Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 May 2010

८४ 'ज्येष्ठ' शिक्षकांना प्रतिबंधात्मक अटक

उपोषणाचा सरकारला धसका
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): वंचित निवृत्त शिक्षकांनी आपल्या मागण्यांप्रीत्यर्थ आज पणजीत काढलेल्या मोर्चावेळी पोलिसांनी तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून या शिक्षकांचा बेत फोल ठरवला. चर्चचौकावरून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी मोर्चा काढून नंतर तिथे साखळी उपोषणाला बसण्याचा त्यांचा इरादा होता. चर्चचौक ते मुख्यमंत्री निवासस्थान या भागांत १४४ कलम लागू करण्यात आले होते व त्यामुळेच ही अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.
वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सुमारे १०१६ शिक्षकांनी आपल्याला दोन वर्षांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे. ते निवृत्त झाल्यानंतर लगेच सरकारने निवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षे केल्याने दोन वर्षांच्या वेतनाला ते मुकले, अशी त्यांची तक्रार आहे. आपल्या मागण्यांबाबत त्यांनी कृती करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची नोटीस जारी केली होती पण या काळात काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात १४४ कलम लागू करण्याचा आदेश जारी केला. सकाळी १० वाजता इथे शिक्षक मोर्चा काढण्यासाठी जमले असता त्यांना तात्काळ भा.दं.सं १५१ कलमाअंतर्गत प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. सुमारे ८४ शिक्षकांना ताब्यात घेऊन दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. या परिसरात १४४ कलम ३ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर येऊन मोर्चा किंवा निषेध करण्याचे प्रकार वाढल्याने पहिल्यांदाच या परिसरात १४४ कलम लागू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. दरम्यान, वंचित निवृत्त शिक्षक मंचतर्फे मात्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. सरकारच्या चुकीमुळेच या शिक्षकांना रस्त्यावर येणे भाग पडले. बहुतांश सर्व शिक्षक हे ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांना अशा पद्धतीने अटक करण्याची ही कृती निषेधार्ह आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला.

No comments: