरातून बाहेर पडले होते. बालवाडीत शिकणाऱ्या सृष्टी या तीन वर्षीय मुलीलाही त्यांनी सोबत घेतले. दुपारी घरी परत जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील यांच्या पश्चात वडील, आई, सहा भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.मुलगी सृष्टी (वय ३) ही या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बांबोळीतील सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

मराठी नवकथेचे शिल्पकार गंगाधर गाडगीळ कालवश

नवकथेचा जनक हरपला
मुंबई, दि.१५ : मराठी लघुकथेला वेगळे वळण देऊन नवकथेचे शिल्पकार ठरलेले साहित्यिक आणि अर्थतज्ज्ञ प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८५ वर्षे होते.
वांद्रे येथील साहित्य सहवासमधील घरीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिव येथील स्मशानभूमीत दुपारी त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला.
गाडगीळांचे कनिष्ठ बंधू पत्रकार मिलिंद गाडगीळ यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. तेही आर्थिक व संरक्षणविषयक लिखाणासाठी प्रसिद्ध होते.
मूळत: अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या प्रा. गाडगीळांनी मराठी लघुकथेच्या क्षेत्रात अधिकाराने संचार केला आणि ख्याती प्राप्त केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक असतानाही त्यांची ओळख लघुकथाकार, नव्हे नवकथाकार अशीच झाली होती.
प्रारंभी सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक राहिलेले गाडगीळ हे नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे संस्थापक प्राचार्य झाले. नंतर आपटे-वालचंद उद्योगसमूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. आवर्जून मराठीत अर्थविषयक वृत्तपत्रीय लिखाण, हे त्यांचे वैशिष्ट्‌य राहिले.
त्यांच्या "भिनलेले विष' या कथेला १९५४ साली न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्यूनचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना राज्य सरकारचा वाड्.मय पुरस्कारही तीन वेळा प्राप्त झाला. १९९६ मध्ये त्यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावला. "एका मुंगीचं महाभारत' या दोन भागांतील आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमीने त्यांना गौरविले होते.
गाडगीळांनी लिहिलेल्या अनेक लघुकथा गाजल्या. विशेषत: तलावातले चांदणे ही कथा प्रचंड गाजली. तशीच गाजली लोकमान्य टिळकांवरील "दुर्दम्य' ही कादंबरी. बंडू हा नायक कल्पून त्यांनी बरेच लेखन केले व ते लोकांना आवडलेही. लघुकथा, प्रवासवर्णने, समीक्षा, अर्थकारण, बालसाहित्य असे विविध विषयांवर विपुल लिखाण त्यांनी केले. त्यांचे बरेचसे साहित्य इंग्रजी, हिंदी, कानडी व मल्याळी भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. प्रा. गाडगीळ हे सामाजिक कार्यकर्तेही होते. मुंबई ग्राहक पंचायतीच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. किंबहुना, ग्राहक चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे या नात्याने ते प्रणेतेच होते, अशी शोकसंवेदना माजी केंद्रीय मंत्री व भाजपानेते राम नाईक यांनी व्यक्त केली.
परंपरागत पठडीतून मराठी कथेला मुक्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणारे साहित्यिक हरपल्याची भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळातील युगाच्या जाणिवा मराठी कथेत आणण्यात गाडगीळ यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

ख्रिस्ती धर्मस्थळांवरील हल्ले चिंताजनक : पर्रीकर

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) : कर्नाटकातील मंगळूर व उडपी येथे ख्रिस्ती धार्मिक स्थळांवर झालेले हल्ले ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. गोवा प्रदेश भाजपकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून देशातील धार्मिक एकोपा बिघडवण्याचा हा सुनियोजित कट असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर बोलत होते. यावेळी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व साळगावचे आमदार दिलीप परूळेकर उपस्थित होते.
आम्ही कर्नाटक भाजपशी याप्रकरणी संपर्क साधला असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची तसेच सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्नाटक हे गोव्याचे शेजारी राज्य असल्याने गोवा सरकारनेही सावधानी बाळगण्याची गरज आहे. तथापि, गोव्यातच सध्या कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने याप्रकरणी दक्षता बाळगण्याची गरज आहे,असे पर्रीकर म्हणाले.
कर्नाटक सरकारने याप्रकरणी सहा जणांना अटक करून आपली कार्यक्षमता दाखवली आहे; परंतु गोव्यात अलीकडील काळात एकूण १७ मंदिरे व ७ चर्च फोडण्यात आली. मात्र, त्यांचा शोध घेण्यात गोवा पोलिस अपयशी ठरले. या प्रकरणात चोरीचा उद्देश नसून केवळ मूर्तीभंजन करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा प्रयत्न होता. तरीही सरकार ढिम्म असल्याचा टोला पर्रीकर यांनी हाणला.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कॉंग्रेसच्या राजवटीत ख्रिस्ती धार्मिक स्थळांवर किती हल्ले झाले याची माहिती त्यांनी घ्यावी व नंतरच बोलावे,असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. देशातील वाढत्या दहशतवादी कारवाया व मुद्दाम धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या घटकांचा शोध लावण्यात केंद्र सरकारलाही अपयश आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संशयितांविरुद्ध आरोप सिद्ध: खैरलांजी हत्याकांड

भंडारा, दि. १५ : महाराष्ट्रात गाजलेल्या खैरलांजी हत्या प्रकरणी आज येथील सत्र न्यायालयाने निवाडा देताना आठ संशयित आरोपींना दोषी ठरवले. एका दलित कुटुंबातील चार व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप या आठ जणांवर ठेवण्यात आला होता.
सदर प्रकरण निकालात काढताना प्रथम श्रेणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. दास यांनी गोपाळ बिंजेवर, सक्रू बिंजेवर, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, रामू धांडे, जगदीश मांडलेकर, प्रभाकर मांडलेकर आणि शिशपाल धांडे यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले.
या प्रकरणातील इतर तीन संशयित आरोपी महीपाल धांडे, धर्मपाल धांडे व पुरुषोत्तम तिटामरे यांना सोडून देण्यात आले. न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती नियम १९८९ ला अनुसरून वरील तिन्ही संशयित आरोपींचे कृत्य अमानुष असल्याचे न्यायालयात सिद्ध न झाल्याने त्यांना मुक्त करण्यात आले.
दरम्यान, संशयितांना आरोपी म्हणून सिद्ध करण्यात आले असून त्यांना २० सप्टेंबर रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
सुरेखा भय्यालाल भोतमांगे, तिची कन्या प्रियांका आणि मुलगे सुधीर व रोशन यांची २९ सप्टेंबर २००६ रोजी खैरलांजी येथे जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. सुरेखाचा पती भय्यालाल घटनास्थळावरून पलायन करण्यात सफल झाल्याने त्याचे प्राण वाचले होते. भय्यालालच्या कुटुंबीयांना अमानुषपणे मारून त्यांचे मृतदेह एका नाल्यात फेकून देण्यात आले होते.

बस तिकीट दरवाढीच्या मुद्यावरून कदंब व खाजगी बसमालक यांच्यात कलगीतुरा

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी): बसतिकिट दरवाढीवरून सध्या खाजगी बसमालक व कदंब महामंडळ यांच्यात जणू अप्रत्यक्ष राजकारण सुरू झाले आहे. कदंब महामंडळाकडून २५ टक्के दरवाढ देण्याच्या प्रस्तावावर सरकारने ५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले असताना आता या तोडग्यास खाजगी बसमालकांनी तीव्र विरोध केला आहे. एकतर २५ टक्के वाढ द्या, अन्यथा दरवाढच नको,अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
गोवा सरकारने बसतिकीट दरवाढीबाबत चर्चा करून किमान ५ टक्के दरवाढ करण्याचे तत्वतः मान्य केले आहे. डिझेल दरवाढीचा सर्वांत जास्त फटका हा कदंब महामंडळाला बसत असल्याने त्यांच्याकडून या वाढीबाबत सरकारकडे आग्रह धरण्यात आला आहे. सद्यस्थितीत दरवाढीच्या या एकूण प्रकरणात खाजगी बसमालकांनी प्रत्यक्ष भाग घेतलेला नाही. कदंब महामंडळाने २५ टक्के दरवाढ सुचवली असली तरी प्रत्यक्ष कदंब महामंडळाला होणारे नुकसान हे केवळ डिझेलदरामुळे नव्हे तर महामंडळाच्या एकूण कारभारामुळे होत आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी हा बोजा प्रवाशांवर लादणे योग्य होणार नाही, अशी भूमिका वाहतूक खात्याने घेतली आहे. वाहतूक खात्याने ५ टक्के वाढ करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पहिल्या पाच किलोमीटरवर ४.५० रुपये तर उर्वरित किलोमीटरसाठी ५ पैसे वाढ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या क्षुल्लक दरवाढीचा कोणताही फायदा बसमालकांना होणार नाही, उलट या वाढीमुळे सुट्टे पैशांचे संकट निर्माण होणार आहे. ही दरवाढ केली तरी प्रवाशांकडून ४ रुपयेच आकारले जातील. या बदल्यात किमान ५ रुपये व पुढील किलोमीटरसाठी १० पैसे अशी वाढ करावी,असे उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सचिव प्रदीप ताम्हणकर यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले. नाममात्र दरवाढ देऊन विनाकारण घोळ घालण्यापेक्षा ही वाढच नको, असेही खाजगी बसमालकांनी ठरवले आहे.
याप्रकरणी कदंब महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी खाजगी बसमालकांकडून तिकीट दरवाढीबाबत राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. वेळोवळी तिकीट दरवाढ झाल्यानंतर प्रवाशांकडून कमी तिकीट आकारायचे व कदंब महामंडळाच्या बसगाड्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या गाड्यांतून न्यायचे ही त्यांची सवय बनली आहे. २५ टक्के दरवाढ झाल्यास किमान दोन ते तीन रुपये तिकीट वाढणार आहे व त्यामुळे प्रवाशांना सध्याचे दर आकारल्यास कदंब गाड्यांत प्रवासी येणार नाहीत. याचमुळे त्यांनी ही शक्कल लढवल्याचे ते म्हणाले. सरकारने तिकीट दर निश्चित केले असताना त्याची कार्यवाही सक्तीने करण्यासंबंधी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खाजगी बसवाल्यांकडून प्रवाशांना तिकीट देणे व सरकारी दराप्रमाणे दर आकारणे होते आहे की नाही, याची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सरकारने जर याप्रकरणी उपाययोजना आखल्या नाहीत तर कदंब महामंडळाची परिस्थिती आटोक्यात येणे शक्य नसल्याचे मतही सदर अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
-----------------------------------------------------
आजची बैठक लांबणीवर
तिकीट दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्या १६ रोजी राज्य वाहतूक प्राधिकरणाची बोलावलेली बैठक एक आठवडा लांबणीवर पडली आहे. ही बैठक आता पुढील सोमवारी २२ रोजी होणार आहे,अशी माहिती वाहतूक संचालक पी. एस. रेड्डी यांनी दिली.

Sunday, 14 September 2008

दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी धागेदोरे सापडल्याचा पोलिसांचा दावा

"सिमी'शी संबंधित सहा अटकेत
नवी दिल्ली, दि.१४ - शनिवारी नवी दिल्लीच्या काही भागांत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला असून, लवकरच याबाबत ठोस माहिती उघड केली जाईल, असे म्हटले आहे.रात्री उशिरा सहा जणांना संशयावरून अटक करण्यात आली असून त्यांचा "सिमी'शी संबंध असल्याचे समजते.
आज दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयात सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने यासंबंधी बोलताना याप्रकरणी गुंतलेल्या सर्वांना गजाआड केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. या बॅाम्बस्फोटांमागे "इंडियन मुजाहिद्दीन' ही संघटना असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब पेरणाऱ्यांनी अमोनियम नायट्रेट आणि बॉल बेअरिंगचा वापर करून त्यांची तीव्रता वाढविली. एका कचऱ्याच्या पेटीत एक काळी पिशवी टाकताना ज्या मुलाने दोघांना पाहिले होते, त्याला पोलिस मुख्यालयात बोलाविण्यात आले असून, त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. या १२ वर्षांच्या फुगेविक्रेत्याने दोन उंच व दाढीवाल्या व्यक्तींनी रिक्षातून येऊन पिशवी टाकल्याचे पाहिले होते. रिगल चित्रपटगृहाच्या रक्षकाने एका संशयितास पकडले आहे, त्याच्याकडूनही माहिती मिळविण्यात येत आहे
आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तजिंदर खन्ना होते. पोलिसांनी अनेक हॉटेल्सवर छापे टाकण्याचे सत्र सुरू ठेवले असून, स्थानिक रहिवाशांच्या मते बॉम्ब पेरणारे हे दिल्लीबाहेरचेच आहेत. देशातील अनेक शहरांत यापूर्वी झालेल्या स्फोटांमागे "सिमी'ही बंदी घालण्यात आलेली मुस्लिम संघटना असून, दिल्लीतील स्फोटांमागे हीच संघटना असल्याचा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ५६ बळी घेणाऱ्या अहमदाबादमधील स्फोटांचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला अबू बशीर हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्याकडून माहिती मिळविण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक गुजरातला भेट देणार आहे.
आज राजधानीच्या शहरात शांतता होती. तथापि नेहमीची वर्दळ दिसत नव्हती. वाहतूकही कमी प्रमाणात चालू असल्याचे दिसून आले. मार्केट, चित्रपटगृहे, इस्पितळे व मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शनिवारी रात्री सात ते आठ जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कॅनॉट प्लेस, करोल बाग व ग्रेटर कैलास हे दिल्लीतील सर्वात अधिक वर्दळीचे भाग मानले जातात. काल आठवड्याच्या अखेरच्या दिवशी तेथे अधिक गर्दी होती. यापैकी दोन ठिकाणी तर मोठी आर्थिक उलाढाल चालू असते. पोलिसांनी कॅनॉट प्लेस व इंडिया गेटजवळून तीन बॉम्ब ताब्यात घेऊन ते निकामी केले.
दरम्यान, पोलिसांनी साक्षीदारांच्या माहितीवरून पाच संशयितांची रेखाचित्रे तयार केली आहेत. ग्रेटर कैलास येथे बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेल्या सायकलच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या रिक्षातून संशयितांनी प्रवास केला, त्या चालकाला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.
आप्तांना भेटण्यास गर्दी
राजधानीत शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी आप्तांच्या प्रचंड मोठ्या संख्येने रुग्णालयात गर्दी झाली होती.
शनिवारी झालेल्या स्फोटात सुमारे २५ जण ठार झाले. जखमींची संख्या १०० च्या वर आहे. या जखमींना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वाधिक जखमी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे तेथे भेटणाऱ्यांची संख्याही अधिक होती. रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आर.के.शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे शनिवारी ६० जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३१ जणांना आज सकाळी सुटी देण्यात आली. १० जखमींची प्रकृती मात्र अद्यापही गंभीर आहे. १९ जणांवर उपचार सुरू आहेत.
या स्फोटात आपल्या नातेवाईकांपैकी कोणी जखमी आहेत, असे कळताक्षणी विविध रुग्णालयात फोन करून नावासह विचारपूस करणाऱ्यांचीही संख्या बरीच होती. आप्तांविषयीची काळजी येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
हुबळीत शिजला कट
गेल्या महिन्याभरात विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट कर्नाटकमधील हुबळी येथे शिजला होता, असे उघडकीस आले आहे. हुबळीस झालेल्या बैठकीत देशातील प्रमुख शहरांत स्फोट करण्याचा कट शिजला. तेथील बसस्थानकाजवळच एका मैदानात अतिरेक्यांना यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले. उघड्या मैदानावर असा कॅम्प घेतल्याने कुणास संशय येण्याचे कारण नव्हते. ही माहिती कर्नाटकमधील स्फोटासंदर्भात अटक केलेले रियाझुद्दीन नसीर व कमरुद्दीन नागोरी यांच्या नार्को चाचणीत उघड झाली होती.