Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 6 July 2011

भजनी मंडळ प्रमुखांसोबत आज अकादमीची बैठक

भजनी मंडळ प्रमुखांना पाचारण
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): माध्यम प्रश्‍नावरून सुरू झालेल्या लढ्यात भजनी कलाकारांनीही उडी घेतल्याने कला अकादमीसमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भजनी कलाकारांनी या स्पर्धेत निषेधात्मक सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या भजन स्पर्धेवर अनिश्‍चिततेचे सावट पसरले असून कोणत्याही परिस्थितीत हा विरोध मोडून काढण्यासाठी उद्या ६ रोजी कला अकादमीने भजनी मंडळ प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी ३ वाजता मा. दिनानाथ मंंगेशकर सभागृहात ही बैठक घेतली जाणार असल्याचे अकादमीने जाहीर केले आहे.
दरम्यान, दि. १५ ऑगस्ट रोजी होणार असलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीवर बहिष्कार घातलेल्या भजनी कलाकारांनी या दिवशी पणजी शहरात महादिंडीचे आयोजन केले आहे. या महादिंडीला अलोट गर्दी उसळण्याची धास्ती कला अकादमीने घेतली आहे. इंग्रजीकरण करण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेच सांस्कृतिक खाते असल्याने या स्पर्धा अधिकच संकटात आल्या आहेत.
येत्या काही दिवसांत तालुका स्तरावर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, गोव्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने अकादमीसमोर तज्ज्ञ परीक्षक मिळवण्याचीही अडचण उभी राहिली आहे. तालुका स्तरावरील पथके अंतिम फेरीत सहभागी होणार नसल्याने या स्पर्धेचे एकूण भवितव्यच अधांतरी बनले आहे.

राज्यसभा उमेदवारी प्रक्रियेला सुरुवात

२२ जुलैला मतदान
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोव्यातील एकमेव राज्यसभा खासदारपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज ५ पासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १२ जुलै असेल. १३ जुलै रोजी अर्जांची छाननी व १५ रोजी अर्ज मागे घेता येईल. २२ जुलै रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल.
कॉंग्रेस पक्षाकडून राज्यसभा उमेदवारांची छाननी सुरू आहे. भाजप आपली भूमिका येत्या ८ जुलै रोजी विधिमंडळ गटाच्या बैठकीत ठरवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली. भाजपकडे आपला उमेदवार निवडून आणण्याची आमदारसंख्या नसल्याने एकूण राजकीय परिस्थितीवर नजर ठेवून योग्य ती भूमिका घेण्याचे भाजपने ठरवल्याचेही पर्रीकर म्हणाले. विद्यमान आघाडीचा घटक असलेल्या मगो पक्षाने यापूर्वीच खासदार शांताराम नाईक यांना पाठिंबा न देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. कॉंग्रेसमधून शांताराम नाईक व माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांची नावे चर्चेत आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत दिल्लीला गेले असून ते या बाबतीत श्रेष्ठींकडे चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. दरम्यान, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार यांच्याशी संपर्क साधला असता येत्या दोन दिवसांत उमेदवार निश्‍चित करणार असल्याचे ते म्हणाले.

मेडिकलच्या विद्यार्थिनीला ‘कॉपी’ करताना पकडले

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): पेपर फुटीनंतर आज प्रथम वर्षाच्या परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थिनीला ‘कॉपी’ करताना पकडण्यात आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षा व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रथम वर्षाच्या ‘ऍनाटॉमी - पेपर (२)’’ च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थिनीला आज कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी तिच्याकडे ‘मायक्रो झेरॉक्स’ करून आणलेले तब्बल १६४ पेपर आढळून आल्याची माहिती खास सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनीवर कारवाई होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कॉपीप्रकरणी एका वर्षासाठी विद्यार्थ्याला निलंबित करण्याची तरतूद नियमात असून त्याची अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांत झालेली नाही.
एका वर्षापूर्वी मेडिकलच्या विद्यार्थ्याची कॉपी पकडण्यात आली होती. त्यानंतर पेपर फुटीचे प्रकरण गाजले होते. परंतु, या घटनांनंतरही महाविद्यालयाच्या प्रशासनाने हे प्रकार रोखण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. गोवा विद्यापीठाच्या एका समितीने परीक्षा सभागृहात ‘सी सी टीव्ही’ बसवण्याची सूचना केली होती. त्याकडेही महाविद्यालयाच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच, गेल्या पेपर फुटी प्रकरणाचा चौकशी अहवालही उघड झालेला नाही.

देशप्रभूंचा सीआयडीला ठेंगा

कोरगाव बेकायदा खाण प्रकरण
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): भाईड - कोरगाव बेकायदा खाण प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काढलेल्या आदेशाला आज राष्ट्रवादी पक्षाचे केंद्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी ठेंगा दाखवला. आज दि. ५ जुलै रोजी दोना पावला येथील सीआयडी विभागात त्यांना जबाब नोंद करून घेण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दिवसभरात ते या ठिकाणी फिरकलेही नाहीत. त्यामुळे आता ११ जुलै रोजी चौकशीस उपस्थित राहण्यासाठी श्री. देशप्रभू यांना समन्स बजावण्यात आले आहेत.
या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या श्री. देशप्रभूंची चौकशी केली नसल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने सीआयडीच्या तपासकामावर ताशेरे ओढल्याने श्री. देशप्रभू यांची अटक अटळ झाली आहे. या प्रकरणात जामिनावर सुटलेला गीतेश नाईक याचा जामीन रद्द का करू नये, यासंबंधी कारणे दाखवा नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बजावली आहे.
आपल्याला अटक झाल्यास बेकायदा खाण व्यवसायात असलेल्या अन्य राजकीय नेत्यांची नावेही उघड करू, अशी धमकी श्री. देशप्रभूंनी दिल्याने त्यांना अटक करण्यास ‘सीआयडी’ विभाग कचरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

डोंबलाची क्रीडा स्पर्धा भरवणार?

बाबू आजगांवकरांवर ऍड. डिसोझांची टीका
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): खेळाच्या नावाने आक्रस्ताळी भाषणबाजी करणारे क्रीडामंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर हे प्रत्यक्षात मात्र खेळाडूंची घोर फसवणूक करीत आहेत, असा आरोप म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केला आहे. राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा ‘जिवबादादा केरकर क्रीडा पुरस्कार’ देण्यात त्यांना आलेले अपयश पाहता ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा काय डोंबलाची भरवणार, असा सरळ सवाल आमदार डिसोझांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट क्रीडापटू किंवा आयोजक यांना दिला जाणारा जिवबादादा केरकर पुरस्कार गेल्या दहा वर्षांत फक्त दोनदाच देण्यात आला आहे. हा पुरस्कार देण्याबाबत आपण वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवला. परंतु, त्याची दखल घेण्याचे औचित्य क्रीडाखात्याने दाखवले नाही. राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देणारा व अत्यंत प्रतिष्ठेचा असा हा पुरस्कार देण्याची कुवत नसलेल्या क्रीडामंत्र्यांच्या वाचाळ तोंडात राष्ट्रीय क्रीडास्पर्धा भरवण्याची भाषा अजिबात शोभून दिसत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
प्रत्येक वेळी क्रीडा धोरणातील गुणांचे गुणगान गाऊन नापास विद्यार्थी कसे उत्तीर्ण झाले याची कहाणीच बाबू आजगांवकर सांगत आहेत. प्रत्यक्षात राज्यात जास्तीत जास्त चांगले खेळाडू कसे तयार होतील व क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या खेळाडूला व आयोजकांना प्रतिष्ठा कशी मिळवून देता येईल याविषयी बाबूंना काहीही सोयरसुतक नसल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा जिवबादादा पुरस्कार २००६ साली देण्यात आला व त्यानंतर हा पुरस्कार सोहळाच बंद करण्यात आला. दरम्यान, या पुरस्कारासाठी असलेले नियम व मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याचे निमित्त गेली पाच वर्षे सांगितले जाते. हे नियम व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात एवढा वेळ जात असेल तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कसले डोंबलाचे करणार, अशा शब्दांत त्यांनी क्रीडामंत्र्यांचा समाचार घेतला. प्रत्यक्ष खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव देण्याचे सोडून आपल्या मर्जीतील लोकांची निवड करणे शक्य होत नसल्यानेच या पुरस्काराचे घोंगडे भिजत पडल्याचा आरोपही त्यांनी केला. या पुरस्कारासाठी एका सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. परंतु, गेले दीड वर्ष या समितीची बैठकही होऊ शकली नाही, याला काय म्हणावे? नव्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही सरकारची जबाबदारी आहे हे जरी खरे असले तरी क्रीडा क्षेत्रातील बुजुर्गांची मानहानीच सरकारकडून सुरू आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे सोडून केवळ लोकप्रियतेसाठीच क्रीडामंत्र्यांची धडपड सुरू आहे व त्यामुळे राज्याचे क्रीडाक्षेत्रातील भवितव्य धोक्यात असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. राष्ट्रीय क्रीडास्पर्धा आयोजित करण्याची भाषा करणार्‍या क्रीडा खात्याकडून प्रत्यक्ष कृती मात्र होत नसून ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर हे सरकार राज्याचे नाव धुळीस मिळवणार असल्याचा आरोप आमदार डिसोझा यांनी केला. गोवा आपल्या मुक्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना निदान यावर्षी तरी हा प्रतिष्ठित पुरस्कार पुनरुज्जीवित व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Tuesday, 5 July 2011

कॉंग्रेसला गाडा : सुभाष वेलिंगकर

डिचोलीत मातृभाषाप्रेमींचे धरणे
डिचोली दि. ४ (प्रतिनिधी): असंस्कृत, लाचार व मातेचा गळा घोटणार्‍या कॉंग्रेस नेत्यांनी गोव्याची संस्कृती, मातृभाषा व संस्कार नष्ट करण्याचे रचलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आता नवी निकराची लढाई लढण्याची तयारी प्रत्येक मातृभाषाप्रेमीने केली आहे. या देशद्रोही कॉंग्रेसला पुरते गाडून टाकण्यासाठी आता अधिक आक्रमक रूप धारण करा, असे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे
कृती योजना प्रमुख प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी डिचोली येथील मंचाच्या धरणे कार्यक्रमात केले.
आज येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सकाळी १० ते संध्या. ५ या दरम्यान इंग्रजीकरणाच्या विरोधात आयोजित धरणे कार्यक्रमात पालक व मातृभाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. इंग्रजीकरणविरोधी लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
पोर्तुगिजांच्या ओंजळीतून पाणी पिणार्‍या व परकीय बाईच्या तालावर नाचणार्‍या गोव्यातील कॉंग्रेस नेत्यांनी गोवा या आधीच विक्रीला काढला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कॉंग्रेसने आता इंग्रजीकरणाचा कट रचून मातेचा गळा घोटण्याचे दुष्कर्म केले आहे. अशा घातकी कॉंग्रेसला आता हद्दपार केल्यावाचून पर्याय नाही, असे सांगतानाच श्री. वेलिंगकर यांनी चर्चिल आलेमाव, प्रतापसिंह राणे, विश्‍वजित राणे, रवी नाईक व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर तुफान हल्ला चढवला. या नेत्यांना अद्दल घडवण्यासाठी त्यांचे सर्व कार्यक्रम उधळून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
करमलींकडून टीकास्त्र
दिल्लीत बसलेल्या परकीय बाईच्या तालावर नाचून गोव्यातील कॉंग्रेस नेते राज्य चालवत आहेत. गोमंतकीयांच्या भावनांना व मतांना कस्पटासमान लेखून ते त्यांचा घोर अपमान करत आहेत. याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून या लाचार मंत्री, आमदारांना कायमचे घरी बसवा, असे आवाहन यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी उपस्थितांना केले. आपली संस्कृती, भाषा व राष्ट्रीयत्व राखून ठेवण्यासाठी सर्व शक्तिनिशी सज्ज राहा, असेही ते म्हणाले.
दिवसभर चाललेल्या या धरणे कार्यक्रमात आमदार राजेश पाटणेकर व अनंत शेट, दादा आर्लेकर, कमलेश बांदेकर, रामचंद्र गर्दे, कांता पाटणेकर आदींनी आपले विचार व्यक्त करताना कॉंग्रेसवर तोफ डागली. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधले. सूत्रसंचालन कांता पाटणेकर यांनी केेले तर श्रीकृष्ण धोंड यांनी आभार मानले.

विष्णू वाघ यांच्याकडून आणखी तीन राजीनामे

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): उदयपूरच्या पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची केंद्रीय समिती, गोवा राजभाषा सल्लागार समिती आणि गोवा राज्य चित्रपट महोत्सव सल्लागार समिती अशा तीन समित्यांवरील सदस्यपदांचे राजीनामे आज विष्णू सूर्या वाघ यांनी संबंधित संस्थांकडे सुपूर्द केले. तिन्ही पदांच्या राजीनाम्यांसोबत श्री. वाघ यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना उद्देशून ‘मार्लीश’ भाषेत एक पत्र लिहिले असून त्यात सरकारच्या माध्यमविषयक धोरणाचा निषेध म्हणून आपण या समित्यांवरून बाजूला होत असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात श्री. वाघ यांनी माध्यम सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. दर आठवड्याला एका पदाचा राजीनामा देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पण येत्या काही दिवसांत आपण गोव्याबाहेर जाणार असल्याने पुढील आठवड्यात राजीनामा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे तीन राजीनामापत्रे एकत्रच सादर केल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. पुढचे राजीनामापत्र ‘कोंक्लीश’ भाषेतून असेल, असेही वाघ यांनी कळवले आहे.

मळा बाजार प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा

पणजी पोलिसांत तक्रार
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): उत्तर गोवा नगर विकास प्राधिकरणाकडे अडीच कोटी रुपये नसल्याची सबब पुढे करून मळा येथे बाजार संकुलाची पुनर्बांधणी आणि सौंदर्यीकरण करून ते ६० वर्षांसाठी लीझवर देण्याच्या करारात करोडो रुपयांचा घोटाळा असल्याची पोलिस तक्रार पणजी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे ६० वर्षांत गोवा सरकारला २ हजार ९९८ करोड रुपयांचा फटका बसणार असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर गोवा नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, प्राधिकरणाचे सचिव अशोक कुमार व मास्टर ऍँड मास्टर असोसिएटचे उदय मास्टर यांच्यावर गुन्हा नोंद करून चौकशी करण्याची विनंती तक्रारदाराने केली आहे.
गोवा पीपल्स फोरमने यापूर्वीच मळा बाजार प्रकल्पात महाघोटाळा असल्याचा आरोप केला होता. आता ऍड. आतीश मांद्रेकर, काशिनाथ शेटये व डॉ. केतन गोवेकर यांनी वरील तक्रार केली आहे. उत्तर गोवा नगर विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘पीपीपी’ धर्तीवर सुमारे ६० कोटी रुपये खर्चून बाजार व तलाव प्रकल्प साकारणार आहे. या ठिकाणी काय असेल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गुजरात येथील कनका इन्फ्राटेक लिमिटेडशी या संदर्भात करार करण्यात आला असून ६० वर्षांसाठी ४४ हजार ८०० चौरस मीटरची जागा लीझवर देण्यात आली आहे. यासाठी प्राधिकरण महिन्याला केवळ ५ लाख रुपये भाडे म्हणून आकारणार आहे. ही रक्कम एकदम नगण्य असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
५.९४ कोटी रुपयांच्या बोलीवर सदर कंपनीला हे कंत्राट मिळाले आहे. सध्या मळा येथे असलेल्या अर्धवट बाजार संकुलाच्या उभारणीवर राज्य सरकारने २ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यानंतर गेली सात वर्षे हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी सुमारे २.५ कोटी रुपयांची गरज आहे. एवढा निधी प्राधिकरणाकडे उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सचिव अशोक कुमार यांनी मान्य केले असल्याचे तक्रारदारांनी पुढे नमूद केले आहे. ६० वर्षाच्या लीझवर दिल्यानंतर या प्रकल्पातील केवळ १० टक्के जागा सरकारला वापरासाठी मिळणार असल्याचेही म्हटले आहे.
हा प्रचंड मोठा घोटाळा असून याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींवर भा. दं.सं. ४२०, ४०९, १२०(ब) तसेच, ७, ८, ९, १०, ११, १२, १३ या कलमांनुसार गुन्हा नोंद करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

कुड्डेगाळ खाण दुर्घटना; प्लांट इनचार्जवर गुन्हा

सावर्डे, दि. ४ (प्रतिनिधी): कुड्डेगाळ फोमेंतो खाणीवर टेलिंग पॉंईटवरील मातीचा ढिगारा कोसळून ३ कामगारांंच्या मृत्युप्रकरणी प्लांट इनचार्जवर कुडचडे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १७ जून रोजी घडलेल्या या घटनेसंबंधी प्लांट इनचार्जवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून घटनेवेळी ताबा कोणाकडे होता व यासाठी कोण जबाबदार आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भानुदास देसाई यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी खाण संचालनालय, सीआयएमआर यांच्याकडे पोलिसांनी अहवाल मागितला आहे.
वायकिंग सिक्युरिटीचे सरव्यवस्थापक आंतोन फर्नांडिस (वास्को) यांनी शनिवारी कुडचडे पोलिस स्थानकावर तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दखल घेत ३०४ (ए) खाली गुन्हा नोंदवला. १७ रोजी रात्री ८.४५ ते ९ या दरम्यान घडलेल्या या घटनेत सुरक्षारक्षक अजित नाईक, अभियंता क्वाद्रुस तिपाजी व कामगार गुलाप्पा चल्मी मातीखाली गाडले गेले होते.

राज्यात पेट्रोलसाठी रांगा

वास्को, दि. ४ (प्रतिनिधी): गोव्यातील बहुतेक भागांतील पेट्रोल पंपांवर आज (सोमवारी) पेट्रोलचा तुटवडा जाणवल्याने वाहनचालकांची बरीच तारांबळ उडाली. गेल्या शुक्रवारी येऊ घातलेले पेट्रोल साठ्याचे जहाज काही कारणांमुळे दोन दिवस उशिराने दाखल झाल्याने त्याला येथील बंदरात उभे राहण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे आज वास्को, पणजी, मडगाव, म्हापसा तसेच अन्य ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा भासला. दरम्यान, संध्याकाळी उशिरा ही समस्या दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज सकाळी गोव्याच्या बहुतेक पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा मोठा तुटवडा जाणवला. त्यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या प्रकाराबाबत अखिल गोवा पेट्रोल पंप मालक संघटनेचे अध्यक्ष परेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही नैसर्गिक कारणांमुळे पेट्रोल साठा घेऊन येणारे जहाज दोन दिवस उशिरा पोहोचले. त्यामुळे नांगरून ठेवण्यासाठी त्याला जागा मिळाली नाही. मात्र, संध्याकाळी सदर जहाजाला जागा मिळताच पेट्रोल साठा उतरवून तो गोव्यातील विविध भागांत पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.