Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 August 2008

बेकायदा खाणीद्वारे २५० कोटी गिळंकृत, बेकायदा खाणींना सरकारचाच आशीर्वाद

विरोधी पक्षनेत्यांचा सरकारवर चौफेर हल्ला,
२५ कोटींची रॉयल्टी कोणाच्या खिशात?

पणजी, दि १८ (विशेष प्रतिनिधी) : गोव्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बेकायदा खाण व्यवसायावर पांघरूण घालण्याचे काम सरकारी पातळीवरून मोठ्या प्रमाणात सुरू असून सांगे परिसरात बेकायदा खाणीद्वारे सुमारे दहा लाख टन माल काढलेल्या एका खाण व्यवसायिकाला खाणमंत्री तसेच वनमंत्री अभय देत असल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत केला. खोटी कागदपत्रे व परवाने दाखवून गेली तीन वर्षे बेकायदा माल काढून सुमारे अडीचशे कोटी रुपयांची लूट केलेल्या या व्यवसायिकावर सरकार कोणती कारवाई करणार, असा सवालही विरोधी पक्षनेत्यांनी केला. आपल्या आरोपांना बळकटी देण्यासाठी श्री. पर्रीकर यांनी यावेळी एकामागोमाग कागदपत्रे सादर करण्याचा सपाटाच लावला. खाण खात्याचे संचालक तसेच वन खात्याच्या एक उपवनपालाच्या आशीर्वादानेच हे गंभीर व बेकायदा कृत्य सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिले.
ही खाण नेमकी कोणत्या परवान्यांआधारे सुरू झाली याचा आजवर कोणालाच पत्ता नाही. सांग्यातील ग्रामस्थ, जागरुक नागरिक या खाणीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहेत. ही खाण बेकायदा असल्याचे नागरिक ठामपणे सांगत आहेत, परंतु खाण संचालनालय मात्र ती कायदेशीर असल्याचे सांगते.या संदर्भात आपण स्वतः गेले चार महिने त्याबाबतची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. दरम्यानच्या काळात उपलब्ध कागदपत्रांनुसार ही खाण पूर्णपणे बेकायदा असल्याचे सत्य उघडकीस आले. हे लीज कायदेशीर असल्याचे खाण खाते सांगत असले तरी केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याकडून उपलब्ध झालेल्या दस्तऐवजांनुसार ही खाण बेकायदा आहे.वन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या खाणीचा उल्लेखच नाही. स्वतः आपण या खात्याच्या सचिवांशी बोलले असून त्यांनीच आपणास ही माहिती दिली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
ही खाण चालवणारी व्यक्ती स्थानिक खाण खात्याचा परवाना दाखवत असली तरी त्यावर लीज क्रमांक व सर्व्हे क्रमांक नसल्याचे आढळून आले आहे. केवळ झाडे कापण्याचा परवाना घेऊन वन खात्याचे वनपाल एम. के. बिडी यांनी त्यांना ही खाण सुरू करण्यास पुरती मोकळीक दिल्यानेच गेली तीन वर्षे ही खाण चालली. अर्थात खाण वन संचालनालयाचीही त्यास फूस असून बीडी तसेच खाण संचालक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
दहा लाख टन मालावरील सुमारे २५ कोटींची रॉयल्टी कोणाच्या खिशात गेली याची माहिती देण्याची मागणीही पर्रीकर यांनी केली.
गोव्यात योग्य परवाना किंवा लीज नसताना तसेच रॉयल्टी न भरता व पर्यावरणविषयक अभ्यास न करता ""कामत यांच्या सरकारच्या राजकीय आश्रयाखाली'' व सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लाखो टन बेकायदा खनिज उत्खनन झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणताना, हा गंभीर प्रकार असून यामुळे जनतेला होणाऱ्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून व विरोध झुगारून हे सर्व सुरू असल्याचे पर्रीकर म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. परंतु ती फेटाळताना, या प्रकरणात चालू अधिवेशनाच्या अखेर पर्यंत चौकशी करून अहवाल सभागृहात ठेवण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले.
या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाला पर्रीकरांनी कामत सरकारवर खाणीच्या प्रश्नावरून आकडेवारी व वस्तुस्थिती सादर करून तोफच डागली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वेळ मारून नेण्याचे प्रयत्न करताना, "खाण विषयक धोरण मसुदा आमदारांना त्यांच्या प्रतिक्रिया व सूचनांसाठी देण्यात आल्याचे सांगून, खनिज उद्योगापेक्षा शेतीला प्राधान्य द्यायचे की काय, यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
खाण खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत सांगे येथील या खाणीतून ६३७ लाख टन लोह खनिजाचे उत्खनन झाले; तर ८९६ लाख टन खनिज निर्यात झाल्याची माहिती दिली आहे. उत्खननापेक्षा निर्यात जास्त असून, अतिरीक्त २५८ लाख टन निर्यात कोठून आली, असा प्रश्न केला. गेल्या तीन वर्षांत गोव्यातील खनिज उत्खनन आणि निर्यात यातील तफावत ५.५ टक्कयांनी वाढली असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ४६७ कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ गेल्या तीन वर्षांत गोव्यात खनिज क्षेत्रात ४६७ कोटी रुपयांचे बेकायदा उत्खनन झाल्याचे सिद्ध होते, असे त्यांनी सांगितले. आपण दिलेली माहिती चुकीची आहे असे म्हणणाऱ्यास मुख्यमंत्र्यांनी आपणासमोर आणावे, असे आव्हान देत आपल्याकडे या प्रकरणाचे संपूर्ण कागदोपत्री पुरावे असल्याचे पर्रीकरांनी सांगितले व उपवनपाल एम. के. बिडी, ज्यांनी या बेकायदा खनिज उत्खननास परवानगी दिली त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
सांगे तालुक्यातील कुर्पे तसेच गोव्यात इतर ठिकाणी लीजवर देण्यात आलेल्या खाणी व उत्खनन करणाऱ्या व्यक्तींची नावे, बेकायदेशीर उत्खनन या विषयांवर सांग्याचे आमदार वासुदेव मेंग गावकर व पर्रीकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.
--------------------------------------------------------------------------------
'इम्रान ट्रेड'चा मालक कोण?
आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी, सांगे तालुक्यातील कुर्पे येथील यशवंत देविदास व इतर १४ जणांनी बेकायदा खाण व्यवसायामुळे बागायती व काजू उत्पादनावर झालेल्या नुकसानीसंबंधी दाखल केलेल्या तक्रारीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला.या बेकायदा व्यवसायात गुंतलेल्या "इम्रान ट्रेडर्स'फर्मचा मालक कोण, याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली. इ. फिगेर्दो यांच्या खाण व्यवसायासंबंधीचा मुद्दाही सभागृहात चर्चेस आला. ही खाण चालविणारा इम्रान खान याने पर्यावरण मान्यता परवाना घेतलेला नसून त्याच्या दाखल्यावर खाण लीज क्रमांकही नसल्याचा आरोप पर्रीकरांनी केला. हा खान मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील असून त्याने मोती डोंगरावरील तरुणांना कामासाठी नेले असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार डॉ.क्लाऊड आल्वारीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या सत्य शोधन पथकानेही हा इम्रान वन जमिनीत खनिज उत्खनन करीत असल्याचा अहवाल सादर केला होता, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बनावट परवाना वापरून या व्यक्तीने १० लाख टन खनिजाचे उत्खनन केले असून मुख्यमंत्र्यांनी त्याच्या अटकेचा आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली.

अखेर मुशर्रफांचा राजीनामा पाकमधील हुकुमशाहीचा अस्त

महाभियोगाचे बालंट टाळले
एक पर्व संपले...
देशाला संबोधित करताना अश्रू तरळले
सुमरो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष

इस्लामाबाद, दि. १८ : महाभियोगाला सामोरे जाण्यापूर्वीच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत भरल्या डोळ्यांनी देश सोडण्याचे संकेत दिले आणि लगेचच ते विमानाने सौदी अरेबियाला रवाना झाले. दरम्यान, मुशर्रफांच्या राजीनाम्यानंतर सिनेट अध्यक्ष सुमरो यांनी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्याचे वृत्त आहे. पाकमधील या मोठ्या घडमोडींचा भारतासोबतच्या संबंधांवर आणि शांतता प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडीने राष्ट्राध्यक्ष मुशर्रफांवर महाभियोग चालविण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यांच्यावरील महाभियोगाची कार्यवाही सुरू होण्याची शक्यता असतानाच त्यांनी राजीनामा देऊन आपल्यावरील महाभियोगाचे बालंट टाळले. देशाला अखेरचे संबोधित करताना त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. या भाषणात त्यांनी सुरुवातीला आपल्यावरील आरोपांचे चोख उत्तर देण्याची भाषा केली. पण, भाषणाच्या अखेरीस राष्ट्रपती भवनाची प्रतिष्ठा कायम राखणार असल्याचे सांगून राजीनामा दिला. डोळ्यात आसवे आणून पाकिस्तानविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या मुशर्रफांचे संवेदनशील रूप संपूर्ण जगासाठीच आश्चर्याचा मोठा धक्का होते.
भारताबाबत सर्वाधिक तणाव झेलला
आपल्या संबोधनात मुशर्रफ म्हणाले की, मी नेहमीच पाकिस्तानच्या हितासाठीच काम केले. माझ्यावर लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी हा विचार केला नाही की, ते माझे नुकसान करू शकतात. पण, त्यामुळे देशाचेही प्रचंड नुकसान होणार आहे. माझ्या कार्यकाळावर अनेक आक्षेप घेतले जातात. पण, माझ्या कार्यकाळातील धोरणांमुळेच देशाची अर्थव्यवस्था सुदृढ झाली. माझ्या कार्यकाळादरम्यान मला भारतासोबतच्या संबंधातही प्रचंड तणाव झेलावा लागला. ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामनाही आम्ही मोठ्या संयमाने केला.
मी देशासाठी प्रचंड संघर्ष केला. जेव्हा देशाला गरज होती त्याचवेळी मी सत्तेवर आलो. देशाचा विकासदर माझ्याच कार्यकाळात ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि महिलांना समान अधिकार मिळावे, यासाठीही मी प्रयत्न केले. आर्थिक, औद्योगिक, पायाभूत सेवासुविधा या सर्वच क्षेत्रात मी देशाला पुढे नेेण्याचे धोरण अवलंबिले. संघर्षातूनही देशाला मी नेहमीच प्रगतीचा मार्ग दाखविला आहे आणि मागील ९ वर्षात मी उचललेले प्रत्येक पाऊल देशाच्या हितासाठीच होते. पाकमधील जनतेनेच याचे मूल्यमापन केले पाहिजे. त्यांनी हा विचार केला पाहिजे की, आजपासून ९ वर्षांपूर्वी पाकिस्तानला जागतिक स्तरावर कोणीही विचारीत नव्हते. पण, आज आमच्या मताला मोठमोठे देशही महत्त्व देतात. आम्ही जागतिक स्तरावर देशाला सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला विविध आघाड्यांवर अपयशी ठरवून स्वत:ला मुशर्रफांनी लोकशाहीचे समर्थक म्हणवून घेतले. ते म्हणाले की, मी देशात शांतता कायम राखण्यासाठी वारंवार आवाहन केले. पण, दुर्दैवाने त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. उलट माझ्यावर देशविघातक कारवाया करण्याचा आणि कट रचण्याचा आरोप ठेवण्यात आला. मी कधीही देशाविरोधात कट रचलेला नाही. नव्या सत्ताधारी सरकारने माझ्याकडे केवळ समस्या म्हणूनच पाहिले. तरीही मी त्यांना नेहमीच माझ्या अनुभवाचा फायदा मिळवून देण्याच्या प्रयत्नात राहिलो.
महाभियोग आणणे हा संसदेचा अधिकार आहे. पण, त्याचे उत्तर देणे हा माझा अधिकार आहे. माझ्याविरुद्ध महाभियोग का, याचे उत्तर देण्यास कोणीही नेता तयार नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी माझ्याविरुद्ध आरोप केले जाताहेत. माझ्याविरुद्ध एकूण सात आरोपांचे आरोपपत्र आणले गेले. पण, त्यापैकी एकही आरोप सिद्ध होऊ शकत नाही. कारण मी जे काही केले ते पाकिस्तानच्या हितासाठीच केले आणि सर्वसहमतीने केले. आजही मी केवळ देशहितासाठीच राजीनामा देत आहे. माझ्या भाग्याचा निर्णय पाकिस्तानी जनतेनेच करावा, असेही ते म्हणाले.
मुशर्रफ आपल्या संबोधनादरम्यान अतिशय भावूक झाल्याचे पदोपदी जाणवत होते. ते म्हणाले की, नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला. कारण मी स्वत: एका मध्यमवर्गीय घरातून आलो आहे. एक सामान्य नागरिक म्हणून मला देशातील लोकांच्या भावनांची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच पाकिस्तानी जनतेने मला खूप प्रेम दिले. त्यांच्या आपलेपणाला मी कधीही विसरू शकत नाही. पण, याक्षणी देशात मोठ्या संख्येत गरीब जनता आहे. त्यांच्यासाठी बरेच काही करायची इच्छा होती. संधी मिळाल्यास त्यांची सेवा करेनच. पण, सध्या मी त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही, याचे मला अपार दु:ख आहे.
सुमरो कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष
परवेझ मुशर्रफ यांच्या राजीनाम्यानंतर आज सुमरो यांनी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याचे पाकिस्तानच्या कायदे मंत्र्यांनी जाहीर केले. सुमरो हे सध्या पाकी सिनेटचे अध्यक्ष आहेत. नवे राष्ट्राध्यक्ष येईपर्यंत तेच कामकाज पाहणार आहेत.

पोरस्कडे पेडणे येथील घटना भावाकडूनच भावाचा खून

मोरजी, दि. १८ (वार्ताहर): सख्ख्या भावानेच आपल्या मुकबधिर (मुका व बहिरा) भावाचा काल खून केल्याने पेडणे तालुक्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे "सख्खे भाऊ पक्के वैरी' याची प्रचीती हळदणकरवाडा पोरस्कडे पेडणे येथे आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोरस्कडे - पेडणे येथील रूपेश शांताराम हळदणकर (२४) या मुकबधिर व अविवाहित भावाचा त्याच्याच मुकबधिर भावाने म्हणजेच सुरेश हळदणकर याने जबर मारहाण करून खून केला.
सुरेश हळदणकर (२६) हाही अविववाहीत आहे. रूपेशचा थोरला भाऊ असलेला सुरेश हा कोलवाळ येथील बिनानी कंपनीत कामाला होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते. १७ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास सुरेश दारू पिऊन कामावरून घरी आला. धाकटा भाऊ रूपेश तेव्हा पडवीत बसला होता. त्याचवेळी सुरेशने त्याच्याशी भांडण सुरू केले. त्यातून सुरेशला राग अनावर झाला. त्याने धाकट्या भावाला लाथ मारून अगंणातील पायऱ्यांवर ढकलून दिले. त्यामुळे अंगणात कोसळला. सुरेशने मग त्याच्या छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारायला सुरवात केली. रूपेशला प्रतिकार करता आला नाही. तो अंगणातच बेशुद्ध होऊन पडला. घरच्या मंडळींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सुरेशने त्यांनाही ढकलून बाजूला केले.
रूपेशला त्यावेळी शेजारी व घरच्यांनी त्याच्या नाकातोंडात कांद्याचा रस घालून शुद्धीवर आणण्याचा बराच प्रयत्न केला. त्याचा उपयोग झाला नाही. अखेर शेजाऱ्यांनी व घरच्या मंडळींनी त्याला तातडीने तुये येथील इस्पितळात उपचारासाठी नेले. तथापि, उपचारापूर्वीच रूपेश मरण पावल्याचे डॉ. नागवेकर यांनी घोषित केले. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी पेडणे पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यानुसार निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक अर्जुन नाईक यांनी पोरस्कडे येथे जाऊन सुरेश याला ताब्यात घेतले.
रूपेशचा मृतदेह बांबोळी येथील "गोमेकॉ' इस्पितळात चिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार वडील शांताराम बाळा हळदणकर यांनी पेडणे पोलिसांत नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी सुरेश यांच्यावर ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. मयत रुपेश हळदणकर हा स्वभावाने मनमिळावू होता. त्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पोरस्कडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रुपेश हा पर्वरी येथील संजय स्कूलमध्ये शिकत होता. त्याने नुकतीच एसएससीची (दहावीची) परीक्षा दिली होती. त्याचा एक विषय राहिला होता. त्या विषयाचा अभ्यास कण्यासाठी तो पर्वरी येथील ओपन स्कूलमध्ये जात होता. त्याच्या पश्चात तिघे भाऊ, आई वडील असा परिवार आहे. पोरस्कडेचे सरपंच दीनानाथ हळदणकर यांचे ते चुलत भाऊ होत.
या खुनाची माहिती समजातच पोलिस उपअधीक्षक सुभाष गोलतेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पेडणे पोलिसांनी जागेचा पंचनामा केला.
रूपेश याला सरपंच दीनानाथ हळदणकर, माजी सरपंच बाबी ऊर्फ यशवंत तळावणेकर व उपसरपंच तनुजा तळावणेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रकरणीचा तपास साहाय्यक उपनिरीक्षक अर्जुन नाईक करत आहेत.

...तर आमरण उपोषण, बाणावलीच्या सभेत नागरिकांचा इशारा

मडगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : बाणावलीतील मेगा प्रकल्पांना परवाने देण्याबाबत पंचायत उपसंचालकांकडून पंचायतीवर येणाऱ्या दडपणांना विरोध दर्शवण्यासाठी बाणावलीवासीयांनी आज एका दिवसाचे उपोषण करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सायंकाळी जाहीर सभेत सर्वच वक्त्यांनी पंचायत उपसंचालकांच्या या दडपणाचा निषेध करून आपली मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.
सभेत जेराल्दीन यांनी आंदोलनाचा निर्णायक टप्पा जवळ आल्याचे सांगितले.मेगा प्रकल्पांबाबत निर्णायक मुदत पंचायत तसेच संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागेल असे सांगून ३१ ऑगस्ट ही तारीख त्यांनी जाहीर केली. त्यानंतर लोकांना पुढचे पाऊल उचलणे अपरिहार्य बनेल असा इशारा त्यांनी दिला.
सभेत सर्वश्री बेनी फर्नांडिस यांनी पंचायत संचालक, उपसंचालक , गटविकास अधिकारी आदींनी राजीनामे द्यावेत; त्यांची भरपाई बाणावली कृती समिती देईल, असे बजावले. अन्य स्थानिकांचीही भाषणे झाली. सर्वांचा रोख स्थानिक पंचायत व सरकारी अधिकारी यांच्यावर होता. ते सगळे मेगावाल्यांची तळी उचलणारे असल्याचा आरोप प्रत्येकाने केला.
स्वातंत्र्यदिनी झालेल्या विशेष ग्रामसभेने मेगा प्रकल्पविरोधी ठरावाचा पुनरुच्चार केला. खोळंबून असलेल्या बांधकामविषयक सर्व फायली तात्काळ फेटाळून लावण्याची मागणी केली हेाती. सकाळी पंचायत कार्यालयाजवळ सुरू झालेल्या उपोषणात गावातील साधारण ५० ते ६० नागरिक सहभागी झाले होते.
दरम्यान, बाणावली रहिवासी व ग्राहक मंचाने सासष्टी गटविकास अधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून अधिकारांचा गैरवापर व कर्तव्यात कसूर करणारे स्थानिक पंचायत मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही कागदपत्रे सोबत जोडली आहेत.

राष्ट्रपती राजवटीकडे झारखंडची वाटचाल

नवी दिल्ली/रांची, दि.१८ : शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाने मधू कोडा सरकारचा पाठिंबा काढून सरकार स्थापन करण्याचा दावा केला असला तरी सोरेन यांच्याकडेही पुरेसे पाठबळ नसल्याने झारखंडची राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री बनण्यासाठी सोरेन गटाच्या तर, सरकार वाचविण्यासाठी कोडा गटाच्या हालचाली आज सकाळपासूनच प्रचंड वेगाने सुरू झाल्या होत्या. राजभवनावरही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. सर्वप्रथम भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सईद सिब्ते रझी यांची भेट घेतली आणि अल्पमतातील कोडा सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठोपाठच बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. मरांडी यांनीही राज्यात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली. राज्यपालांनी भेटीस आलेल्या प्रत्येकांचेच म्हणणे शांतपणे ऐकून घेतले.
राजभवनातून बाहेर आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पी. एन. सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, कोडा सरकार अल्पमतात असल्याने आणि सोरेन यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्याने आमदारांच्या खरेदी-विक्रीला वाव देण्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे योग्य राहील, अशी भूमिका रालोआने विशद केली.
८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाचे २९ आमदार असून, रालोआतील घटक पक्ष असलेल्या जदयुकडे चार आमदार आहेत.
दरम्यान, झामुमोने आपल्या सर्वच आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणती रणनीती असायला हवी यावर त्यांच्यात चर्चा सुरू आहे. पक्षाचे आमदार सुधीर महतो यांनी सांगितले की, येत्या एक-दोन दिवसांतच चित्र स्पष्ट होईल.

Sunday, 17 August 2008

मंदिरे शक्तिपीठे बनल्यासच सुरक्षा शक्य - ब्रह्मेशानंदाचार्य

पणजी, दि. 17 (प्रतिनिधी) - मंदिरातील मूर्ती या साक्षात देव असून तो आमचा आत्मा आहे. आत्म्याचे रक्षण करणे हे पाप आहे का?, देव श्रद्धेमध्ये आहे. जशी श्रद्धा तसे कार्य. आपणही वणवे पेटवू शकू, पण आम्हाला ते करावयाचे नाही. मंदिरात नुसते पुजारी येऊन पुजा करतात, असे संबंध ठेवू नका. संपूर्ण गावाला एकत्र करा, मंदिरातील कोणत्याही धार्मिक विधीला संपूर्ण गाव एकत्र आलाच पाहिजे. गावातील संपूर्ण तरुण पिढी मंदिरात शिरलीच पाहिजे. मंदिरांची सुरक्षा महत्त्वाची असून ही धर्मस्थळे येणाऱ्या काळात शक्तिपीठ व्हायला हवीत, असे प्रतिपादन प. पु. तपोभूमीचे पीठाधीश ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराजांनी आज अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीच्या महामेळाव्यात केले. पणजीतील मराठा समाज सभागृहात भूतपूर्व अशा प्रकारे पहिल्यांदाच गोव्यातील असंख्य देवस्थान समितीच्या सदस्यांनी भरलेल्या महामेळाव्यात प.पु. ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी महाराज बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम भारत धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर, प्रा. अनिल सामंत, सनातन संस्थेचे डॉ. पांडुरंग मराठे, तपोभूमी मठाचे खजिनदार सुदेश नाईक, बजरंग दलाचे राज्य प्रमुख विनायक च्यारी, हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी तसेच अकराही तालुक्याचे समन्वयक यावेळी उपस्थित होते.
""आपल्या धर्मांत विकृती शिरणार नाही याची काळजी घेणे. मंदिरांची सुरक्षा ही आपली स्वतःची सुरक्षा आहे. लोक सहकार्य करतील की नाही, याची चिकित्सा करू नये. देवांना सांभाळण्यासाठी जेवढे आहे, तेवढे पुरे आहोत'', असे स्वामीजी म्हणाले. खचाखच भरलेले सभागृह पाहून आपला ऊर भरून आल्याचे स्वामीजीने सांगून या महामेळाव्यासाठी परिश्रम घेतलेल्यांचे अभिनंदन केले. सहाशेपेक्षा जास्त संख्या यावेळी उपस्थित होती. उत्सवाच्यावेळी मंदिरात पाश्चात संगीत वाजणार माही आणि नृत्य होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी यावेळी सर्व देवस्थान समित्यांना स्वामींजींनी आवाहन केले. यावेळी खुद्द स्वामीजींनी ""भारत माता की जय'' "" वंदे मातरम'' अशा जोरदार घोषणा देऊन संपूर्ण सभागृह दणाणून सोडला.
""भारतात हिंदू समाज मोठ्या वेगाने जागृत होत आहे. गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेल्या 450 मंदिरांपैकी 300 मंदिरे पुन्हा उभी राहिली आहेत. सरकार कोणाचे आहे, हा मुद्दा नाही. गोव्यातील जनता कशी आहे, हा मुद्दा आहे. जनतेला हवे तेच या सरकारला करावे लागणार आहे. या समितीचा कोणालाही विरोधा नाही. आजची सभा ही केवळ सुरुवात असून मंदिरे ही समाज सुधारण्याची जागृत घरे व्हावी, असे मत यावेळी पश्चिम भारत धर्म जागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी व्यक्त केले.
अध्यात्म म्हणजे केवळ रुद्राक्षाची माळ जपणे नाही. आता एका हातात रुद्राक्षाची माळा आणि दुसऱ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार घेण्याची गरज आहे. पूर्वजांनी चुका केल्यात त्यातून शिकले पाहिजे आणि पराक्रम केलेत त्यांतून प्रेरणा घेतली पाहिजे, असे यावेळी प्रा. अनिल सामंत बोलताना म्हणाले. सध्या कागदी अभ्यासक्रम शिकवणारी विद्यापीठे उभी राहिली आहेत. त्यात खारा इतिहास शिकवला जात नाही. इतिहासाच्या अभ्यासक्रमात छ. शिवाजी महाराज, क्रांतिकारी आणि संताचा लवलेशही नसतो. असला तर तोही चुकीचा, असे ते म्हणाले. आपली मंदिरे ही विद्यापीठ आणि विद्यालये होती. त्याठिकाणी नवे विचार दिले जात होते. मंदिरांच्या माध्यमातून विद्यालये चालत होती. त्या तोडल्या गेल्यात. आपल्या सर्व कला मंदिरातून सुरू झालेल्या आहेत. त्यात कोणताही भोगवाद नाही, असे ते शेवटी म्हणाले.
गोव्यात गेल्या काही वर्षापासून सुमारे 15 मंदिरांची नासधूस करण्यात आली. वेळोवेळी पोलिस स्थानकात तक्रारी करण्यात आल्यात. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांनी निवेदने सादर करण्यात आली. मात्र एक गठ्ठा मतदानासाठी त्याकडे लक्ष पुरवण्यात आले नाही. त्यामुळेच ही समिती स्थापन करण्यात आली आहे, असे यावेळी बजरंग दलाचे प्रमुख विनायक च्यारी यांनी सांगितले. यापुढे हिंदूच्या मंदिरांकडे वाकड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांचे डोळे फोडले जातील, अशा रक्तरंजित इशारा यावेळी च्यारी यांनी बोलताना दिला. या समितीचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले.
गोव्यात पकडण्यात आलेला दहशतवादी बाटलू हा स्वतः खटला लढवून गोवा सरकारच्या नाकावर टिच्चून निर्दोष सुटू शकतो, ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. गोवा दहशतवादापासून वंचित आहे, असे म्हणता येणार नाही. कोणत्याही कृतीला वेळीच प्रतिक्रिया दिली गेली पाहिजे, असे राजेंद्र वेलिंगकर यांनी सभेला उद्देशून सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात या समितीचे कार्य काय असणार आहे, याचा उलगडा यावेळी श्री. वेलिंगकर यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश थळी यांनी केले.
समितीचा निर्णय
मंदिरावर संकट आल्यास लगेच मंदिरात गोळा व्हावे.
तरुणांची शक्ती मंदिराकडे जोडली जावी.
मंदिरासाठी सुरक्षा पथक निर्माण व्हावे.
आरत्यांना भाविकांना गोळा करण्यासाठी शंख नाद करणे.
दसऱ्याला सामूहिक शस्त्रपूजन
हिंदूच्या सर्व देवदेवतांच्या हातात शस्त्र असल्याने आपल्या संरक्षणासाठी कायद्यात बसणारे एकतरी शस्त्र हिंदूने बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षापासून दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला संपूर्ण गोव्यात सामूहिक शस्त्र पूजन केले जाणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन

अंतर्गत कलह सरकारच्या मुळावर?
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) ः सरकारांतर्ग संघर्ष आणि इतर अनेक कारणांनी वादग्रस्त ठरण्याचे संकेत असलेले राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून हे अधिवेशन म्हणजे दिगंबर कामत यांची अग्निपरीक्षाच ठरण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्य विधानसभेच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीचे हे पावसाळी अधिवेशन आहे.
विकास, स्थैर्य, आर्थिक स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, प्रदूषण अशा अनेक कळीच्या मुद्यांवर सामान्य जनतेच्या रोषास पात्र ठरलेले कामत सरकार, गृह कलहाच्या वणव्यातही चांगलेच सापडले आहे. बाबुश मोन्सेरात सारख्यांच्या सरकार पाडण्याच्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे गडबडलेल्या मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ अशा दयानंद नार्वेकर यांनाच मंत्रिपदावरून हटविण्याचा अधिवेशनाचा तोंडावर जो निर्णय घेतला तो केवळ धोकादायकच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना अधिकच अडचणीत आणणारा असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे. पक्षांतर्गत असंतोषही त्यामुळे वाढू लागल्याने एकाबाजूने पक्षांतर्गत टीका तर दुसऱ्या बाजूने सरकाराअंतर्गत तीव्र होत जाणारे वाद अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांची कसोटी पाहणारे ठरतील असा अंदाज आहे.
खाण प्रदूषण, बिल्डर लॉबीचे वाढते प्रस्थ, गावागावांत उफाळणारा असंतोष, न्यायालयांची आक्रमक भूमिका, खंडीत आणि वीज पुरवठा, भर पावसात कोरडे पडलेले नळ, कचऱ्यांची कमी होण्याऐवजी वाढत जाणारी समस्या, जमीन व्यवहारांच्या नवनवीन भानगडी अशा अनेक विषयांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याची सर्व तयारी केली असताना कामत यांना सरकाराअंतर्गत पुरेसे सहकार्य मिळण्याची शक्यता नसल्याने हे अधिवेशन त्यांच्यासाठी एक संकटच ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कामत मुख्यमंत्री झाल्यापासून या सरकारच्या विधिमंडळ कामकाजाची जबाबदारी हाताळणारे दयानंद नार्वेकर आता मंत्री नाहीत त्यामुळे कामत यांनी आपला मोठा आधार गमावलेला आहे. यापूर्वीच्या दोन्ही विधानसभा अधिवेशनाच्या वेळी कामत यांना नार्वेकर यांची मोठी मदत झाली होती, परंतु अटीतटीच्या वेळी त्यांचाच बळी दिला गेल्याने परिस्थितीत मोठा फरक पडला आहे. शिवाय पायावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते विधानसभेत उपस्थित राहतील की नाही याबद्दल शंकाच आहे. मुख्यमंत्री कामत यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधी उघड प्रतिक्रिया व्यक्त करून कामत यांची अधिवेशनाच्या ऐन तोंडावर गोची करून ठेवली आहे. त्यांच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. म. गो. पक्षही आतून नाराज असल्याचे सांगितले जाते. परिणामी मुख्यमंत्र्यांसाठी अधिवेशन चांगलेच कठीण ठरण्याचे संकेत आहेत.
दरम्यान उद्या दुपारी अडीच वाजता अधिवेशनाला आरंभ होईल. ठरलेल्या कार्यक्रमानुसार २८ ऑगस्टपर्यंत ते चालेल.

पाकिस्तानात राष्ट्राध्यक्षपदी महिलेची शक्यता : झरदारी

इस्लामाबाद, दि.17 - पाकिस्तानात आगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून महिला नेत्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत देत असतानाच सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी आपण या पदाचे दावेदार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झरदारी यांनी म्हटले की, मुशर्रफ यांच्या राष्ट्राध्यक्षपदावरून जाण्यानंतर देशातील एकंदर शासन व्यवस्था, राष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरण यात आमूलाग्र बदल करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांसोबतचे काही वादाचे मुद्दे शांततेच्या मार्गाने सोडविण्याचाही प्रयत्न केला जाईल. राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ हे सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या विरोधात कट रचित असल्याच्या सूचना मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर महाभियोग चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. असे झाले नसते तर संसद आणि प्रशासन अपयशी असल्याचे वाटले असते. या दोहोंपेक्षा मुशर्रफ शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले असते. आता त्यांच्यावरील महाभियोगानंतर एखाद्या महिलेने राष्ट्राध्यक्षपदी यावे, अशी आमची इच्छा आहे. अर्थात, यासाठी योग्य त्या उमेदवाराची निवड सत्ताधारी आघाडी लवकरच करेल, असेही त्यांनी सांगितले.

असोळणा येथे हातपाय बांधून वृद्धाचा खून

आरोपी मुंबईस फरार?
मडगाव , दि.17 (प्रतिनिधी) - असोळणा येथे प्रेसेपिओ ऊर्फ जोझेफ मेंडिस हा 65 वर्षीय रहिवासी आज दुपारी आपल्या घरातच हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडला . त्याचा खून झाल्याचा संशय असून संशयित हे कृत्य करून मुंबईकडे पळाल्याच्या संशयावरून एक पोलिस पथक तिकडे रवाना झाले आहे.
कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक सिद्धार्थ शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीवरून सकाळी 9-30 ते 1 या दरम्यान हा प्रकार घडलेला असावा. मयताची पत्नी ऍना मेंडिस ही चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेली होती. ती दुपारी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी येऊन तपासणी केली व पंचनामा करून मृतदेह हॉस्पिशियोच्या शवागारात ठेवला आहे.
मयताच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार सांतान सालीस फर्नांडिस याचे हे कृत्य असावे. तो मूळ मुंबईचा पण हल्ली येथेच त्यांच्या शेजारी रहात होता. तो मयताला दारु पिण्यासाठी प्रवृत्त करीत होता व दोघेही तर्र होऊन पडत असत. या नेहमीच्या प्रकारामुळे संतापून ऍना हिने त्याला आपल्या घरी येण्याची बंदी केली होती. त्यामुळे संतापून त्याने हे कुकर्म केले असावे असा तिला संशय आहे.
पोलिस तपासात मयताच्या अंगावर कोणत्याच माराच्या खुणा आढळलेल्या नाहीत.

"त्या'नऊ आरोपींना 14 दिवसांची कोठडी

अहमदाबाद, दि.17 - अहमदाबाद स्फोट मालिकेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीन उर्फ सिमीच्या नऊ सदस्यांना स्थानिक न्यायालयाने आज 14 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. या सर्व आरोपींना अलीकडेच अटक करण्यात आली होती.
आज सकाळी या आरोपींना महानगर दंडाधिकारी जे. के. पंड्या यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अहमदाबाद स्फोट मालिकेतील कट उघड करण्यासाठी त्यांच्या कोठडीवर विशेष भर दिला. तर, आरोपींच्या वकिलांनी आपल्या अशिलांना निर्दोष सांगत कोठडी देण्यास विरोध केला. तथापि, न्या. पंड्या यांनी पोलिसांची भूमिका मान्य करताना 14 दिवसांचा रिमांड तात्काळ मान्य केला. पोलिसांनी या आरोपींना नुकतीच अटक केल्याचे दाखविले आहे. पण, हे सर्वच आरोपी 30 जुलैपासूनच कोठडीत असल्याने त्यांना आणखी रिमांड देता येणार नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. तथापि, न्यायालयाने तो अमान्य केला.
या स्फोट मालिकेतील प्रमुख सूत्रधार मुफ्ती अबू बशिर याला सकाळी तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर शहरात आणण्यात आले आहे.