Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 5 September 2008

बीएमडब्ल्यू कांड संजीव नंदाला पाच वर्षांची शिक्षा

दोन दोषींना सहा महिन्यांची शिक्षा चौथ्या दोषीला १ वर्षाची शिक्षा
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. ५ : बहुप्रतीक्षित बीएमडब्ल्यू प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने आज दोषींना शिक्षा ठोठावली. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला धनिकपुत्र संजीव नंदा याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषी ठरविण्यात आलेल्या दोन जणांना प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची, तर चौथा दोषी राजीव गुप्ता याला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
बीएमडब्ल्यू प्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला संजीव नंदा हा शस्त्रास्त्र व्यापारी सुरेश नंदा यांचा मुलगा आहे,तर माजी नौदलप्रमुख ऍडमिरल एस. एम. नंदा यांचा नातू आहे. आज शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या चौघांनाही २ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने दोषी ठरविताना शिक्षेचे स्वरूप राखून ठेवले होते. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. १० जानेवारी १९९९ रोजी संजीव नंदाने आपली बीएमडब्ल्यू ही आलिशान कार बेदरकारपणे चालवत दक्षिण दिल्लीच्या लोधी कॉलनीत सहा जणांना चिरडले होते. या घटनेच्या वेळी संजीव नंदासोबत त्याच्या कारमध्ये त्याचा मित्र माणिक कपूर हा देखील होता. मात्र, त्याची या प्रकरणातून न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष म्हणून सुटका केलेली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद कुमार यांनी संजीव नंदा याला कलम ३०४ (२)अंतर्गत (जीव घेण्याचा उद्देश नसलेला)दोषी ठरविले. या कलमात गुन्ह्यासाठी १० वर्षांच्या कमाल शिक्षेची तरतूद आहे.
एखाद्या आरोपीला कलम ३०४ (२)अंतर्गत दोषी ठरविण्याचे बहुदा हे पहिलेच प्रकरण आहे. अशा प्रकारच्या बहुतांश प्रकरणांमध्ये कलम ३०४ (१)नुसारच निर्णय सुनावला जातो. बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यू ओढवणे, असे स्वरूप या कलमात येणाऱ्या प्रकरणांचे असते. यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणी अन्य आरोपी व्यापारी राजीव गुप्ता आणि त्याच्याकडे घरकामासाठी असलेले दोन नोकर भोलानाथ आणि शाम सिंग यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा राजीव गुप्ताचा मुलगा सिद्धार्थ हा देखील अपघाताच्या वेळी कारमध्येच होता. त्याची या प्रकरणातून ऑगस्ट १९९९ मध्येच निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे.

पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडले

मडगाव, दि.५ (प्रतिनिधी): मडगावातील दुकाने व घरे फोडून लाखोंचा ऐवज पळविण्याचे प्रकार चालू असतानाच आज सकाळी राय येथे महामार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका कष्टकरी महिलेकडील साधारणपणे ७६ हजारांचे दागिने पळविण्याचा प्रकार घडला व शहरातील गुन्ह्याप्रकरणात एका नव्या प्रकाराची नोंद झाली.
मायणा कुडतरी पोलिसांत नोंद झालेल्या तक्रारीनुसार उजवाडो -राय येथील पुष्पा गावकर ही महिला सकाळी उठून शिरोडा बाजाराला गेली होती, तेथून ती परत येऊन राय येथील बसथांब्यावर उतरून पायी घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिला आपण पोलिस आहोत, पुढे वाटेवरच खून झालेला आहे व त्यामुळे गडबड उडालेली आहे,तेव्हा तू सांभाळून जा,अंगावर दागिने ठेवू नकोस ,त्याऐवजी सगळे काढ व रुमालात गुंडाळून पिशवीत घाल व गुपचूप घरी जा असा सल्ला दिला.
छक्केपंंजे माहित नसलेल्या साध्याभोळ्या महिलेला ते खरेच वाटले, तिने त्यांच्या समक्षच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, साखळी , बांगड्या, कानातली वगैरे काढली व त्यांची पुरचुंडी करून ती जवळच्या पिशवीत ठेवण्यापूर्वीच त्यापैकी एकाने ती हिसकावली व पोबारा केला. तिने आरडाओरडा केला पण त्यावेळी रस्त्यावर जवळपास कोणीच नव्हते , त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
मायणा कुडतरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला पण सायंकाळपर्यंत काहीच तपास लागला नव्हता.अशा प्रकारची ही या भागातील ही नवी घटना असून त्यामुळे पोलिस अधिकारी चक्रावले आहेत.
दरम्यान, गणेेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भर दिवसा मडगावातील गजबजलेल्या आबादे फारिय या रस्त्यावरील एक घर भर दुपारी फोडून आतून जो १.८० लाखांचा ऐवज लंपास केला गेला होता, त्याप्रकरणीही अजून कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही . त्यावरून शहरात जरी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला गेलेला असला तरी त्याचा चोरट्यांवर काहीच परिणाम झालेला नाही हेच स्पष्ट झालेले आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांची माहिती देण्याबाबत 'एसएमएस'

सीबीआयची अशीही मोहीम
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : भ्रष्टाचाराची कीड देशाला पोखरत असताना, आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने त्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास त्याची थेट माहिती देण्याचे आवाहन करणारा"एसएमएस' केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनेच(सीबीआय)नागरिकांना पाठवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आज दुपारी अनेकांच्या मोबाईलवर "एसएमएस' रिंगटोन वाजली... प्रत्येकाने आपला मोबाईल पाहिला... तो "एसएमएस' सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. कारण एसएमएस त्यांच्या आप्तस्वकीयांकडूनही नव्हता, की मोबाईल कंपनीकडूनही नव्हता. तो सीबीआयकडून आवाहन करणारा एसएमस होता. प्रत्येक बीएसएनएलधारकांच्या तोंडी आज या एसएमएसचीच चर्चा होती.
राजकीय नेत्यांसह सरकारी कार्यालयातही भ्रष्टाचाराची पाळेमुळे अगदी खोलवर गेली आहेत. सरकारी कार्यालयात एखादे काम करून घेण्यासाठी लोकांना अगदी खालपासून वरपर्यंत "हात गरम' करावे लागतात. मात्र आता अशा "हातां'मध्ये बेड्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सीबीआयने अशा लोकांची माहिती त्वरित उपलब्ध करण्याचे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. केंद्र सरकारचा एखादा कर्मचारी जर "लाच' घेत असेल, मागत असेल वा घेताना आढळला तर त्याबाबत त्वरित ९४२३८८४१०० किंवा २४३४७१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सीबीआयने मोबाईल ग्राहकांना केले आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयच्या spacgoa@cbi.gov.in. या वेबसाइटवरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण दिवसात बीएसएनएलच्या प्रत्येक मोबाईलधारकास हा मोबाईल संदेश पाठवण्यात आला. हा एसएमएस वाचून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.

नोकरीचे आमिष दाखवून विनयभंग केल्याची तक्रार 'टूर्स'च्या मालकाला अटक

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : काम शिकवतो म्हणून टूर्स ऍंड ट्रॅव्हलच्या कार्यालयात बोलवून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग आणि अतिप्रसंग केल्याने सान्तिनेज येथील एस.के. ट्रॅव्हल ऍंड टूर्सचा मालक सतिशकुमार काजोल (४५) याला आज पणजी पोलिसांनी अटक केली. दि. ३ सप्टेंबर रोजी चतुर्थीच्या दिवशी कार्यालयात कोणीच नसल्याची संधी साधून संशयित काजोल याने "त्या' तरुणीला बोलावून दुपारी १ ते ३ पर्यंत कार्यालयात कोंडून ठेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आज त्या तरुणीने आपल्या अन्य मैत्रिणींना घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर दुपारी त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक राहुल परब यांनी त्याला तीन तासांच्या आत अटक केली.
प्राप्त माहितीनुसार पाटो प्लाझा येथे नवीनच सुरू झालेल्या एका हॉटेलने एस.के. टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स या कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी वाहने व बसेस उपलब्ध करून देण्याचा करार केला आहे. त्यामुळे त्यासाठी एक काऊंटर त्या हॉटेलमध्ये सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी काम करण्यासाठी एका मुलीच्या शोधात संशयित काजोल होता. त्यानंतर त्याच हॉटेलमध्येे काम करणाऱ्या एका तरुणीने आपल्या मैत्रिणीला याठिकाणी नोकरी असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या हॉटेलच्या लॉबीतच या तरुणीची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर काम शिकण्यासाठी काही दिवस आपल्या सान्तिनेज येथील कार्यालयात यावे लागणार असल्याचे सांगून त्या तरुणीला संशयित काजोल याने तिला दि. ३ रोजी कार्यालयात बोलावले. दुपारी १ वाजल्यानंतर काजोल याने अचानक कार्यालयाचा दरवाजा बंद करून आपल्यावर अतिप्रसंग आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे त्या तरुणीने दिलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
आज सकाळी त्या तरुणीने घडलेली सर्व हकिकत आपल्या त्या हॉटेलमधील मैत्रिणीला सांगितले. यावेळी त्यांनी याविषयी काजोल याला विचारले असता तो तेथून पळाल्याने त्यांनी याविषयीची रीतसर पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.द.स ३४२, ३५४, ५०९, ५०४ आणि ३२३ कलमानुसार गुन्हा नोंद करून काजोल याला अटक केली. संशयित काजोल हा मूळ हरियाणा येथे राहणारा असून गोव्यात तो पर्वरी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याविषयाची अधिक तपास उपनिरीक्षक राहुल परब करीत आहे.

Thursday, 4 September 2008

अणुकरारप्रश्नी देशाची दिशाभूल

संसदेच्या विशेष अधिवेशनाची भाजपची मागणी
अध्यक्ष बुश यांच्या पत्राने
उघड केला दुटप्पीपणा

नवी दिल्ली, दि.४ : भारताने अणुचाचणी केल्यास त्यांना केला जाणारा अणुइंधनाचा पुरवठा तात्काळ रोखला जाईल, असे बुश यांनी अमेरिकी कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. हे पत्र त्यांनी जानेवारी महिन्यात लिहिले होते. या पत्रातील माहिती त्यांनी भारत सरकारला दिलेली होती. याचाच अर्थ असा की, आपल्याच पंतप्रधानांनी संसदेची दिशाभूल केलेली आहे, असा आरोप आज भाजपने करून संसदेच्या खास अधिवेशनाची मागणी केली.
अमेरिकेशी नागरी अणुऊर्जा सहकार्य करणाऱ्या केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने देशाची तसेच संसदेची दिशाभूल केलेली आहे. यामुळे त्यांना आता यापुढे सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. मनमोहनसिंग सरकारने राजीनामा देऊन पायउतार व्हावे, अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
""अणुकरारामुळे भारताच्या अणुचाचणीच्या अधिकारांवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत. आवश्यकता भासल्यास भारत अणुचाचण्या घेऊ शकतो. अणुकराराशी अणुचाचण्यांचा कसलाही संबंध नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आतापर्यंत सांगत होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या गोपनीय पत्राचा उलगडा झाल्याने मनमोहनसिंग यांनी देशाची दिशाभूल कशी केली, हे आता उघड झालेले आहे. याप्रश्नी दिशाभूल करून संसदेच्या दोन्ही सभागृहांचा पंतप्रधानांनी केलेला हा मोठा व गंभीर असा हक्कभंग आहे. या मुद्यावरून संसदेचे तात्काळ विशेष अधिवेशन आयोजित करावे व संपुआ सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे. त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार पूर्णत: गमावलेला आहे,''असे यशवंत सिन्हा यावेळी म्हणाले.
संसदेत सरकारने केलेले वक्तव्य आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी अमेरिकी कॉंग्रेसला दिलेली माहिती ही परस्परांशी पूर्णत: विसंगत आहे. परस्परांशी निगडीत असलेल्या एकाच विषयांवर अमेरिका वेगळ्याच दिशेने विचार करीत आहे, तर भारत वेगळ्य़ाच दिशेने! अणुकराराच्या अंमलबजावणीला प्रारंभालाच असे गंभीर स्वरूपाचे मुद्दे समोर आल्याने भविष्यात काय होणार? कोणत्या समस्या उद्भवणार, आदी प्रश्नेही उपस्थित झालेले आहेत. आम्हाला जी भीती होती; ती खरी ठरलेली आहे. भारताला अणुतंत्रज्ञान देण्यास तसेच अणुइंधनासाठी सूट देण्यास अमेरिका इच्छूक नाही. भारताच्या अणुचाचण्यांविषयी अमेरिकेच्या मनात नेमके काय खदखदत आहे, हे बुश यांच्या पत्राने उघडकीस आलेले आहे, असे सिन्हा म्हणाले. अमेरिकेच्या "हाईड ऍक्ट'विषयी बोलताना सिन्हा म्हणाले की, अमेरिकेच्या या हाईड ऍक्टचा अणुकराराशी केवळ संबंधच नाही; तर कराराला बांधून ठेवणारा हा कायदा आहे. दोन्ही देशांवर हाईड ऍक्ट बंधनकारकच राहणार आहे. हाईड ऍक्टमधून भारताची सुटका नाहीच, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण, अपघातात बालकाचे निधन

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीजवळ एका मारुती कारचा अचानक ताबा गेल्याने सुमारे सात ते आठ मीटर गाडी खाली कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील सहा महिन्याचा बालक ठार झाला तर अन्य तिघे जखमी होण्याची घटना काल रात्री घडली.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. मडगाव येथील हे कुटुंबीय शिरगावहून आपल्या घरी परतत असताना मारुती गाडी क्रमांक जीए-०५-बी-०५०२ अचानक रस्त्याच्या बाजूला गेली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी कठड्याला धडक देऊन ही गाडी सुमारे सात ते आठ मीटर खाली कोसळली, अशी माहिती देण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गोवा आरोग्य महाविद्यालयात दाखल केले. यावेळी कु.समर्थ जयेश नाईक या सहा महिन्याच्या जखमी बालकाचे प्राण वाचवणे शक्य न झाल्याने त्याचा अंत झाला. जखमींपैकी जयेश रघुनाथ नाईक(३२),नितीन गुरूदास बिचोलकर(३२) व विणा राजेश नाईक (६) यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू आहेत तर शुभा जयेश नाईक(३०),विनोदकुमार(२२),ओम जयेश नाईक(५) यांना घरी पाठवण्यात आले. अपघाताचा पंचनामा हवालदार शिवाजी मेरवा यांनी केला तर पोलिस उपनिरीक्षक आमोणकर पुढील तपास करीत आहे.

म्हापसा येथे अपघातात दुचाकी चालक ठार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): म्हापसा गणेशपुरी येथील शिवोलीमार्गे जाणाऱ्या उतरणीवर आज सकाळी दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक महादेव वासुदेव खडजी (४२) हे ठार झाले. त्यांच्याबरोबर दुचाकीवर बसलेल्या त्यांच्या पत्नी पार्वती या जखमी झाल्याने त्यांना आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले असून यावेळी दुचाकीवर स्वार असलेली त्यांची तीन मुले मात्र सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे दहाच्या सुमारास महादेव खडजी आपली पत्नी पार्वती खडजी व मुले कु. रेशा(९), कु. नवमी (३) व कु. तुषार (२) यांना घेऊन मोरजी येथे आपल्या गावी गणेश चतुर्थीला जात होते. म्हापसा गणेशपुरी येथील धोकादायक उतरणीवर ते आपली कायनेटिक होंडा क्रमांक जीए-०३-एम-५५३४ या दुचाकीवरून जात असता म्हापसामार्गे येणारी मारूती झेन क्रमांक जीए-०१-एस-१८१४ ही दिसताच त्यांचा दुचाकीवरील ताबा गेला. वेळीच ब्रेक न लागल्याने रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर दुचाकीचा धक्का बसल्याने त्यांच्या डोक्याला बराच मार बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की हेल्मेटचे देखील तुकडे झाले. दुचाकीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी व तीनही मुले बाजुला फेकली गेली. यावेळी त्यांना तात्काळ म्हापसा आझिलो इस्पितळात दाखल केले असता तिथे त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या पत्नी पार्वती या जखमी झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून तीनही मुलांना सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी मोरजी येथील खडजी कुटुंबीयांवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे या गावातील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा आरोग्य महाविद्यालयात पाठवला असून त्यांच्यावर उद्या अंतीमसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पंचनामा साहाय्यक उपनिरीक्षक श्माम नाईक यांनी केला तर उपनिरीक्षक बसवानी पुढील तपास करीत आहेत.

अणुसहकार्य करारावर केंद्राचा दुटप्पीपणा उघड सरकारचे 'वस्त्रहरण'!

नवी दिल्ली, दि.४ (रवींद्र दाणी): वॉशिंग्टनने आण्विक करारात भारताचे अण्वस्त्रहरण केले तर वॉशिंग्टन पोस्टने मनमोहनसिंग सरकारचे वस्त्रहरण केले. ज्या मनमोहनसिंगांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची हिंमत विरोधकानांही होत नव्हती, त्याच मनमोहनसिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवणे आता सरकारमधील त्यांच्या सहकाऱ्यानांही जड जात आहे.
बुश प्रशासनाने अमेरिकन कॉंग्रेसच्या समितीला पाठविलेले २६ पृष्ठांचे अति गोपनीय पत्र प्रसिध्द झाल्यानंतर मनमोहनसिंग यांच्या विश्वसनीयतेला जबर तडा गेला आहे.
काकोडकर यांचा दुजोरा
विशेष म्हणजे वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिध्द झालेल्या या पत्राला भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दुजोरा दिला आहे. या पत्राची मलाही माहिती होती. ते प्रश्नोत्तराच्या स्वरुपात आहे हेही मला माहित होते असे डॉ. काकोडकर यांनी आज एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या पत्राची माहिती डॉ.काकोडकर यांना होती, याचा अर्थ ती पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनाही होती. मनमोहनसिंग यांनी ती देशाच्या संसदेपासून दडवून ठेवली हे सरकारी गोटात मानले जात आहे.
अमेरिकेचे भारतातील राजदूत डेव्हिड मेलफोर्ड यांनीही या पत्रातील माहितीला दुजोरा दिला आहे. पत्रात नवे काहीच नाही, पत्रात जे काही आहे ते सारे भारत सरकारला सांगण्यात आहे आहे, असे मेलफार्ड यांनी म्हटले आहे. डॉ.काकोडकर व मेलफोर्ड या दोघांनीही या पत्राचे अस्तित्व मान्य केले आहे. मात्र भारताच्या संसदेत या करारावर अनेकदा चर्चा होत असताना सरकारने या पत्रात नमूद असलेल्या अटींच्या नेमकी विरुध्द माहिती संसदेला दिली. आणि प्रत्येक वेळी हे काम खुद्द पंतप्रधानांनी केले.
काकोडकर यांचा खुलासा
डॉ.काकोडकर यांच्या या मुलाखतीचे वृत्त बाहेर येताच सरकार हादरले. कारण काकोडकर यांनी या पत्राची आपल्याला माहिती होती, असे सांगून सरकार व पंतप्रधान यांना अडचणीत आणले होते. मग काकेडकर यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले. आपल्याला पत्राची माहिती होती, पण पत्रात काय आहे हे आपल्याला माहित नव्हते, असा नवा खुलासा काकेडकर यांनी नंतर केला. पण काकोडकर यांच्या या खुलाशाला सरकारचे वस्त्रहरण रोखण्याची एक केविलवाणी धडपड मानली जाते. कारण, एका चॅनेलाला त्यांनी या पत्रातील माहितीची आपल्याला माहिती होती, असे सांगितले आहे तर दुसऱ्या एका चॅनेलला त्यांनी आपल्याला फक्त पत्राची माहिती होती, असे सांगितले आहे.

राज्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील दीड दिवसांच्या गणपतींचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. घुमट आरतींची साथ व फटाक्यांची आतषबाजी यांच्या जोडीने व पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करीत श्रींना निरोप देण्यात आला.
राजधानी पणजीत मिरामार येथील समुद्र किनाऱ्यावर तसेच बेती फेरीबोट धक्क्यावर विसर्जनासाठी लोकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. गोव्यात दीड,पाच,सात,नऊ,अकरा व एकवीस दिवसांचा गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. राज्यातील शहरी भागांतील लोक जादाकरून दीड दिवसांचा उत्सव साजरा करतात तर विविध ग्रामीण भागांत मात्र जादाकरून पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राजधानी पणजीत शांतता पसरली असली तरी विविध गावांत मात्र उत्सवाला उधाण आले आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. नोकरी व्यवसायानिमित्ताने शहरात राहणारे लोक या उत्सवानिमित्ताने आपल्या मूळ गावी जात असल्याने शहरात सामसूम पसरली आहे.

Tuesday, 2 September 2008

आता ब्रम्हपुत्रेचाही कहर आसामात महापूर

गुवाहाटी, दि. २ : कोसी नदीच्या महापुराने बिहारमध्ये लाखो लोक विस्थापित झाले असून अजूनही तेथे पुनर्वसन आणि मदत कार्य सुरू आहे. त्यातच आता आसामामध्येही पुराने थैमान घातले आहे. जवळपास दहा लाख लोक बेघर झाले आहेत. आतापर्यत १५ जणांचा पुराने बळी घेतला असून लष्कराचे जवान पूरग्रस्तांच्या मदतकार्यात गुंतले आहेत. लोकांना वाचविण्यासाठी जवानांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. तसेच वायुदलाची हेलिकॉप्टर्सही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आली आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुत्रेच्या पात्राचे २० ही भराव पुराने फुटल्याने आसामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला असून सुमारे तीन लाख हेक्टर जमीन पुराखाली आली आहे. या महापुराच्या हाहाःकाराने १३४६ गावे होत्याची नव्हती झाली आहेत. महापुरातील हजारो विस्थपित लोक सध्या तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत राहत आहेत.
दरम्यान, यापूर्वी सन २००४ मध्ये आसाममध्ये आलेल्या महापुरात सुमारे २०० हून अधिक लोकंाचा बळी गेला होता.