Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 16 June 2009

संपकरी गोमेकॉ कामगारांकडे कोणी फिरकलेच नाही

पणजी,दि.१५ (प्रतिनिधी): "विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे पाषाणहृदयी आहे व या सरकारला राज्यातील "आम आदमी' ची अजिबात चिंता नाही', असा सनसनाटी आरोप गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सफाई कामगारांनी केला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे कामगार संपावर आहेत, पण त्यांची भेट घेण्यासाठी किंवा त्यांची विचारपूस करण्यासाठी एकही सरकारी अधिकारी अथवा मंत्री येथे फिरकलेला नाही. यावरून या सरकारला "आम आदमी' चा किती पुळका आहे हे उघड झाले, अशी टीका कामगार संघटनेच्या नेत्या अनिषा नाईक यांनी केली आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेली नऊ वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे २०७ चतुर्थश्रेणी सफाई कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन विद्यमान सरकारने दिले होते. गेली दोन वर्षे या कामगारांना या आश्वासनावर झुलवत ठेवून आता आपल्या मर्जीतील नव्या लोकांची भरती करण्याचे सत्र सुरू झाले आहे. सध्या सेवेत असलेल्या कामगारांच्या पोटावर लाथ मारून नव्या लोकांचा भरणा करण्याची ही कृती निषेधार्ह असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सत्तरी भागातील सुमारे ५८ नव्या कामगारांना थेट नेमणूकपत्रे देण्यात आली आहेत, ते कामावर रुजू झाले आहेत. मुळात येथे सेवेत असलेल्या कामगारांना नियमित करण्यापूर्वी या नव्या कामगारांची भरती केल्याने सफाई कामगार गेल्या सहा दिवसांपासून संपावर गेले आहेत.
"या कामगारांनी अद्याप आपल्या संपाचा परिणाम कामावर होऊ दिलेला नाही. पण परिस्थिती अशीच राहिल्यास कामावर बहिष्कार घालणे भाग पडेल', असा इशारा अनिषा नाईक यांनी दिला. मुख्यमंत्री दिगंबर कामत सरकारने अलीकडेच दोन वर्षे पूर्ण केली. या निमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री कामत यांनी आपण राज्यातील सामान्य लोकांच्या हृदयाशी भिडण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री कामत हे देवभक्त आहेत व देवभक्त व्यक्ती ही संवेदनशील असते, अशी आत्तापर्यंतची धारणा आहे. परंतु, राज्यात विविध पातळीवरील सामान्य कामगारांचा विचार करताना मुख्यमंत्र्यांचे संवेदनशील हृदय अजूनही कसे हेलावत नाही, असा खडा सवाल या कामगारांनी केला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांकडूनच कोडकौतुक केले जाते, त्याच आरोग्यमंत्र्यांकडून या कामगारांच्या पोटावर लाथ मारली जात आहे. याचेही कौतुक संबंधित नेतेमंडळी करणार आहेत काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कामत आपल्या सहकारी मंत्र्यांचे लाड पुरवत असतील, तर ते घोडचूक करत आहेत, अशी टीका या कामगारांनी केली आहे. मुख्यमंत्री जर खरोखरच परमेश्वराला मानतात व त्यांचा परमेश्वरावर विश्वास आहे तर त्यांनी सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, त्यांच्या खुर्चीला अजिबात धोका संभवणार नाही, असा विश्वास या कामगारांनी व्यक्त केला आहे.

No comments: