Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 10 May 2009

कुंकळ्ळीत १९ मूर्तींची तोडफोड

लोक खवळले, आज पोलिस स्थानकावर मोर्चा

कुंकळ्ळी, दि. ९ (प्रतिनिधी) - कुंकळ्ळी वेरोडा तळवडे येथील रामनाथ देवस्थानातील वेताळ मूर्तीसह एकूण १९ लिंगांची अज्ञाताने घणाचे घाव घालून तोडफोड केली. त्यामुळे या भागातील लोक कमालीचे संतापले असून त्यांनी संशयित आरोपीला ताबडतोब जेरबंद करण्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात उद्या रविवारी सकाळी ९ वाजता रामनाथ देवस्थान समितीतर्फे कुंकळ्ळी पोस्ट ऑफिसपासून कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्यात येणार आहे. भल्या पहाटे हे संतापजनक कृत्य झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
अतिप्राचीन गणल्या गेलेल्या या देवस्थानातील वेताळ मूर्तीवर २५ हून अधिक घणाचे घाव घालण्यात आले. खड्गहस्त, मस्तक, दोन्ही नेत्र, छाती, कंबर व पाय विच्छेदन केलेले आहेत. तसेच बाहेरील जल्मी, ब्रह्मो, पाचापुरूष या प्रमुख लिंगांसह एकूण १९ लिंगांची तोडफोड करण्यात आली आहे.
रामनाथ देवस्थानापुढील दीपस्तंभ व तुलसी वृंदावनाचीही या माथेफिरूने तोडफोड केली आहे. पिंपळपेडावरील जुना गणेश मुखवटा जवळील विहिरीत फेकला आहे. बेताळ मूर्तीचा मुखवटाही चेपवून बाहेर फेकलेला आढळला.
दरम्यान, तोडफोडीच्या घटनेची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांना समजताच त्यांनी त्वरित त्याबाबत कुंकळ्ळी पोलिसांना कळवले. त्यानंतर निरीक्षक संदेश चोडणकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मागील व या घटनेत साम्य असल्याचे आपणास जाणवले, असे सांगितले.
उपअधीक्षक शांबा सावंत व अधीक्षक ऍलन डिसा यांनी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी यावर आपण गांभीर्याने विचार करत असून लवकरच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, असे सांगितले.
मंदिर समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले की, यापूर्वीच्या अशा घटनांमुळे
आम्ही मंदिराला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तथापि, आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही. हिंदूंच्याबाबतीत सरकारकडून उदासिनता दिसू येते अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, भाजपचे पदाधिकारी ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार रमेश तवडकर, आमदार दामू नाईक, प्रकाश वेळीप यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी १२ वाजता श्वानपथकास पाचारण करण्यात आले. मात्र कुत्रे मंदिराच्या आवारातच घुटमळत राहिले. त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
सरकारचा तीव्र निषेध
पुढील कृती ठरवण्यासाठी संध्याकाळी मंदिर समिती व गावकऱ्यांची बैठक घटनास्थळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठी उपस्थिती लाभली होती. यावेळी सरकारच्या उदासिनतेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचे ठरवण्यात आले. या मोर्चात सुमारे दोन हजार लोक सामील होतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

No comments: