Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 4 September 2010

नरेश दोरादोच्या खुन्यास अटक

वास्को, दि. ०३ (प्रतिनिधी): एका महिन्यापूर्वी चिखली येथील भावाच्या फ्लॅटवर राहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय नरेश दोरादो या युवकाचा निर्घृणरित्या खून केल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी आज दुपारी तीन वाजता नोनमोंन, खारीवाडा येथे राहणारा १९ वर्षीय स्नेहल विन्सेंट डायस या युवकाला अटक केली. हा संशयित वास्कोतील दोन दुचाकी चोरी प्रकरणात सामील असल्याचे त्यांनी सांगितले.
"फेंडशिप डे'अर्थात एक ऑगस्ट रोजी रात्री वास्कोतील नरेश दोरादो या युवकाचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी उघड होताच संपूर्ण वास्को शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. चिखली येथील "शेलोम क्रेस्ट' या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर विदेशात असलेल्या भावाच्या फ्लॅटवर राहण्यासाठी गेलेला नरेश दुसऱ्या दिवशी कामावर पोचला नसल्याने त्याचे वडील तेथे गेले असता आपल्या मुलाचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याचे त्यांना दिसले. दोरादो याचा पाच सुऱ्यांचा वापर करुन खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. मानेवर, छातीत अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सतरा ठिकाणी त्याला भोसकण्यात आले होते. खुन्याने सुमारे ४५ वार केल्याचे यावेळी उघड झाले होते. चिखली येथील फ्लॅटवर खून केल्यानंतर सदर आरोपीने दोरादोची नव्याने घेतलेली "शेरवॉलेट स्पार्क' चारचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला होता, तसेच त्याने दोरादोचा मोबाईल व लॅपटॉपही लंपास केला होता. यानंतर काही दिवसांनी नरेश दोरादोची चारचाकी पोलिसांना पणजीजवळ आराडीबांध-ताळगाव येथे सापडली होती. वास्को पोलिसांनी दोरादोच्या अनेक मित्रांना तसेच इतरांना तपासासाठी बोलावून चौकशी करण्यास सुरवात केली असता, अखेरीस ते आरोपीपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरले. सदर प्रकाराबाबत अधिक माहिती देताना दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक एलन डिसा यांनी आज नरेश दोरादोच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव स्नेहल विन्सेंट डायस असल्याचे सांगून तो १९ वर्षीचा असल्याची माहिती दिली. नोनमोंन, खारीवाडा येथे राहणारा स्नेहल हा अटक करण्यापूर्वी न्यायालयीन कोठडीत सडा येथे होता असे डिसा यांनी सांगितले. सारे पुरावे मिळताच आज त्याला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. स्नेहलने आपण दोरादोचा खून केल्याची कबुली केली असल्याची माहिती डिसा यांनी दिली. सध्या सदर प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असल्याचे सांगून खुनामागचे कारण लवकरच उघड होईल,असे सांगितले. स्नेहल हा संशयित वास्कोतील दोन दुचाकी चोरी प्रकरणात गुंतला आहे. "डिओ' दुचाकी चोरीच्या प्रकरणात त्याला १६ ऑगस्ट २०१० रोजी पणजी येथे गजाआड केल्यानंतर १८ रोजी वास्को पोलिसानी अटक केली होती.
दरम्यान, वास्को पोलिसांनी आज दुपारी स्नेहलला सदर खून प्रकरणात भा.दं.सं. ४४९, ४५०, ३९७ व ३०२ कलमाखाली अटक केल्यानंतर त्यास तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठवून दिले आहे. नरेश दोरादोच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला स्नेहल हा युवक वास्कोतील बहुतेकांना सुपरिचित असलेले विन्सेंट डायस यांचा मुलगा असल्याची बातमी आज संध्याकाळी शहरात पसरताच सर्वांत हा चर्चेचा विषय बनला. स्नेहलचे वडील पूर्वी गोवा शिपर्यांडमध्ये कामाला होते व ते एका युनियनचे नेते होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-------------------------------------------------------------------
वास्को पोलिसांचे अभिनंदन
मानेवर तीन ठिकाणी, छातीत, पायात अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून १७ जाग्यांवर भोसकून व सुमारे ४५ वार करून (पाच सुऱ्यांचा वापर करून) वास्कोतील २५ वर्षीय नरेश दोरादो या युवकाचा खून केलेल्या संशयित आरोपीला आज शेवटी एका महिन्यानंतर वास्को पोलिसांनी अटक केल्याने सध्या त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नरेश दोरादोचा विदेशात असलेला भाऊ दीपक याने आपल्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आल्याने मोबाईलवर पोलिस निरीक्षक ब्राज मिनेझीस यांना संदेश पाठवून अभिनंदन केले.

नगरपालिका राखीव प्रभाग घोषणेबाबत वेळकाढूपणा

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): नगरपालिका निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली, प्रभागकक्षांबाबतच्या अधिसूचनाही जारी झाल्या पण कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणे व हेवेदावे यांमुळे प्रभाग आरक्षणाची घोषणा मात्र अजून केली गेलेली नाही असे वृत्त आहे.
पालिका निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊन दीड महिना उलटून गेलेला असून त्यानंतर प्रभागांची कक्षा अधिसूचित केली गेली पण मागास जाती, जमाती व अन्यमागासवर्गीय यांच्यासाठी कोणते प्रभाग आरक्षित असतील ते जाहीर करण्याबाबत सरकारातच एकवाक्यता नाही व त्यामुळे दी दिरंगाई केली जात आहे असे कळते.
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोडणाऱ्या मडगाव नगरपालिकेत या आरक्षणाबाबत सरकारात एकवाक्यता नाही.कॉंग्रेसमधील काही मंडळी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी अमुकच प्रभाग आरक्षित करा, असा घोशा लावत आहे. गेल्या वेळी आपणाला नको असलेल्यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव करून त्यांचा काटा काढण्यात आला होता पण तसे करूनही त्या प्रभागांतून आपला उमेदवार संबंधितांना निवडून आणता आला नव्हता तर पूर्वीच्या नगरसेवकाने उभ्या केलेल्या महिला उमेदवारालाच विजय मिळाला होता. शेवटी सत्ताधाऱ्यांनी तिला आपल्या गोटात ओढले होते पण तेथील मतदारांना ओढणे शक्य न झाल्याने तशा प्रकारचे काही प्रभाग राखीव करण्याचे राजकारण मागे सुरू होते, पण सत्ताधाऱ्यांना सर्वच ठिकाणी तसे करणे शक्य नाही व त्यामुळेच आरक्षण घेाषणेस विलंब लावला जात असल्याचे समजते.
निवडणुकीस आता अवघेच दिवस उरल्याने राखीव प्रभागांची घोषणा लवकर केल्यास इच्छुक उमेदवारांना तेथे काम करणे सोपे होणार आहे .

अटालाचा जामीन प्रकाश मैत्रला म्हापसा न्यायालयाचा समन्स

अटालाविरुद्धही वॉरंट जारी
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गोव्यात अवैधरित्या वास्तव केल्याप्रकरणी "अटाला' याला जामीन थांबलेला प्रकाश मैत्र याला उद्या सकाळी म्हापसा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश गुन्हा अन्वेषण विभागाला देण्यात आला असून न्यायालयाने बजावलेली नोटीस श्री. मैत्र याला देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
जामिनावर सुटलेला "अटाला' याला न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचेही आदेश "सीआयडी' विभागाला देण्यात आले आहेत. मात्र अद्याप तरी पोलिसांना "अटाला' याचा शोध लागलेला नाही. परंतु, पोलिसांनी "अटाला'याच्या संपर्कात असलेल्या काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जामिनावर सुटलेल्या "अटाला' याच्याशी काही व्यक्ती सतत संपर्कात होते, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
उद्या न्यायालयात मैत्र याच्या जबानीत बरेच काही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. "मैत्र' हा पोलिसांचा खास "पंच' असल्याने "अटाला' याला जामीन राहण्यासाठी मैत्र याला कोणी बोलावले होते, असाही प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

रिव्हर प्रिन्सेस निविदाप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा

परुळेकर यांची मुख्य सचिवांना नोटीस
पणजी,दि.३(प्रतिनिधी): सिकेरी येथील समुद्र किनाऱ्यावर गेली दहा वर्षे रुतून बसलेले रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्याबाबत पर्यटन खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला आहे. या निविदेत अवैध पद्धतीने जहाज हटवण्याचे कंत्राट बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे कंत्राट ताबडतोब रद्द झाले नाही तर न्यायालयात जाणे भाग पडेल, असा इशारा माजी मंत्री सुरेश परूळेकर यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना पाठवलेल्या नोटिशीत दिला आहे.
रिव्हर प्रिन्सेस हटवण्यासाठी विविध कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले प्रस्ताव राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी साटेलोटे करून सादर करण्यात आले आहे. या समितीचे एक सदस्य आनंद मडगावकर यांनी स्वतः आपला प्रस्ताव सादर करण्याची घटनाही बेकायदा असल्याचा दावा सुरेश परूळेकर यांनी या नोटिशीत केला आहे. टायटन सेल्वेज कंपनीला हे कंत्राट देण्याची शिफारस समितीने केली असली तरी त्यात मिलीभगत असल्याचा सनसनाटी आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. या कंत्राटात कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीचा अपव्यय केला जाणार असल्याने त्याबाबत वेळीच सरकारने हस्तक्षेप करून हे कंत्राट रद्द केले नाही तर याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी या नोटिशीत नमूद केले आहे. मुळात राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने या निविदा प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवली आहे. या समितीवर मुख्यमंत्री, मुख्य सचिव तथा कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस हे सदस्य असल्याने या घोटाळ्याला अप्रत्यक्ष ते सुद्धा जबाबदार ठरतील,असेही यावेळी श्री.परूळेकर यांनी म्हटले आहे. या जहाजाचे मालक मेसर्स साळगावकर खाण उद्योग कंपनीतर्फे विनाशुल्क हे जहाज हटवण्याची तयारी दर्शवली असताना कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याची सरकारने दर्शवलेली तयारी हा सरकारी निधीचा गैरवापरच ठरतो,असेही या नोटिशीत श्री.परूळेकर यांनी म्हटले आहे.

अप्पासाहेब देशपांडे यांचे पुण्यात निधन

कोल्हापूर, दि. ३ : नूतनगंधर्व या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि भजनशिरोमणी विनायकराव ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारीच होते. आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आजच पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुलगा कृष्णा, तीन मुली, सून, नातवंडं असा आप्तपरिवार आहे. नूतनगंधर्वांचा जन्म बेळगावमधील संकेश्वर येथे २८ जानेवारी १९२५ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. ग्रामोफोन ऐकून ते मोठमोठ्या गायकांची गाणी हुबेहूब म्हणत असत. अतिशय प्रतिकूल स्थितीतही त्यांनी जयपूर, आग्रा, किराना या घराण्यांची गायकी आत्मसात केली. संकेश्वर येथे त्यांनी कै. शंकरराव पेंटर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरविले. गानसम्राट अल्लादियॉं खॉंसाहेब यांचे सुपुत्र भुर्जीखॉंसाहेब यांच्याकडे गंडाबंधन करून त्यांनी शागिर्दी पत्करली. बालगंधर्वांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नाट्यसंगीताचा अभ्यास केला. भजन गाण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे ते भजनशिरोमणी म्हणून ओळखले जायचे.
खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे गाणे ऐकून त्यांना स्वत: कातलेल्या सुताचा हार आणि हरिजन साप्ताहिकाचा अंक देऊन गौरविले होते. संकेश्वराच्या शंकराचार्यांनी त्यांना "नूतनगंधर्व' ही उपाधी दिली होती.

'क्वीन बॅटन' च्या सुरक्षेसाठी एक हजार पोलिस

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संदर्भात काढण्यात येणारी ""क्वीन बॅटन रॅली'' येत्या ७ सप्टेंबर रोजी कारवार मधून गोव्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने भारतात तसेच गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी आपल्या नागरिकांना उद्देशून काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या अनुषंगाने गोवा पोलिसांनी या "रॅली'ला सुरक्षा पुरवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. सुमारे एक हजार पोलिस या रॅलीला सुरक्षा देण्यासाठी तैनात केले जाणार असल्याची माहिती सुरक्षेच्या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेले पोलिस अधीक्षक डी. के. सावंत यांनी दिली. गोव्यावर कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.
कारवार येथून दि. ७ रोजी ही रॅली पाळे कोणकोण येथे दाखव होणार आहे. याठिकाणी मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळ या रॅलीचे स्वागत करण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यानंतर काणकोण येथील ही रॅली मडगाव येथे येणार आहे. तेथून फोंडामार्गे ती जुने गोवे येथे आल्यानंतर मांडवी नदीतून ही रॅली पणजी शहरात सायंकाळी पोचणार आहे. पणजी रात्री मुख्य मशाल कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये ठेवली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हापसामार्गे रॅली पत्रादेवी येथून सावंतवाडी येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोव्यात या रॅलीच्या प्रवासात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे अधीक्षक, उपअधीक्षक तसेच एक हजार पोलिस शिपाई तैनात असणार असल्याची माहिती श्री. सावंत यांनी दिली. या "क्वीन बेटन रॅली'ची सुरुवात २९ ऑक्टोबर २००९ मध्ये लंडन येथून सुरुवात झाली आहे. ही रेली २८ राज्यातील २०० शहरात आणि हजारो शहरात फिरणार आहे. खेळाडू, अभिनेते, उद्योजक आणि सामान्य व्यक्ती असे पाच हजार पेक्षा जास्त लोक सहभागी होणार आहेत.

Friday, 3 September 2010

कळंगुट येथे बंदुकीच्या धाकाने जोडप्याला लुटले

९५ हजारांचा ऐवज व स्कूटरली पळवली
म्हापसा दि. २ (प्रतिनिधी): कळंगुट येथे काल रात्री बंदुकीचा धाक दाखवून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या एका जोडप्याला काल रात्री ९५ हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याविषयीची पोलिस तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिसांचे पथक या लुटारूंचा शोध घेत आहे. पुणे येथील प्रीतेश महिंद्रे यांनी ही तक्रार सादर केली आहे. गेल्या महिन्यातील ही अशा स्वरूपाची दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी दोघा विदेशी पर्यटकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते.
काल रात्री दीडच्या सुमारास प्रीतेश आपल्या पत्नीसह ऍक्टिवा दुचाकीवरून हॉटेलवर परतत होता. ब्रिटो रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण झाल्यानंतर "मॅगी ये' हॉटेलवर तो आपल्या पत्नीसह निघाला होते. यावेळी कळंगुट कांदोळी रस्त्यावर दोघे तरुण रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्यांनी हातवारे करून त्यांना अडवले व बंदुकीचा धाक दाखवून रोकड, मोबाईल तसेच त्यांच्याकडील दुचाकी घेऊन सदर भामट्यांनी पळ काढला. दोघेही तरुण इंग्रजीत बोलत होते, असे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
सदर स्कूटर प्रीतेश याने गोव्यात फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. पर्यटन मौसमाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे पर्यटकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याने पर्यटन खात्याने चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या लुटारूंना ताब्यात घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याविषयीचा अधिक तपास कळंगुट पोलिस करीत आहेत.

प्लॅस्टिक गोदामाला आग लागून दोन कोटींची हानी

फोंडा, दि.२ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीतील ओरिएंटल कन्टेनर प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅस्टिक उत्पादक करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आज (दि.२) सकाळी ८ च्या सुमारास आग लागल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गोदामात साठवून ठेवलेले तयार प्लॅस्टिक सामान आणि इमारतीच्या छप्पराचे मिळून सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या कंपनीच्या इमारतीच्या वरच्या दुसऱ्या मजल्यावर तयार सामान साठवून ठेवण्याचे गोदाम आहे. त्यात कंपनीत बनविलेले प्लॅस्टिक "कॅप्स' बॉक्समध्ये भरून साठवून ठेवण्यात आले होते. या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती कुंडई अग्निशामक दलाला सकाळी ८.२० वाजता मिळाली. गोदामाला लागलेली आग भीषण असल्याने फोंडा, ओल्ड गोवा, पणजी येथील अग्निशामक दलाच्या जवानांची आग विझविण्यासाठी मदत घेण्यात आली. दुपारी १.३० च्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी सामानाला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात यश प्राप्त केले. प्लॅस्टिक सामानाने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे प्लॅस्टिक सामानाबरोबर गोदामाच्या छप्पराची सुध्दा हानी झाली आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविली असून सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या विभागीय अधिकारी डी.डी. रेडकर यांनी दिली. फोंडा, पणजी, ओल्ड गोवा आणि कुंडई येथील दलाच्या पंचवीस जवानांनी पाच अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. तसेच फोंडा अग्निशामक दलाकडे असलेल्या फोंडा पालिकेच्या वीस कामगारांनी सुध्दा आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. कुंडई केंद्राचे प्रमुख श्रीपाद गावंस, फोंडा केंद्राचे अधिकारी फ्रान्सिस मेंडिस, ओल्ड गोवा केंद्राचे अधिकारी मायकल ब्रागांझा आणि पणजी येथील अधिकारी अजित कामत यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम केले. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत आगीच्या कारणाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.

दोन चोरी प्रकरणात संशयित गजाआड

चौघा सोनारांनाही अटक
वास्को, दि.२ (प्रतिनिधी): चार दिवसांपूर्वी कर्नाटक येथील आग्नेल सालगट्टी या ३२ वर्षीय इसमाला वेर्णा पोलिसांनी उतोर्डा येथील एका बंगल्यात केलेल्या चोरी प्रकरणात अटक करून त्याच्याशी चौकशी केली असता या इसमाने एकूण दोन बंगल्यात चोरी केल्याचे उघड झाले आहे.
आग्नेलने उतोर्डा येथील एस्लिंडा ब्रागांझा व फ्रान्सिस परेरा यांच्या बंगल्यातून चोरी केलेले सोन्याचे ऐवज यल्लापूर येथील चार सोनारांना विकल्याचे वेर्णा पोलिसांना समजताच त्यांनी त्या सोनारांच्या दुकानांवर छापा मारून चोरीस गेलेले एक लाख साठ हजार रुपयांचे दागिने जप्त केले असून त्या चार सोनारांना अटक करण्यात आली आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने उतोर्डा येथील फ्रांसिस परेरा यांच्या बंगल्यात (दोन लाखांची मालमत्ता) ११ मे २०१० रोजी चोरी केल्याचे उघड झाले. फ्रांसिस व एस्लिंडा यांच्या बंगल्यातून चोरी केलेले सोन्याचे ऐवज कुठे आहेत, याची चौकशी करण्यास सुरुवात केली असता, यल्लापूर, कर्नाटक येथील चार सोनारांना विकल्याचे उघड झाले. यल्लापूर येथील नारायण रिवणकर, सदानंद रायकर, प्रकाश शेट व राजेंद्र शेट यांना चोरीचा माल विकल्याचे समजताच त्यांच्या दुकानावर छापे मारले असता चोरीला गेलेल्या दोन सोन्याच्या साखळ्या, एक जोड कर्णफुले व वितळविण्यात आलेले सोने मिळून एक लाख साठ हजारांची मालमत्ता सापडल्याची माहिती त्यांनी दिली.दक्षिण गोव्याचे अधीक्षक एलन डिसा यांच्या मार्गदर्शनामुळेच सदर दोन्ही प्रकरणातील आग्नेल या संशयिताला गजाआड करण्यास आम्हाला मोठी मदत मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले.

वास्कोत दोन लाखांचे मोबाईल लंपास

वास्को, दि. २ (प्रतिनिधी): येथील सेंट अँन्ड्रू चर्चसमोर राहणाऱ्या मोदाराम पुरोहित यांच्या फ्लॅटमध्ये काल रात्री २.३० ते पहाटे ५.३० यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी घुसून तेथील १ लाख ९० हजार रुपयांचे सुमारे १०० मोबाईल लंपास केले.
पुरोहित यांची वास्कोत मोबाइल विकण्याची रामदेव इलेक्ट्रॉनिक्स या नावाची दोन दुकाने आहेत. सदर मोबाईल त्या दुकानांत विकण्यासाठी त्यांनी आणून ठेवले होते. फ्लॅटवर चोरी झाल्याची तक्रार त्यांनी वास्को पोलिसांत नोंदवली. अज्ञात चोरट्यांनी पुरोहित परिवार झोपेत असल्याची संधी साधून ही चोरी केली. सेंट अँन्ड्रु चर्च समोर असलेल्या "सनफ्लावर' इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या पुरोहित याच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी "बाल्कनीतून' प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. "बाल्कनीचा' दरवाजा त्यांनी व्हेंटिलेटरमधून हात घालून उघडल्याचे तपासात दिसून आले. "नोकिया', "स्पाईस' व "मायक्रोमेक्स' या कंपन्यांचे हे मोबाईल होते. पुरोहित यांनी दोन बॅगमध्ये ते ठेवले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक वैभव नाईक यांनी
श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा केला. याप्रकरणी ४५७ व ३८० कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.