नवी दिल्ली, दि. १४ ः लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. दोन्ही आघाड्यांच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापासूनच "सेटिंग' सुरू केले आहे. कमी - जास्त जागा मिळाल्यास सरकार स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागू नये म्हणून कोणत्या पक्षाला कसे आपल्याकडे ओढावे, याचाच सध्या ही मुत्सद्दी मंडळी अंदाज घेत आहेत.
कुस्तीच्या आखाड्यात उतरल्यानंतर दोन मल्ल सुरुवातीला डाव टाकण्यापूर्वी जसा एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेतात, तसेच सध्या राजकीय वर्तुळातही सुरू आहे. कोणता पक्ष साधारणत: किती किमतीत मानेल, त्याचप्रमाणे जिंकून येण्याची शक्यता असलेल्या अपक्षांना कसे जाळ्यात ओढायचे, याची व्यूहरचना केली जात आहे.
विशेष बाब अशी की, विविध वाहिन्यांनी जारी केलेल्या जनमत चाचणीचा कौल बघता रालोआ व संपुआसह कोणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत. म्हणूनच ही राजकीय डावपेच खेळण्याची वेळ असून रणनीतीची व्यवस्थित आखणी करण्याच्या उद्देशाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षनेते व राष्ट्रीय सरचिटणिसांची आपापल्या निवासस्थानी बैठक घेतली. अडवाणी यांनी तर वेळ दवडायचा नाही म्हणून अंतिम टप्प्याची निवडणूक संपून २४ तास होत नाही तोच भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी विचारविनिमय सुरू केला आहे.
तिकडे हैद्राबादेत तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या मुख्यालयात ठाण मांडले आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांना माझ्या संपर्कात राहा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणालाही बहुमत मिळणार नाही अन् त्रिशंकू परिस्थिती येणार याची जाणीव असल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपने जिंकून येण्याची शक्यता असलेले अपक्ष उमेदवार आणि लहान पक्ष आपल्या गळाला लागावेत म्हणून मन वळवण्यात तरबेज असलेल्या नेत्यांना कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.
हालचालींना वेग
निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच इकडे तिकडे विखुरल्यामुळे महिनाभर ओस पडलेली पक्षांची मुख्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत. नेत्यांच्या हालचालींमधील गती वाढली आहे. निकालाच्या अंदाजाबाबत प्रतिस्पर्धी परस्परविरोधी दावे करीत असून, सत्तेच्या सिद्धांतांची समीकरणे रोजच बदलत आहेत. प्रत्येक घटना टिपण्यासाठी वाहिन्यांचे कॅमेरे व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजधानीत दाटी केली आहे.
नव्या सरकारच्या निर्मितीत कोणकोणते पक्ष सहभागी होतील, कोण बाहेरून समर्थन देतील, त्यांच्या अटी काय असतील याविषयी सध्या सर्वच अनिश्चित आहे. मात्र, ज्या तीन आघाड्या सरकार बनविण्याचा दावा करीत आहेत, त्यांपैकी कोणालाही संधी मिळाली तर देशात कोणते बदल होतील, त्यांचे धोरण कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
लुधियानातील महारॅलीनंतर रालोआचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जो पक्ष अडवाणी यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा देईल त्याचे स्वागत करण्यास आम्ही तयार आहोत असे भाजप नेते व्यंकय्या नायडू म्हणाले. टीआरएसचा रालोआमध्ये प्रवेश ही त्याचीच सुरुवात म्हणता येईल. नायडू हे सध्या हैद्राबादमध्ये डेरेदाखल आहेत. दक्षिण आघाडीवर विजय मिळविता यावा म्हणून चंद्राबाबू नायडू व जयललितांना रालोआच्या गोटात खेचण्याकरिता त्यांचा खटाटोप सुरू आहे. तसेच संपुआ पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास कॉंग्रेस महासचिव दिग्गीराजांना वाटतोय. देशात भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष जातीय असल्याचे कॉंग्रेसचे मत असून यांच्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षावर धर्मांध किंवा जातीय असा आरोप आम्ही कधीच केला नाही. १६ तारखेपर्यंत नानाप्रकारचे अंदाज व्यक्त होतील. लोकशाहीत हे टाळता येणार नाही, असे दिग्विजयसिंग म्हणाले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंगळवारी रात्री १० जनपथवर अगदी गुपचूप सोनियांना भेटले. पत्रकारांनी त्यांना बाहेर निघताना बघितल्यानंतर रुमालामागे तोंड लपवून माध्यमांशी न बोलता ते सटकले. असे असले तरी माजी पंतप्रधान व कुमारस्वामी यांचे वडील देवेगौडा यांनी आपला पक्ष तिसऱ्या आघाडीत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
१९९६ व १९९८ मधील खंडित जनादेशासारखीच स्थिती पाचव्या फेरीच्या मतदानानंतर दृष्टिक्षेपात आहे. तिसऱ्या आघाडीच्या सरकारला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळेल अशी डाव्यांसह काहींना आशा आहे. म्हणूनच डाव्या पक्षांचे सूर सध्या वरच्या पट्टीतील दिसताहेत. अन् पडद्यामागील जोडतोडीच्या हालचालींनाही वेग वाढला आहे.
Friday, 15 May 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment