Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 25 October 2010

फातोर्डा स्टेडियमवर पाकिटमारांची चांदी!

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) - भारत -ऑस्ट्रलियामधील एक दिवसीय झटपट लढतीतील येथील फातोर्डा नेहरू स्टेडियमवरील सामना जरी काल पडलेल्या पावसामुळे होऊ शकलेला नसला तरी सामना होईल या आशेने आलेल्या अनेकांना आपले लक्ष्य बनविण्याचे काम मात्र तेथे त्याच हेतूने आलेल्या पाकिटमारांच्या टोळीने केले. मडगाव पोलिसात या प्रकरणी १५ ते १६ तक्रारी नोंदल्या गेलेल्या असल्या तरी नोंद न झालेल्यांचे प्रमाण कितीतरी पटीने असावे असा कयास आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्यात भ्रमणध्वनींची संख्या अधिक आहे. सुमारे १४ भ्रमणध्वनी चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंदल्या गेलेल्या आहेत, त्यात एका डॉक्टराने दोन दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या भ्रमणध्वनीचा समावेश असून त्याची किंमत १५ हजार रु. आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅंटीनमध्ये गेल्यावेळी कुणीतरी त्याच्यावर कलंडल्यासारखे झाले व नंतर काही वेळाने भ्रमणध्वनी नसल्याचे लक्षात आले.
दवर्ली येथील प्रसाद नाईक याचा असाच २८ हजारांचा मोबाईल तर दिकरपाली येथील डी.जी.नाईक या बांधकाम ठेकेदाराचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, वाहतूक परवाना व अंगठीसाठी घेतलेले सुवर्ण नाणे व २८ हजार रोकड असलेले पाकीट व मोबाईल चोरीस गेला आहे. त्याशिवाय असंख्यांची पाकिटे पळविली गेलेली असून पोलिसांचा ससेमिरा नको, म्हणून ते पोेलिस तक्रारीच्या फंदांत पडलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय सामन्याच्यावेळी सर्रास असे प्रकार चालतात व फातोर्डा येथील या पूर्वींच्या सामन्यांच्या वेळीही सर्रास असे प्रकार झाले होते. परराज्यांतून या मोहिमेवर खास टोळ्या येतात व काम आटोपून लगेच पसार होतात.
पण यंदाचे आश्र्चर्य म्हणजे बहुतेक सर्व चोऱ्या स्टेडियममध्ये झालेल्या आहेत व त्यावरून चोरटे वा पाकिटमार तिकिटे काढून आतमध्ये गेले होत, हेच सिद्ध होते.
सर्व पोलिस बंदोबस्त स्टेडियमबाहेर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी असेल हे हेरून चोरट्यांनी नवी शक्कल लढविली व आतमध्ये जेथे जास्त झुंबड उडते त्या जागा हेरून आपले काम साधले असे दिसते. भारत ऑस्ट्रेलियामधील लढत पाहण्यासाठी आलेल्यांवर मात्र सामना नाही तो नाही उलट आर्थिक फटका बसला, असे म्हणण्याची पाळी आली.

सुरांवर केले ते निस्सीम प्रेम व भक्ती... सुरांवर केले ते निस्सीम प्रेम व भक्ती...

पं.तुळशीदास बोरकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) - आपण फार काही केले नाही, केली ती सुरांवर भक्ती, वेड्यासारखे त्यांच्यावर प्रेम केले व त्यांच्या मागे धावत राहिलो पण त्याचे मोल आपणास आज कळले, असे भावोद्गार ज्येष्ठ हार्मोनियम कलाकार पं. तुळशीदास बोरकर यांनी आज येथे त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना काढले.
यावेळी अमृतमहोत्सव सत्कार समितीतर्फे पं. बोरकर यांचा मुख्यमंत्री दिगंबर कामत हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व समई अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पं. बोरकर व मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सत्कार समितीचे अध्यक्ष व समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, नाट्यकर्मी भिकू पै आंगले, पं. रशिद खॉं उपस्थित होते. पं. बोरकर यांचा साडेसात वर्षें वयाचा शिष्य उन्मेश खैरे याचाही मुख्यमंत्र्यांहस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना पं. बोरकर म्हणाले की, आईने दिलेली शिक्षा ही सर्वांत मोठी होती, हेही आजच कळले, आईचा व माता नवदुर्गेचा आशीर्वाद हाच आपणास सर्वश्रेष्ठ ठरला त्या बळावरच आज आपण उभा आहे. त्याकाळी पैशाला महत्त्व नव्हते, कलेची हेटाळणी केली जात होती, पण आपण सारा भरवसा नवदुर्गेवर टाकला व ती आपणाला पावली. तिने भरभरून आपणाला दिले, जे आपण आपल्या दोन्ही हातांतही पेलू शकत नाही व म्हणून आजच्या या सत्काराचे. आपणाला मिळालेल्या कीर्तीचे सारे श्रेय तिलाच आहे व ते सारे आपण तिच्याचचरणी अर्पण करतो, असे ते सद्गदित होऊन उत्तरले.
आपणाला मिळालेल्या गौरवाचे बरेचसे श्रेय शिष्यांनाही जाते असे मनमोकळेपणाने सांगताना त्यांनी " बाळा होऊ कशी उतराई, तुझ्याचमुळे मी झाले आई' ही काव्यपंक्ती उद्धृत केली व सांगितले की आपणाला सत्पात्र शिष्य मिळाले व आपणातील गुरूचे चीज झाले. आपल्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांनी सर्वप्रसंगात साथ दिलेल्या धर्मपत्नीला सौ. प्रतिभा यांनाही दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपणाहस्ते बोरकर गुरुजींचा सत्कार होतो आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. कलाकार हा मुडी असतो या कल्पनेला बोरकर यांनी छेद दिल्याचे सांगून त्यांनी कितीही कीर्ती व मानसन्मान मिळाले तरी आपले पाय अजूनही जमिनीवर खिळवून ठेवले आहेत, त्यावरून ते सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अशा कलाकारांना मान व सन्मान मिळवून देण्यासाठी गोवा सरकारने योजलेल्या उपायांचीही माहिती दिली व सांगितले की, त्यामुळे वृद्धापकाळात कलाकारांच्या वाट्याला लाचारीचे जिणे येणार नाही.
यावेळी बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आजचा कार्यक्रम हा एक आनंद सोहळा असल्याचे व बोरकर यांचे योगदान केवळ गोव्यापुरते सीमित राहिलेले नाही तर संपूर्ण देशभर विस्तारल्याचे सांगितले. असे गुरु मिळणे कठीण असे सांगून ते शिष्यांना शिकवीत असतानाही स्वतःही शिकत गेले असे नमूद केलेे.
यावेळी पं.रशिद खॉं व नाट्यकर्मी भिकू पै आंगले यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अजय वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. नंतर पं. बोरकर यांचे साडेसात वर्षे वयाचे शिष्य उन्मेष खैरे याच्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम सर्वांकडून टाळ्या घेऊन गेला. नंतर बोरकरांच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिग्गज कलाकारांनी दिलेले संदेश पडद्यावरून प्रसारित करण्यात आले. यावेळी बोरकर रजत आसनावर बसवून त्यांना ओवाळले गेले व मंत्रघोष करण्यात आला. नंतर रशीद खॉं यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.
रवींद्र भवनाच्या वातानुकूलित परिषदगारात झालेल्या या कार्यक्रमास पं. बोरकर यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मीरप्रश्नी पाकचा सहभाग आवश्यक

पाडगावकरांच्या मतामुळे खळबळ

नवी दिल्ली, दि. २४ - काश्मीरात सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी, काश्मीरप्रश्नी तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानलाही चर्चेत सहभागी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केंद्र सरकारवर कठोर टीका केली आहे. पंतप्रधानांनी दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केलेल्या मतासंबंधी आपले धोरण स्पष्ट करावे, अशी जोरदार मागणी आज भाजपने केली. भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
काश्मीरात मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्राने सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे निमंत्रक असलेल्या पाडगावकरांनी आपण पाकसंबंधी बोलून नवे काहीच सांगितलेले नाही, अशी भूमिका घेतली आहे. काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग असताना, तेथील शांतता प्रक्रियेत पाकला सहभागी करण्याची सूचना म्हणजे या प्रश्नाचे विनाकारण आंतरराष्ट्रीयीकरण असल्याची टीका त्यांनी केली. पाडगावकर यांनी व्यक्त केलेले मत हे हुरियतच्या मागणीला पुष्टी देणारे आहे, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, पाडगावकर यांनी यासंबंधी बोलताना, पंतप्रधान अथवा गृहमंत्र्यांनी आपल्या कामाबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याचे सांगताना आपण काश्मीरमधील घटना व त्यावरील उपाय याबाबत स्वतंत्र वृत्तीने अभ्यास करीत असल्याचे सांगितले.

मुंबईतील तरुण पाळोळ्यात बुडाला

काणकोण, दि. २४ (प्रतिनिधी)- पाळोळे किनाऱ्यावर पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच आज स्नानासाठी उतरलेल्या तिघा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांना धक्का बसला आहे. पाळोळे येथे काल रोजी मीलन रोहित ठाकरे (वय २५) हा विलेपार्ले, मुंबई येथील युवक आपल्या प्रकाश पटेल व हर्ष शहा या मित्रांसमवेत पाळोळ्यात आला होता. काल संध्याकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आज पहाटे ते तिघे समुद्रस्नानासाठी उतरले. समुद्राला भरती असल्याने तिघेही कमी पाण्यात किनाऱ्यापाशी मौजमजा करीत असता मीलन अचानक पाण्यात ओढला गेला. तो बुडत असताना त्याच्या दोन्ही मित्रांनी त्याला पाण्याबाहेर आणण्यात यश मिळविले, असे एक स्थानिक अनिल पागी यांनी सांगितले. त्याला किनाऱ्यावर आणताच जवळच असलेल्या जीवरक्षकांकरवी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला १०८ गाडीतून काणकोण सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सध्या त्याचे शव मडगाव येथे शवागारात ठेवण्यात आले आहे. मीलनच्या वडिलांना ही खबर देण्यात आली आहे. उद्या शवविच्छेदनानंतर मीलनचा मृतदेह मुंबईला रवाना करण्यात येणार आहे. साहाय्यक उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेसंबंधी माहितीसाठी संपर्क साधला असता जीवरक्षकांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून पत्रकारांशी हुज्जत घातली तसेच स्थानिकांशीही उद्धटपणाची वर्तणूक केली. या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून भविष्यात अशा प्रसंगी सहकार्य करण्याबद्दल जीवरक्षकांना समज देण्यात यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

वार्ताकारांना न भेटण्याचा निर्णय

श्रीनगर, दि. २४ - काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच प्रयत्न केंद्र सरकारने चालवला असल्याचा आरोप करत, जम्मू-काश्मिरात पाठविलेल्या वार्ताकारांशी चर्चा न करण्याचा निर्णय हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाने आज घेतला आहे.
वार्ताकारांच्या पथकाला वैयक्तिक स्तरावर आमचा काहीही विरोध नाही. मात्र, काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच हा सरकारचा प्रयत्न असल्याची आमची भावना आहे. त्यामुळे या पथकाशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे हुर्रियतच्या मवाळ गटाचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काश्मिरी जनतेचा संदेश स्पष्ट असून, आमच्या मनात याप्रकरणी कुठलाही संभ्रम नाही. आम्हाला स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा आहे आणि गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही त्यासाठीच लढत आहोत, असेही मिरवाईझ यांनी सांगितले. हुर्रियतने याआधी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली असल्याने नव्याने वार्ताकारांची नियुक्ती करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sunday, 24 October 2010

आज रंगणार भारत-कांगारू झुंज

वरुणराजाने विश्रांती घेतल्यामुळे सामन्याची शक्यता वाढली
वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): गेले दोन दिवस वरुणराजाने आपला हिसका दाखवल्यानंतर आज दिवसभर विश्रांती घेतल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व या मालिकेतील अंतिम झटपट आंतरराष्ट्रीय सामना होण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी सुखावले असून फातोर्डा मैदानावर होणारी ही लढत कधी एकदा डोळे भरू पाहतोय, असे क्रिकेटप्रेमींना झाले आहे.
या सामन्याबाबत सर्वांच्यात मनात धाकधूक निर्माण झाली होती.
मात्र आज सकाळपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने क्रिकेटप्रेमी उद्याच्या दिवसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. आज सकाळपासून फातोर्डा मैदानाच्या परिसरात पाऊस झाला नसल्याने सामना होण्याची शक्यता बळावली आहे.
काल दुपारी फातोर्डा मैदानाच्या परिसरात काळे ढग दाटून आल्यामुळे
आयोजकांनी खेळपट्टीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. पाऊस थांबला नाही तर सामना होणार नाही हे ठरलेलेच आहे. त्यामुळे हा मामला सर्वांनी
देवावरच सोडून दिल्याचे दिसून आले. काल उशिरा रात्रीपर्यंत पाऊस पडल्यानंतर आज सकाळी वरुणराजाने विश्रांती घेतली. साहजिकच मैदानावरील कर्मचाऱ्यांचा उत्साहदेखील वाढला. त्यांनी आपल्या कामाची गती वाढवली. आज दिवसभर मैदानाच्या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना होणार असल्याची आशा निर्माण झाल्याने तो पाहण्याकरिता पास अथवा तिकीट मिळवण्याची धडपड करताना क्रिकेटप्रेमी दिसून आले. त्यांच्यापैकी काही जणांना त्यात यशही आले. उद्याच्या सामन्यापूर्वी आज सकाळी प्रथम येथे भारतीय क्रिकेट संघाचा सराव निश्चित करण्यात आला होता व नंतर ऑस्ट्रेलियन संघ सराव करणार होता. मात्र, काल उशिरा रात्रीपर्यंत पाऊस पडल्याने दोन्ही संघांनी आज दुपारी मैदानावर उपस्थिती लावून सराव केला.
दरम्यान सामन्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच त्यांनी फातोर्डा मैदानावर उपस्थिती लावून सर्व गोष्टींची पाहणी केली. मैदानाबरोबर दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांत उद्याच्या सामन्याबद्दल आज प्रचंड उत्साह दिसला.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोवा पोलिसांनी मैदानाच्या सर्व भागांत
कडक बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले. वाहतूक नियंत्रणात ठेवण्याकरिता सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दिसून आले. उद्या सकाळी सामना होणार असला तरी आज (शनिवारी) संध्याकाळीच काही क्रिकेटप्रेमींनी फातोर्डा मैदानाबाहेरच आपले घर केल्याचे दिसून आले. यात महाराष्ट्रातील व कर्नाटक येथील शेकडो क्रिकेटप्रेमींचा समावेश होता. संध्याकाळी गोव्याच्या इतर काही भागात पाऊस पडल्याची माहिती पसरताच क्रिकेटप्रेमींत पुन्हा एकदा निराशेचे वातावरण पसरले. मात्र हा सामना चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वरुणराजा आपली कृपादृष्टी दाखवत असल्याचे दिसून आले. गोव्यातील क्रिकेटप्रेमींची नजर आता घड्याळाच्या काट्यांवर स्थिरावली असून हा सामना यशस्वीरीत्या पार पडावा अशीच त्यांची ईश्वराच्या चरणी विनंती असेल.
चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा!
उद्या रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी आज भारत तसेच ऑस्ट्रेलिया संघाने फातोर्डा मैदानावर आपला सराव करून ते पुन्हा हॉटेलात जाण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा मैदानाच्या परिसरात शेकडो क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती लावून त्यांचे "दर्शन' घेतले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग, विराट कोहली इत्यादी खेळाडू सरावानंतर मैदानाच्या बाहेर आले तेव्हा रसिकांनी त्यांना उद्याच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या!

भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर आज गोव्यात

पणजी,दि.२३(प्रतिनिधी): भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर यांचे उद्या २४ रोजी गोव्यात आगमन होत आहे. ते सोमवार २५ रोजी सकाळी १० वाजता भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित गोवा प्रदेश भाजयुमो कार्यकर्त्यांना "इंडिया फर्स्ट' कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व युवा कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन भाजयुमोचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सावंत यांनी केले आहे.

'इफ्फी'च्या पाहुण्यांसाठी किनारी हॉटेलच कशाला?

आर्नोल्ड डिकॉस्टा यांची सडकून टीका
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) निमित्ताने गोव्यात येणारे पाहुणे चित्रपट पाहण्यासाठी येतात की किनारी हॉटेलांचा पाहुणचार झोडण्यासाठी येतात, असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण, चित्रपट महोत्सव संचालनालयाने यंदा सामंजस्य करारात पाहुण्यांना केवळ किनारी हॉटेलच हवे अशी अट लादून नेमकी कुणावर मेहेरनजर करण्याचा घाट घातला आहे, असा खडा सवाल "फेडरेशन ऑफ फिल्म फ्रॅटर्निटी ऑफ गोवा' चे अध्यक्ष आर्नोल्ड डिकॉस्टा यांनी केला आहे.
संघटनेतर्फे आज जारी केलेल्या पत्रकांत आर्नोल्ड डिकॉस्टा यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेताना काही महाभागांनी "इफ्फी' महोत्सवाचा व्यापारच मांडला आहे, असा गंभीर आरोप केला. यापूर्वी दिल्ली,बंगळूर, हैदराबाद येथे "इफ्फी' महोत्सव आयोजिण्यात आला होता; पण तिथे किनारी हॉटेलांची कुणालाच गरज भासली नाही. मग यंदा "इफ्फी'साठी येणाऱ्या पाहुण्यांना किनारी हॉटेलच हवे,अशी अट लादून कुणाची भर केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर अनेक हॉटेल उद्योजक आहेत व यापूर्वी महोत्सवाच्या हॉटेलाचे कंत्राटही त्यांनाच देण्यात आले होते.यंदा सुरुवातीला काढण्यात आलेल्या हॉटेल निविदेत "इफ्फी' आयोजन स्थळापासून जवळ असलेल्या हॉटेल "ताज विवांता'कडून एकमेव कमी बोली लावण्यात आली होती. आता मात्र अचानक किनारी हॉटेलाची अट लादून या हॉटेलला दूर सारण्याचा प्रयत्न केला जात आहे.केवळ प्रशासकीय समितीवर काही हॉटेल उद्योजक सदस्यांना कंत्राट मिळवून देण्यासाठीचा हा खटाटोप सुरू आहे, असा संशय यावेळी श्री.डिकॉस्टा यांनी व्यक्त केला.
गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर थेट चित्रपट उद्योगातील लोकांना डावलून उद्योजकांची निवड करण्यात आली आहे व हे उद्योजक "इफ्फी' आयोजनाची कंत्राटे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून "इफ्फी'शी दुरान्वयानेही देणेघेणे नसलेल्या अवाजवी मागण्या पुढे रेटल्या जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच या मागण्या फेटाळून लावाव्यात, अशी विनंतीही सदर पत्रकात करण्यात आली आहे.

ज्ञातीचा न्यूनगंड बाळगू नका : सुशीलकुमार शिंदे

षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शंभू भाऊ बांदेकरांचा ह्रद्य सत्कार
पणजी, दि.२३ (सांस्कृतिक प्रतिनिधी): आपण दलित समाजात जन्मलो याचा न्यूनगंड बाळगून ते उगाळत राहण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून अंधारावर मात करत प्रकाशाकडे जाणे यातच खरे कर्तृत्व आहे. धोका पत्करल्याशिवाय जीवनात काहीही मिळत नाही. धोका पत्करणे म्हणजेच जीवन, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले.
कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात भव्य स्वरूपात झालेल्या शंभू भाऊ बांदेकर षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, उद्योगपती श्रीनिवास धेंपे, साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, सत्कारमूर्ती शंभू भाऊ बांदेकर, सौ. शुभांगी बांदेकर, सत्कार समितीचे सरचिटणीस सुरेश वाळवे, समितीचे अध्यक्ष ऍंड. रमाकांत खलप, खजिनदार गुरूदास नाटेकर, गंगाराम मोरजकर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, आम्हीच स्वतःला कमी लेखतो. उघड्या डोळ्यांनी पाहिले तर आमच्यापेक्षा उपेक्षित लोक जगाच्या कानाकोपऱ्यांत दिसून येतील.कधी काळी गुलामीचे जिणे नशिबी आलेल्या कृष्णवर्णीयांनी केलेली प्रगती डोळे दीपवणारी आहे. सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम केलेल्या मंडळींना समाज कधीच विसरत नाही.
ते म्हणाले, कवी हळव्या मनाचा असतो. शंभू भाऊ बांदेकर हे त्यापैकीच एक होत. त्यामुळे राजकारणात ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. कदाचित सध्याच्या राजकारणातील गोंधळ त्यांच्या संवेदनशील मनाला रुचला नसावा. आजकाल जे राजकारणात चालले आहे ते भयंकर आहे. कवी मनाला त्यामुळे किती दुःख, वेदना होत असतील याची कल्पना मी करू शकतो. अर्थात, जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी कडवा संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष करण्याची उमेद बाळगणारेच या रणांगणात टिकून राहतात.
शंभू भाऊ बांदेकरांना हार्दिक शुभेेच्छा व्यक्त करून गोव्याच्या माणसाशी संवाद साधायला मला आवडते असे सांगतानाच यापूर्वी आपण बा. द. सातोस्करांच्या पुस्तक प्रकाशनासाठी गोमंतभूमीत आल्याच्या आठवणींना श्री. शिंदे यांनी उजाळा दिला.
श्री. शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून श्री. बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला; तर श्रीनिवास धेंपे यांनी बांदेकर यांना नॅनो मोटार भेट दिली. सौ. चित्रा क्षीरसागर यांनी सौ. बांदेकर यांची खणानारळाने ओटी भरली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शंभू भाऊ गौरव ग्रंथ "स्वयंभू' व श्री. शिंदे यांच्या हस्ते "दलितांची डायरी' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विष्णू वाघ म्हणाले, बांदेकर हे वेगळेच रसायन आहे. शब्दांमध्ये न पकडता येणारी ती वल्ली आहे. ते नेहमी माणसे जोडत राहिले. मैत्री करणे हा त्यांचा छंद. त्यांच्याशी मैत्री केलेली माणसे कधीच त्यांच्यापासून तुटली नाहीत.
श्री. धेंपे यांनीही बांदेकरांचा उचित गौरव केला. बांदेकर आपल्या कुटुंबाशी बांदेकरांचा गेल्या तीन पिढ्यांचा संबंध असला तरी आजपर्यंत ते कधीही स्वतःचे काम घेऊन किंवा स्वतःसाठी काही मागण्याकरिता आले माझ्याकडे आले नाहीत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री कामत यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले, चांगुलपणाने अनेक गोष्टी माणसाला जीवनात साध्य होऊ शकतात. म्हणून जीवनात शंभू भाऊ बांदेकर यांच्यासारखा चांगला माणूस होणे आवश्यक आहे.
सत्काराला उत्तर देताना शंभू भाऊ बांदेकर यांनी या ह्रद्य सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ६० वर्षांच्या कालावधीत सर्व हितचिंतकांनी सत्काराच्या स्वरूपात नव्याने दिलेली ऊर्जा आपण समाज कार्यासाठी उपयोगात आणायची असे ठरवले आहे.
स्वागत व प्रास्ताविक ऍड. खलप यांनी केले. सुदेश आर्लेकर यांनी गौरवपत्राचे वाचन केले. श्री. शिंदे यांना याप्रसंगी गोव्याचे भूषण असलेली समई प्रदान करण्यात आली. सुरेश वाळवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.

खोऱ्यातील संचारबंदी उठवली

श्रीनगर, दि. २३ : फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या जहाल गटाने केलेल्या बंदच्या आवाहनानंतरही परिस्थिती आटोक्यात असल्याने काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांमध्ये लागू असलेली संचारबंदी प्रशासनाने आज पूर्णपणे उठवली आहे.
आज सकाळपासूनच खोऱ्यातील जनजीवन पूर्णपणे सुरळीत असून, अजूनपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे पोलिस खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. असे असले तरी श्रीनगर शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या लाल चौक भागातील सर्व दुकाने आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. खोऱ्याच्या इतर भागातील आर्थिक व्यवहार सामान्यपणे होत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सयद अली शाह गिलानी यांच्या जहाल गटाने आंदोलनाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतरही अनेक खाजगी आणि सरकारी वाहने खोऱ्यातून ये जा करत आहेत. सार्वजनिक परिवहन सेवेच्या गाड्या मात्र आज रस्तावर उतरलेल्या नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.