महापौर हल्ल्याच्या निषेधार्थ
सोमवारी पणजी बाजार बंद
पालिका कामगार संपाचे लोणही राज्यभर पसरणार
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- महापौर टोनी रॉड्रिगिस यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पणजी बाजारातील व्यापाऱ्यांतर्फे सोमवार २५ रोजी पणजी बाजार बंद पुकारण्यात आला आहे. पणजी शहर व परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही आपापली आस्थापने स्वखुशीने बंद ठेवून पणजी बाजारकर संघटनेला सहकार्य द्यावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर व सचिव दयानंद आमोणकर यांनी केले आहे.
दरम्यान, पणजी महापालिका कामगारांनी घोषित केलेल्या बेमुदत संपाचा भडका आता संपूर्ण राज्यभर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालपासून पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या महापालिका मंडळाने आता संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्याची अट सरकारसमोर ठेवली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, उपमहापौर यतिन पारेख यांनी ही माहिती दिली.
पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगिस यांच्यासह ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात व त्यांचे कुटुंबीय यांना अमानुषपणे जी मारहाण करण्यात आली तो अत्यंत लज्जास्पद प्रकार असून कायद्याच्या चौकटीबाहेर ही कृती झाल्याची टीका त्यांनी केली आहे. महापालिका कामगार संघटनेच्या नेत्यांना राज्यातील इतर पालिका कामगार संघटनांकडून पाठिंबा दर्शवण्यात आल्याने राज्यातील सर्व पालिका कामगार या घटनेच्या निषेधार्थ तथा गुन्हेगारांना अटक करण्याच्या मागणीवर बेमुदत संपावर जाण्याची तयारी करीत असल्याची माहितीही श्री. पारेख यांनी दिली.
सरकारने अजिबात वेळ न दवडता या विषयी तात्काळ कृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पणजीतील कचरा गेले दोन दिवस उचलला नसल्याने आतापासूनच शहरात दुर्गंधी पसरली असून येत्या दोन दिवसांत दुर्गंधीचा कहर होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी अनेक नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधून पालिकेकडून त्यांना वेठीस धरू नये, अशी सूचना केल्याचेही श्री. पारेख म्हणाले. दरम्यान, महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असल्याने त्यांना जी हीन वागणूक दिली गेली व क्रौर्याने मारहाण झाली ही संपूर्ण शहरातील नागरिकांच्या प्रतिष्ठेची मानहानी असल्याने त्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील असा इशारा पारेख यांनी दिला.
एक नागरी संस्था या नात्याने महापालिकेला आपल्या कर्तव्याची जाण आहे, त्यामुळे सरकारने अधिक वेळ न दवडता या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यातील बहुतेक पालिका अध्यक्ष तथा नगरसेवकांनी पणजी महापालिकेच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शवल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पालिका कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांना इतर पालिका कामगार नेत्यांनी पाठिंबा दिल्याने या कृतीच्या निषेधार्थ राज्यभरातील पालिका कामगारांनी संपावर जाण्याची तयारी ठेवली आहे.
या विषयावर राजकारण करण्याची पालिका मंडळाची मुळीच तयारी नाही, असे ठामपणे सांगून सरकारने या प्रकरणी ताबडतोब लक्ष घालून त्यावर उपाय काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. विविध राजकीय पक्ष व समाज संघटनांकडून पोलिसांवरील हल्ला व पोलिसांची मोर्चानंतरची कृती या दोन्ही घटनांबाबत टीका केली आहे. या संपूर्ण घटनेची सत्यता उघड होण्यासाठी न्यायालयीन चौकशी हा एकमेव योग्य मार्ग असून सरकारने तात्काळ हे आदेश द्यावेत, अशी मागणी नगरसेवक ऍड. अविनाश भोसले यांनी केली.
आधीच कचऱ्यामुळे दुर्गंधीमय झालेले पणजी शहर दोन दिवस कचरा न उचलल्यामुळे अधिकच बकाल बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सर्वांवरच होण्याची शक्यता आहे. पणजी बाजारात तर आतापासूनच फिरणे दुरापास्त बनले असून नागरिकांना नाक व तोंड बंद करून चालावे लागते आहे.
Sunday, 24 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment