Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 25 April 2011

बुडणारी मुलगी वाचली; वाचवणारा तरुण बुडाला

वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): बुडत असलेल्या एका १२ वर्षीय मुलीला वाचवणारा तरुणच समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना आज २४ रोजी वास्कोत घडली. सदर मुलगी समुद्रात बुडत असल्याचे नजरेस येताच तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना कुठ्ठाळी येथील सद्दाम हुसेन (२२) हा युवक सडा येथील समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगोरहील, वास्को येथील एक कुटुंब आज ‘जपानीझ गार्डन’खाली असलेल्या समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले असता दुपारी २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. सद्दाम हुसेन ‘जपानीझ गार्डन’च्या जवळ असलेल्या ‘एम.पी.टी.’ च्या मलनिस्सारण प्रकल्पात काम करत असून आज दुपारी तो आपल्या अन्य तीन मित्रांबरोबर येथील समुद्रकिनार्‍यावर गेला होता. यावेळी त्याला एक मुलगी समुद्रात बुडत असल्याचे दिसले. त्याने लगेचच तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. समुद्रातील एका खडकावर चढून त्याने सदर मुलीला हात देऊन जवळ आणले. मात्र यावेळी त्याचाच तोल जाऊन तो पाण्यात पडला. नंतर येथे असलेल्या इतर लोकांनी सदर मुलीला समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन सद्दामचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. नंतर पोलिसांनी तटरक्षक दलाला तसेच अग्निशामक दलालाही पाचारण केले. दोन्ही पथकांनी त्याचा शोध घेतला. परंतु, उशिरा रात्रीपर्यंत तो सापडू शकला नव्हता. मुरगाव पोलिस स्थानकाचे हवालदार यशवंत मलिक्कार्जुन यांनी घटनेचा पंचनामा केला. निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

बेशिस्त खनिजवाहतूक

सांगे, केपेसाठी विशेष आदेश जारी
कुडचडे, दि. २४ (प्रतिनिधी): सांगे, केपे तालुक्यांत बेकायदेशीरपणे वाढत असलेल्या खाणींवर व बेशिस्त मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनी बारा मुद्दे असलेला आदेश जारी केला आहे. याचा अवधी येत्या ३ महिन्यांसाठी आहे. एका बाजूने जनतेकडून सुरू असलेला संघर्ष व वाढत्या मालवाहतुकीस विरोध करण्यात येत असताना संबंधित खाते या आदेशाकडे लक्ष पुरविणार की, सदर आदेश धाब्यावर बसवणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (सविस्तर वृत्त पान ९ वर)

दीनानाथांच्या पुण्यतिथीचे कला अकादमीला विस्मरण

पणजी, दि. २४ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोमंतकाच्या मातीतील अद्वितीय कलाकार दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीचा खुद्द गोमंतकीयांना विसर पडल्याचे चित्र आज दिसून आले. कला अकादमीतील मा. दीनानाथांच्या प्रतिमेला साधे पुष्प वाहण्याचेही औचित्य आज दाखवले गेले नाही.
केवळ गोव्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात सुप्रसिद्ध असलेल्या कला अकादमीतील नाट्यगृहाचे दीनानाथ मंगेशकर कलामंदिर असे नामकरण झालेले असून त्यांचा मोठा फोटोही या नाट्यगृहाच्या बाहेर लावलेला आहे. याच नाट्यगृहात आज एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या या कार्यक्रमात कला अकादमीचे अध्यक्ष प्रतापसिंग राणे, उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, कार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद काळे, तसेच कलाक्षेत्रातील अनेक मातबर मंडळींची उपस्थिती असूनही या महान व्यक्तीच्या पुण्यतिथीची कुणालाही आठवण झाली नाही. किंबहुना त्यांच्या फोटोला एखादे पुष्पही कुणी वाहिले नाही.
ज्या कला अकादमीत जागतिक रंगभूमी दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो त्याच कला अकादमीला रंगभूमीवरच्या या अद्वितीय कलाकाराचे विस्मरण व्हावे हे मोठेच दुर्दैव असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

रंगांत रंगलेले नीळकंठ खलप

नाटकाच्या मोठमोठ्या पडद्यांवर विविध रंगाच्या माध्यमातून जिवंत देखावे उभे करणारे कासारपाल येथील नीळकंठ कृष्णा खलप म्हणजे गोव्यातील हुन्नरी कलाकारांच्या पुष्पमालेतील एक रंगबिरंगी पुष्पच होय! गोव्यातील अनेक कलाकार जगाच्या नकाशावर झळकले. त्यांना सरकार व अन्य संस्थांकडून अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. परंतु, या ‘पडद्या’आडच्या कलाकाराने प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणेच पसंत केले. कोणताही पुरस्कार मिळावा म्हणून त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. आपल्या गुरूंचा आशीर्वाद व उपदेशानुसार कला ही साधना एवढेच तत्त्व मानून हा कलाकार सतत कार्यरत आहे.
कलाकार जन्मावा लागतो हे जरी खरे असले तरी जन्माला आल्यानंतर त्याच्यावर गुरूंकडून होणारे संस्कारच त्याला योग्य दिशेने नेऊ शकतात. गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच तो आपल्या कलेचा खर्‍या अर्थाने आविष्कार करू शकतो. डिचोली तालुक्यातील कासारपाल येथील नीळकंठ खलप यांच्या मस्तकावर बालपणापासूनच त्यांचे गुरू सोमनाथ नाईक यांनी हात ठेवला व त्या बळावरच आज ते चित्रकलेच्या क्षेत्रात बहरत आहे. या कलेची उपासना करत असतानाच ते आपल्या कुटुंबासमवेत जीवनाचा आनंद घेत आहेत.
या कलासाधनेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, माझे गुरू सोमनाथ नाईक यांच्या कृपेनेच आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. ७ वी पर्यंत शालेय शिक्षण घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मी जाऊ लागलो. त्यांच्या सावलीत माझ्यातील कलाकार फुलू लागला. गोमंतकातील महान चित्रकार म्हणून गुरूजींची ख्याती होती. गोव्यातील जवळजवळ सर्वच रंगमंचांवर त्यांनी रंगवलेले पडदे लागतात. केवळ गोव्यातच नव्हे तर तियात्राच्या माध्यमातून त्यांनी रंगवलेले पडदे हे परदेशातही पोहोचले असून अशा महान कलाकाराच्या हाताखाली दहा ते पंधरा वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. गुरूजींच्या घरात मला त्या कुटुंबातील एकसदस्य असल्यासारखी वागणूक मला मिळालेली आहे. गुरुजींच्या निधनानंतर त्यांचे पुत्र किशोर नाईक यांचेही मोठे सहकार्य लाभले. ते स्वतःही कलाकार असून पडदे रंगवण्याच्या कामात तेही मदत करत असतात. गुरूजींची शाळा रंगाविना रिकामी राहू नये यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आज या शाळेत भरपूर कामे असून काम करणारेच कमी पडत आहेत, असेही ते म्हणाले.
वयाच्या बारा ते तेराव्या वर्षी हातात रंग घेणारे नीळकंठ आता रंगाच्या आधारेच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत असून त्यांनी आपल्या जुन्या घराची पुनर्बांधणीही केलेली आहे. नाटक, तियात्र आणि इतर कामांसाठी लागणारे पडदे ते रंगवत असतात. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक अशा आशयांवरचे विविध देखावे ते पडद्यावर साकारत असतात. केवळ पडदे रंगवणेच नव्हे, तर विविध नाटकांत रंगभूषाकार म्हणून काम करणे, कॅनव्हासवर चित्रे काढणे अशा अनेक प्रकारे ते आपली कला पेश करत असतात.
आजही गुरूजींच्या शाळेत कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात असतो. सतत काम करणे हीच गुरूंवरची श्रद्धा मानून सकाळी गुरूजींच्या तसबिरीला प्रणाम करून ते आपल्या कामाला सुरुवात करतात. गुरूजींच्या कृपेमुळेच आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी आपण रंग लावला त्या त्या ठिकाणी आपल्याला दाद मिळाली, अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात. जीवन जगण्यासाठी पैसा जरी महत्त्वाचा असला तरी पैशांपेक्षाही मोठी गोष्ट कलेतून मिळणारा आनंद ही आहे आणि रसिकांची दाद हेच आपले सर्वांत मोठे धन असेही ते प्रांजळपणे सांगतात. किशोर नाईक यांचा रंगभूषाकार म्हणून स्वतंत्र व्यवसाय असतानाही गुरूजींचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांचे मोठे सहकार्य लाभते हेच मोठे म्हणायला हवे. आपल्या कलेच्या दुनियेत आपण आनंदी असून गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हेच आपले खरे बळ असल्याने जीवनात कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नाही, असेही ते सांगतात. आपल्या गुरूच्या कृपाशीर्वादाने रंगांच्या सागरात मनसोक्त पोहणार्‍या या कलाकाराला आमच्या शुभेच्छा!

Sunday, 24 April 2011

कावरेवासीयांवर पोलिसांचा लाठीमार

९५ जणांना अटक, महिलांवर अत्याचाराचा आरोप
कुडचडे, दि. २३ (प्रतिनिधी): सततच्या बेफाम खनिज वाहतुकीमुळे खवळलेल्या कावरेवासीयांना आज रुद्रावतार धारण करून सकाळी आठच्या सुमारास खनिज वाहतूक करणारे ट्रक रोखून धरले. यास्तव केपे पोलिसांनी ९५ आंदोलकांना अटक केली. यावेळी पोलिसांनी आपणावर अमानुष लाठीमार केला आणि महिलांवर अत्याचार केले, असा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र कावरेवासीयांनी कायदा हाती घेतल्यामुळे आम्हाला कारवाई करणे भाग पडले, असे स्पष्टीकरण केपे पोलिसांनी दिले आहे. उग्र आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांनी याप्रसंगी पोलिसांच्या दंडेलशाहीच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला.
कावरे येथून करण्यात येणारी खनिज मालवाहतूक आज (दि.२३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी अडवल्याने केपे पोलिसांनी सुमारे ९५ ग्रामस्थांना अटक केली. मात्र यावेळी पोलिसांनी लाठीमार करत महिलांवरही अत्याचार केल्याचा आरोप अटक केलेल्या ग्रामस्थांनी केला. यावेळी जबरदस्तीने आम्हांला पोलिस वाहनांत पोलिसांनी कोंडल्याचा आरोप आंदोलकांनी केला. कावरे भागातून फोमेंतो, दिनार तारकर, मेग्ना मिनरल्स, साळगावकर, आदी कंपन्यांचे खाणवाहू ट्रक सुमारे ३०० ग्रामस्थांनी अडवून ठेवले. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा खाणवाहतूक करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळून लावत सर्व खाणवाहू ट्रक पुन्हा खाणींवर पाठवण्यात आले होते. काल गुडफ्रायडेची सुट्टी असल्याने हे प्रकरण थंडावले होते. मात्र आज पुन्हा खाणवाहतूक सुरू झाल्याने ती ग्रामस्थांनी अडवली.
यावेळी मात्र पोलिसांनी ग्रामस्थांकडे दुर्लक्ष करत त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यातून महिलाही सुटल्या नाही. यावेळी अनेक महिलांची मंगळसूत्रेही पळवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मात्र या आरोपाचा इन्कार करत केपे पोलिस स्थानकाचे उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी उपजिल्हाधिकारी तसेच पोलिसांवर या आंदोलकांनी हल्ला चढवल्याने पोलिसांना ही कारवाई करणे भाग पडल्याचे सांगितले.
यापूर्वी अनेकवेळा ग्रामस्थांना समज देऊनही आज रस्ता अडवत आपल्यासह पोलिस तसेच पत्रकारांना शिविगाळ करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करणे भाग पडले असे केप्याचे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले.
सुमारे ९५ ग्रामस्थांना पोलिस स्थानकात आणताच उर्वरित नागरिकांनी पोलिस स्थानकाबाहेर जमत या घटनेचा निषेध केला. यावेळी पोलिस यंत्रणा कंत्राटदाराच्या हातच्या बाहुल्या बनल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आदिवासी बचाव समितीतर्फे ट्रबल कायद्यानुसार सुभाष फळदेसाई, अशोक नाईक, जे. एन. नेवगी, अजित काडणेकर, अग्रवाल या कंत्राटदारांवर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते अनुसूचित जमाती व इतर मागास जमातीचे असल्याने सरकार त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात येत आहे. प्रदूषणामुळे शेती, कुळागरे उत्पादन पूर्णपणे नष्ट झाल्याने गावावर उपासमारीची वेळ उद्भवली आहे. खाणवाहतूक पूर्णपणे बंद होईपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे येथील आंदोलनकर्ते सत्यवान वेळीप यांनी सांगितले. दरम्यान अनेक बिगर सरकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनाही अटक करण्यात आलेले आहे.
अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर, भाजपचे दक्षिण गोवा सचिव ऍड. नरेंद्र सावईकर, केपेचे माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी भेट घेतली. रात्री उशिरा आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आले.
यादरम्यान, केपे बाजारातून सुरेंद्र वेळीप, रमाकांत वेळीप, शांताराम वेळीप, रत्नाकर वेळीप, रामचंद्र गावकर, संदीप वेळीप, प्रशांत वेळीप, श्याम वेळीप, अनंत वेळीप, निशिता वेळीप, चंद्रकला वेळीप, प्राची वेळीप, राजेश वेळीप, प्रकाश वेळीप, दिलीप वेळीप यांच्यासह अनेक नागरिकांनी मोर्चा काढत या घटनेचा निषेध केला.
-----------------------------------------------------------
पीपल्स फोरमचा आंदोलकांना पाठिंबा
खनिज वाहतुकीचे दुष्परिणाम भोगणार्‍यांच्या हालअपेष्टा दूर करण्याऐवजी त्यांनाच तुरुंगात डांबणारे सरकार किती उलट्या काळजाचे आहे याचा पुरावा आहे, अशी प्रतिक्रिया गोवा पीपल्स फोरमच्या वतीने ऍड. सतीश सोनक यांनी व्यक्त केली आहे. कावरे आदिवासी व ग्रामस्थ हे हौस म्हणून रास्ता रोको करत नसून स्थानिकांचे आरोग्य व पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न आहे. या लोकलढ्यास फोरमने पाठिंबा जाहीर करत शासन आम आदमीकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत व चीड व्यक्त केली आहे. जनता जेव्हा शांततापूर्ण व कायदेशीर मार्गांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत असूनही अयशस्वी ठरते तेव्हा नाइलाजाने रस्त्यावर उतरते. गोवा सरकारने सामान्यांना कायदा हाती घेण्याशिवाय पर्याय ठेवला नसल्याने सारा दोष सरकारचाच असल्याची टीका फोरमने केली आहे.

१०० पोलिसांच्या शोधानंतरही मायकल फर्नांडिस अद्याप फरारी

पणजी, दि.२३ (प्रतिनिधी): अनेक गुन्हे प्रकरणात विविध राज्यातील पोलिसांना हवा असलेला आणि काल दि.२२ रोजी पोलिसांना ‘चॅलेंज’ देऊन पुन्हा पसार झालेला कुप्रसिद्ध गुन्हेगार मायकल फर्नांडिस आज १०० पोलिसांनी दिवसभर अथक प्रयत्न करूनही सापडला नाही. त्यामुळे राज्य गृहखात्याचे सर्वत्र हसे होत आहे.
या बाबत सविस्तर हकिगत अशी की गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात पोलिसांना विविध गुन्ह्यांसाठी हवा असलेला गुंड मायकल फर्नांडिस हा काल दि.२२ रोजी डिचोली पोलिसांच्या हातावर तुरी देत निसटला. बांबोळी येथील मनोरुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता तो पोलिसांची नजर चुकवत पसार झाला. त्याच्याबरोबरच पळालेल्या दुसरा गुन्हेगार दीपक केरकर हा पोलिसांना कालच सापडला. मात्र काल व आज १०० पोलिसांनी अथक प्रयत्न करूनही मायकल सापडला नाही. महत्त्वाचे म्हणजे त्याने पकडला गेल्यानंतर लवकरच आपण पळून जाणार असे ‘चॅलेंज’ पोलिसांना दिले होते. आपले ते चॅलेंज खरे करून दाखवल्यामुळे गोवा राज्याच्या गृहखात्याचे वाभाडे सर्वत्र निघत आहे. राज्यात अनेक चोर्‍या व खुनासारखे प्रकार घडत असतानाच मायकल खुद्द गृहखात्याला ‘चॅलेंज’ देऊन फरार झाल्यामुळे गृहखात्याची सर्वत्र नाचक्की होत आहे. ही नाचक्की आणखी होऊ नये यासाठी १०० हवालदार कालपासून मायकलच्या मागावर आहेत. मात्र पोलिसांनी भरपूर प्रयत्न करूनही मायकल आज रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता.
याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी डिचोली पोलिस स्थानकाचे मुख्य हवालदार बी. ए. बोर्डेकर, हवालदार सुहास पाडेलकर, सिद्धार्थ पत्रे व कालिदास पास्ते यांना काल रात्री ९ वाजेपर्यंत मायकलला शोधून आणण्यास फर्मावले व काल उशिरापर्यंत मायकल न सापडल्यामुळे वरील चौघांनाही निलंबित केले. आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली आज उशिरापर्यंत मायकलचा कसून शोध घेण्यात येत होता. मात्र मायकल सापडला नव्हता.

‘अर्भक’प्रकरणी हलगर्जीपणामुळे एक डॉक्टर निलंबित

पणजी, दि.२३ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती विभागांत घडलेल्या प्रकाराबद्दल प्रथमदर्शनी हलगर्जीपणा झाल्याच्या कारणामुळे या विभागातील डॉ. विनिता पॅरेरा यांना निलंबित करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यानिर्णयाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी गोमेकॉच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. प्राप्त माहितीनुसार आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने त्यांच्या आदेशावरूनच ही कारवाई झाल्याचे लक्षात आल्याचे समजते.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) चार दिवसांपूर्वी घडलेल्या प्रसूती शस्त्रक्रियेवेळी अर्भकाची बोटे कापण्याचे व दोन अर्भकांना जखमी करण्याचे जे गंभीर प्रकरण घडले आहे त्यामुळे गोमेकॉतील डॉक्टरांच्या कामगिरीबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीरपणे चौकशी सुरू झाली आहे. अशी माहिती गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्येकर यांनी आज दि.२३ रोजी दिली. या प्रकरणी दोषी आढळणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचेही डॉ. कुकळ्येकर यांनी सांगितले.
दि.२० एप्रिल रोजी पहाटे ३, ५ व नंतर सकाळी ११ या वेळेत तीन महिलांवर प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया नवख्या डॉक्टरने केल्याची चर्चा आहे. या शस्त्रक्रियेवेळी तीनही अर्भकांना जखम झाली. यात एकाचा गाल कापला, दुसर्‍याची पाठ कापली तिसर्‍याची तर चक्क उजव्या हाताची तीन बोटेच छाटली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली. हे प्रकरण दडपण्याचा वरिष्ठ पातळीवरून भरपूर प्रयत्न झाला. मात्र हे प्रकरण बाहेर आलेच. त्यानंतर या प्रकरणी तपासाची चक्रे जोरदारपणे फिरू लागली. गोमेकॉचे अधीक्षक डॉ. कुंकळ्येकर यांनी प्रसूती विभागाच्या शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. सविता चंद्रा यांना ४८ तासात या प्रकरणी अहवाल देण्याचा आदेश दिला. या दरम्यान गाल व पाठ कापलेल्या अर्भकाच्या पालकांनी आपली तक्रार मागे घेतली मात्र बोटे कापण्यासारखा गंभीर प्रकार घडल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
आज दि.२३ रोजी डॉ. सविता चंद्रा यांनी डॉ. कुंकळयेकर यांना या तिन्ही प्रकरणाची सर्व कागदपत्रे तथा अहवाल सुपूर्त केला असून डॉ. राजन कुंकळ्येकर हे यावर अभ्यास करून हा अहवाल गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांना सुपूर्त करणार आहेत. या प्रकरणामुळे गोमेकॉच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून वरिष्ठ डॉक्टर फक्त बड्या रकमेचे पगार घेण्यासाठी येतात आणि कनिष्ठांना अवघड शस्त्रक्रिया कराव्या लागतात. असा प्रकार येथे घडत असल्याचे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची नोंद आता चार दिवसानंतर आरोग्य खात्याच्या वरिष्ठांनी घेतली असून आरोग्य सचिवांनी या प्रकरणी निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास सदर डॉक्टरवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे कळते.
डॉक्टर निलंबित

...अन्यथा कालव्याचे पाणी रोखू

• तिलारी संघर्ष समितीचा जलसमाधीचाही इशारा
• सरकारला नोकर्‍यांसाठी १ मेपर्यंत मुदत

पणजी, दि.२३ (प्रतिनिधी): गोवा व महाराष्ट्र सरकारने १९९० साली केलेल्या कराराप्रमाणे ७३ टक्के तिलारी धरणग्रस्तांना गोवा सरकारने १ मेपूर्वी (सुमारे ४४० जणांना) नोकर्‍या द्याव्यात. अन्यथा दि. १ मे या महाराष्ट्र राज्य दिनापासून गोव्यात येणार्‍या तिलारीच्या डाव्या कालव्याचे पाणी रोखून धरण्यात येईल. हे पाणी रोखण्यापासून आम्हांला परावृत्त करण्याचा प्रयत्न झाल्यास तिलारीच्या पाण्यातच संघर्ष समितीचे सुमारे २०० सदस्य जलसमाधी घेतील. असा खणखणीत इशारा तिलारी धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या सदस्यांनी आज पणजी येथील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
या बाबत बोलताना समितीचे सचिव संजय नाईक म्हणाले की, गोवा व महाराष्ट्र राज्य यांनी सयुंक्तपणे तिलारी धरणप्रकल्प उभारला असून यातील ७३.३० टक्के पाणी गोवा राज्याला मिळणार आहे. १९९० साली केलेल्या करारानुसार प्रकल्पग्रस्तातील ७३.३० टक्के बेरोजगारांना गोवा सरकारने नोकर्‍या देणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारने १८५ जणांना नोकर्‍या दिल्या आहेत. मात्र वारंवार मागणी करुनही गोवा सरकार नोकर्‍या देण्यास टाळाटाळ करत आहे. हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. गोवा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जलसिंचन मंत्री तसेच संबंधित आमदार यांना नव्याने ‘निवेदन’ देण्यात आले असून त्यांना १ मे ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्या दिवसापर्यंत नोकर्‍या देण्याबाबत हालचाल न झाल्यास संघर्ष अटळ आहे असे संजय नाईक यांनी सांगितले.
या प्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष शशिकांत गवस म्हणाले की, तिलारी प्रकल्पामुळे शिरंगे, पाटये, आयनोडे, सरगवे, पाल, भरडोंगर तेरवण मेढे या गावांतील १,२३६ कुटुंबे विस्थापित झाली आहेत. या सर्वांना फक्त ३०० चौरस मीटर जागा देण्यात आली. शेती - बागायतींच्या बदल्यात सरकारी किंमत देण्यात आली. त्यामुळे रोजगारांचे कोणतेही साधन विस्थापितांकडे नाही व त्यामुळे आमची उपासमार होत असून गेली २० वर्षे प्रकल्पग्रस्त हा संघर्ष करत आहेत. त्यामुळे गोवा सरकारने त्वरित तिलारी प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या द्याव्यात अशी मागणी श्री. गावस यांनी केली आहे. या वेळी समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावस, सदस्य भूषण तिळवे, गुरुदास देसाई, संजय गावस आदी उपस्थित होते.

आश्‍वासनांत शतकाकडे कूच, पूर्ततेत ‘क्लिनबोल्ड’!

• २००७ पासून सरकारची विधानसभेत ९९ आश्‍वासने
• अनेकांची पूर्तताच नाही, कित्येक प्रलंबित

पणजी,दि.२३ (प्रतिनिधी): विधानसभा अधिवेशन काळात सरकारकडून विविध प्रश्‍नी आश्‍वासनांची खैरात केली जाते. परंतु ही आश्‍वासने कितपत पूर्ण केली जातात याचा मात्र काहीच थांगपत्ता सामान्य जनतेला लागत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी एका अतारांकित प्रश्‍नाद्वारे या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. गेल्या २००७ पासून आत्तापर्यंत विविध मंत्र्यांनी एकूण ९९ आश्‍वासने सभागृहात दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘उदंड झाली आश्‍वासने, पूर्तता मात्र शून्य‘ अशीच काहीशी परिस्थिती त्यांची बनली आहे.
मुख्यमंत्री तथा विधिमंडळ व्यवहार तसेच कायदामंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या माहितीत २८ विविध खात्यांबाबत एकूण ९९ आश्‍वासने सभागृहात दिल्याची नोंद करण्यात आली आहे. या आश्‍वासनांच्या पूर्ततेचा अहवालच या उत्तरात त्यांनी दिला आहे. याप्रकरणी उघड झालेल्या माहितीनुसार बहुतांश आश्‍वासनांबाबत सरकारकडून फक्त कागदोपत्री व्यवहार झाल्याचेच दिसून येते. यातील काही महत्त्वाची आश्‍वासने म्हणजे गोवा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यास राज्यात सर्व थरांतून विरोध करण्यात आला होता. वाढत्या विरोधाची दखल घेऊन हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला व त्यासंबंधी ३ डिसेंबर २००८ रोजी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाला पत्रही पाठवले. या पत्रावर केंद्राकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाने दिली आहे. मांडवी नदीतून कॅसिनो जहाजांना खोल समुद्रात पाठवण्याबाबतच्या आश्‍वासनांचीही पूर्तता झाली नाही. सरकारकडून वेळोवेळी कॅसिनो मालकांना त्यासंबंधी कळवूनही अद्याप त्याची अंमलबजावणी होत नाही, असेच उत्तर बंदर कप्तान खात्याने दिले आहे. ‘एनआयटी’ व ‘बीट्स’ गोवा संस्थेत ५० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याबाबत दिलेल्या आश्‍वासनावरही अद्याप तोडगा निघालेला नाही. याप्रकरणी संबंधित संस्थांकडे बोलणी चालू आहे, असे तांत्रिक शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. गृह निर्माण मंडळात रेईश मागूश येथील जागा विक्री प्रकरणातील घोटाळ्याचा प्रश्‍न आमदार रमेश तवडकर यांनी विचारला होता. या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या माजीमंत्री मिकी पाशेको यांनी दिलेल्या आश्‍वासनाचाही अद्याप निकाल लागलेला नसून ही चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे. सायबर एज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना संगणक प्रदान करण्याबाबतचे आश्‍वासनही अजून प्रलंबित असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून सरकारने विद्यार्थ्यांची बोळवण केली आहे.
या व्यतिरिक्त इतर अनेक आश्‍वासनांची सरकारने पूर्तता केल्याचा दावा केला आहे तर इतर आश्‍वासनांबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही सरकारने कळवले आहे.

विक्रमादित्य सचिनचा आज वाढदिवस

मुंबई,दि.२३ : क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारातील जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर करणारा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा उद्या रविवारी वाढदिवस असून, तो ३८ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
सचिनचे वय जसजसे वाढत गेले तसतसा त्याचा खेळ आणखी बहरत गेल्याचा अनुभव सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी गेल्या काही वर्षांपासून घेत आहेत. यावर्षी तर सचिनचे विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले असल्याने यावर्षी त्याच्या वाढदिवसाला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. विश्‍वचषक जिंकल्याचा उत्साह अजूनही कायम असल्याने सचिनच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सचिनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी अनेक बेत आखले असले, तरी सचिनला मात्र आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसमवेत घरीच साजरा करायला आवडतो. दौर्‍यासाठी परदेशात नसला तर सचिन आपली पत्नी अंजली आणि दोन मुलांसोबत वाढदिवस साजरा करतो. मात्र, उद्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा हैदराबाद येथे डेक्कन चार्जर्सविरुद्ध सामना असल्याने सचिनला कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करायला वेळ मिळणे जरा अवघडच दिसते.
सचिनकडून अपंग सैनिकांची विचारपूस
आयपीएल स्पर्धेत व्यस्त असल्याने व्यक्तिगत रीत्या भेटणे शक्य नसले तरी सचिनने आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्हिडीओ कॉन्ङ्गरन्सिंगच्या माध्यमातून पुण्यात उपचार घेत असलेल्या अपंग सैनिकांशी संवाद साधला. पूर्णपणे व्हीलचेअरवर अवलंबून असलेले सुमारे ८० सैनिक खडकी येथे वैद्यकीय उपचार घेत आहेत. सचिनने या सर्व सैनिकांना अभिवादन केले. ‘‘आपली जबाबदारी ओळखून शेवटपर्यंत संघर्ष करणे मी तुमच्यापासून शिकलो,’’ असे सचिनने या सैनिकांना सांगितले. यावेळी सचिनने आपल्या वाढदिवसाचा केकही कापला. यानंतर जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर तुमच्या भेटीला येईन, असे आश्‍वासनही मास्टर ब्लास्टरने यावेळी या अपंग सैनिकांना दिले.