Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 June 2008

25 टक्के तिकीट दरवाढीची बसमालक संघटनेची मागणी

मडगाव, दि. 15 (प्रतिनिधी) - पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये भरमसाठ झालेल्या वाढीच्या अनुषंगाने सरकारने बस तिकीट दरात किमान 25 टक्के वाढ द्यावी, अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेच्या कार्यकारिणीच्या आज येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पाजीफोंड येथील भंडारी भवनात झाली व तिला कार्यकारिणीचे सर्व सदस्य हजर होते. सरकारने निःसंकोच मनाने ही मागणी मान्य करायला हवी कारण यापूर्वी दिलेल्या तिकीट दरवाढीनंतर डिझेलचे दर कितीतरी वाढले आहेत व आता झालेली वाढ तर कल्पनेपलीकडील आहे असे बैठकीत प्रतिपादण्यात आले.
बसमालकांनी केलेली मागणी अवास्तव वाटत असेल तर सरकारने यापूर्वी स्थापन केलेल्या व्यापारी वाहनांच्या समितीची बैठक बोलवावी व तिचा सल्ला घेऊन आजच्या बाजारभावाप्रमाणे दरवाढ निश्र्चित करावी असेही सुचविण्यात आले.या समितीत बसमालकांच्या प्रतिनिधींबरोबरच टॅक्सीवाले, ऑटोरिक्षावाले सारख्या प्रवासी वाहन चालकांचा समावेश आहे.
सरकारने या प्रश्र्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक प्रवासी सेवा हा या व्यवसायाला उद्योग म्हणून मान्यता द्यावी, त्याला डिझेल व आवस्यक त्या वस्तू व सुटे भाग सवलतीच्या दराने पुरवावेत अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.त्याशिवाय बसमालकांना ही लोकसेवा चालू ठेवता येणे शक्य होणार नाही हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
दरम्यान, आज बसमालक संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीतील एकंदर सूर पहाता संपूर्ण कार्यकारिणी लवकरच राजीनामा देण्याचे संकेत मिळाले. अध्यक्ष रजनीकांत नाईक यांना त्याबाबत विचारता त्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला पण अधिक काही सांगण्याचे टाळले.

मेगा गृहनिर्माण प्रकल्प नकोच

कोलवा ग्रामसभेचा ठाम निर्धार
मडगाव,दि.15 (प्रतिनिधी ) - कोलवा ग्रामपंचायतीच्या आज येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत एकंदर वातावरण मेगा गृहनिर्माण प्रकल्पाच्या विरोधीच राहिले. सकाळी 10 -30 वा . सुरू झालेली ही सभा दुपारी 3 वा. पर्यंत चालली व तरीही कामकाज पूर्ण होऊ न शकल्याने ती तहकूब करून पुन्हा 29 जून रोजी बोलावण्याची पाळी सरपंच सूझी फर्नांडिस यांच्यावर आली.
लोकांच्या मेगा प्रकल्पविरोधी संतप्त भावना या सभेत व्यक्त झाल्या , सरसकट सर्वांनीच या प्रकल्पाविरुध्द भूमिका घेतल्याने कोणत्याच स्थितीत मेगा गृहनिर्माण प्रकल्पांना थारा देऊ नये तसेच जे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर पोचलेले आहेत त्यांचा वास्तव्य दाखला अडवून ठेवावा असे निर्णय आज झालेल्या विशेष ग्रामसभेने घेतले.
या मेगा प्रकल्पांबाबत लोकांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्याबाबत सरपंच वा पंचायत मंडळ समाधानकारक खुलासा करू न शकल्याने सर्वांनीच त्यांच्यावर तोंडसुख घेतले व ते या प्रकरणांत अडकल्याचा आरोप केला.
पंचायतीतील कचऱ्याचा प्रश्र्न जटिल बनत चाललेला असल्याने मेगा प्रकल्पांना परवाने देऊन या प्रश्र्नात आणखी भर टाकणे योग्य होणार नाही यास्तव कचरा प्रश्र्न अगोदर सोडवा असे अनेकांनी प्रतिपादले.
यापुढील बैठकीसाठी स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना निमंत्रण द्यावे व पंचायत विभागात मेगा हाउसिंग प्रकल्प येणार नाहीत असे नियम करून एक विधेयक त्यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात सादर करावे, अशी मागणी करण्यात आली.
आजच्या ग्रामसभेत गडबड -गोंधळ होणार असल्याचा कयास होता व त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात होता. शाब्दिक बाचाबाची , आरोप प्रत्यारोप ग्रामसभेत झालेले असले तरी प्रकरण हातघाईवर आले नसल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला नाही.बाणावलीप्रमाणे या सभेतही महिलांची संख्या लक्षणीय होती व त्यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे महिला सरपंचांची मात्र विलक्षण कोंडी झाली.
कोलवा नागरिक व ग्राहक मंचाने या मेगा गृहनिर्माण प्रकल्पांचा मुद्दा बराच धसास लावून गावात जागृती करून या प्रकल्पाविरुद्ध ग्रामसभेत आपले मत नोंदविण्याचे आवाहन केल्याने त्याचीच परिणती ग्रामसभेत गर्दी होऊन झाली होती.

बुधवारपासून कामावर बहिष्कार

बोलणी निष्फळ ठरल्याने कर्मचारी आक्रमक
पणजी, दि. 15 (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि मुख्य सचिव जे.पी.सिंग यांच्याशी झालेली आजचीही चर्चा विफल ठरल्याने सोमवार व मंगळवार पर्यंत 'पेन डाऊन' तर बुधवारपासून कामकाजावर बहिष्कार टाकून संपूर्ण सरकारी यंत्रणा ठप्प करण्याचा इशारा सरकारी कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे केवळ दोन दिवसांचा अवधी आहे. सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून येत्या दोन दिवसांत हा गुंता सोडवला नाही तर हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन पणजीत आमरण उपोषण करण्यांचीही तयारी असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष अरुण तळावलीकर यांनी यावेळी सांगितले.
आज सकाळी मुख्यमंत्री कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत समान वेतन श्रेणी लागू केल्यास केवळ 15 कोटींचा आर्थिक बोजा येणार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दुपारी मुख्य सचिव सिंग यांचे भेट घेण्यात आली. परंतु यावेळी सर्व बोलणी फिसकटल्याने सरकारला केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. तळावलीकर यांनी दिली.
हा गुंता अधिक वाढण्यास वित्त खात्याचे अवर सचिव श्री. शानभाग जबाबदार असून त्याने सरकारची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी संघटनेचे सचिव गणेश चोडणकर यांनी केला. थकबाकी सोडण्यासही आम्ही तयार आहोत. परंतु मूळ वेतन वाढीव प्रमाणे कायम ठेवून वेतन वाढ द्यावी, यावर आम्ही ठाम असल्याचे श्री. तळावलीकर यांनी सांगितले.
उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वरून 58 करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. परंतु निवृत्तीवय 58 वरून 60 करण्याचा सरकारचाच निर्णय होता, त्याची आम्ही मागणी केली नव्हती, असे श्री. तळावलीकर म्हणाले. 58 वर्षे निवृत्ती वय हा नियम सर्वांनाच लागू करावा लागणार आहे. तसेच निवृत्तीवय 58 केल्यास सरकारी तिजोरीवर 450 कोटी रुपयांच्या आर्थिक बोजा पडणार आहे. कर्मचाऱ्यांनी कर्ज घेतलेले असून त्यांचे हप्ते भरण्यास त्यांना कठीण जाणार असल्याचेही श्री. तळावलीकर यावेळी म्हणाले.

नार्वेकरांनी त्वरित राजीनामा द्यावा

भाजप कार्यकारिणीची मागणी
पणजी, दि. 15 (प्रतिनिधी) - वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांच्यावर तिकीट घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्याने त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे खाते काढून घ्यावे, कॅसिनोंना देण्यात आलेले परवाने त्वरित रद्द करावे, "सेझ' प्रकल्पांसाठी देण्यात आलेली जागा सरकारने मागे घेऊन जागा वाटपाची चौकशी करावी त्याचप्रमाणे संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात, अशा प्रकारचे ठराव आज भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संमत करण्यात आल्याची माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी दिली. ते आज कार्यकारिणी बैठकीनंतर पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर व संघटनमंत्री सुभाष साळकर उपस्थित होते.
राष्ट्रीय सहसंघटनमंत्री सतीश वेलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय व महागाईच्या विरोधात असे दोन ठराव यावेळी संमत करण्यात आले. सामान्याला दोनवेळेचे अन्न घेणेही मुश्कील झाले आहे. पेट्रोलची सात वेळा दर वाढवण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत ही अतोनात महागाई वाढली असून जेव्हा जेव्हा केंद्रात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असते, त्यावेळी महागाईने आपली सीमा ओलांडली आहे, असे महागाईच्या विरोधात घेण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे. सट्टेबाजी करणाऱ्यांकडे कॉंग्रेसचे साटेलोटे असल्यामुळे ते महागाईवर अंकुश ठेवूच शकत नसल्याचे यावेळी खासदार श्री. नाईक म्हणाले. महागाईच्या विरोधात माजी सभापती ऍड. विश्वास सतरकर यांनी ठराव मांडला तर त्याला सौ. कुंदा चोडणकर यांनी अनुमोदन दिले.
भारतीय जनता पक्षाने कमी दरात 14 ठिकाणी तेल, नारळ व कांदे वाटप करून महागाई आटोक्यात आणता येत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. यावेळी 48 हजार किलो कांदे, 26 हजार 500 लीटर तेल तर, 38 हजार नारळ वाटप केल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली. तर सरकार 33 रुपयांत बाजारात मिळणारी वस्तू स्वस्त दराच्या नावाने 34 रुपयांत विक्री करून लोकांची थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले.
गोवा सरकारने सध्या अंदाधुंद कारभार चालवला आहे. सरकार नावाची चीजच नाही. कायदा व्यवस्था तर पूर्णपणे कोलमडली आहे. स्कार्लेट खून प्रकरणामुळे राज्याची अतोनात बदनामी झाली आहे. राज्यात हजारो तरुण बेकार आहेत, त्यांना हे सरकार नोकरी देऊ शकत नाही. प्रादेशिक आराखडा अद्याप तयार झालेला नाही. "सेझ' प्रकल्पाबाबत सरकाराचे दुटप्पी धोरण आहे. कॉंग्रेसच्याच आमदाराने साळ नदीतील कॅसिनोला विरोध करून आता कॉंग्रेस हा कॅसिनो मांडवी नदीत उभा करू पाहत आहे, असे राजकीय ठरावात नमूद करण्यात आले आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
वित्तमंत्री ऍड. नार्वेकर यांच्यावरील आरोपांचा राज्य सरकारशी कोणताही संबंध नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाबद्दल भाजप कार्यकारिणीने आश्चर्य व्यक्त केले आहे. यावेळी श्री. नाईक म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी यांच्यावर हवालाचा आरोप झाल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता आणि त्यातून निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यावरच त्यांनी लोकसभेत पाय ठेवला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मायावतींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांवर "एफआयआर' नोंद होताच त्याला मंत्रिमंडळातून कमी करण्यात आले तर गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रकरणाचे वक्तव्य करून गोव्याचे नाव बदनाम करीत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. ऍड. नार्वेकर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना त्वरित मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, असे श्री. नाईक म्हणाले.
कार्यकारिणीवर महिलांना स्थान
33 टक्के महिला आरक्षणाअंतर्गत भारतीय जनता पक्ष तसेच जिल्हा समित्यांवर महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. भाजप प्रदेश समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती कमलिनी पैंगिणकर तर सचिवपदी सौ. छाया विजय पै खोत यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर गोवा जिल्हा समितीच्या उपाध्यक्षपदी सौ. शुभांगी वायंगणकर तर सचिवपदी अरुणा राजेश पाटणेकर यांची नियुक्ती झाली आहे. तसेच दक्षिण गोवा जिल्हा समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीमती आंतोनेत फ्रान्सिस मास्कारेन्हस तर सचिवपदी सौ. रोहिणी परब व सौ. मेदिनी नाईक यांनी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली.

पणजी दूरदर्शनवरून लवकरच प्रादेशिक बातमीपत्र सादर होणार

राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांना विश्वास
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - पणजी दूरदर्शन केंद्रावर प्रादेशिक भाषेत बातमीपत्र सादर करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे आपले प्रयत्न सुरू असून यासंदर्भात माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची परवानगी मिळेल, असा विश्वास राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी व्यक्त केला.
पणजी दूरदर्शनच्या नव्या इमारत बांधकामाची पाहणी केल्यानंतर शांताराम नाईक यांनी ही माहिती दिली. या इमारतीत नवा सुसज्ज स्टुडिओ उभारण्यात येणार असून त्याचे सामान सध्या गोव्यात पोहचत असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार नाईक यांच्याबरोबर संचालक चंद्रकांत बर्वे,स्टेशन अभियंता उज्ज्वला चंद्रमोर, साहाय्यक अभियंते नागराज, प्रसन्न प्रभुदेसाई, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आल्तिनो गोम्स व उल्हास परब हजर होते.
पणजी दूरदर्शन इमारतीच्या बांधकामाकडे आपले सुरुवातीपासून लक्ष आहे. सध्या व्हिडिओ साहित्य, कॅमेरा, वातानुकूलित यंत्रणा,विद्युत साहित्य आदी अजूनही आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, प्रसारभारतीचे अध्यक्ष भटनागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व साहित्य वेळेत पोहचण्याची विनंतीही नाईक यांनी केली.

प्रदेश व युवक कॉंग्रेस यांच्यात "तू..तू मै..मै'

युवा नेत्यांत संतापाची लाट
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)_ गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसला प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी कॉंग्रेस भवनमध्ये बैठक घेण्यास मनाई केल्याने युवक कॉंग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर बैठक बोलावण्यापूर्वी आपल्याला का कळवले नाही, असे कारण सार्दिन यांनी पुढे केले असले तरी कॉंग्रेस नेते युवक कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचे या कृतीवरून सिद्ध झाल्याने यापुढे कॉंग्रेस भवनात अजिबात बैठक न घेण्याचा निर्धार युवक कॉंग्रेसने केला आहे.
गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या कार्यकारिणी व सर्व तालुका समितीची महत्त्वाची बैठक आज कॉंग्रेस भवनमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासंदर्भात काल प्रदेशाध्यक्ष सार्दिन यांनी या बैठकीसाठी कॉंग्रेस भवन मिळणार नसल्याचा संदेश युवक कॉंग्रेसला पाठवला. यामागचे कारण विचारले असता आपल्याला न सांगता बैठका कशा काय घेतल्या जातात, असा सवाल करून सार्दिन यांनी कॉंग्रेस भवन देण्यास प्रतिबंध केल्याची माहिती युवक कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अचानकपणे ओढवलेल्या या परिस्थितीमुळे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी अखेर टी. बी. कुन्हा सभागृहात बैठकीची व्यवस्था केला. या बैठकीसाठी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसचे खजिनदार सुखपालसिंग हजर होते. राज्यात युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या या वागणुकीमुळे श्री. सुखपालसिंग यांनाही आश्चर्य वाटले. आज सकाळपासूनच कॉंग्रेस भवनला भले मोठे कुलूप ठोकून सार्दिन यांनी युवक कार्यकर्त्यांचा अपमान केल्याची भावना युवक नेत्यांची बनली आहे. ताळगाव येथे बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांकडून युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण होऊनही एकाही ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने युवक कार्यकर्त्यांना सहानुभूती दिली नाही. युवक कॉंग्रेसचे जखमी कार्यकर्ते इस्पितळात उपचार घेत असताना तिथे त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणी गेला नाही. मात्र पोलिसांनी बाबूश यांना केलेल्या मारहाणीनंतर त्यांची सुटका होताच कॉंग्रेस नेत्यांची रीघ लागली. कॉंग्रेसचे नेते केवळ निवडणुकीत निवडून येण्यासाठी जर युवक कॉंग्रेस नेत्यांचा वापर करून घेत असतील तर त्यांना योग्य तो इंगा दाखवण्यास मागे राहणार नाही,अशाही संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
"आम आदमी का सिपाही'
राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस नेते राहुल गांधी यांनी "आम आदमी का सिपाही' हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत सरकारच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सक्रियपणे वावरणाऱ्या युवा नेत्यांची एक फळी तयार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्य समन्वयक तथा युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची निवड झाली आहे. उत्तर गोव्याचे प्रतिनिधी दिलीप धारगळकर, तर दक्षिण गोव्यासाठी दया पागी यांची निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आयआयटीत गोव्याची गरुडझेप! अंतिम परीक्षेसाठी १२ विद्यार्थी पात्र

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (आयआयटी) अंतिम पात्रता परीक्षेत यावर्षी राज्यातील विद्यार्थ्यांनी गरुडझेप घेतली आहे. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बारा विद्यार्थी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची परीक्षा देण्यास पात्र ठरले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांना आज (दि. १४) मिरामार रेसिडेन्सी येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिलीप देवबागकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रौनक साखरदांडे, गणपती भट, आर. श्रीनिवास, पल्लवी खरे, संपत देसाई, राहुल प्रभू, रोहित धुमे, रॉबर्ट बोरकर, यशांक साखरदांडे, केवल रामाणी, अकिलेश खोपे, अरुण मल्याळ या विद्यार्थ्यांनी आयआयटी परीक्षेत चांगले यश संपादन करून स्वतःबरोबरच गोव्याचे नावही उज्ज्वल केले आहे. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी गोव्यातून चौघे विद्यार्थी पात्र ठरले होते. त्या तुलनेत यंदा गोव्याने धवल यश मिळवले आहे.
व्यासपीठावर प्रा. देवबागकर, व्ही. ए. पै पाणंदीकर, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये, कमलेश पै पाणंदीकर, उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक आणि "आर्यन क्लासेस'चे मुख्य शिक्षक व्यंकटेश प्रभुदेसाई उपस्थित होते.
आयआयटीसारख्या कठीण परीक्षेत यावर्षी राज्यातील विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी अभिनंदनीय आहे. आजची युवा पिढीच देशाचे भवितव्य घडवणार आहे. या युवकांचे भवितव्य उज्ज्वल आहे. युवकांनी प्रगतीचा हा वेग कायम राखल्यास भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आपल्या खास शुभेच्छा, असे प्रा. देवबागकर यांनी सांगितले.
कमलेश पै पाणंदीकर यांनी विद्यमान युगात शक्तीपेक्षा बुद्धीनेच आपण जगात आपली ओळख निर्माण करू शकतो यावर भर दिला. विद्यार्थ्यांना गौरविल्यानंतर सतीश शेट्ये यांच्या हस्ते दिलीप देवबागकर, कमलेश पाणंदीकर, व्ही. ए. पाणंदीकर आणि प्रा. व्यंकटेश प्रभुदेसाई यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
व्यासपीठावरील मान्यवर आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सतीश शेट्ये यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिनार भाटकर यांनी केले.

राज्यात नवजात अर्भकांच्या तपासणी योजनेचा शुभारंभ

पणजी, दि. १४(प्रतिनिधी) - राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे आज नवजात शिशूंच्या वैश्विक तपासणी योजनेचा शुभारंभ झाला. तसेच आपत्कालीन सेवा पुरवण्यासाठी "इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला.
बांबोळी येथील "गोमेकॉ'मध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते नवजात शिशू तपासणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे,"गोमेकॉचे" डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्ळीकर, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, आरोग्य सचिव आनंद प्रकाश तसेच आरोग्य सल्लागार मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
नवजात शिशूच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून अशी योजना राबवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री कामत यांनी यावेळी काढले. जन्मजात बालकाला भविष्यात कोणताही धोका उद्भवू नये, तसेच जर बालकाला जन्मजातच आजारपण असेल तर त्यावर वेळीच उपचार करणे शक्य होण्यासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे करणारी असल्याचे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. सध्या ही व्यवस्था काही गोमेकॉ तसेच इतर महत्त्वाच्या इस्पितळात केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
१५ ऑगस्टपासून १८ रुग्णवाहिका
गोवा सरकारने आज "इमर्जन्सी मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेशी सामंजस्य करार सही केला. रस्ता अपघात किंवा इतर आरोग्य विषयक तात्काळ सेवा बहाल करण्यासाठी "गोमेकॉ' व आरोग्य संचालनालयाच्या मदतीने ही नवी योजना राबवण्यात येणार असून "नमस्ते १०८' ही रुग्णवाहिका सेवा २४ तास लोकांना मोफत उपलब्ध होणार आहे.
आज दोनापावला येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट चंगवल्ली, आरोग्य सचिव आनंद प्रकाश तसेच आरोग्य सल्लागार मंडळाचे सदस्य हजर होते. या योजनेचा शुभारंभ येत्या १५ ऑगस्ट रोजी केला जाणार असून एकाच दिवशी एकूण १८ रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चेंगवल्ली यांनी सांगितले. "पीपीपी'पद्धतीवर राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व अकराही तालुक्यांना प्रत्येकी १ रुग्णवाहिका सेवेसाठी दिली जाईल व उर्वरित रुग्णवाहिका राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तैनात केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षासाठी सुमारे १०.२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत केंद्र सरकारनेही या योजनेच्या कार्यवाहीसाठी आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.
ही योजना राबवण्यासाठी आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखाली खास समिती नेमण्यात येणार आहे. सर्व अद्ययावत यंत्रणांनी सज्ज रुग्णवाहिकेत तातडीच्या सेवेचे खास प्रशिक्षण घेतलेले तज्ज्ञ मंडळी असतील. अपघातग्रस्त किंवा ह्रदयविकार, गरोदरपण किंवा इतर तातडीच्या समयी इस्पितळात पोहोचेपर्यंतचे प्राथमिक उपचार देण्याची सोय या रुग्णवाहिकेत असेल, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळे गोव्यातील सुमारे दीडशे बेराजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे. या कंपनीतर्फे निवडलेल्या लोकांना खास प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नौदल इमारतीचा स्लॅब कोसळून दहा कामगार जखमी, दोघे गंभीर

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी): नौदलाच्या वरुणापुरी (मंगोरहील, वास्को) येथील वसाहतीत "मिग-२९' चा लढाऊ विमानांसंदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब आज दुपारी दीडच्या सुमारास कोसळून दहा कामगार जखमी झाले. त्यापैकी बसवराज व प्रकाश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या ३० मीटर उंच इमारतीचा स्लॅब कोसळला तेव्हा खाली सुमारे २५ कामगार काम करत होते.
जखमींना चिखली येथील एस.एम.आर.सी. या खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तेथे दाखल झालेल्या वास्को अग्निशामक दलाच्या जवानांनी नौदलाच्या जवानांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. नकुल देवरनार, अलनाफ हुसैन, हमीनुल रेहमान, अब्दुल रजाक, सैफुल, प्रकाश, नीलेश, संजी स्वार (अभियंता) लक्क व बसवराज अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
ही माहिती "एसएमआरसी'चे डॉक्टर ऍलन जॉन यांनी दिली.
घटना घडली तेव्हा या इमारतीखाली सुमारे पंचवीस कामगार काम करत होते, अशी माहिती वास्कोचे पोलिस निरीक्षक हरिष मडकईकर यांनी दिली.
इमारतीचा ठेकेदार डी. पी. शिरोडकर याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३३६ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कामगार जखमी झाल्याची माहिती मिळताच नौदलाचे ध्वजाधिकारी संजय वडगावकर यांनी तेथे भेट देऊन पाहणी केली. यानंतर "गोवादूत'च्या प्रतिनिधींशी बोलताना वडगावकर म्हणाले की, जखमी झालेल्या सर्व कामगारांना कंत्राटदारांकडून नुकसान भरपाई दिली जाईल.
या इमारतीचा स्लॅब कोसळण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून चौकशीअंती त्यावर उजेड पडेल.
जखमी झालेल्यांपैकी संजू याला नंतर त्याच्या कुटुंबीयांनी म्हापशाच्या खाजगी इस्पितळात दाखल केले. तसेच लक्की यास बांबोळीच्या "गोमेकॉ' इस्पितळात दाखल करण्यात आले. एसएमआरसी इस्पितळाचे डॉक्टर जॉन यांनी सांगितले की, या इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या सहा जणांपैकी काही जणांना फॅक्चर झाले आहे.
निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनीही घटनास्थळी पाहणी करून कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन केले.

पणजी दूरदर्शनवरून लवकरच प्रादेशिक बातमीपत्र सादर होणार

राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांना विश्वास
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - पणजी दूरदर्शन केंद्रावर प्रादेशिक भाषेत बातमीपत्र सादर करण्यासाठी परवानगी मिळवण्याचे आपले प्रयत्न सुरू असून यासंदर्भात माहिती व प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांची परवानगी मिळेल, असा विश्वास राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी व्यक्त केला.
पणजी दूरदर्शनच्या नव्या इमारत बांधकामाची पाहणी केल्यानंतर शांताराम नाईक यांनी ही माहिती दिली. या इमारतीत नवा सुसज्ज स्टुडिओ उभारण्यात येणार असून त्याचे सामान सध्या गोव्यात पोहचत असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार नाईक यांच्याबरोबर संचालक चंद्रकांत बर्वे,स्टेशन अभियंता उज्ज्वला चंद्रमोर, साहाय्यक अभियंते नागराज, प्रसन्न प्रभुदेसाई, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस आल्तिनो गोम्स व उल्हास परब हजर होते.
पणजी दूरदर्शन इमारतीच्या बांधकामाकडे आपले सुरुवातीपासून लक्ष आहे. सध्या व्हिडिओ साहित्य, कॅमेरा, वातानुकूलित यंत्रणा,विद्युत साहित्य आदी अजूनही आणले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, प्रसारभारतीचे अध्यक्ष भटनागर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सर्व साहित्य वेळेत पोहचण्याची विनंतीही नाईक यांनी केली.