Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 18 October 2010

'राष्ट्र भक्कम होण्यासाठी धार्मिक सलोखा महत्त्वाचा'

पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांचे प्रतिपादन; राष्ट्रहित मंचची दिमाखात स्थापना
म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): सध्याच्या दोलायमान परिस्थितीत आपला देश भक्कम होणे गरजेचे आहे. त्यासाठी धार्मिक सलोखा राखणे सर्वांत महत्त्वाचे ठरावे. हिंदू आणि इस्लामी संस्कृतीत अनेक साम्यस्थळे आहेत. तोच धागा पकडून ही वीण आणखी घट्ट करत नेली तर आपल्या राष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, असे प्रतिपादन पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांनी आज येथे केले.
येथील मयुरा हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात "राष्ट्रहित मंच'ची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी श्री. हुसेन बोलत होते. व्यासपीठावर जगन्नाथ उर्फ सद्गुरू मणेरकर, इबादुल्ला खान, नुरुद्दीन खान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह संजय वालावलकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. खास कार्यक्रमास खासदार श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, माजी सभापती सुरेंद्र सिरसाट, संदीप फळारी, मिलिंद अणवेकर, सुधीर कांदोळकर, स्नेहा भोबे, गुरुदास वायंगणकर आणि आजी - माजी नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. हुसेन म्हणाले, राष्ट्रीयताच राष्ट्राचे रक्षण करते. राष्ट्रीयतेचा भार देशाच्या नागरिकांवर आहे. त्यामुळे राष्ट्राच्या ऐक्यासाठी प्रत्येकाने आपल्या मनात आणि काळजात राष्ट्रीयता बाळगली पाहिजे. सध्या पेटत्या मेणबत्या विझवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. याच्या उलट आपल्या संस्कृतीत दीपप्रज्वलन करून नवी प्रभा, नवी ज्योत लावून नवजीवन सुरू केले जाते. हिंदुस्थानची संस्कृती काळोखाकडून प्रकाशाकडे नेणारी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या देशात "मनीप्लांट'सारखी संस्कृती रुजत चालली आहे.ती घातक आहे.
त्यापेक्षा घरासमोर तुळस आणि पिंपळाची झाडे लावा. ही वृक्षवल्ली सुरक्षित राहिली तर आपले भवितव्य सुरक्षित होईल.
ते म्हणाले, देश राजकारण्यांच्या कचाट्यात सापडला आहे. मतपेढीची संस्कृती रुजत चालली आहे. हे प्रकार थोपवले पाहिजेत. लोकशाहीच्या वाढीसाठी देशात मतदान सक्तीचे व्हायला पाहिजे. राज्यकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.
हिंदू आणि मुसलमान हे दोन धर्म हे हिंदुस्थानचे प्रमुख धर्म आहेत. या दोन्ही धर्मांनी एकोपा राखला आहे. त्याद्वारे राष्ट्रीय एकात्मता जोपासायला हवी. कित्येक वर्षे या भूमीत दोन्ही धर्मांचे अनुयायी गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे विचार श्री. नुरुद्दीन यांनी मांडले. संजय वालावलकर स्वागतपर भाषणात "राष्ट्रहित मंच' या संघटनेच्या स्थापनेमागील उद्देश व अनुषंगिक माहिती दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांनी परस्परांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. पद्मश्री हुसेन यांनी खासदार श्रीपाद नाईक यांना राखी बांधून देशाच्या सुरक्षेततेसाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. सलीम खान यांनी श्री. हुसेन यांचा परिचय करून दिला. जगन्नाथ मणेरकर यांच्या हस्ते श्री. हुसेन यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. प्रा. दिलीप बेतकेकर यांनी सूत्रनिवेदन केले. प्रा. अनिल सामंत यांनी आभार मानले. राष्ट्रीयगीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रीगीताने सांगता झाली.

कुडचडे येथे एका रात्रीत आठ दुकाने फोडली

कुडचडे, दि. १७ (प्रतिनिधी): येथील बसस्थानकापाशी परस्परांना खेटून असलेल्या चार इमारतींच्या तळमजल्यावरील एकूण आठ दुकाने अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री आठच्या सुमारास फोडून रोकड व इतर ऐवज पळवला.
गुरूदेव मॅन्शन, विश्वनाथ मॅन्शन, आत्मदर्शनी व अनू अपार्टमेंट या चार इमारतींमधील दुकानांत ही चोरी झाली असून यात एका औषधालयाचाही (फार्मसीचा) समावेश आहे. सावईकर एंटरप्रायझेस या दुकानातून चोरट्यांनी लॅपटॉप पळवला आहे. गुरू मेडिकल स्टोअर्समधून पाच हजारांचे साहित्य व रोख एक हजार, रवी देसाई यांच्या हेअर कटिंग सलूनमधून रोख पाचशे रुपये लांबवण्यात आले.
गुरूदेव मॅन्शनमधील एकाच रांगेत असलेली चार दुकाने फोडण्यात आली आहेत. यात दोन मोबाईल फोन दुरूस्ती तसेच एक रेडिमेड कपड्याच्या दुकानाचा समावेश आहे. तसेच अनू अपार्टमेंटमधील सुमारे वर्षभर बंद असलेल्या किचन किंग हे आईस्क्रीम विक्रीचे दुकानही चोरट्यांनी फोडले. मात्र तेथे चोरट्यांच्या हाती फार काही लागले नाही.
सर्व दुकानांची शटरे जॅकच्या सहाय्याने वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांची मदत घेतली. त्याचा विशेष फायदा झाला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस स्थानकापासून अवघ्या ५० मीटरवर असलेल्या या भागात दुकाने बंद करताच अंधार पसरतो. तेथे रस्त्यावर काही मोजकेच दिवे लागतात. रस्ता सोडल्यास इतर परिसरात संपूर्ण काळोख पसरलेला आसतो. चोरट्यांनी या काळोखाचा फायदा उठवत चोरी केल्याचा संशय आहे. चोरटे परप्रांतीय असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
सायंकाळी पाचच्या दरम्यान येणाऱ्या दिल्ली एक्सप्रेस रेल्वेतून चोरटे पळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी हवालदार श्री. फडणीस तपास करीत आहेत. एकूण आठ दुकाने फोडल्याने पोलिस रात्री योग्य प्रकारे गस्त घालत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या या प्रकारामुळे पोलिसांची झोप उडाली आहे.

भाजप-जेडीयु युती भक्कमच : नितीशकुमार

पाटणा, दि. १७ : कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी जनता दल युनायटेड आणि भारतीय जनता पक्ष यांची युती भक्कम असल्याचा निर्वाळा आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिला. काही प्रसारमाध्यमांनी या दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची आवई उठवल्यासंदर्भात नितीशकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले.
पत्रकारांशी आज येथे बोलताना नितीशकुमार यांनी सांगितले, जेडीयु आणि भाजप यांच्यात वाद उत्पन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अगदी तळागाळापर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने आणि हातात हात गुंफून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि मी स्वतः त्यांना मार्गदर्शन करत आहोत. पहिल्या चार टप्प्यांत एकूण १८२ मतदारसंघांत मतदान होणार असून त्यासाठी केवळ आठ - नऊ दिवस प्रचाराकरिता पुरेसे नाहीत. यास्तव आम्ही प्रचाराचेही सुयोग्य नियोजन केले आहेत. समाधानाची बाब म्हणजे येत्या २० तारखेपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि "जेडीयु'चे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य नेतेही प्रचारात जोमाने भाग घेणार आहेत. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्या युतीचे तीनतेरा वाजणार आहेत यात शंकाच नाही. कॉंग्रेसची तर कितव्या क्रमांकावर घसरण होईल हे सांगणेही कठीण आहे.
आम्ही या निवडणुकीत बिहारचा सर्वतोपरी विकास हाच मुख्य मुद्दा बनवला आहे. त्याला बिहारी जनतेकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालील वाळू घसरत चालली आहे. आता भाजप व जेडीयु यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या त्यांना पेराव्या लागत आहेत. मतदारांनी यावरूनच काय ते ओळखावे, असा शालजोडीतील "मखमली प्रहार' नितीशकुमार यांनी केला.
पाकमध्ये ड्रोन हल्ल्यात १० ठार
इस्लामाबाद, दि. १७ : पाकिस्तानच्या कबायली भागात अमेरिकी विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात दहा जण ठार झाले. वजिरिस्तानच्या मीर अली शहरावर हा हल्ला करण्यात आला. ड्रोन विमानांनी या भागात सहा क्षेपणास्त्र डागल्याचे पाक सैन्याने म्हटले आहे. या भागात तालिबानी व अलकायदाचे दहशतवादी मोठ्या प्रमाणावर लपल्याचे बोलले जाते. या भागात मागील काही दिवसांपासून पाक सैन्यानेही अभियान राबवण्यास सुरुवात केली असून, मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले जात असतात.

सर्वात महागडे घर अंबानींचे!
वॉशिंग्टन, १७ : जगभरातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर नंबर लागतो तो अंबानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा. आता त्यांचे घरही महागड्यांच्या यादीत आले आहे. मुकेश अंबानी यांचे घर सर्वात महागडे घर आहे. फोर्ब्सने त्यांच्या घणाचा समावेश आपल्या यादीत केला आहे. मुकेश अंबानी यांचे मुंबईत ऐल्टा माउंट रोडवर मोठे घर आहे. फोर्ब्सने त्यांच्या या घराचा समावेश आपल्या यादीत केला आहे.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार या घराची किंमत ६३ कोटी पाऊंडच्या घरात आहे. भारतीय चलनात याची किंमत एक अब्ज डॉलरच्यावर आहे.

सोने आणखी महागले..!
नवी दिल्ली, दि. १७ : सणासुदीमुळे मागणी वाढल्याने राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव काल प्रतितोळा २० हजारांवर गेला. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १७५ रुपयांनी चमकत प्रतितोळा २०,१२० रुपये तर चांदीचा भाव प्रतिकिलो ३७ हजार रुपयांवर गेला. नवरात्रोत्सवामुळे बाजारात सोने आणि चांदीची जोरदार खरेदी होत आहे. विदेशी बाजारातील तेजीचाही स्थानिक बाजारावर परिणाम झाल्याचे दिसते.

'एसबीआय'चे कर्ज महागणार
मुंबई, दि. १७ : स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) कर्ज महागणार असल्याचे संकेत बॅंकेचे चेअरमन ओ. पी. भट्ट यांनी दिले आहेत. तरलतेची स्थिती कठीणच होत नाही तर यात अधिक चढ-उतार होत आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदर वाढविले जातील, असे त्यांनी सांगितले. एसबीआयने आपला आधार दर वाढवला आहे. ठेवींचा ओघ कमी होत असल्याने हे पाऊल उचलावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेना दम देणारी, दम खाणारी नव्हे..

बाळासाहेब ठाकरे गरजले
मुंबई, दि. १७ : शिवसेना ही दम देणारी आहे दम खाणारी नाही. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा आवाज ५० डेसिबलच्या आत मावणारा नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी शिवसैनिकांचा हा आवाज कमी करू शकणार नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आज येथील शिवाजी पार्क मैदानावर विराट जनसमुदायाकडून जबरदस्त टाळ्या घेतल्या. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ठाकरे शैलीत सगळ्यांची खरडपट्टी काढली. "युपीए'च्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मंत्री नारायण राणे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.
दसरा मेळाव्यात बाळासाहेब बोलणार म्हणून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठणठणीत बाळासाहेबांना पाहून जमलेल्या जनसागरात एक नवचैतन्य निर्माण झाले. बाळासाहेब व्यासपीठावर आल्यावर प्रचंड टाळ्या आणि घोषणांनी त्यांचे स्वागत झाले. बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून सभेला सुरूवात केली. यावेळी आदित्य ठाकरे यांना बाळासाहेबांनी तलवार देऊन त्यांच्या युवा सेनेचे उद्घाटन केले. "भावोजी' आदेश बांदेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर तोंडसुख घेत बाळासाहेब म्हणाले, त्यांना भगवा दहशतवाद दिसतो. अन्य रंगांचा दहशतवाद दिसत नाही. हिंदूंचा रंग भगवा आहे. शिवरायांच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. या भगव्याच्या नादाला लागलात तर तुम्हाला परवडणार नाही.
माणिकरावांबद्दल का बोलायचं, चांगले माणिक पैदा झाले आहेत. या गुळगुळीत माणिकरावांच्या टकलावरून घसरून कॉंग्रेसचं सरकार पडतं की नाही ते पहा, असा खुसखुशीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
माय नेम इज खान, बिग बॉस या कार्यक्रमांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संरक्षण देताते. का बिग बॉसमध्ये दोन पाकिस्तानी आणले आहे. भारतात काय गायक, कलाकारांची कमी आहे. कशाला लाचारासारखे जगतात, असा घणाघाणी वार त्यांनी यावेळी केला.
श्रीमती सोनिया गांधीचा समाचार घेताना आपल्या नेहमीच्या शैली बाळासाहेब म्हणाले, मोगलांनी तुमच्यावर २०० वर्ष राज्य केले. ब्रिटिशांनी १५० वर्ष आणि आता इटलीची गुलामी हे कॉंग्रेसचं सरकार करीत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्हीच ठरवणार, असे म्हणणारे कुठे आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्री कुठे आहे? कल्याण-डोंबिवली महापालिकाचा महापौर आमचाच होणार, अरे बाबा सर्व तुमचच होणार असे म्हटला तर आम्हालाही काही तरी ठेव. ४५ वर्षे आम्हीही काही तरी केलं आहे, असा चिमटा राज ठाकरे यांचं नाव न घेता बाळासाहेबांनी काढला.
शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही. मंत्र्याचा पोरगा कोणी आमदार होतोय, कोणी खासदार होतोय. कोणी गोळ्या घातलोय, पण या गोळ्या घालणाऱ्यांना क्लीन चीट दिली जाते, तुमच्याकडे किती क्लीन चीट आहे मला सांगा. प्रत्येकाला क्लीन चीट देत बसले आहेत.
अशोकराव मंत्रालयाच्या भिंती काय मजबूत करताहेत, देशाच्या भिंती मजबूत करा. पाकिस्तानी - चिनी देशात घुसताहेत तरी आपण गप्प बसून आहोत, असे म्हणून अशोक चव्हाण यांचाही त्यांनी समाचार घेतला.
काही वृत्तपत्रावर बाळासाहेबांनी एकांगी वृत्त देत असल्याचा आरोप केला. मनसेने ते वृत्तपत्र विकत घेतल्यासारख्या बातम्या त्यात प्रसिद्ध होत आहेत. उद्या त्या वृत्तपत्रात बातम्या येतील बाळासाहेबांची सभेला पूर्वीसारखी गर्दी नव्हती, जोश नव्हता. त्यांना मी एवढचं सांगू इच्छितो, ही पत्रकारिता आम्हालाही जमते, पण ती आम्ही करत नाही.

Sunday, 17 October 2010

राणे यांनी २९ वर्षांत काय केले याचे उत्तर आधी द्यावे

मगच २९ महिन्यांत आम्ही काय केले ते सांगू : पर्रीकर
वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): प्रतापसिंह राणे २९ वर्षे सत्तरीवर सत्ता गाजवत आहेत. असे असूनही विश्वजित राणे यांना सत्तरी मागासलेली वाटत असेल तर त्यांनी २९ वर्षे त्यांचे वडील मंत्री असूनदेखील सत्तरीचा विकास का झाला नाही? विश्वजित यांनी याचे उत्तर आधी भाजपला द्यावे. नंतर आम्ही २९ महिन्यांत कोणता विकास केला हे सांगू, असे सवाल करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विश्वजित राणेंना आज प्रतिआव्हान दिले. वाळपई पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप उमेदवार संतोष हळदणकर खासदार श्रीपाद नाईक, उल्हास अस्नोडकर, गोविंद पर्वतकर, नरहरी हळदणकर, नारायण गावस आदी नेते तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
श्री. पर्रीकर म्हणाले, आजपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी योग्य नियोजनाद्वारे प्रचार केला आहे. प्रचार करताना घरोघरी वैयक्तिक संपर्क साधण्यावर जास्त भर दिला.
आज वाळपई मतदारसंघातील लोक निर्भय बनले आहेत. याआधी लोक भीतीपोटी गप्प बसायचे. त्यांना धमकीचे, पैशाचे भय होते. या पोटनिवडणुकीत मात्र तसे नाही. चित्र बदलत चालले आहे. विश्वजित यांनी तरीसुद्धा "अर्थ'पूर्ण व्यवहार सुरूच ठेवले आहेत. जे एकूण स्वयंसाहाय्य गट तयार केले आहेत त्यांना पैसे देऊन लाचार बनविले. हल्लीच खडकी वेळगे येथे पैशांवरून कॉंग्रेसच्या गटांत मारामारी झाली. हे खेदजनक आहे. याला सर्वस्वी विश्वजितच जबाबदार आहेत. याआधी विश्वजित सांगत होते की, भाजपच्या बाहेरील आमदारांनी वाळपईत येऊन प्रचार करू नये. मग असे असताना आज विश्वजित राणे वाळपईतील आहेत काय? ते कोणत्या आधारावर भाजपवर टीका करीत आहे. संतोष हा स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. म्हणून त्यालाच या मतदारसंघातील समस्या ठाऊक आहेत. जनतेने भाजप उमेदवारालाच निवडून आणावे आणि सत्तरीतील मक्तेदारी मोडीत काढावी.
दाबोस प्रकल्प रस्ते आमच्या काळातील आहेत. विश्वजित यांनी पूल बांधून खाणींची तयारी सुरू केली आहे. वाळपईत हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर सुरू करून भंगसाळ करण्याची उपाययोजना त्यांनी केली आहे. १६० खाटांचे हॉस्पिटल बांधून व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणार काय? विश्वजित हे १८० दिवसांपैकी १२० दिवस परदेशांत होते. त्यांना परदेश दौरे करण्यात रस आहे. दोनापावला बंगल्यावर बसून सहज जिंकून येईन, असे सांगणारे विश्वजित आज सहकुटुंब प्रचार का करीत आहेत, असा खडा सवाल पर्रीकरांनी केला.
आमच्या काळात १४ सरकारी शाळा, पाणी प्रकल्प सुरू झाले. जी कामे अपूर्णच आहेत ती पूर्ण झाली अशा बाता राणेंनी मारू नयेत व स्वतःचा उदोउदो करू घेऊ नये. सावर्डे पंचायतीतील बुद्रुक करमळी येथील ३८.५६५ हे जमीन (सर्व्हे क्र ११/१) राखीव जंगल करण्याचे कारस्थान शिजत असून दि. ३०/९/२०१० रोजी आचारसंहिता असताना तशी नोटीस पंचायतीला आली आहे. त्याची प्रतच पर्रीकरांनी सादर केली. या जमिनीत वनस्पती काजू लागवड केली जाते. त्यामुळे या निवडणुकीनंतर ही ३८ हे जमीन राखीव जंगल होणार आहे. साहजिकच १०० हून अधिक शेतकरी संकटात येणार असल्याची माहिती पर्रीकरांनी यावेळी दिली. ही माहिती विश्वजित यांना नाही काय? डोळे मिटून दूध पिण्याचे काम ते करत आहेत, असा आरोप पर्रीकरांनी केला.
विश्वजित यांना शेतकऱ्यांबद्दल ना सोयर ना सुतक. त्यांनी नोकऱ्या दिल्या त्या स्वीपर, पेशंट ऍटेंडंट अशा स्वरूपाच्या. शिवाय त्याही तात्पुरत्या. सत्तरीत अनेक उच्चशिक्षित आहे त्यांना मोठ्या हुद्याच्या नोकऱ्या का दिल्या नाहीत? आमच्या काळात पोलिस निरीक्षक, मामलेदार अशा नोकऱ्या आम्ही सत्तरीवासीयांना दिल्या. विश्वजित यांना हे जमत नाही काय, असे पर्रीकर शेवटी म्हणाले.
भ्रष्टासुराला खाली खेचा : श्रीपाद नाईक
श्रीपाद नाईक म्हणाले, मी खासदार या नात्याने काहीच केले नाही; फक्त पाट्या लावल्या ,असे कॉंग्रेसकडून सांगितले जात आहे. ते खोटे असून मी विविध २२ प्रकल्प ११ हॉल पर्येत, ५ हॉल वाळपईत, शाळांना मदत अशी अनेक कामे पूर्ण केली आहे. पालहिरवे येथे टेंडर काढलेले असताना विश्वजितांनी हॉलचे बांधकाम बंद करण्यात भाग पाडले. अशा व्यक्तीला पराभूत करण्यातच लोकांचे कल्याण आहे. या पोटनिवडणुकीत सत्तरीवासीयांना भ्रष्टासुराला नव्हे तर भाजपला मते देऊन विजयी करावे.

बार्देश बझार मडगावात १.३० लाखांची चोरी

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): येथील बार्देश बझार आस्थापनातून काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे १.३० लाखांचा ऐवज पळविला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खिडकीचे गज कापून चोरटे आत शिरले व त्यांनी ६० हजारांची रोकड आणि सुमारे ७० हजारांचा माल हातोहात लांबवला.
आज सकाळी नेहमीप्रमाणे आस्थापन उघडण्यात आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी श्र्वानपथकास आणून चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सदर संस्थेची मडगाव शाखा येत्या मंगळवारी येथील वर्षपूर्ती साजरी करीत असून त्यापूर्वीच चोरट्यांनी तिला अशाप्रकारे हिसका दाखवला आहे.

'गोमेकॉ' कॅंटीनमध्ये कूपनच्या नावाखाली लूट

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ("गोमेकॉ') कॅन्टीनमध्ये सुट्टे पैसे नसल्याच्या नावाखाली १ रुपयापासून ८ रुपयांपर्यंत छापील कुपने देऊन गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवईकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने लोकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
"गोमेकॉ'मध्ये प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गीय लोकच जात असतात. त्यामुळे आधीच पैशांची मारामार सहन करणाऱ्या या लोकांना ही कुपनची झंजट परवडेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ गोव्यातूनच नव्हे तर गोव्याबाहेरूनही दररोज हजारो रुग्ण या इस्पितळात येत असतात. त्यातील काही दोन चार दिवसांकरिता इस्पितळात भरती होतात. काहीजण औषधोपचार करून त्याच दिवशी आपल्या घरी जातात. त्याच दिवशी घरी जाणाऱ्या रुग्णांनी या कॅन्टीनमध्ये काही गरज म्हणून घेतले आणि राहिलेले पैसे सुट्टे नाहीत असे सांगून त्याला कुपन देण्यात आले तर त्याने त्या कुपनचे पैसे आणण्यासाठी पुन्हा बांबोळीला जायचे का? अडचण म्हणून येणाऱ्या सामान्य लोकांची ही एकप्रकारे पिळवणूकच केली जात आहे. एक वेळ तिथल्या कर्मचाऱ्यांनाही कुपनची गोष्ट परवडण्यासारखी असू शकते; कारण ते रोज तिथे जात असतात. मात्र रुग्णांनी १२ रुपयांचे पदार्थ खरेदी केल्यास आठ रुपयांचे कुपन देण्यात येते. अशावेळी दूरवरून आलेला रुग्ण केवळ ८ रुपये आणण्यासाठी परत जाईल का? परिणामी ते आठ रुपये कॅन्टीन मालकाच्या खिशात जातात. अशा पद्धतीने लोकांना लुटणे कितपत योग्य आहे, असा सवाल विचारून याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सत्तरीच्या अस्तित्वासाठी खाणींविरोधात लढणार

विश्वेश परोब यांनी स्थापला
सत्तरी जागृत युवा मोर्चा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): शेती, बागायती आणि जलस्त्रोतांनी संपन्न असलेल्या सत्तरीचे काजू हे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. या निसर्गसंपन्न सत्तरीवर खाणीसारखे संकट आणणाऱ्या राजकारण्यांना व सत्तरीची अस्मिता नष्ट करणाऱ्या खाणींना आपली संस्था प्रखरपणे विरोध करणार असल्याचे प्रतिपादन आज वाळपई येथे पत्रपरिषदेत माजी आमदार अशोक परोब (प्रभू) यांचे पुत्र विश्वेश परोब यांनी केली.
उभरते नेतृत्व म्हणून पुढे येत असलेल्या विश्वेश परोब यांनी सत्तरीची विल्हेवाट लावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी व सत्तरीतील दबलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी आज वाळपईत सत्तरी जागृत युवा मोर्चाची स्थापना केल्याची घोषणा केली. यावेळी युवा कार्यकर्ते तथा पत्रकार अविनाश जाधव व इतर नागरिक त्यांच्यासोबत उपस्थित होते.
श्री. परोब म्हणाले, सत्तरीत दबावाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे अनेकांचा खाणींना व अन्य गैरकृत्यांना विरोध असूनही दबावामुळे ते बोलू शकत नाहीत. आपली संस्था अशा दबलेल्या लोकांचा आवाज बनून त्यांच्या सहकार्याने खाणींविरुद्ध लढणार आहे. पिसुर्ले सारख्या कृषिसंपन्न गावाची खाणींमुळे काय अवस्था झाली आहे त्याचा विचार लोकांनी करावा. खाणींमुळे राजकारण्यांचे व खाणमालकांचे खिसे भरतील; पण त्यामुळे सारी सत्तरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी लोकांनी खाणींचे दुप्षरिणाम ओळखून खाणींना विरोध करावा.
त्यांनी सांगितले की, सत्तरीचा नको त्या पद्धतीने विकास होतोय. होंडा येथील बसस्थानक त्याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या मतांचा सन्मान करावयाचा असतो. त्यांच्यावर दबाव टाकून आपणास हवे ते करून घ्यायचे नसते. काजूच्या बागा, बागायती व शेती तसेच दाबोस येथील पाणीप्रकल्प यांना घातक ठरणाऱ्या खाणी एकदा का वाळपईच्या ग्रामीण भागात घुसल्या की सत्तरीचे सौंदर्य संपलेच म्हणायचे.
खाणींना कुणाचाही पाठिंबा नाही; पण आरोग्यमंत्री खाणींचे समर्थन करतात म्हणून कुणीही जाहीरपणे विरोध करत नाहीत. तथापि, आपली संस्था या सर्व लोकांना खाणींचे दुप्षरिणाम सांगून खाणविरोधी लढ्यासाठी सज्ज करणार आहे. लोकांनी वाळपईतील निसर्गाच्या जतनासाठी, काजूंच्या व कुळागरांच्या तसेच शेतीच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे ते म्हणाले.
आपली संघटना कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. मात्र "खाण समर्थकांना घरी बसवा,' असा प्रचार करणार असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

प्रचार संपला, प्रथमच 'पोल मॅनेजमेंट'चा वापर

वाळपई, दि. १६ (प्रतिनिधी): वाळपई मतदारसंघाच्या १८ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार समाप्त झाला असून यावेळी प्रथमच "पोल मॅनेजमेंट' पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, अशी माहिती निवडणूक अधिकारी जयंत तारी यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली. या नव्या पद्धतीअंतर्गत मतदाराचा फोटो काढला जाईल आणि त्याच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल.
पोटनिवडणुकीत १७९२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ९१०७ पुरुष व ८८०५ महिला मतदार आहेत. एकूण ३१ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्या मतदान केंद्रांवर एक हजारापेक्षा जास्त मतदार आहेत त्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. मतदारांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आलेले नाही. पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, पोस्ट कार्यालयातील मुदतठेव पुस्तक, स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र, पेन्शनची कागदपत्रे, बंदुकीचा परवाना, अपंगत्वाचा दाखला, नोकरीचे कार्ड यापैकी कोणताही दस्तऐवज सोबत आणला तरी त्यास मतदानाची अनुमती दिली जाणार आहे. निवडणुकीसाठी प्रथमच केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. त्यांना विविध मतदान केंद्रांवर तैनात केले जाईल. त्याखेरीज चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात एक मतदान केंद्र अधिकारी, साहाय्यक अधिकारी, खास निरीक्षक आदींचा समावेश आहे. एका अधिकाऱ्याची नेमणूक मतदारांची ओळख पटवण्यासाठी करण्यात आली आहे. काही मतदान केंद्रांसमोर मतदार सुविधा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. सर्व मतदार केंद्रांवर ध्वनिचित्रमुद्रण केले जाईल. उमेदवार व त्याचा प्रतिनिधी असा दोनच गाड्या वापरता येतील. त्यापेक्षा जास्त गाड्या दिसल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मतदारांची ने-आण करण्यासाठी गाड्यांचा वापर करता येणार नाही, असेही श्री. तारी यांनी नमूद केले.